बंधन भाग 26

Love Social Issues

भाग 26
( गेल्या भागात अनघाला पाहायला श्रीकांत आणि त्याचे आईबाबा येतात. श्रीकांतला पाहताक्षणी ती पसंद पडते. दोघांच्याही आईबाबांचा लग्नाला होकार येतो आणि पहिल्याच भेटीत दोघांचं बोलणसुद्धा होतं. वझे मंडळी त्यानंतर तीन चार दिवसांनी साखरपुड्याची तारीख ठरवतात तीही सगळ्यांना आवडते. त्यानंतर भाऊसाहेबांच्या घरी जाऊन अनघा त्यांना साखरपुड्यासाठी निमंत्रणही देते. पाहूया आजचा भाग )

अनघा एन्गेजमेंन्ट ठरल्यामुळे खुश होती आणि रिया तिला चिडवून अजूनच त्रास देत होती. साखरपुड्याची तारीख ठरली आणि श्रीकांतने त्याच्या आईकरवी अनघाचा मोबाईल नंबर मागून घेतला होता. त्यामुळे दोघे आता वॉट्सअॅपवरुन एकमेकांशी बोलायचे अर्थात त्यांचं लग्न पाहुन ठरवून जमलेल्या पैकी होतं त्यामुळे प्रीतीचा बहर वगैरे नव्हता ना सतत एकमेकांना फोनवरुन आय लव यु बोलणं होतं ना रात्री- अपरात्री मेसेजवरुन चॅटिंग करणं होतं. दोघेही एका नोबल प्रोफेशनमध्ये होते त्यामुळे उठसुट एकमेकांना बागबगीचा, कॅफे अश्या ठिकाणी कोणत्याही वेळी इतर 'कपल' सारखं भेटत राहणं त्यांना बरोबर वाटायचं नाही कारण कॉलेजमधले विद्यार्थी कधी कुठे भेटतील सांगता येणं कठीण! त्यातून दोघांचं कॉलेज सकाळी असायचं त्यामुळे रात्री तासनतास मोबाईलवरुन गप्पा मारणही शक्य नसे. पण ते खूश होते. साध्या सरळ स्वभावाचा, हळव्या मनाचा, आपलं काम प्रामाणिकपणे करणारा एखादा मुलगा आपला जोडीदार असावा इतकीच तिची इच्छा होती जी श्रीकांत तिच्या आयुष्यात येण्याने पुर्ण झाली होती.
........................
अखेर 'गुरुकूल ' च्या स्नेहसंमेलनाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली. स्नेहसंमेलनाच्या आधी दोन दिवस कॉलेजला  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दरवर्षीप्रमाणे होता ज्यात वर्षभर कॉलेजमधील विविध स्पर्धा, उपक्रम तसच विविध स्पर्धांतून कॉलेजचं राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी या सगळ्यांचा सन्मान या दिवशी होत असे. अनघा यावर्षी खुश होती कारण तिलाही सर्वोत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. गेल्या वेळी काळेसरांनी हा पुरस्कार स्विकारला तेव्हा आपल्यालाही एक दिवस अशी शाबासकी मिळवायचीय अस मनातून तिला वाटलं पण ती इच्छा एवढ्या लवकर पुर्ण होईल अस वाटलं नव्हतं. पारितोषिक वितरण समारंभाला भाऊसाहेब, त्यांच्यासोबत विक्रम, महापौर, शहरातील दुसर्‍या एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य, करंबेळकर सर, निंबाळकर सर व्यासपिठावर उपस्थित होते. त्या प्रत्येकाच्या हातून बक्षिस स्विकारताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आनंद त्यांच्या आशा आकांक्षाना बळ देणारा होता. 'बेस्ट टिचर अॉफ दि इयर ' अशी अनाउन्समेंन्ट सुत्रसंचालन करणार्‍या वर्दे मॅडमकडून झाली आणि अनघाने दोन क्षण डोळे बंद केले. तिचं नाव मोठ्याने पुकारल गेलं.ती स्टेजवरती चढली आणि टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. व्यासपिठावरचे सर्व मान्यवर उभे राहिले. भाऊसाहेबांच्या हस्ते तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. योगायोगाने त्यांच्याच डिपार्टमेंन्टला तृतीय वर्षाला असणार्‍या किमया पुजारीला 'स्टुडंन्ट अॉफ दि इयर' अवॉर्ड मिळालं. आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक पाहायला प्रत्येक शिक्षकाला आवडतं त्यामुळे अनघाचा आनंद द्विगुणीत झाला. तिला कधी एकदा कार्यक्रम संपतोय आणि घरी जाऊन आईला ट्रॉफी दाखवते असं वाटत होतं. दोन तासांचा कार्यक्रम उपप्राचार्यांच्या समारोपाच्या भाषणाने संपला. त्यानंतर काळेसर, खंदारे मॅडम आदी प्राध्यापकांनी अनघाचं अभिनंदन केलं.
