बंधन भाग 34

Love, Social isues

भाग 34

( गेल्या भागात अनघाची रजा संपते आणि ती कॉलेजला जायला पुन्हा सुरुवात करते. कॉलेज पुर्वीसारखच असत पण तिच्यातला बदल पाहुन अनेकांना प्रश्न पडतात. अनघाचे बाबा यासगळ्याविषयी सांगण्यासाठी श्रीकांतच्या घरी जातात आणि साखरपुडा फिक्स असल्याची आनंदाची बातमी घेउन घरी येतात. पाहुया आज श्रीकांतसोबतचं नातं पुढे जातं कि नाही.)

श्रीधर आणि कुमुदने साखरपुडा ठरल्या तारखेलाच होणार असल्याची बातमी अनघाला सांगितली सोबतच श्रीकांतच्या आईवडिलांसोबतच बोलणंही तिला श्रीधरनी स्पष्टपणे सांगितलं. श्रीधररावांना खुप अभिमान वाटत होता इतकी समजूतदार माणसं आपल्या लेकीच्या सासरी असणार आहेत याचा. एवढ्या मोठ्या वादळानंतर आलेली हि सुखाची सर त्यात चिंब भिजावस वाटत होत तिच्या आईबाबांना. रियाही ताईच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहून खुश झाली.

" ताई श्रीकांत किती चांगला आहे गं." आईबाबांनी साखरपुड्याची बातमी सांगितल्यानंतर रिया खुशीत गप्पा मारायला अनघा जवळ येऊन बसली होती.

" हं खरंच ग्रेट आहेत ते. पण रियु मला भिती वाटते गं." अनघा तिचा हात हातात घेत म्हणाली.

" कसली भिती आता अजिबात घाबरायचं नाही सगळं छान होईल बघ आणि त्या नालायकालासुद्धा लवकरच शिक्षा होईल." रिया तिला धीर देत म्हणाली. प्रचंड राग होता तिच्या नजरेत.

" हो तरीपण मला ना भिती वाटते खुप सगळ्याचीच सजण्याची- नटण्याची सारखं वाटतं आजुबाजुचे सगळे पुरुष माझ्याकडेच नको त्या नजरेनं बघतायत. कोणासोबत बोलायलाही नको वाटतं, वाटतं हा माणूस आपल्याला भुलवेल फसवेल कि काय. शेजारून चुकुन जरी एखाद्याचा धक्का लागला तरी मुद्दामहुनच तो वागला तस अस वाटतं. पुरुषांच्या स्पर्शाची, त्या नजरेचीपण किळस वाटते मला. वाटतं कुणीच नको आजुबाजुला." ती बोलत होती. पहिल्यांदा गेल्या दहा पंधरा दिवसात तिने कोणाकडे तरी मन मोकळं केलं होतं.

" ताई, यावरती काळासारखं दुसरं औषध नाही. श्रीकांत तुझ्या आयुष्यात आला की बघ सगळं किती छान होईल. मग त्याला सोडून इकडे येणारपण नाहीस तु!" तिला हसवण्यासाठी रियाने तिला नेहमीसारखं चिडवलं.

" हं बघु " म्हणत ती अंधुकस हसली. रियाच्या लक्षात येत होतं ताईला याचा किती मोठा धक्का बसला आहे. तिचं दिसण असणं सगळच कोमेजून गेलय. हसणही पुर्वीसारखं छान निखळ उरलेलं नाही त्यातली अगतिकतेची, वेदनेची किनार रियालाही दिसत होती. पण ती दररोज स्वतःला हेच समजावत होती कि आपल्या माणसाची साथ सगळ्या जखमा झेलायचं बळ देते आणि आपल्या ताईच्याही बाबतीत तसच होईल.

.................

