बंधन भाग 39

Love, Social Issues

भाग 39

(  गेल्या भागात अनघाचे आईबाबा, रिया विक्रमच्या घरी गेले. लग्नाची बोलणीही झाली आणि थोड्याच दिवसात साखरपुड्याचा मुहुर्तही ठरला पाहूया आज काय होतय.)

अनघा - विक्रमच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला आणि भाऊसाहेब खूश झाले. अजूनतरी या लग्नाविषयी बाहेर कोणालाही कल्पना नव्हती. अरुंधतीला तर विक्रमच्या लग्नाची बोलणी होऊन साखरपुडाही ठरला हे सगळं राजेश्वरीला कसं सांगावं तेच कळत नव्हतं. तिला तर त्यांच्या मैत्रीणींमध्ये यावरुन खूपच अपमानित झाल्यासारखं वाटणार होतं. त्यातून समिहाचा उतरलेला चेहराही तिला पाहवला नसता त्यामुळे आधी गप्पच बसावं असं अरुंधतीने ठरवलं. साखरपुडा एकदाचा झाला कि लग्नाची पत्रिका मैत्रीणींना द्यायची आणि सांगायचं मी तयारच नव्हते पण साहेबांनी त्या माणसांना शब्द दिला म्हणून नाईलाजाने मलाही हो म्हणावं लागलं असं काहीतरी सांगून स्वतःची सुटका करवून घ्यायचं तिने ठरवलं होतं. दुसरीकडे भाऊसाहेबांनी मात्र आनंदाने सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. त्यातलच महत्त्वाचं होतं ते गुरुकुल. त्यांच्या कॉलेजमध्ये मात्र अजून कोणालाच या नव्या नात्याची कल्पना नव्हती आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक, कर्मचार्‍यांना सांगणं गरजेचं होतं. साहेबांनी स्वतः ही खूशखबर देण्यासाठी प्राचार्य करंबेळकर सरांना फोन केला. त्यांना आधी आश्चर्यच वाटलं हि बातमी ऐकून. पण अनघाच्या बाबतीत घडलेला तो प्रसंग त्यानंतर तिचं मोडलेलं लग्न याची कॉलेजमध्ये कोणालाच कल्पना नव्हती त्यामुळे भाऊसाहेबांनी सगळं सावरुन घेतलं. अनघा हुशार आहे त्यातून भाऊसाहेबांनाही तिची हुशारी, प्रामाणिकपणा आवडतो त्यामुळे त्यांनी घेतलाही असेल निर्णय असं प्राचार्यांना वाटलं. साहेब गरिब- श्रीमंत, पदप्रतिष्ठा बघून नाती जोडत नाहीत याची त्यांना कल्पना होती. करंबेळकर सरांना कळलं आणि त्यांनी उत्साहाने हि गूडन्युज प्राध्यापकांच्या वॉट्सअॅप ग्रुपवरती टाकली. त्यासरशी भराभरा मेसेजेस त्या ग्रुपवरती येउन धडकले. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता त्यात अपवाद म्हणजे खंदारे मॅडम आणि काळेसर फक्त त्या दोघांकडेच विक्रमने अनघाची चौकशी केली होती. वर्गातले विद्यार्थी कोण कुठे पाहतायत आणि काय करतायत ते विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरुन ओळखणारी त्यांची अनुभवी नजर त्यामुळे असं काहीतरी असेल असा अंदाज त्यांना आला होता. पण बाकी प्राध्यापकांना तर हे सगळं अजबच वाटतं होतं. शेवटी सगळ्यांच्या मेसेजेसना कंटाळून प्राचार्यांनी ग्रुपच म्युट केला.

.................

" अरे राजेश What is this ? हे काय आहे प्रोफेसर्सच्या ग्रुपवरती !" सामंतसर रुममधुन त्यांचं टेस्ट पेपर तयार करण्याचं काम तसच टाकून धावत बाहेर आले. राजेश आरामात सोफ्यावरती बसला होता आणि आरामात पाय टेबलवरती ताणून टि.व्ही. पाहत होता.

