बंधन भाग 35

Love Story, Social Issues

भाग 35

( गेल्या भागात श्रीकांत आणि त्याचे आईवडिल साखरपुड्यासाठी अनघाच्या घरी येतात. सगळं सुरळीत सुरु असताना श्रीकांतच्या वडिलांपर्यंत एक निनावी पत्र पोचतं. ज्यामुळे अनघावरती झालेल्या अत्याचाराविषयी त्यांना समजतं. तिच्या घरच्यांनी आपला विश्वासघात केला असं त्यांना वाटतं. पाहुया काय होतय आता हे लग्न ठरणार कि अजून काही घडणार)

श्रीकांतचे आईबाबा कुमुद आणि श्रीधरने समजावूनही ऐकले नव्हते. ते त्यांच्या म्हणण्यावरती ठाम राहिले आणि श्रीकांतला हाताला धरुन तरातरा तिथून निघून गेले. झाला प्रकार कुमुद आणि श्रीधररावांसाठी फारच लाजिरवाणा होता. श्रीधरनी भाऊसाहेबांची माफी मागितली. श्रीधरला वाटलं, उगीच भाऊसाहेब इथे आले त्यांचा किती अपमान झाला.

" साहेब, तुम्ही त्यांचं बोलणं मनावरती नका घेऊ. मी त्यांच्यावतीने माफी मागतो. खरतर आमचचं चुकलं तुम्हाला अश्या घरगुती कार्यक्रमात बोलवायलाच नको होतं. उगीच तुमचा वेळ वाया गेला आणि वरून ती मंडळीही..."

" असु द्या श्रीधर, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो रागात माणसं काहीही बोलतात आणि गैरसमजातून झालय हे जे तुम्ही त्यांच्या घरी गेलात तेव्हाही झालच असतं की फक्त आता अश्या प्रकारे ते व्हायला नको होतं. पोरगी किती खुश होती पाहिलंत ना!"  भाऊसाहेब दुःखी सुरात म्हणाले.

" हो तिला आता कस या सगळ्यातून बाहेर काढायचं काय समजावायचं तेच कळतं नाहीय आम्हाला. मेंदू अगदी सुन्न होऊन गेलाय." 

" श्रीधर होईल सगळं ठिक अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. बरं तुम्ही पाहा तिच्याकडे जरा. मी निघतो आता." श्रीधरच्या खांद्यावरती विश्वासाने थोपटत भाऊसाहेब तिथून निघाले.

....................

हसत खेळतं घर क्षणात शांत झालं होतं. टेबलवरची गिफ्ट्स, किचनमधले मिठाई बॉक्स तसेच पडुन होते. आजची सकाळ किती आनंदाने आणि नव्या आशा घेऊन उगवली होती त्यांच्यासाठी पण आता पुन्हा सगळं शुन्य ! आधीच इतकं सगळ सहन केलेल्या तिला हा धक्का अजुनच मोठा होता याची तिच्या आईबाबांना कल्पना होती.

" अहो काय होउन बसलं ना हे! किती खूश होतो ओ आपण."  कुमुद रडवेल्या चेहर्‍याने म्हणाली.

" हो गं. कुमुद मला प्रश्न पडतो कोण असेल गं तो नालायक आणि त्याचं काय एवढं बिघडवलं होतं आपल्या अनुने. " श्रीधर कपाळाला हात लावत म्हणाले.

" तो जो कुणी असेल त्याचं कधीच भलं नाही होणार बघा! माझ्या सोन्यासारख्या पोरीच्या आयुष्याची माती केली त्या नालायकाने. हे जर झालं नसतं ना तर आता ती किती खुश असती ना हो." कुमुद रडत बोलत होती.

" हो ग पण नशिबापुढे कोणाचं काय चालतं." श्रीधर हताशपणे म्हणाले.

" बरं अनु कुठेय ?" त्यांनी विचारलं.

" आहे रुममध्ये रिया आहे वरती. तिला कस समजावायचं आता तेच कळत नाहीय." कुमुद म्हणाली.

" हो तेच तर छे! काही सुचेनासचं झालय बघ." येरझार्‍या घालणारे श्रीधर सोफ्यावरती बसत म्हणाले.

.................

