बंधन भाग 32

Love Story,Social Issues

 भाग 32

( गेल्या भागात नीतू विक्रमला सॉरी म्हणते. नीतूसोबत बोलून त्याला बरं वाटतं. श्रीकांत रियाला फोन करतो पण ती थापा मारून वेळ मारून नेते. अनघा बाबांसोबत पोलीसस्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून येते. अस्वस्थ असणारा विक्रम मात्र खंदारेमॅडमना अनघाची चौकशी करायला सांगतो. पाहुया पुढे)

भाऊसाहेबांनी स्कील डेव्हलपमेंन्ट प्रोग्रॅमच्या कामाविषयी माहिती घेण्यासाठी प्राध्यापकांची मिटिंग बोलावली होती. सर्वांना त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मिट टर्म परिक्षा, त्यानंतर दिवाळीसुटी मग स्नेहसंमेलनाची तयारी यात स्कील डेव्हलपमेंन्ट प्रोग्रॅमचं काम बाजूलाच राहिलं होतं. नव्या वर्षात हा प्रोग्रॅम कॉलेजमध्ये सुरु व्हावा यासाठी लवकर ते काम आटोपाव अशी त्यांची इच्छा होती. मात्र मिटिंगला अनघा त्यांना दिसली नाही. तिच्या डोक्यातून आलेली ही आयडिआ आणि तिच गैरहजर हे जरा त्यांना विचित्र वाटलं म्हणून त्यांनी खंदारेमॅडमना विचारलं. मॅडमनी ती आजारी आहे आणि दहा दिवसांच्या रजेवरती आहे अस त्यांना सांगितलं. ते ऐकून त्यांनी तिला भेटुन चौकशी करावी म्हणून तिच्या घरी जाण्याचं ठरविलं.

.........................

" भाऊसाहेब तुम्ही आज अचानक इकडे!" त्यांना दारात पाहताच अनघाच्या आईला आश्चर्य वाटलं. इतक्यात अनघाचे बाबाही बाहेर आले.

" अरे भाऊसाहेब या ना आत " श्रीधर त्यांचं स्वागत करित म्हणाले. ते आत आले. कुमुदने त्यांना प्यायला पाणी दिलं. ते अचानक आलेले त्यामुळे आईबाबांना टेन्शन आल होतं.

" बर अनघा काय म्हणते? इतकी कशी आजारी पडली हो परवा परवा पर्यंत आमच्या घरी उड्या मारित आली होती." भाऊसाहेब पाण्याचे घोट घेत कौतुकाने बोलले. त्यावर कुमुदला राहवलं नाही. सात एक दिवसांपुर्वीची खुप खुश असणारी, घरभर हसणारी खिदळणारी अनघा तिला आठवली आणि तिचे डोळे भरुन आले.

" हे काय तुम्ही असे शांत! कसला विचार करताय?काही अडचण आहे का ?" भाऊंनी श्रीधरकडे पाहत विचारलं.

भाऊंच्या त्या मायेच्या शब्दांनी श्रीधरने इतके दिवस डोळ्यात साठवुन धरलेले अश्रु ओघळले.

" साहेब माझ्या लेकीचं आयुष्यचं संपल हो! खरंच आता काही नाही उरलं. " ते बोलायला लागले.

" काय काय झालं श्रीधर तुम्ही आधी शांत व्हा." भाऊ म्हणाले तस घडलेला सगळा वृत्तांत त्यांनी भाऊसाहेबांना सांगितला. गेले काही दिवस जी गोष्ट ते सगळ्यांपासुन लपवत होते. जी गोष्ट कोणाला समजू नये म्हणून आटापिटा करित होते तेच त्यांनी सगळ भाऊसाहेबांना सांगून मन मोकळ केलं. भाऊंना हे ऐकुन धक्का बसला पण त्यांनी स्वतःला सावरत श्रीधरची समजुत घातली. 

" बिच्चारी! श्रीधरराव तुम्ही माझ्याकडे मन मोकळं केलत मला बरं वाटलं. मीही एका मुलीचा बाप आहे तुमचं डोंगराएवढं दुःख समजु शकतो मी. एका शब्दानेही तुम्ही बोलला नाहीत हो आम्हाला सगळ्यांना ती आजारी आहे असच वाटत होतं." ते म्हणाले.