कुमुद, श्रीधर, रियाने साखरपुड्याची तयारी करायला सुरुवात केली. श्रीकांतच्या आईने आधी  हौशीने साड्या घेतल्या होत्या शिवाय लग्नासाठी दागिन्यांच्या डिझाईन्ससुद्धा पाहायला सुरुवात केली होती. रिया आणि कुमुदने मार्केटला जाऊन अनघासाठी साड्या घेतल्या. निर्मलाताईंसाठीही वरमाईचा मान म्हणून एक छानशी पैठणीसुद्धा खरेदी केली. श्रीकांत आणि जयंतरावांसाठी साखरपुड्यादिवशी द्यायला गिफ्ट्स घेतली. एक दिवस निर्मलाताईंसोबत जाऊन दोघींनी अनघा- श्रीकांतसाठी अंगठ्यांची खरेदी केली. निर्मलाताई तर इतक्या उत्साहात होत्या कि लग्नाच्या तयारीचं बरचस प्लॅनिंग त्यांनी आतापासुनच करायला सुरुवात केली होती. दागिने कुठे करायचे, साड्यांची शॉपिंग कुठे करायची इथपासुन अनघाची लग्नातली मेहंदी, मेकअप सगळच त्यांनी कस करता येईल याचं प्लॅनिंग कुमुदला ऐकवलं होतं. कुमुदही आपल्या लेकीला इतकी छान माणसं मिळाली म्हणून मनातून देवाचे आभार मानत होती. अनघाला आईबाबांना खूश पाहून बरं वाटलं. त्यात समाधानाची गोष्ट ही होती कि झाल्या घटनेविषयी बोलणं, त्याचा सारखा उच्चार करणं हे निर्मलाताई, जयंतरावांनी टाळलं होतं. श्रीकांतही काहीच झालं नाही आहे याचप्रमाणे अनघाशी वागत होता त्यामुळे तिलाही जरा हायसं वाटत होतं.

...................

साखरपुड्यासाठी ठरलेली वीस तारिख अखेर उजाडली. सकाळी श्रीधर कुमुदने लवकर उठुन सगळं आटोपलं. घर छान, प्रसन्न दिसावं म्हणून सोफ्यावरचे उश्यांचे अभ्रे, डायनिंगटेबलवरचा टेबलक्लॉथ, फुलदाणीतली फुलं सगळं कुमुदने आदल्या दिवशी बदललं त्यामुळे सगळ्या वस्तू अगदी नवनव्या लकलकीत दिसत होत्या. सकाळी आईने घरभर उदबत्ती फिरवली. त्या सुगंधाने घर प्रसन्न झालं. सगळ्यांनी आंघोळ, नाश्ता लवकर आटोपून घेतला. रियाने ताईला सजवायला मदत केली. अनघाची सजण्याधजण्याची गेल्या वेळेसारखी इच्छाच नव्हती पण रिया आणि आईच्या आग्रहामुळे ती तयार झाली. आईने पाहुण्यांना द्यायच्या भेटवस्तू हॉलमध्ये टेबलवरती आणून ठेवल्या. घरुन निघण्यापुर्वी श्रीकांतच्या बाबांनी ते सगळे निघाल्याचा फोनही केला. अनघाने आठवणीने भाऊसाहेबांना निमंत्रणपत्रिका दिली होती त्यामुळे तेही कार्यक्रमासाठी घरच्यासारखे आले होते. पोरीचं आयुष्य कोलमडुन गेलय आता तरी तिला आज हसताना पाहायला मिळेल याची त्यांना खात्री होती.

" अरे साहेब आलात तुम्ही या ना. " भाऊसाहेबांना दारात पाहून आनंदाने श्रीधर म्हणाले.

" वा! घर छान दिसतय आज पाहुणे खूश होणार पाहा." आत येत सभोवार नजर फिरवित ते आनंदाने बोलले.

" हो थँक्यु बसा हा. तुम्ही चहा सरबत काही घेणार का?" कुमुदने विचारलं.

" नको आधी पाहुणे येऊ देत मग त्यांच्यासोबत होईलच चहा." ते नम्रपणे म्हणाले. बरं म्हणत कुमुदने मान डोलावली.

इतक्यात अनघा तयार होऊन बाहेर आली. तिने आईबाबांना नमस्कार केला. मग ती भाऊसाहेबांकडे वळली.

" असु दे गं. आयुष्यमान भव सुखी राहा बाळा." ते मायेने तिच्या डोक्यावरती हात ठेवित म्हणाले. एवढ्यात बाहेर गाडीच्या चाकांचा आवाज आला. श्रीधरराव बाहेर पाहुण्यांना आणण्यासाठी गेले.

........................