" What डॅड आणि मोबाईल तुमचा, वॉट्सअॅप तुमचं, ग्रुप तुमच्या प्रोफेसर्सचा मग मला कसं माहीत असणार?" राजेश चॅनेल बदलत म्हणाला.

" म्हणजे विक्रमने नाही सांगितलं तुला काही ?" सामंतसरांनी शंकास्पद नजरेने त्याला विचारलं. विक्रम आणि राजेश एकमेकांना सगळं सांगतात. ते चांगले मित्र आहेत हे त्यांना माहित होतं.

" नो पण Why are you screaming ?" 

" अरे हे बघ ना करंबेळकर सरांनी काय टाकलयं, ' Hello to all, Glad to inform you all that our one of the brilliant Prof. Miss Angha Karkhanis & Our Honourable M.D. Mr.Vikram are going to get engaged soon. Heartiest Congratualtions to both of them. Showers of blessings & Wishes for them.' 

 हा मेसेज सामंतसरांनी राजेशसमोर मोठ्याने वाचला तसा त्याने विजेचा शॉक बसावा तसे दोन्ही पाय टेबलवरून मागे घेतले आणि सरांच्या हातातून मोबाईल घेऊन स्वतः मेसेज पाहिला. त्याचा विश्वासच आधी बसला नाही. त्याच्या मनात एकामागोमाग विचार येत होते मग तो अंधुकसं हसला. ' वा!! विक्रम मस्त आहे ही नवीन खेळी! बिच्चारी अनघा अगं फसलीस कि तू आता पुर्णच!!!'

" राजेश, मी काय म्हणतोय हे ठरलं कधी! अरे अॉलरेडी या पोरीमुळे भाऊसाहेबांसमोर उघडे पडलो असतो आपण आणि हे काय विक्रमचं नवीन! " सामंत चिंतीत चेहर्‍याने म्हणाले.

"  Don't worry डॅड. विक्रम आहे तो तुम्हाला काय वाटतं हे एन्गगेंजमेंन्ट, लग्न सगळं खरय का! अनघा त्याला कधीच आवडली नव्हती, आणि तिच्यासारख्या टिपिकल सिरीयल हिरोईन त्याला आवडत नाहीत. त्यातून तिने कॉलेजमध्ये जे उपदव्याप केले त्याने तो तिचा अजून राग करायला लागलाय. तुम्हाला वाटतं तो सहजासहजी तिच्यासमोर झुकेल. सो अजिबात टेंन्शन नका घेऊ."

" ओके आता तू म्हणतोयस तर!" ते शांत होत बोलले.

" काय पण तुम्ही डॅड असो विक्रमला समजणं इतकं सोप नाहीय!!!! बिच्चारी अनघा तिला काय वाटलं विक्रम तिच्याशी खरं बोलतोय का तिच्यावर प्रेम करतोय."  तो गूढपणे हसला.

......................

आदल्या दिवशी रात्रीच्या त्या ग्रुपवरच्या मेसेजने कॉलेजमध्ये विक्रम - अनघाच्या लग्नाची जोरदार चर्चा सकाळी कॉलेजला सुरु झाली. सगळेच प्राध्यापक तिचं अभिनंदन करित होते आणि ती चेहर्‍यावरती हसु ठेवून त्यांना थँक्स म्हणत होती अगदी प्राचार्यांनीही केबिनमध्ये बोलावून तिचं अभिनंदन केलं. बातमी हळुहळु कॉलेजच्या अॉफिस स्टाफ पर्यंतही पोचली तिथून मग शिपायांना कळायला कितीसा वेळ लागतो. 