" नाहीतर काय सांगणार होतो आम्ही तरी सगळ अस अचानक घडलं. कॉलेजमध्ये तिचं एवढं कौतुक होत होतं. श्रीकांत आणि तिचा साखरपुडा अवघ्या पंधरा दिवसांवर आला होता इतकी खूश होती ती आणि आख्खं आयुष्यच उलटपालटं झालं." श्रीधर बोलता बोलता दोन्ही हातात डोक धरुन रडू लागले.

" श्रीधरराव शांत व्हा. तुम्ही दोघांनी अस खचुन नाही चालायचं. " भाऊसाहेब त्यांच्या हातावर थोपटत कुमुदकडे पाहत म्हणाले.

" हो तुमचं सगळ पटतय हो पण जे घडलय ते विसरणं सोपही नाही ना!" कुमुद पदराने डोळे पुसत म्हणाली.

" तुम्ही आधी स्वतःला त्रास नका करुन घेऊ. यात तुमची किंवा तिची काहीच चूक नाही हो चुक असेल तर त्या नालायकाची आहे. स्त्रीला सगळ्यात जीव की प्राण तिचं चारित्र्य त्यावरच घाला घातला की ती संपते हे माहित झालय या असल्या लोकांना म्हणून मग हे असलं काहीतरी वागायचं सुचतं यांना." भाऊसाहेब म्हणाले आणि त्या दोघांनाही समजावून काहीही गरज लागली तर सांगा असं बोलून ते तिथून निघाले. हा सगळा प्रकार त्यांच्यासाठीही  धक्कादायक होता.

अनघाला त्रास नको म्हणून तिला न भेटताच ते तिच्या घरुन निघून आले. अनघाला मात्र आईकडुन भाऊसाहेब घरी आले होते आणि बाबांनी त्यांना सगळ काही सांगून टाकलं हे कळलं तेव्हा ती चिडली पण आईने तिला समजावलं. भाऊसाहेबांना अनघाची काळजी आहे म्हणून ते इथवर स्वतः आले मग त्यांच्याशी खोटं बोलणं बरं नाही म्हणून आईबाबांनी त्यांना सांगितल होतं. आईने समजावल्यामुळे ती थोडी शांत झाली.

..............

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी अरुंधती आणि तिच्या मैत्रिणींनी न्यु इयर पार्टिचा प्लॅन केला होता. अलिकडे अरूंधती आणि राजेश्वरी दोघी जणु घरचे संबंध असल्यासारख्या एकमेकींसोबत इतर मैत्रीणींच्या सगळ्या घरगुती समारंभांना, पार्टिजना वावरायच्या. यामुळे अरुंधतीचा समिहाला सुन बनवुन घेण्याचा विचार आहे अशी चर्चा आता त्यांच्या फ्रेंड्स सर्कलमध्येही सुरु झाली होती. मैत्रीणी यावरून अरुंधतीची अगदी समिहा समोर थट्टामस्करीही करायच्या पण भाऊसाहेबांसमोर हा विषय काढण्याचं धाडस अरुंधतीने अजुनतरी केलं नव्हतं त्यामुळे तूर्तास तरी ती नुसतच हसुन गप्प बसायची. राजेश्वरीलाही अरुंधतीच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज येत होता. अरूंधतीने उघडपणे समिहा किंवा राजेश्वरीकडे विक्रमविषयी विषय काढला नव्हता तरीही कुठल्याही क्षणी अरुंधती आंन्टी आपल्याला ' विक्रम तुला आवडतो का?' अस विचारेल या कल्पनेत समिहा वावरत होती. तिलाही विक्रम आवडत होताच. न्यु इयरच्या पार्टीचा प्लॅन बनवण्यासाठी काही मैत्रीणी अरुंधतीकडे येणार होत्या. अरुंधतीने समिहालाही त्यानिमित्ताने घरी बोलावलं होतं.

....................