जयंत आणि निर्मलाताई श्रीकांतसोबत आत आल्या. कुमुद पुढे आली आणि दारातले पाहुणे आत येण्याआधी निर्मलाताईंच्या कपाळाला हळदकुंकु लावून त्यांचं स्वागत केलं. कुमुदच्या मागे रिया उभी होती. श्रीकांतने नजरेनेच तिला अनघा कुठेय असं विचारलं जे तिच्या बरोबर लक्षात आलं. तिनेही हातानेच त्याला थांबण्याची खूण केली. सगळे आत आले. समोर भाऊसाहेबांना पाहून वझेमंडळींनाही फार आनंद झाला. इतका मोठा माणूस आपल्या लेकाच्या साखरपुड्याला पाहुन श्रीकांतची आई खूश झाली. अनघा गुरुकुलमध्ये काम करते हे त्यांना माहित होतं पण भाऊसाहेब कॉलेजच्या प्राध्यापकांना इतकं आपुलकीने वागवतात हे त्यांच्यासाठी नवीन होतं. शिवाय तेही सांगलीतलेच असल्याने भाऊसाहेबांच्या राजकीय कारकिर्दिचा, त्यांच्या कामाचा त्यांनाही इतरांप्रमाणे आदर वाटायचा. पण प्रत्यक्ष त्यांना कधी भेटता येईल अस वाटल नव्हतं.

" भाऊसाहेब तुम्ही इथे असणं तेही आजच्या दिवशी आमच्यासाठी मोठी गोष्टच आहे ही." जयंतराव त्यांना हात जोडत म्हणाले.

" हो अनुने निमंत्रणपत्रिका दिली होती मग यावचं लागणार त्यांना." अनघाची आई म्हणाली.

" बरं झालं भावी वधुवरांना तुमचे आशीर्वाद आजच मिळतील." जयंतराव म्हणाले तसे सगळे हसायला लागले. 

" अहो आशीर्वाद काय नेहमीच आहेत." भाऊसाहेब जयंतरावांना म्हणाले. "बाकी तुमची भावी सुनबाई आहेच गुणी आणि लाघवी सुद्धा." 

" हो हे शंभरटक्के खरं बोललात " निर्मलाताई  त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाल्या.

" या बसा ना तुम्ही सगळे." सगळ्यांना हाताने बसण्याची विनंती अनघाच्या बाबांनी केली.सगळे गप्पांमध्ये दंग झाले होते. श्रीकांतचे आईबाबा तर भाऊंसोबत मनमोकळ्या गप्पा मारित होते. श्रीकांतविषयी त्यांना सांगत होते. श्रीकांत भाऊसाहेबांनाही मनापासुन पसंद पडला होता. 

श्रीकांतची नजर मात्र बसल्या बसल्याअनघाला शोधीत होती.

" बरं सगळे बसा तुम्ही मी कोल्ड्रींक्स आणते." असं म्हणून आई आणि रिया आत गेल्या. दोघींनी किचनमधून सगळ्यांसाठी कोल्डिंक्सचे ग्लास भरुन आणले. पाहुण्यांचं स्वागत तर छान झालं होतं. 

" चला आता मुख्य कार्यक्रम आटोपून घेऊ या." निर्मलाताई एक्साइट होत म्हणाल्या. त्यावर सगळ्यांनी हो म्हटलं. रिया आतमधुन अनघाला बाहेर घेऊन आली आणि श्रीकांत श्वास रोखून तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण सगळ्यांसमोर कसं बोलावं तेच समजत नव्हतं. रिया मात्र तिच्या कानात श्रीकांतच्या चेहर्‍यावरचे हावभाव हसुन सांगत होती.

" बरं तुम्ही सुरु करा मी जरा गाडीतून प्रसादाचा बॉक्स घेउन येतो. येता येता मंदिरात जाऊन आलो पण गप्पांच्या नादात बॉक्स गाडीतच विसरलो. येतो हा जरा." म्हणत जयंतराव हसत उठले आणि बॉक्स आणण्यासाठी बाहेर आले.

" चला चला आपण सुरु करुयात " भाऊसाहेब बोलले तशी निर्मलाताईंनी  पिशवीतून अंगठीचा बॉक्स बाहेर काढला आणि श्रीकांतच्या हातावर ठेवला. त्याने बॉक्स ओपन केला. ती नाजूकशी सुंदर अंगठी पाहुन त्याचे डोळे भावी आयुष्याच्या रंगीबेरंगी स्वप्नांनी लकाकले. साखरपुडा ठरल्यापासुनचे मधले पंधरा वीस दिवसही त्याला वर्षासारखे वाटत होते आणि अखेर तो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला होता. या क्षणापासुन अनघा त्याच्या आयुष्यात येणार होती. त्याची होणार होती. त्याने अंगठी बॉक्समधुन काढली आणि तिच्या चेहर्‍याकडे पाहिलं.  ती बर्‍याच दिवसांनी आज हसली ते आई आणि रियाच्या नजरेतून सुटलं नाही. त्याने अंगठी घालण्यासाठी तिचा हात हातात घेतला तोच दारातून जयंतराव तरातरा आत आले.