रात्री सगळ्यांची जेवणे आटोपल्यानंतर विक्रम रुममध्ये आला. त्याचं जेवणाकडे लक्षच नव्हतं. लवकर जेवणं आटोपून कधी एकदा भाऊसाहेबांना स्टडीरूममध्ये भेटायला जातो असं त्याला वाटत होतं. एकदाची जेवणे आटोपली आणि सगळे आपापल्या रुममध्ये गेले. आत्या किचनमध्ये नोकरमंडळीसोबत साफसफाई करित होती. अरुंधती रुममध्ये होती. भाऊसाहेब जेवणानंतर थोडावेळ स्टडीरूममध्ये वाचत बसायचे. तेवढाच वेळ ते एकटे असतात नाहीतर सतत आजुबाजुला आत्या, अरूंधती किंवा कारखान्याची कामं सांगायला जितेंद्र कुणीतरी असायचचं. म्हणून स्टडीरुममध्ये जाऊन भेटायचं आणि अनघाच्या साखरपुड्याविषयी त्यांना विचारायचं त्याने ठरवलं पण कारण काय सांगणार म्हणून तो थोडावेळ रुममध्ये थांबला. टेबलवरती थोडी शोधाशोध केली. कॉलेजमध्ये एम.बी.ए.ही सुरु होणार होतं त्यासाठी नव्या क्लासरुम बांधायला हव्या होत्या. ते कन्सट्रक्शनचं काम कॉलेजमध्ये सुरु होतं. तिथल्या कामगारांची महिन्याची पेमेंन्ट काढायची होती आणि त्या फाईलवरती भाऊसाहेबांच्या सह्या हव्या होत्या. त्याने लगेच ती फाईल ड्रॉवरमधुन बाहेर काढली. त्यावर आवश्यक होत्या तिथे स्वतःच्या सह्या मारल्या आणि तो भाऊंच्या सह्या घेण्यासाठी खाली स्टडीरूमला आला.

................

" बाबा तुम्ही आमच्या प्रोग्रॅमला नक्की यायचं हं." नितू भाऊसाहेबांसमोर बसली होती आणि हट्टाने त्यांनी त्यांच्या एन.जी.ओ. च्या उपक्रमाला यावं म्हणून हट्ट करित होती.

" हो ग नक्की येणार पण काय करणार आहात तुम्ही नक्की ते तरी कळु द्या." ते कौतुकाने पुस्तकातून नजर वरती करित म्हणाले आणि पुस्तक बाजूला ठेवून नितूचं म्हणणं ऐकायला लागले.

" आम्ही महिलाआश्रमात जाणार आहोत. तिथल्या मुलींना स्वसंरक्षण किती महत्व्वाचं असतं त्याची माहिती देणार आहोत आणि फक्त पोपटपंची नाही हा आम्ही एक कराटे प्रशिक्षण सुद्धा एन.जी.ओ. कडुन प्रत्येक आश्रमात मोफत द्यायचं ठरवलय नंतर. त्यासाठी शहरातले काही फेमस कराटे, तायक्वांदो क्लासेस चे प्रशिक्षक आम्हाला यात जॉईन होणार आहेत. " ती बोलत होती आणि ते नजर न ढळता ऐकत होते.

" वा! आमचं नितू बाळ मोठ्ठचं झालं की!"  ते तिची थट्टा करायला लागले.

" बाबा बाळ काय ओ म्हणता!" ती रागावत तोंड फुगवुन म्हणाली.

" बरं बरं आम्ही येऊ हा." 

" ओके बाबा थँक्यु. " ती उठुन हसत म्हणाली.

" चला पळा झोपायला आता."

"ओके मी मालिश करु तुमच्या डोक्याला?"

" नको ग. जा झोप तू आता " ते हसत म्हणाले.

" हो " म्हणून ती तिथून बाहेर पडली.

....................