आपल्या लाडक्या मम्माच्या डोक्यात काय चालू आहे याची विक्रमला मात्र कल्पना नव्हती. गॅदरिंगच्या दिवसापासुन तो घरीही जास्त कोणाशी बोलत नव्हता. पण त्याचा मुडी स्वभाव किंवा कॉलेजमध्ये काहीतरी प्रोजेक्ट वरती काम सुरु असेल असा विचार करुन नितू आणि जितेंद्रनेही त्याला काही विचारलं नाही. त्याचं काहीतरी बिनसलय असं आत्याला मनातून वाटत होतं पण तिने तस काही त्याला विचारल नाही. भाऊसाहेब त्यांच्या कामांमध्ये व्यग्र असल्याने घरातल्या सगळ्याच गोष्टींकडे त्यांना लक्ष देता यायच नाही. सकाळी नाश्याला असले तर रात्री जेवणाला नाहीत. एक दिवस घरी असले तर चार दिवस मतदारसंघात नाहीतर दौरावर अशी स्थिती. अरुंधती तर तिचं शॉपिंग, पार्टी, वाचन यातच रमलेली  असायची त्यामुळे विक्रमच्या अस्वस्थतेकडे कुणाचं लक्ष नव्हतं त्यामुळे तोही निर्धास्त होता. त्याचं नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठणं, जीमला जाणं, कॉलेजला जाणं सुरुच होतं फक्त एकच त्या प्रसगांमुळे तो अस्वस्थ होता. न्यु इयरची पार्टीही त्याने दरवर्षीसारखी मित्रांसाठी अरेंन्ज केली नाही ना कोणाला शुभेच्छा द्यायला फोन केले होते. सद्या काहीही वेगळ करण्याची किंवा काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करायची त्याची इच्छाच नव्हती. आपण कुणाचं तरी लाईफ अंधारात लोटलय आणि स्वतः एन्जॉय करतोय या भावनेनच त्याने काहीही प्लॅनिंग केलेलं नव्हतं. 

नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी तो तयार होत होता. फुल स्लिव्हजच्या शर्टच्या हाताला असणारी बटन्स त्याने व्यवस्थित लावली. रिस्ट वॉच हातात नेहमीप्रमाणे घातलं. ब्लेझर चढवला. हेयर स्टायलिंग ब्रश केसांवरती फिरवला. त्याच्या नेहमीच्या फेवरेट पर्फ्युमची बॉटल टेबलवरुन हातात घेतली आणि पफ्युर्म ब्लेझरवती मारला. त्या गंधाने त्याला उत्साही वाटलं. त्याने एकदा आरश्यात पाहिलं आणि नेहमीप्रमाणे एक स्माईल दिली. इतक्यात त्याच्या मागे कुणीतरी उभ असल्याचा त्याला भास झाला. अंगावरती हिरवी नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, कपाळावर भरलेला मळभट त्या चेहर्‍याचं प्रतिबिंब स्पष्टपणे त्याला त्याच्यासमोरच्या आरश्यात दिसत होतं. पण त्या चेहर्‍यावरच प्रखर तेज त्याच्या डोळ्यांना झेपेना. उन्हातून चालताना हात सुर्यकिरणांपुढे धरावा त्याप्रमाणे त्याने डोळ्यांसमोर हात धरला. त्याला काय होतय काहीच समजेना.

" बाई कोण तुम्ही आणि आत कश्या आलात?" त्याने तिच्या चेहर्‍यावरच्या प्रखर तेजाकडे पाहत विचारलं.

" मी कोण तुला काय वाटतं ?" त्या बाईने विचारलं.

" आपण या आधी भेटलो असलो तरी मला आठवत नाही." त्याने म्हटलं.

" हं कस आठवणार कारण पुरुषाला जन्मही मीच देते आणि तोच मला विसरतो नेहमीचच आहे. तुही त्याला अपवाद नाहीस." ती बाई म्हणाली.

" म्हणजे मला काही समजलं नाही पण तुम्ही आहात तरी कोण?" त्याने पुन्हा विचारलं. त्या चेहर्‍यावरच प्रखर तेज त्याच्या डोळ्यात खुपत होतं.

" मी कोण? समज तुझ्या सोयीने तुला जे वाटेल ते! भवानी, दुर्गा, चंडिका नाहीतर जानकी, द्रौपदी,कुंती नाहीतर मग जिजाऊ, सावित्री नाहीतर नकोच निर्भया म्हण कारण हल्ली त्याच नावाने जास्त ओळखतात मला!" ती बाई निर्विकारपणे म्हणाली.

