बंधन भाग 42

Love, Social Issues

बंधन 42

( गेल्या भागात आपण पाहिलं विक्रमचं अनघाशी सतत गोड वागणं कॉलेजच्या स्टाफला खटकतं खासकरुन तिच्यासोबतच्या इतर  प्राध्यापिका तिच्याविषयी उलटसुलट चर्चा करतात. त्यात नव्या विभागाच्या उद्गाटनामुळे तर यात अजुन भर पडते पाहुया आज काय होतय)

कॉलेजमध्ये दिवसेंदिवस स्वतःविषयी चाललेली उलटसुलट चर्चा आपल्याच सहकार्‍यांकडून ऐकून घेणं अनघाला असह्य होत होतं. त्यातून वर्देमॅडम, कार्ले मॅडम आणि रेगे मॅडम तिच्याविषयी ज्या उकाळ्यापाकाळ्या करित होत्या त्यामुळे तिला वाईट वाटलं होतं. तिने रात्री विक्रमचा मेसेज आला तेव्हा सकाळच्या प्रकाराविषयी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. 

' एक सांगू का ?' त्याच्या गुडनाईटच्या मेसेजला तिने असा रिप्लाय दिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने लगेच 'हो' चा मेसेज केला. त्यावर तिचा लगेच मेसेज आला.

' कॉलेजमध्ये आपल्याविषयी स्टाफ चांगलं नाही बोलतं. especially about our marriage.' 

त्याने मेसेज वाचला आणि तिला काय नक्की म्हणायचय ते त्याला समजलं नाही. त्याने रिप्लाय दिला,

' चांगलं नाही बोलत म्हणजे कसं...I didn't get it..तसही कुणाच्या बोलण्याने काय फरक पडतो. आपली एन्गगेजमेंन्ट झालीय & We're going to marry....You don't think about it.' 

यावर मात्र त्याला सकाळी घडलेला कँन्टिनमधला प्रसंग कसा सांगायचा, कुठल्या शब्दात सांगायचं ते तिला कळतं नव्हतं. मग नाईलाजाने तिने ओकेचा रिप्लाय दिला तरी तिच्या डोक्यात त्या तिघींचं बोलणं घोळत होतं मग कशीतरी तिला झोप लागली.

.....................

फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा जवळ आला होता. पुढे विद्यार्थ्यांच्या परिक्षाही जवळ आल्या होत्या. त्यामुळे साधारणतः कोणत्या विभागाचा किती अभ्यासक्रम पुर्ण करायचा राहिला आहे, प्रॅक्टिस टेस्ट, क्लास टेस्ट, प्रॅटिकल परिक्षा या सगळ्याविषयीचा आढावा घेण्यासाठी विक्रमने स्टाफरुमला सगळ्या प्राध्यापकांची मिटिंग बोलावली होती. प्राचार्य, उपप्राचार्य यासह सकाळशिपचे सर्वच प्राध्यापक मिटिंगला उपस्थित होते. दुपारच्या सत्रातील प्राध्यापकांची वेगळी मिटिंग दुपारी होती.

सगळे आपापल्या फाईल्स घेऊन स्टाफरुमला चेअरमध्ये बसले होते. त्यांचंही आपापसात डिस्कशन सुरु होतं. कोणाचे दोन topic राहिले होते तर कुणाच्या क्लास टेस्ट बाकी होत्या तर काहींनी प्रॅक्टिकल परिक्षांचं प्लॅनिंग अजून पुर्ण केलं नव्हतं. त्यांची चर्चा सुरु असताना विक्रम आला तसे सगळे उठून उभे राहिले. त्याने हातानेच सर्वांना बसण्याची खूण केली.

" So Very Good Morning all of you. " तो चेअरमध्ये बसत म्हणाला. 

" I think गेल्या सत्रात परिक्षांच्या आधी अशी मिटिंग घेतली होती आपण त्यानंतर आज या सेमिस्टरच्या तयारीसाठीची ही मिटिंग आहे. सो We shouldn't waste  our time तर सुरु करुयात." त्याने सगळ्यांकडे पाहत विचारलं.त्यावर सर्वांनी येस म्हटलं. 

सिनिअर प्राध्यापकांनी प्रथम उभं राहून बोलायला सुरुवात केली. खंदारे मॅडम, सामंतसर, काळेसर, निकमसरांसारखी सिनिअर प्राध्यापकमंडळी उत्साहाने त्यांच्या डिपार्टमेंन्टच्या टेस्ट, प्रॅक्टिकलची तयारी, गेल्या वेळेच्या तुलनेत आता खास वार्षिक परिक्षांसाठी घेत असलेली मेहनत, टि.वायच्या परिक्षांची तयारी याविषयी भरभरून सांगत होते. विक्रमनेही त्यांना ओके, वाव! नाईस, किप इट अप अश्या प्रतिक्रिया दिल्या ज्यामुळे बाकीच्यांचा उत्साह वाढला. 