नीतू तिथून गेली आणि आपल्या लेकीचा हसता चेहरा पाहून त्यांना श्रीधररावांची आठवण झाली. बिच्चारे श्रीधर. स्वतःच्या लेकीच्या आयुष्याची अशी परवड पाहण्यासारखं दुसरं दुर्दैव काय! ते स्वतःशीच पुटपुटले. आरामखूर्चीवरती मागे रेलून बसले आणि अनघाचा विचार मनात आला. बिचारी पोरं काय अवस्था असेल तिची कल्पनापण करवत नाही. आपण तरी काय करु शकतो म्हणा जेवढं होईल तेवढं समजावलं आपण श्रीकांतच्या घरच्यांना पण ते काही समजूनच घेत नाहीयत उलटपक्षी आपल्यालाच त्यांनी! पण पण ते बोलले त्याचा विचार का करु नये आपण! अनघा आपल्याच कॉलेजमध्ये शिकली. तिच्या विद्यार्थीदशेपासुन आपण तिला गुणी, हुशार मुलगी म्हणून ओळखतो. आताही तिने कॉलेजमध्ये नवीन रुजु होऊनही किती उत्तम काम केलंय उलट तिच्यामुळेच तो भ्रष्टाचाराचा प्रकार तरी उघडकीस आला मग अशी मुलगी राजेशिर्केंची सुन व्हायला काय हरकत आहे! असा विचार त्यांचं एक मन करित होतं तेव्हा दुसरं मन म्हणालं, ' हो पण जितेंद्र या लग्नासाठी तयार होईल का? तो साध्यासरळ स्वभावाचा आहे आणि त्याला मुलींविषयी किती आदर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे आणि आपण सगळी परिस्थिती त्याच्या कानावरती घालू तो नाही म्हणणार नाही! हो पण कसं जमायचं हे अनघाच्या आईवडिलांनी तिच्यासाठी किती स्वप्न पाहिली असतील. एवढी हुशार प्राध्यापक मुलगी आणि आपला जितेंद्र फक्त साधा ग्रॅज्युएट त्यात दिसायलाही अगदी साधा. शिक्षणाची, अभ्यासाची फार आवड नाही. फार महत्वाकांक्षा नाहीत अगदी समाधानी आनंदी जगणारा असा मुलगा हा. छे! दोघे भावनिक, वैचारिक, बौद्धिक कुठल्याच पातळीवरती समान नाहीत. अश्याने कसा संसार व्हायचा. ती अडचणीत आहे म्हणून काहीही तिच्या माथी मारल्यासारखं नको व्हायला. असे एकामागोमाग विचार त्यांच्या मनात येत होते.

...................

पायर्‍या चढत वरती जाताना समोरून विक्रम खाली आला.

" काय रे घाईत कुठे " 

" काही नाही साहेबांकडे " एवढच तो बोलला.

" ओके " म्हणत झोप डोळ्यावरती आलेली नितू काही न बोलता वरती गेली. हुश्श सुटलो म्हणत तो तडक स्टडीरुममध्ये आला.

" येऊ का ?" त्याने बाहेरुनच विचारलं.

" अरे या ना " त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा बाजूला करित पुन्हा  हातातील पुस्तक बाजूला ठेवलं.

" चला आज काय वाचायचा योग दिसत नाही वाटतं."

" सॉरी " तो पटकन म्हणाला.

" राहु द्या. काही काम होतं का?" त्यांनी विचारलं तस हो म्हणत तो पुढे आला.

" आपल्या कामगारांची महिन्याची पेमेंन्ट्स काढायची आहेत. तुमच्या सह्या राहिल्या होत्या." असं म्हणत त्याने फाईल त्यांच्या हातात दिली. ते फाईल उघडुन पाहू लागले. त्याने थोडी बोटांशी चाळवाचाळव केली. कसा विषय काढावा तेच त्याला समजत नव्हतं. 

" आज सकाळी तुम्ही कुठे फॅमिली फंक्शनला गेला होतात का?" धीर गोळा करून त्याने विचारलं.

" हो आपल्या कारखानीस मॅडम त्यांची एन्गॅजमेंन्ट होती. त्यांनीच निमंत्रण दिली होतं अगदी घरी येऊन! म्हटलं जाऊया." ते सह्यांची फाईल विक्रमच्या हातात देत म्हणाले.

" मग कसा झाला प्रोग्रॅम ?" त्याने पुन्हा विचारलं.

" कसला प्रोग्रॅम नी कसलं काय ! मंडळींनी साखरपुडा  मोडला आणि लग्नसुद्धा! " ते छताकडे पाहत शांतपणे म्हणाले. विक्रमला हे अस काही अपेक्षितच नव्हतं. त्याच्या पायाखालची जमिनच क्षणभर हलल्यासारखी त्याला वाटली. त्याच्या हातातली फाईल जमिनीवरती पडली. बापरे! त्यांना कस कळलं असेल कुणी सांगितलं असेल! या विचारातच तो खाली वाकला आणि भाऊसाहेबांकडे न पाहता जमिनीवरती विखुरलेले पेपर्स जमा करु लागला.