" हे काय म्हणताय तुम्ही! तुम्ही अगोदर आतमध्ये कश्या आलात?" त्याला त्या बाईचं बोलण कळेना.

" मी आत कशी आले! आत यायला मी कुठे जाते रे इथेच तर असते प्रत्येकाच्या घरात आई, मावशी, काकी, ताई सगळ्याजणींमध्ये माझाच तर अंश असतो." 

"बरं पण म्हणणं काय आहे तुमचं लवकर सांगा. मला उशीर होतोय." तो रिस्ट वॉचमध्ये पाहत म्हणाला.

" हं उशीरच तर झालाय तुमच्यासारख्या वृत्तीच्या माणसांना धडा शिकवायला! उशीरच तर झालाय न्यायासाठी पायर्‍या झिजवणार्‍या कित्येकिंच्या पदरात न्याय पडायला." 

" बाई, तुम्ही काय बरळताय?" त्याने म्हटलं.

" मी काय बोलतेय ते तुला माहितीय. विचार ना तुझ्या अंतरमनाला. एका हसत्या खेळत्या लेकीचं आयुष्य तु उद्धवस्त केलस आणि ताठ मानेने विचारतोस." ती बाई धारदार नजरेने म्हणाली तस त्याला त्या रात्रीची अनघाच्या डोळ्यातली आग आठवली. 

" ते ते माझ्या हातून चुकुन झालं किंबहुना रागाच्या भरात झालेली चूक होती ती!" तो नजर खाली करीत म्हणाली.

" चूक ! इतकं साधी गोष्ट वाटली ही तुला! हा अक्षम्य गुन्हा आहे. इतकं साधसोप वाटत का तुम्हा पुरुषांना एखादीच्या शरिराशी खेळुन, मनाशी खेळुन तिला फेकून द्यायचं. तीही माणूसच आहे ना. जनावरासारख वागताना काहीच नाही वाटत का मग माणूस म्हणवुन घ्यायचीच योग्यता नाही तुझ्यासारख्या पुरुषांची." ती म्हणाली.

" बस बस. Stop it I say " त्याने दोन्ही कानांवरती हात ठेवत डोळे बंद केले. क्षण दोन क्षण गेले आणि आवाज आला.

" विक्रम What happened ?" दारातून आवाज कानावरती आला तसे त्याने डोळे उघडले तर आजूबाजुला कोणीच नव्हतं. त्याने आरश्यात पाहिलं तर ती बाई नव्हतीच. दारात समिहा उभी होती. ती चालत आत आली. तसा तो तिच्याकडे वळला.

" Nothing, Hi How're you ?" त्याने म्हटलं.

" Absolutly fine dear " ती त्याला हग करण्यासाठी पुढे येत म्हणाली. तसा त्याने दोन्ही हात उंचावत ओके म्हटलं आणि तो मागे सरकला. 

" ओके आज इकडे कशी तू ?"

" आन्टीसोबत न्यु इयर पार्टीचं प्लॅनिंग. You must come हा!" ती हसत म्हणाली.

" Thanks but not possible. I'm busy" तो रुक्षपणे म्हणाला.

" ए काय रे विक्रम एवढं न्यु इयर आहे.Let's enjoy ना ! सारखं काय काम काम. प्लीज ना रे!" ती त्याचा हात धरत म्हणाली.

" समिहा प्लीज, Aren't you get it? " तो हात तिच्या हातातून सोडवून घेत म्हणाला. इतकं गोड बोलूनही हा माणूस ऐकत नाही इतका कसला अॅटीट्युड असा विचार तिच्या मनात येत होता.

" Ok Then bye " ती चेहर्‍यावरती हसु आणित बोलली.

जाताना दरवाज्यातून ती पुन्हा मागे वळली.

"You can come if you wish byeee " एवढं बोलून ती खाली हॉलमध्ये गेली.