त्यानंतर ज्युनिअर प्राध्यापक एकेक करुन उभे राहून आपल्या लेक्चर्सविषयी, डिपार्टमेंन्टविषयी सांगत होते. बर्वेसरांचं बोलून संपलं आणि विक्रमने त्याला Well Done म्हटलं. तो खूशीत खाली बसला. त्यानंतर अनघा उभी राहिली.

" हं बोला कारखानीस मॅम ?" विक्रम असं म्हणाला आणि सगळ्यांचे कान अनघाच्या बोलण्याकडे लागले. वर्दे मॅडम आणि रेगे मॅडम नजरांची खूणवाखूणवी करित गालात हसत होत्या. तिने बोलायला सुरुवात केली.

" सर, I've completed the whole syllabus of T.Y." आणि तिने टि.वाय.च्या विभागाची तिच्या विषयांची फाईल त्याच्या हातात दिली. त्याने त्यावरुन पटापट पानं पलटत नजर टाकली.

" हं ओके What about F.Y.& S.Y. ?" 

त्याने विचारलं. तिच्या तळव्यांना घाम सुटला. ती धीर करुन म्हणाली.

" सर सॉरी......म्हणजे नाही कंप्लिट झालाय Syllabus. अजून एक Week लागेल but I will try to complete " तिच्या या वाक्यावरती त्याने वरती नजर केली. आता पुर्ण स्टाफरुममध्ये पिन ड्रॉप सायलेंन्स पसरला.

"  उपकार नाही करित कॉलेजवरती......I will try नको You must do it मॅडम. पेमेंन्ट घेता न महिन्याला न चुकता मग स्टुडन्ट्सना व्यवस्थित शिकवणं हि जबाबदारी आहे तुमची सगळ्यांचीच."

" सर सॉरी मी कारणं देते असं वाटेल but मी मध्ये दहा पंधरा दिवस रजेवरती होते म्हणून......." तिचं बोलणं तोडत तो म्हणाला.

" मॅम तुमचे पर्सनल प्रोब्लेम तुमच्याजवळच ठेवा. त्याचा आणि शिकवण्याचा काही संबंध नाही. तुमच्या पर्सनल प्रोब्लेमसाठी कॉलेजचं काम थांबणार नाहीय. तुम्ही रजा घ्या वा घेउ नका Syllabus, Students च्या सबमिशन, प्रॅक्टिकल वेळेतच व्हायला हवं. बाकी तुम्ही काय करता याच्याशी मला देणघेणं नाही." त्याच्या या कडक शब्दांनी त्या तिघी तिच्याकडे पाहून खाली मान घालून हसत होत्या. त्याच्या या बोलण्याने तिचे डोळे भरुन आले. तिला मोठ्याने ओरडावस वाटलं, ' मी मुद्दाम नव्हती घेतली रजा आणि एका बलाक्तारित मुलीला पुन्हा उभ रहायला आयुष्य खर्ची जातं. मी तर पंधरा दिवसात.....' पण हे शब्द तिने मनातच गिळून टाकले. 

" and one more thing, You're winner of Best Teacher Award त्यामुळे जबाबदारीने वागा." त्याच्या या बोलण्यावरती तिने नुसतीच मान डोलावली आणि ती खाली मान घालून बसली. त्यानंतर बाकी उरलेले प्राध्यापक बोलत होते पण तिच्या कानावर कोणाचेच शब्द पडत नव्हते फक्त विक्रमचं बोलणं तिच्या कानात घुमत राहिलं.

.....................

मिटिंगनंतर सगळे आपापल्या लेक्चर्सला जाण्यासाठी स्टाफरुमबाहेर पडले. ती एकटीच खाली मान घालून चालत होती. मागून काळेसर आले आणि त्यांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवत नजरेनच डोन्ट व्हरी म्हटलं. तिनेही होकारार्थी मान हलवली. ते पुढे गेले आणि मागून तिघी - चौघींचा घोळका पुटपुटत आला.

" आज मजाच आली नाही !"  कार्ले मॅडम म्हणाल्या.

" हो ना काहीजण जास्त हवेत होते ते जमिनीवरती आले." वर्दे मॅडमनी हसत म्हटलं.

" पण तुम्ही निरिक्षण केलं का एक, आज सर ओरडत होते पण नेहमीसारखं नाही."  रेगेमॅडमनी त्यांचं अतिनिरिक्षण सांगितलं.

" हो ना मला पण वाटलं तसं नेहमी धडाधडा बोलत असतात तेही समोरच्याच्या नजरेला नजर देत आणि आज बघ एकदा मोजून पाहिलं तिच्याकडे." वर्देमॅडमनेही रेगेच्या बोलण्याला दुजोरा दिला त्यावरती कार्ले मॅडम बोलल्या,

" हं अगं बघतील कसे! ज्युलिएट रडत होती ना सहन नसेल झालं. बिच्चारी Juliet !"  त्यावर वर्देमॅडम म्हणाल्या,

" हं आता काय बुवा....डोळे पुसण्याचा कार्यक्रम मोठा होणार.....राणी रडून कशी चालेल!!!"  त्यावर तिघींनी खो खो हसत एकमेकीला टाळ्या दिल्या. ती गप्पपणे पुढे चालत होती आणि त्यांचं हसणं, बोलणं ऐकत होती. तिला वाटलं बस झालं नको आता ही नोकरी आताच्या आत्ता राजीनामा द्यावा पण भाऊसाहेबांना काय वाटेल या विचाराने तिने मन शांत केलं.