" बिच्चारी पोरं ! एका नालायक हलकट माणसाच्या करतुतीचे परिणाम आहेत हे! या असल्या मुलांचं काय करायचं तेच समजत नाही. एखादीचं शरिर म्हणजे यांना काय स्वतःची प्रोपर्टी वाटते का? " ते रागाने बोलत होते आणि हातोड्याचे घाव पडावे तसे त्यांचे ते शब्द त्याच्या कानावरती पडत होते. 

" ती मंडळी सुद्धा कसं बोलली ती श्रीधर आणि कुमुदताईंशी. म्हणाले असली मुलगी कशी सुन करवून घेणार! उगीच काही निष्पन्न झालं तर! त्यांना म्हणे वाटलं तिचं काही प्रेमप्रकरणं होतं. छे! किती अश्लाघ्य भाषेत बोलत होते ते. ऐकवेना."

त्याने वरती पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.

" मला तर तिच्या वडिलांकडे पाहवतपण नाही. तिला पाहिलं ना कि आपल्या नितूचा चेहरा येतो डोळ्यासमोर!" पाणवल्या डोळ्यांनी ते बोलत होते. तो काहीही न बोलता गप्पपणे पेपर्स गोळा करित होता. 'साहेब, कसं सांगु माझ्याकडून घडायला नको होत तेच घडलं. मी काय करु आता. मीच हतबल झालोय माझा तसा काहिच हेतू नव्हता  हो' तो मनातून म्हणाला.

दोन पेपर्स भाऊसाहेबांच्या पायापाशी पडले होते. त्याने त्यांच्या  पायापाशी हात लावला. इतक्यात भाऊ खाली नजर करित विक्रमच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणाले.

" विक्रम एक सुचवु का ? तुम्हीच का नाही करत अनघाचा विचार ! "  

त्यावर त्याने पटकन नजर वरती वळवली. 

" हा म्हणजे आम्ही जितेंद्रला खरतर विचारणार होतो पण तुम्ही तिला ओळखता शिवाय तुम्ही एकाच क्षेत्रात काम करता. शिवाय दोघेही हुशार आहात. महत्वाकांक्षी आहात. विक्रम तुम्ही विदेशात राहिला आहात त्यामुळे तुमचे विचार नक्कीच श्रीकांतसारखे नसतील असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही सुचवलं. पाहा विचार करुन." भाऊसाहेब म्हणाले आणि तो आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याने पटकन पेपर्स फाईलमध्ये भरले आणि ओके म्हणत तो उठला.

" गुड नाईट " बोलून तो तिथून बाहेर पडला.

" हं "  भाऊसाहेब म्हणाले. पुढे काय बोलावं ते दोघांनाही सुचेना. तो गेल्यानंतर त्यांना वाटलं उगीच अतिभावनिक होऊन आपण काहीतरी बोलून गेलो. विक्रम आणि अनघा आपल्या मनाला अनुरुप वाटत असलं तरीही विक्रमच्या मनात कुणी आहे का काय माहित! तो एवढा सतत बाहेर असतो. शिक्षणाच्या निमित्ताने अगदी परदेशातही जाऊन आला. त्यातून इतकी बुद्धीमत्ता आहे अंगी. दिसायला स्मार्ट आहेत . कामाच्या निमित्तानेही बाहेर फिरणं होत त्याचं कुणीतरी नक्कीच भेटली असेल एव्हाना! असा विचार करितच ते खुर्चीतून उठले.

..............

तो रूममध्ये आला. हातातली फाईल त्याने ड्रॉवरमध्ये ठेवली. भाऊसाहेब जे म्हणाले होते त्यावरती त्याचा अजुन विश्वास बसत नव्हता. त्याला पुन्हा पुन्हा त्यांचे शब्द आठवत होते. तो त्याच्या रूमच्या गच्चीत जाऊन उभा राहिला. गच्चीतून निरभ्र आकाश दिसत होतं आणि लाखो चांदण्या आभाळभर मिणमिणत होत्या. त्याला त्यांच्या बोलण्यावर कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळेना शेवटी काहीही न बोलता तो तिथून निघून आला होता. त्या चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे पाहताना त्याला वाटलं, आपल्यामुळे तिच्या आयुष्यात इतका अंधार पसरलाय. कशी असेल ती काय माहित! असा विचार मनात आला आणि त्याच्या खांद्यावरती कुणीतरी हात ठेवल्याची चाहूल त्याला लागली.