" ए विक्रमसाहेब आणि कारखानीस मॅडमच्या लग्नाची बातमी खरी म्हनायची काय ?"  शिवाने दिनेशला चौकशीसाठी म्हणून विचारलं. शिवानेही या बातमीने चांगलाच धसका घेतला होता.

" होय तर खोटी बातमी ! येड लागलय काय विक्रमसाहेबांनी बातमी पसरवणार्‍याला शिल्लक तरी ठेवल असत काय!" दिनेशने उत्तर दिलं.

" व्हय रं पन समदं अचानक ठरलं की रं. मला तर वाटतं त्यांचं काय काय म्हनतात ते अफेयर बिफेयर काय ते नव्हतं ना...मागं एकदा कारखानीस मॅडम लई खोदून खोदून इचारत व्हत्या विक्रमसाहेबांबद्दल....नंतरच तो कसला तरी प्रोग्रॅम का काय कालेजला सुरु करायला कारखानीस मॅडमनीच सांगितलं की!"  शंकरने म्हटलं.

" ए अफेयर वगैरे काय!!! अरे तीन वर्ष विक्रम साहेब कॉलेजचं सगळं बघतायत....तेव्हापासून नवीन किती प्रोफेसर मॅडम आल्या कि तेव्हा नाही बरं अफेयर झालं. कारखानीस मॅडम तर गेल्या वर्षी जॉईन झाल्या नी तुम्हाला वाटतं साहेब प्रेमात पडतील कुणाच्या!"  दिनेश शंकरला बोलला.

" व्हय ते बी खर की. विक्रमसाहेब माहितीयत ना किती कडक स्वभावाचं त्यातनं एवढं शिकलेलं, हुशार दिसतायत बी साहेबासारखं ते आनी मॅडम म्हनजी जरा कठीनच दिसतय."  शंकर म्हणाला तसा शिवा म्हणाला,

" भाऊसाहेबांची ईच्छा "  त्यावर दोघांनीही शिवाच्या बोलण्याला माना डोलवुन दुजोरा दिला.

...............

अनघा मात्र कॉलेजमध्ये सगळ्यांना या लग्नाविषयी समजल्यामुळे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता अवघडून गेली. सगळ्यांच्या नजरेत तिला एकच प्रश्न दिसत होता,' कसं ठरलं आणि खरं का ?' पण अनघाचे आईबाबा मात्र खूश होते. श्रीकांतच्या घरच्यांनी घातलेल्या गोंधळानंतर पुन्हा रितसर स्थळं वगैरे पाहण्याचा कार्यक्रम, बोलणी करणं त्यांना जीवावरती आलं होतं. पाहायला पाहुणे येणार, तिला पसंद करणार आणि जुनं सगळं समजल्यावरती कोरडा नकार! तेच त्यांना नको होतं त्यामुळे तिची होणारी अवस्था त्यांच्याने पाहवणार नव्हती आणि अश्यातच भाऊसाहेबांनी घेतलेला पुढाकार म्हणजे देवच जणू धावून आला असं त्यांना वाटत होतं तरी हे लग्न जोपर्यंत निर्विघ्न पार पडत नाही तोपर्यंत भिती होतीच त्यांना.

" अहो गेल्या वेळेसारखं नाही ना काही होणार?"  साखरपुड्याच्या आदल्या रात्री कुमुदने श्रीधरना आपली भीती बोलून दाखवलीच.

" कुमुद नको निगेटिव्ह विचार करुस. ठिक होईल आणि आता सगळं त्या देवावर सोडायचं बघ."  श्रीधरही अस्वस्थ होउन म्हणाले.

" हो बरोबर आहे तुमचं पण मनात शंभर शंका येतायत जोपर्यंत उद्याचा कार्यक्रम नीट होत नाही ना तोपर्यंत जीवाला चैन पडणार नाही." कुमुद दोन्ही हात एकमेकांना जोडीत देवाचा धावा करित म्हणाली.