" एक मिनिट थांब श्रीकांत! श्रीधरराव हा साखरपुडा आणि हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं म्हणून समजा." या वाक्याने सगळेच हादरले आणि उठुन उभे राहिले.

" हे काय बोलताय तुम्ही जयंतराव!" अनघाचे बाबा न समजून म्हणाले.

" खर तेच बोलतोय श्रीधरराव. छे! विश्वासघात केलात तुम्ही आमचा श्रीधरराव." जयंतरावांचा असा नाराजीचा सुर पाहून अनघाची आई मूळापासुन हादरली. 

" असं काय बोलताय निर्मलाताई बघा ना!" 

" अहो झालं काय एवढं मोडामोडीची भाषा करायला." निर्मलाताई जयंतरावांकडे पाहत त्रासिक चेहर्‍याने बोलल्या.

" काय झालं हे मला विचारण्यापेक्षा श्रीधरराव आणि कुमुदताईच मला वाटतं जास्त चांगलं सांगु शकतील." रागाने जयंतराव त्यांच्या हात

" बाबा काय झालय ते स्पष्ट बोला." श्रीकांत चिडून म्हणाला.

" She is rape victim. एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवलीत श्रीधरराव."

" काय ?" निर्मलाताई मोठ्याने ओरडल्या. आता त्याही कुमुदताईंकडे नाराजीने पाहु लागल्या.

" मी काहीही लपवलं नाही उलट हेच सांगण्यासाठी मी घरी आलो होतो. जयंतराव तुम्हीच म्हणालात ना तिच्या पुर्वाआयुष्याशी तुम्हाला देणघेणं नाही म्हणून. नीट आठवा." श्रीधरराव आता बोलायला लागले.

" हो पण त्याचा अर्थ असा नव्हता. आम्हाला वाटलं याआधी तिच्या आयुष्यात कुणी होतं असेल. लग्न ठरण्याआधी कुणावरती प्रेम असणं, अफेयर असणं हे हल्ली काही नवीन नाही. आणि अश्या वेळी प्रत्येकवेळी मुलगी चूक असते असा विचार का करायचा एवढचं म्हणणं होतं आमचं." जयंतराव म्हणाले. 

" अहो मग आता तिच्यासोबत जे घडलय त्यात काय तिची चूक आहे का?" कुमुद रागाने आता बोलली.

" तस नव्हे पण शेजारीपाजारी, नातेवाईकांना कळलं तर काय उत्तरं देणार आम्ही आणि देव न करो पण यातून काही वेगळच निष्पन्न झालं तर त्याची जबाबदारी माझ्या लेकाने घेऊन आयुष्यभर परक्याचं मुलं आम्ही वाढवायचं का?" निर्मलाताईंनी सरळ सरळ बोलून दाखविलं.

"माझा काही बोलण्याचा यात सबंधं नाही पण तुम्ही जरा शांत व्हा. समजुतीने बोलू या ना." इतका वेळ शांत असलेले भाऊसाहेब सहन न होऊन बोलले.

" कसं शांत होऊ भाऊसाहेब. अशी मुलगी कशी आम्ही सुन करवून घेणार." 

" जयंतराव या अश्या गोष्टींनी स्त्री अपवित्र नाही होतं, चारित्र्यहीन नाही ठरत हो चूक आपल्या समजण्याची असते. आपण हे लेबल तिला लावून मोकळं होतो." भाऊसाहेब काकुळतीने बोलत होते.

" सॉरी साहेब पण हे सगळं भाषणामध्ये बोलायला ठिक आहे आणि तसही लहान तोंडी मोठा घास पण तुम्ही आमच्याजागी विचार करा ना! तुम्ही करवून घेतली असती अशी मुलगी तुमची सुन!" भाऊसाहेबांची नजर पटकन वरती वळली.

" तुम्ही प्लिज त्यांना यात ओढू नका जयंतराव." अनघाचे बाबा त्यांना हात जोडीत म्हणाले.

" बाबा थांबा आई काय चाललय हे. तुम्ही एवढा का इश्यु करताय." श्रीकांतने अखेर मौन सोडलं.