" काय रे इतका कसला विचार करतोयस ?" 

" मम्मा तू ! झोपली नाहीस." अरुंधतीचं त्यावेळी तिथं येणं त्याला नकोसं वाटलं.

" अ.... काही नाही नथिंग. तू बोल ना. " त्याने लगेच मुद्द्याला हात घातला.

" विक्रम हल्ली लक्ष नाहीय तुझं कश्यातच! काही बिनसलंय का? टेंन्शन आहे का काही?" तिने आज सगळ्या शंकांची उत्तरं मिळवायचीच असं ठरवलं होतं.

" नाही गं. टेन्शन कुठे " तो नजर खाली ठेवत म्हणाला.

" मग तू समिहाशी हल्ली असा का वागतोस?"

" असा म्हणजे कसा? I don't get it. " त्याने रूक्षपणे म्हटलं.

" अरे तुच मागे म्हणालेलास ना ती आवडते तुला. In fact ठिक आहे. तुझी लाईफपार्टनर म्हणून मी तिचा विचार करतेय You know that आणि तू मात्र तिच्याशी नीट बोलायलासुद्धा तयार नसतोस. She will be hurt ना!" अरुंधती शांतपणे बोलत होती.

" मम्मा मी बोललो होतो साहेबांशी बोल तू या विषयावर आणि Second thing is ती मला एक मुलगी म्हणून ठिक वाटली बाकी तश्या नजरेने आयमिन लाईफपार्टनर, माय वाईफ अश्या point of view ने मी अजूनतरी तिचा विचार केलेला नाही आणि या पुढेही करेन असं मला नाही वाटतं." 

त्याच्या या बोलण्याने अरुंधतीला त्याने जणू अणुबॉम्ब तिच्यावरती फेकल्यासारखच तिला वाटलं.

" काय !!!!!! हे काय बोलतोयस तू विक्रम! " ती आश्चर्याने म्हणाली.

" हो मम्मा करेक्ट ऐकलयस तू !" तो ठामपणे म्हणाला.

" बरं मग समिहा नाही तर दुसरी कोणती स्थळं पाहु का मी?" ती थोडी सावरुन म्हणाली.

" No मम्मा प्लीज Give me some time प्लिज आत्ता तरी हा विषय नको." तो तिच्याकडे पाहत म्हणाला. आता हा निरवानिरवीचा संवाद आहे हे तिच्या लक्षात आलं तसं ती ओके गूड नाईट बोलली.

" हं Good night मम्मा." एवढच तो बोलला. अरुंधती निराशेने तिथून बाहेर पडली. 

.......................

 विक्रमने सकाळी आत्याकडे आधी भाऊसाहेबांची चौकशी केली तेव्हा कळलं ते सकाळी लवकर बाहेर पडलेत. कवठेमहाकाळला एकाच कुटुंबातल्या दोघीजणींना सासरच्यांनी हुंड्यासाठी मारून जाळल्याची घटना आदल्या रात्री घडली होती. आणि रात्रीपासुनच पत्रकारांचे फोन येऊ लागले होते. न्युजचॅनेल्सवाले कवठेमहाकाळला जणू रात्रीपासुनच तंबु टाकून बसले होते. भाऊसाहेब पहाटे पटकन आंघोळ उरकुन नाश्ताही न करता बाहेर पडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आधी घटनास्थळी जाऊन तिथली पाहणी करून लगेच पत्रकारपरिषद त्यांना घ्यायची होती. आत्याने हे सगळं विक्रमला सांगितलं.

" बरं मग मी दुपारी येतो तेव्हा भेटेन. त्यांना घरीच थांबायला सांग प्लिज " 

" बरं रे बाबा " आत्या हसत म्हणाली.

" हसलीस का ?" त्याने विचारलं.