.......................
ती घरी आली तीच लहान मुलांसारखी ट्रोफी हातातून नाचवत आली. ते पाहून आईला शाळेत जाणारी छोटी अनघा आठवली. श्रीधर आणि कुमुद खुश झाले. रियाने हौसेने ती ट्रोफी हॉलच्या शोकेसमध्ये ठेवून दिली. 
"काय मग अनघा मॅडम खुश ना एकदम !" श्रीधरनी तिला विचारलं.
" हो बाबा I'm sooo happy आत्ता खूपच चांगलं काम केलं पाहिजे. बक्षीस म्हटलं की अपेक्षा आल्या अपेक्षा म्हटलं की जबाबदारी आलीच नाही का!" ती म्हणाली त्यावर हो ओ मॅडम म्हणत आईबाबांनी माना डोलावल्या. सगळ्यांसाठी काहीतरी गोड पदार्थ बनवावा म्हणून कुमुद किचनमध्ये गेली. अनघाही तिच्या रुममध्ये गेली. तिला श्रीकांतला ही बातमी सांगायची होती.
......................
तिने कपडे बदलले आणि रुममध्ये येऊन दोन दिवसांनंतर असणार्‍या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी कोणती साडी नेसावी त्याचा विचार करित कपाटातले ड्रेस आणि साड्या बेडवरती मांडल्या. इतक्यात रिया आली.
" ए वाव! काय चाललय श्रीकांत सोबत डेट वगैरे आ !" ती बेडच्या कोपर्‍यावरती बसली.
" नाही गं त्याचा कॉल आलेला का?" अनघाने उत्सुकतेने विचारलं.
" छे! बुवा आम्हाला कश्याला येईल फोन तुला करेल ना" ती तिला चिडवीत म्हणाली.
" हो पण नाही आला ना असो " ती खट्टु चेहर्‍याने मोबाईलकडे पाहत म्हणाली तेवढ्यात रियाने मोबाईल हातातून ओढून घेतला आणि मोबाईलमधली पिक्चर गॅलरी ओपन करुन इमेजेस पाहू लागली. त्यात सकाळच्या पारितोषिक वितरणसमारंभाचे फोटोज होते. तिने त्या फोटोचं निरिक्षण करित विचारलं.
" ए ताई Who is this handsome guy?" 
" कोण ?" अनघा कपाटातले कपडे बाहेर काढण्यात बिझी होती.
" हाच गं भाऊसाहेबांच्या शेजारी "
" हा ते विक्रम सर भाऊसाहेबांचा मोठा मुलगा " तिने असं म्हणताच तिच्या लक्षात आलं कि दरवर्षी ज्या प्रोफेसरना बेस्ट टिचिंगचं अवॉर्ड मिळतं त्यांना विक्रम केबिनमध्ये भेटायला बोलावतो आणि त्याच्याकडून शुभेच्छा म्हणून एका  एन्वलप मध्ये थोडीशी रक्कम आणि स्वतः हाताने बनवलेलं ग्रीटिंगकार्ड सोबत देतो. गेल्या वर्षी काळेसरांनाही मिळालं होतं पण आपल्याला का नाही मग बोलावलं असा प्रश्न तिला पडला पण विसरले असतील म्हणत तिने तो विचार बाजूला सारला.
" ओ Nice look ना! ए फोटोत इतका भारी दिसतोय प्रत्यक्षात कसा आहे गं?" रियाने विचारलं.
" छान आहे त्यांची पर्सनॅलिटी. मी एकदाच गेलेले केबिनमध्ये भेटायला " अनघा ड्रेसेसचं आता निरिक्षण करित होती.
" Okkk भारीच ना पण ए हा जिच्या प्रेमात पडेल ती सॉल्लीड लकी असेल ना! म्हणजे बघ ना राजेशिर्केंसारखी मोठी फॅमिली, भाऊसाहेब तर माजी आमदार, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बरं याचे आजी आजोबा समाजसेवक वगैरे त्यातून हा परदेशातून शिकून आलेला इतका हँन्डसम आणि एवढ्या मोठ्या कॉलेजचा मॅनेजींग डायरेक्टर कसलं भारी ना!" ती स्वप्नाळू नजरेने बोलत होती तसं पुरे हा म्हणत अनघाने मोबाईल तिच्या हातून काढून घेतला.
" जरा जमिनीवर याल का आपण? मला सांग ना मी गॅदरिंगला काय घालू ड्रेस की साडी नेसु ?" 
" O My Dear साडी नेहमीच वापरतेस तसही गॅदरींगला प्राध्यापकांना जरा सुट असते की ड्रेस बघ ट्राय करुन" असं म्हणत बेडवरच्या ड्रेसेसचं निरिक्षण करित रिया म्हणाली,
" हा बघ छान गुलाबी कलरचा पटियाला छानच एमब्रॉयरडरी आहे याच्यावर दुपट्टा पण बघ ना जाळीदार वेलबुट्टीची डिझाईन मस्त आहे हा!" ती ड्रेस हातात घेत म्हणाली.