" तू गप्प बैस. प्राध्यापक झालास म्हणजे जगातलं सगळं ज्ञान तुला आहे असं नाही. आम्ही तुझ्या भविष्यासाठीच बोलतोय हे." जयंतराव त्याला गप्प करित बोलले.

"बाबा पण ऐकून तरी घ्या ना जरा त्यांचं." श्रीकांत त्याच्या वडिलांकडे पाहत म्हणाला.

" निर्मलाताई माझ्या लेकीच्या आनंदावर अस विरजण टाकून नका हो जाऊ. प्लीज." कुमुद निर्मलाताई समजून घेतील या आशेने अजूनही बोलत होती.

" कुमुदताई मी तुम्हाला इतके फोन केले निदान तुम्ही माझ्याकडे तरी हे बोलायला हवं होतं."

" नाहीतर काय हे पत्र आज माझ्या हातात पडलं नसतं तर काहीच कळलं नसतं." मघाशी जयंतराव बाहेर गेल्यानंतर एका शेजारच्या मुलाने आणून एक लिफाफाबंद पाकिट त्यांच्या हातात ठेवलं होतं ज्यावर ' To जयंत वझे ' इतकच लिहिलेलं होतं. त्यांनी तो लिफाफा उघडून पाहिला तर आत एक चार ओळीचा मजकुर लिहिलेलं निनावी पत्र होतं. 

' नमस्कार, तुम्ही आनंदाने ज्या मुलीला तुमची सुन करवून घ्यायला चाललाय ती एक बलात्कारित मुलगी आहे याची तुम्हाला कदाचित कल्पना नसावी. तुमचा शुभचिंतक.' त्या पत्रावरुन आता पुन्हा त्यांनी नजर फिरवली आणि पुन्हा त्याच रागाने ते बोलायला लागले. अनघाचे आईबाबा, भाऊसाहेब पोटतिडकीने श्रीकांतच्या आईबाबांंना समजवण्याचा प्रयत्न करित होते. रिया हे सगळ बघुन भांबावुन गेली होती आणि रडणार्‍या आईला शांत करित होती. श्रीकांत त्याच्या परिने आईबाबांना टोकत होता.पण हे सगळे जिच्यासाठी भांडत होते ती मात्र त्यांच्यात नव्हतीच हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही. सगळ्यांचे शाब्दिक वार प्रतिवार सुरु होते एकमेकावर. मघापासुन हसणारं घरं अचानक कडु शब्दांनी, तिरस्कारित नजरेनं आणि आरडाओरडीने भरुन गेलं. अनघा हळुच मागच्या पावलांनी रडत रडत तिच्या रुममध्ये निघून गेली होती.

.......................

तिने रुमचा दरवाजा कडी लावून बंद केला आणि बेडवरती पडून उशीत डोकं खुपसुन ढसाढसा रडायला लागली. तिच्यासाठी सगळचं संपलं होतं. किती छान साधस स्वप्न होतं तिचं, खुप शिकायचं, नोकरी करायची आणि एका साध्या प्रामाणिक तिला समजुन घेणार्‍या मुलाशी लग्न करायचं. आईबाबांना आनंदी ठेवायचं.पण इतकं साधस स्वप्नही पुर्ण झालं नाही. इतकं मोठं वादळ येऊनही ती उभी राहिली त्याचं कारण होतं श्रीकांत! तो आपल्याला नक्की समजून घेईल. त्याचे घरचे आपल्याला दूर नाही लोटणार अशी आशा तिला वाटत होती. पण आता होत्याचं नव्हतं झाल होतं. आता यानंतर काय वाढुन ठेवलय नशिबाने कोण जाणे असा विचार तिच्या मनात आला. दुसरं मन म्हणालं, आता हे असच सगळं कळल्यानंतर कोण तयार होणार आहे आपल्याशी लग्नासाठी! फार तर एखादा डिवोर्सी किंवा विधुर कोणीतरी. आता इथुन पुढे स्वतःची शोभा नको. आईबाबांना कोणासमोर हात जोडायला लागता नये या लग्नापेक्षा आपलं काम बरं. आता ठरलं, आपलं कॉलेज आणि आपलं काम यात स्वतःला वाहून घ्यायचं. वाटल्यास अजुन शिक्षण घेऊ आपण पण हे सगळं नको आता. हे लग्न संसार, प्रेम आपल्या नशिबात नव्हतच कधी अस समजायचं आणि पुढे जायचं. ती हाच विचार करत रडत होती आणि उशीच्या शेजारी तिची नजर गेली तर ते लॉकेट तिथं होतं जे तिनेच तिथं ठेवलं होतं. तिने ते हातात घेतलं आणि डोळ्यातून अश्रु ओघळू लागले. खरचं मी कुठे चुकले? माझं काम प्रामाणिकपणे करित होते हिच चुक होती का माझी! ती स्वतःशीच म्हणाली आणि ते लॉकेट हातात घट्ट धरुन रडायला लागली.