" हो गं होईल ठिक सगळं. चल झोपूया आपण पण आता. लवकर जायचय उद्या त्यांच्याकडे." श्रीधर तिला धीर देत म्हणाले.

................

दुसर्‍या दिवशी सगळे वेळेत राजेशिर्केंच्या घरी पोहचले. भाऊसाहेबांच्या नजीकची काही खास मंडळी, 'गुरुकुल ' चे प्राचार्य, उपप्राचार्य आणि खंदारे मॅडमसारखी काही सिनियर प्राध्यापकमंडळीही कार्यक्रमाला येणार होती. घरच्या घरी छान घरगुती कार्यक्रम करुयात असं आत्याने साहेबांना सुचवलं. अनघाची मानसिक स्थिती पाहता त्यांनाही ते पटलं त्यामुळे फार कुणाला त्यांनी साखरपुड्याला घरी बोलवायचा घाट घातला नाही. अरुंधतीने तर याबद्दल कोणालाच काही सांगितलं नसल्याने तिच्या ओळखीतलं कोणीही येणार नव्हतं. नितू, जितेंद्र, आत्या तर सकाळपासूनच उत्साहात होते. आत्याने सगळ्यांचं छान आदरातिथ्य केलं. खंदारे मॅडम, प्राचार्य, निंबाळकर सर, निकम सर, काळे सर असे काही मोजके प्राध्यापक घरी आले होते. भाऊसाहेबही सकाळपासून घरीच होते. सगळ्यांच्या छान गप्पा झाल्या. विक्रम आवरुन खाली आला आणि नितू सगळ्यांचं लक्ष वेधत म्हणाली,

" चला चला मेन कार्यक्रम आटोपून घेऊ.. उगीच वेटिंग नको." यावरती सगळे हसले. अरुंधती मात्र शांतपणे त्यांच्यात बसुन सगळं पाहत होती. कुमुदने अनघाला समोर बसवलं आणि रिंगचा बॉक्स उघडून रिंग तिच्या हातात दिली.

विक्रमने पटकन बॉक्स उघडला तशी तिच्या हातांची चाळवाचाळव झाली. संकोचूनच तिने हाताची बोटं पुढे केली. त्याने एकदाच तिच्याकडे पाहिलं आणि तिला साखरपुड्याचा तो प्रसंग आठवला. त्या दिवशी श्रीकांत अक्षरशः तिला पाहायला बैचेन झाला होता. अंगठीचा बॉक्स उघडुन तो कितीतरी क्षण अनघाकडे पाहत राहिला होता तो प्रसंग तिला आठवला त्याक्षणी ती भानावरती आली तोपर्यंत विक्रमने मात्र पटकन रिंग हातात घेतली आणि तिला कळायच्या आत तिच्या बोटात सरकवली सुद्धा! तिचं बोटाकडे लक्ष गेलं तोपर्यंत अंगठी तिच्या हातात होती! आश्चर्य वाटलं तिला, स्वतःच्या साखरपुड्यालाही हा माणूस इतका फॉर्मल कसा वागू शकतो. या विचारातच तिने त्याच्या बोटात अंगठी घातली आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

त्याने सगळ्यांना 'थँक्स ' म्हणून टाकलं. तिला मात्र वाईट वाटलं होतं खूप जे तिने चेहर्‍यावरती दाखवलं नाही. सगळे दोघांचं अभिनंदन करायला पुढे आले. तिने सगळ्या ज्येष्ठांना वाकून नमस्कार केला. साखरपुड्याचा कार्यक्रम एकदाचा पार पडला आणि अनघाच्या आईबाबांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

....................

साखरपुड्याच्या दिवशी रात्री आईबाबा, रिया सकाळच्या कार्यक्रमाच्या गप्पा मारित होते. तिला मात्र त्यात रस नव्हता ती उठुन तिच्या रुममध्ये निघून आली आणि शांतपणे बेडवरती बसून राहिली. इतक्यात मोबाईलवरती मेसेज आला.