ही मम्माचीच आयडिआ असणार अस त्याला वाटलं. पण त्याला आता तरी कोणाला कमिंटमेंन्ट द्यायची नव्हती. मम्मा आपल्यासाठी समिहाचा विचार करतेय हे त्याला लक्षात आलं. आपल्या हातून आधीच एवढी मोठी चुक घडलेली असताना ते सगळ विसरुन दुसर्‍या एखादीशी गोड गोड वागण, तिला प्रोमिसेस देण, लग्नासाठी होप्स दाखवणं त्याला नको वाटत होतं. उगीच कुणाला फसवण्याचं अजुन ओझं त्याला नको होतं म्हणून तू समिहाचा विचार करू नकोस अस अरुंधतीला सांगण्याचं त्याने ठरवलं. तो खाली हॉलमध्ये आला तेव्हा समिहा आणि अरुंधती हॉलमध्येच गप्पा मारित बसल्या होत्या. तो लक्ष न देता पुढे जाऊ लागला तशी अरुंधती सोफ्यावरुन उठून पुढे आली.

" विक्रम निघालास? " 

" हो मम्मा. अॉलरेडी लेट झालाय चलो You carry on Bye" एवढ बोलून तो निघून गेला. तशी समिहा अरुंधतीकडे पाहत म्हणाली,

" अॉन्टी, हा असा का वागतो विचित्र माझ्याशी? "

" विचित्र नाही ग. तो कामाला फस्ट प्रेफरन्स देतो इतकच आणि त्याच्या दिसण्यावरती जाऊ नका हा मुलींशी fliert वगैरे नाही करायला आवडत त्याला!" अरुंधती हसत म्हणाली.

" हं, पण त्याच्या मनात दुसरी कुणी नसेल ना!" समिहाने शंका बोलून दाखवली. इतका हँण्डसम, जिनियस मुलगा आणि त्याच्या आयुष्यात कुणीच नाही हे तिला पटत नव्हत.

" चल काहीतरी काय अस नाही आहे काही! तू भलते विचार करु नको. चल आपण आपलं प्लँनिंग करु." अरुंधती तिला समजावित म्हणाली.

...................

" हॅलो कुमुदताई मी बोलतेय निर्मला " अचानक श्रीकांतच्या आईचा फोन पाहुन कुमुदला भितीच वाटली.

" हा बोला ना निर्मलाताई." ती स्वतःला सावरत म्हणाली.

" अहो बोला काय! साखरपुडा दहा दिवसावर आलाय तयारी नको का करायला! मी म्हटल तुम्ही फोन कराल शेवटी मलाच चैन पडेना म्हटल बघुया तुम्ही काय म्हणताय?" समोरून श्रीकांतची आई उत्साहात बोलत होती.

" अ म्हणजे हो मी करणारच होते तुम्हाला." 

" राहु द्या हो! मी केला काय तुम्ही केला काय एकुण एकच. मग कधी साड्या,अंगठी खरेदी करुया म्हणताय?" त्यांनी सरळ विषय काढला.

" अ हो हो... मी मुलींशी बोलते ना रिया सोबत असली तर बर होईल मला. बघते मी कळवते तुम्हाला." कुमुदने म्हटलं.

" बरं आणि हो तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा." 

" हो तुम्हाला पण बर ठेवु का ?" कुमुदला फोन ठेवण्याची घाई झाली होती.

" हो हो ओके बाय." म्हणत श्रीकांतच्या आईने फोन ठेवला आणि कुमुदला आता साखरपुड्याचं टेन्शन यायला लागलं.सगळ नीट होउ दे म्हणत तिने प्रार्थना केली.

क्रमशः

Psychology मध्ये अशी एक संकल्पना आहे कि आपण सतत तोच तोच विचार केला कि आपल्या मनातले विचार अगदी दिवास्वप्न बनतात. विक्रम सद्या त्याच त्या घटनेचा इतका विचार करतोय आणि स्वतःची चूक स्वतःशीच मान्य करतोय त्याच्याचं मनांचं द्वद्वं सध्या सुरु आहे. त्याचे हेच विचार आदीशक्तीच्या रुपात त्याच्यासमोर येतात. यातली बाई म्हणजे भवानी मातेचं दुर्गेचं एक रुप आहे. हा हटके प्रयत्न कसा वाटला जरूर सांगा.Like, Comment, Share with name.

🎭 Series Post

View all