....................

" विक्रम मी तुला सांगत होते कि...." डायनिंगटेबलवरती अरूंधती, नितू, जितेंद्र, विक्रम नेहमीप्रमाणे नाश्ता करित होते आणि कश्यातच रस नसलेला विक्रम शांतपणे प्लेटमधला नाश्ता खात होता. अरुंधती त्याच्याकडे वळुन बोलत होती इतक्यात त्याला जोराचा ठसका लागला.

" अरे हळु हळु खा " अरुंधती म्हणाली.

" घे पाणी घे जरा " आत्याने पटकन पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला.

" काय रे कुणीतरी आठवण काढली वाटतं." नितूने लगेच म्हटलं.

" कोण गं? " जितेंद्रने लगेच तिला विचारलं.

" I don't know पण त्याच्या Silent crush काही कमी नाहित ना त्यातलीच असेल एखादी नाहीतर असेल पण हा बुवा एखादी Queen of Heart ! " नितूने प्लेटमधला भरलेला चमचा तोंडात टाकत गालातल्या गालात हसत म्हटलं.

" गप्प बस गं आणि सारखी काय त्याची थट्टा करतेस! मोठा भाऊ आहे ना तो तुझा तेवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं." अरुंधती रागावून तिला म्हणाली. बाण बरोबर वर्मी लागला होता खरतर नितूला माहित होतं समिहाशिवाय दुसरी दादाच्या चॉइसची कुणी अरुंधतीला पसंद पडणार नाही म्हणून तिला इनसेक्युअर करण्यासाठी आणि जळवण्यासाठी नितू मुद्दाम विक्रमला थट्टेत काहीतरी बोलत रहायची त्यामुळे अरूंधती जेलस व्हायची आणि नितूला स्वतःच्याच आईची मजा वाटायची.

" बरं बाबा कधी येणारयत माझं एन.जी.ओ.चं काम आहे एक ?" नितूने विचारलं.

" अगं ते येतील ना. नाश्त्याला थांबणार होते आज पण कॉलेजमधल्या एका मॅडमचा साखरपुडा आहे म्हणे. काय बरं नाव हा कारखानीस. आली होती ती घरी निमंत्रण घेऊन मागे. तिकडेच गेलेत ते!" आत्या भांड्यांवरती झाकण ठेवत म्हणाली. पण ते ऐकुन विक्रमच्या पायाखालची मात्र जमिन सरकली.

' OMy God।! अनघाची एन्गगेजमेंन्ट तीही आज! म्हणजे त्या दिवशी संध्याकाळ त्याबद्दल सांगायला आली होती ती भाऊसाहेबांना! ' त्याच्या मनात विचार आला.

" चल आत्या, मम्मा मी निघतो.बाय" असं म्हणून तो पटकन नाश्ता प्लेटमध्ये टाकुनच उठला.

" अरे खाउन जा थोडच उरलय." आत्या म्हणालीच.

"नो थँक्स " म्हणत तो पटकन उठुन कॉलेजला जायला निघाला. तशी अरूंधती विचारात पडली. तिने नितूकडे पाहिलं तर ती नाश्ता संपवण्यात गर्क होती. 'खरंच विक्रमच्या मनात कुणी नसेल ना! हल्ली असा का वागतो तो! समिहाला पण तशीच शंका आली होती आणि नितूलापण! बापरे! नाही अस होता नये. लवकर काहीतरी करायला हवं.' अरुंधतीचं मनातल्या मनात विचारचक्र सुरु झालं.

................

गाडीत बसल्यानंतरही त्याच्या डोक्यात तेच विचार सुरु होते. खंदारेमॅडमना फोन करुया असा विचारही मनात आला पण नको सारखं त्यांना विचारणं बरं दिसत नाही म्हणून त्यांना फोन करण्याचं त्याने टाळलं. ' देवा! सगळं ठिक असु दे.' असा विचार करितच त्याने गाडी स्टार्ट केली.

क्रमशः

🎭 Series Post

View all