" काही नाही तुला सगळं भाऊसाहेबांना बरं सांगायचं असतं." तिने म्हटलं.

" नाही गं असं काही.  महत्त्वाचं बोलायचं होतं." तो उसासे टाकत निराश मनाने म्हणाला.

.......................

कॉलेजमध्ये तो पोचला तरी त्याला चैन पडेना. भाऊसाहेबांचं रात्रीचं बोलणं अजूनही त्याच्या कानात घुमत होतं. आता तर त्याला त्या दिवशी आरश्यात दिसलेलं ते बाईचं प्रतिबिंबही स्पष्ट आठवु लागलं आणि ती जे म्हणाली तेसुद्धा ! तिचं ते शेवटचं वाक्य, ' माणूस म्हणवून घ्यायची योग्यताच नाही तुमच्यासारख्या पुरुषांची. ' खरंच इतके निर्लज्ज आणि नालायक आहोत आपण! पण माझा खरंच तसा हेतूच नव्हता. हो पण त्यामुळे तिचं जे व्हायचं ते नुकसान झालचं ना दुसरं मन लगेच म्हणालं. छे! कुणी हे पत्रबित्र लिहिलं असेल आणि त्या माणसाला मूळात हे समजलंस कसं! त्या रात्रीतर सगळे कॉलेजलाच होते आणि तिनेही अजून कुणाला काही सांगितलेलं नसावं नाहितर खंदारे मॅडम बोलल्या असत्या आपल्याला! आणि त्या श्रीकांतचे घरचे तरी इतकी तिला बोलायची काही गरज नव्हती. असा विचार मनात आला आणि त्याचच मन त्याच्यावरती उपहासाने हसलं आणि म्हणालं, ' विक्रम, तू श्रीकांतच्या जागी असतास तर एखाद्या बलात्कारित मुलीसोबत तू तरी लग्नाला तयार झाला असतास का? बोलणं खूप सोप असतं विक्रम! ' दूसरं मन लगेच उत्तरलं, नीतू बोलली होती आपलं चुकलं तर आपण अश्यावेळी तिच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा पण कसा? मी भेटू का श्रीकांतला हो पण त्याने काय होईल माझ्या हातून चूक झाली आता तू तिची साथ दे असं कुठल्या तोंडाने सांगायचं त्याला! आणि असं करून मला काही कादंबरीतला हिरो वगैरे व्हायची इच्छा नाहीय. जो नायिकेच्या आयुष्यात आनंद आणतो. तिला तिचं प्रेम मिळवुन देतो. Foolish romantic stories ! मी नाही कुणाच्या हातापाया पडायला जाणार! विक्रम कधीही कोणासमोर झुकत नाही. आणि हे असलं काही करण्याने काय होणार? त्यांचं लग्न होईल पुन्हा आहेतच नातेवाईकांचे टोमणे, सासुसासरे घालून पाडून बोलणार आणि तिच्या आईवडिलांवर आम्ही कसे उपकार केले हे आयुष्यभर मिरवत बसतील! Such poor mentality people! असा विचार करताना पुन्हा त्याचच मन त्याला खाऊ लागलं.' विक्रम तुझ्या अश्या attitude ने च वाट लागलीय तिच्या लाईफची ! छे! काय विचार करतोय मी हा ! मी सगळं श्रीकांतच्या घरच्यांवरती ढकलून मोकळा झालो. नाही ! चूक माझी झालीय आणि माझ्यामुळे तिचं आयुष्य उद्धवस्त झालय मग मीच ही विस्कटलेली घडी बसवेन. कुणीही तिच्यावरती उपकार करायची, तिची जबाबदारी वगैरे घ्यायची गरज नाहीय मी समर्थ आहे त्यासाठी. अनघा मी तुझ्या आयुष्यात येण्यामुळे तुझं इतकं नुकसान झालय मग आता मीच तुझ्यासोबतच तुझ्याच आयुष्यात थांबतो! होय हाच आता एकमेव मार्ग आहे. भाऊसाहेबांशी दुपारीच बोलायला हवं. त्यांनी जितेंद्रशी बोलण्याआधी! असा विचार करून तो कॉलेजमधून घरी जाण्यासाठी निघाला.

क्रमशः

Like, Comment, Share with author name

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित ©®

कृपया कॉपी पेस्ट करु नये.

🎭 Series Post

View all