" Hiii " तिनेही त्याच्या मेसेजला हॅलो म्हटलं.

' How was the program ?'  विक्रमने पुन्हा मेसेज टाकत विचारलं त्यावरती ' छान होता ' एवढाच तिचा रिप्लाय आला. पुढे काय बोलायचं त्याला कळेना मग त्याने ' Okk, Good night ' म्हटलं. तिनेही 'गुड नाईट ' चा रिप्लाय दिला. तिला त्याच्या कोरड्या हाय हॅलो वरती काय बोलायचं तेच सुचायचं नाही त्यातून आजचं सकाळचं त्याचं वागणं आणि आता फक्त दोन शब्दाच्या मेसेजने 'कार्यक्रम कसा झाला ?' हे विचारणं यामुळे तिला वाईट वाटलं होतं. दिवसभरात साधा फोनही करण्याची तसदी त्याने घेतली नव्हती. या सगळ्या विचारातच तिने डोकं उशीला टेकलं.

...................

विक्रमने मोबाईल बेडशेजारच्या कॉर्नरपिसवरती ठेवून दिला. पुन्हा हातात घेतला आणि मोबाईलची गॅलरी ओपन करुन सकाळचे एन्गगेजमेंन्टचे फोटोज पाहायला सुरुवात केली. मोबाईलवरती बोटं फिरवताना त्याचं लक्ष त्याच्या बोटातल्या अंगठीकडे गेलं. त्याने दोन क्षण रिंगकडे पाहिलं आणि स्माईल केलं. त्याने फेसबुक ओपन करुन ' Going to engaged soon ' ची पोस्ट टाकली. अनघाला अॅड करण्यासाठी तिचं अकाउंन्ट सर्च केल. तिचा स्वतःचाच फोटो प्रोफाईल ला होता आणि सव्वीस डिसेंबरच्या रात्री तिने टाकलेली शेवटची पोस्ट! रात्री आठला टाकलेला तिचा गॅदरिंगच्या दिवशी घातलेल्या ड्रेसमधला फोटो होता. त्याने फोटोखालच्या कमेंन्ट्स वाचायला सुरुवात केली. छान छान कमेंन्ट्स आणि त्यात ' looking like Princess ' अशी श्रीकांतची कमेंन्ट होती. त्याला जेलसी वाटली ते वाचून आणि श्रीकांतचा रागही आला. पण त्याकडे दुर्लक्ष करित त्याने स्क्रोल डाउन केलं आणि तिचे अजून फोटोज सापडले. त्यातला एक साडीतला फोटो त्याने डाऊनलोड करुन घेतला आणि मोबाईलला वॉलपेपर म्हणून ठेवला. त्या फोटोकडे पाहून तो हसला आणि मोबाईल पुन्हा कॉर्नरपिसवरती ठेवून झोपी गेला.

क्रमशः

वाचकांना आवाहन :

सद्याचे चालू भाग interesting अाहेत त्यामुळे बर्‍याच नवीन वाचकांनी वाचायला सुरुवात केलीय आणि लव्हस्टोरी मस्त अश्या कमेंन्ट्स येतात...तर प्लीज हि लव्हस्टोरी म्हणून वाचू नका....या कथेला प्रेमकथेचा स्पर्श असला तरी बर्‍याच सामाजिक प्रश्नांना मांडत कथा पुढे जाते...मग शिक्षणसंस्थेतले भ्रष्ट्राचार असतील किंवा महिला अत्याचार, समाजकार्य आणी पैसा कमावणं या दोन्हिमधला संघर्ष असेल त्यामुळे प्रत्येक भाग हा तोच धागा पकडून लिहिलेला आहे. कृपया इतर Romantic Love - stories मध्ये याची गणना करु नका....बंधनचा आशय विषय वेगळा आहे. त्यामुळे नव्या वाचकांनी आधीचे भाग वाचावेत.

🎭 Series Post

View all