" ओके मी बाकी सगळ्याजणींना विचारते त्यांचं काय काय ठरलय थँक्स हा " अनघा सगळे ड्रेसेस उचलून कपाटात ठेवत म्हणाली. सद्या ती खूप खूश होती आणि माणूस आनंदी असलं की आपसुकच छान रहावं दिसावं अस वाटत तसच काहीस तिचं झालं होतं.
........................
दोन दिवस पटकन निघून गेले आणि गॅदरींगचा दिवस उजाडला. सकाळी कॉलेज लवकर सुटलं होतं त्यामुळे दुपारी तिने थोडा वेळ घरी विश्रांती घेतली. गॅदरिंगचा कार्यक्रम रात्री कधी संपेल याची काही निश्चिती नव्हती.अनघाचं घर कॉलेजपासुन दूर होतं त्यामुळे एवढ्या रात्री घरी येण्यापेक्षा कॉलेजमधला कार्यक्रम संपला की खंदारे मॅडमसोबत त्यांच्या घरी जायचं. त्यांचं घर कॉलेजपासुन पंधरा मिनिटाच्या अंतरावरती होतं त्यामुळे रात्री तिथे थांबून सकाळी फ्रेश होऊन घरी यायचं असं तिने ठरविलं होतं आणि आईबाबांनाही सांगितलं. संध्याकाळी तयारी करुन अंधार पडण्याआधीच ती कॉलेजला गेली. खंदारे मॅडमच्या घरी पोहचल्यावर फोन कर आठवणीने अस आईबाबांनी सांगितलं. ती डोन्ट वरी म्हणाली. तिला अस फुलपाखरासारखं उड्या मारताना पाहून आईबाबांना बर वाटत होतं लेक तिच्या कामात यश मिळवत होती सोबत सोन्यासारखा जावई त्यांना मिळाला होता त्यामुळे खूप समाधानी होते ते.
......................
रात्री आठच्या सुमारास कार्यक्रम सुरु होणार होता. कॉलेजचा हॉल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गच्च भरला होता. पहिल्या रांगेत शहराचे महापौर, भाऊसाहेब, विक्रम, प्राचार्य, उपप्राचार्य, शहरातली इतर काही मान्यवर मंडळी यांना बसण्याकरिता खुर्च्या मांडल्या होत्या. त्यामागे प्राध्यापकमंडळींच्या बैठकीची व्यवस्था केलेली होती. अनघाने कार्यक्रमाचा पास गेटवरती दाखवला आणि ती हॉलमध्ये आली. अजून पहिल्या रांगेतील खूर्च्या रिकामी होत्या. तिने इकडे तिकडे पाहिलं तर प्राध्यापक बर्‍यापैकी बाहेर रेंगाळत होते. काही सिनिअर प्राध्यापक त्यांच्या फॅमिलीसोबत आले होते त्यामुळे त्यांची आपापसात बोलणी सुरु होती. वेगवेगळ्या कॉश्मुममधले विद्यार्थी त्यांच्या कार्यक्रमांच्या मेकअप आणि पोशाखांमुळे ओळखु सुद्धा येत नव्हते. त्यांची इकडेतिकडे धावाधाव सुरुच होती.  सुत्रसंचालन करणारी मुलं स्टेजवरती माईकटेस्टींग करत होती तर ग्रुपडान्स करणारी मुलं स्टेजवरती उभे राहून त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या जागा,अँगल चेक करित होते. अनघा येऊन तिच्या चेअरवरती बसली. टाईमपास म्हणून तिने फेसबुक ओपन केलं. आदल्याच दिवशी ' Geeting enganged soon ' अशी पोस्ट तिने टाकली होती पण श्रीकांतचं नाव टाकलं नव्हत त्यामुळे तिच्या वर्गमैत्रीणींच्या उत्सुकतेपोटी अनेक कमेंन्ट्स आल्या होत्या त्या वाचून तिला मजा वाटली. घरुन निघताना तयारी झाल्यानंतर तिचा ड्रेसमधला छानसा फोटो रियाने काढला होता जो तिने आता बसल्या बसल्या फेसबुकला अपलोड केला. इतक्यात खंदारे मॅडमची हाक आली तिने वरती पाहिलं तर त्या तिच्याच दिशेने येत होत्या त्यांच्यासोबत साधारणतः पंचवीस सव्वीस वयाचा एक मुलगाही चालत येत होता. त्या तिच्याजवळ येताच ती मोबाईल हातात ठेवून उभी राहिली.
" हॅलो अनघा एकटीच काय बसलीस अशी ?" त्या म्हणाल्या.
" नाही जस्ट आत आले. " 
" ओके, अरे तुमची ओळख करुन देते हा राजेश! सामंतसरांचा मुलगा." त्या म्हणाल्या.
" ओ हाय " ती त्याच्याकडे आता लक्ष देत म्हणाली.
" हाय Glad to meet you " तो शेकहँन्डसाठी हात पुढे करित हसत म्हणाला. ' तर ही अनघा काय! अनघा मॅडम भेटुच या आज रात्री !' तो मनातून म्हणाला पण चेहर्‍यावरचं स्माईल त्याने तसच ठेवलं. 
क्रमशः

🎭 Series Post

View all