...........,..,,,....

विक्रम स्टाफरुममधून मिटिंगनंतर त्याच्या केबिनमध्ये येऊन बसला. त्याने डोक मागे चेअरला टेकलं. हातातल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरती त्याचं लक्ष गेलं. तिचा फोटो होता हसणारा! " I'm sorry my dear " त्याच्या तोंडून नकळत शब्द आले. सकाळी खंदारे मॅडम डिपार्टमेंन्टच्या कामासाठी म्हणून त्याला भेटायला केबिनला आल्या होत्या. त्याला राहवलं नाही म्हणून कॉलेजमध्ये सद्या कसल्या कसल्या चर्चा चालू आहेत म्हणतात असा बोलता बोलता त्याने मॅडमना टोमणा मारला. तो कशाविषयी बोलतोय ते मॅडमच्या लक्षात आलं. त्यांनी सरळ सरळ त्याला अनघा आणि त्याच्या लग्नाविषयी कॉलेजमध्ये सगळीकडे काय चर्चा चालू आहे याविषयी सांगून टाकलं. त्यामुळे त्याला सगळ्यांचा अॉलरेडी राग आला होता. त्यातून अनघा आपली होणारी बायको जरी असली तरी कॉलेजच्या शिस्तीबाबतीत आणि कामाच्या बाबतीत तिला कोणतीच सूट मिळणार नाही. इतरांसारखीच ती इथे प्रोफेसर म्हणूनच काम करेल हे त्याला त्याच्या वागण्यातून सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे मिटिंगमध्ये तो तिला ओरडला होता. त्या क्षणी  विक्रम म्हणून त्याला वाटलं तिला सांगावं, Don't worry. I know you're responsible professor पण हे शब्द त्याने ओठावरती येऊ दिले नव्हते आणि बाकी चारजणांसारखं तिलाही त्याच कडक शब्दात सूचना दिल्या होत्या. त्यावेळी तिची बाजू घेणं म्हणजे इतर सगळ्यांना बोलायला संधी देणं आणि आता कसही वागलं तरी चालेल अशी मुभा सगळ्यांना देणं ठरलं असतं. त्याच्या मनात हे सगळे विचार सुरु होते. शेवटी रात्री सॉरी बोलूया असं त्याने ठरवलं.

.......................

तो पूर्ण दिवस असाच गेला. अनघाचं कश्यातच लक्ष लागेना. आपण गेले एक दीड वर्ष साधं प्राचार्यांनाही आपल्याला कामाच्याबाबतीत ओरडण्याची संधी दिली नाही. डिपारटमेंन्टच्या हेड, प्राचार्य, भाऊसाहेब सगळेच आपल्या कामावरती खूश असतात आणि आज आपल्याला सगळ्यांसमोर खाली मान घालावी लागली. खरतर चूक आपलीच होतील त्याला सर तरी काय करणार म्हणा! पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्याबाबतीत कसलाच हलगर्जीपणा करायचा नाही असं तिने ठरवलं. रात्री विक्रमने नेहमीप्रमाणे 'गुड नाईट ' चा मेसेज केला. लागोपाठ ' I'm Sorry ' चा मेसेजही होता. त्यावरती तिने रिप्लाय दिला,

'  सॉरी का? माझचं चुकलं म्हणा! असो पुन्हा माझ्याकडून हलगर्जीपणा नाही होणार.' 

तिचा हा मेसेज वाचून त्याला बरं वाटलं आणि दिवसभराचं टेन्शनही पळालं. 

.....................

फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उजाडला. अनघाचे आईबाबा राजेशिर्केंच्या घरी जाऊन आले होते. भटजींनी मार्चच्या पंधरवड्यातलाच शुभमुहूर्त काढला होता. भाऊसाहेबांनी आत्या आणि जितेंद्रवरती सगळी लग्नाच्या तयारीची जबाबदारी सोपवली होती. त्यात लुडबुड करणारी नीतूही होतीच. नीतू आणि रियाचीही चांगली गट्टी जमली होती मात्र बाकी कुठेही दोघेही जा काहीही करा पण अनघाच्या बाबतीत घडलेलं जितेंद्र आणि नीतूला माहित नाही आहे आणि भाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे घरातल्या लहानांना उगीच यात ओढायला नको म्हणून नीतूला काहीही सांगायचं नाही असं कुमुदने रियाला बजावलं होतं. त्यामुळे नितू आणि जितेंद्र सोबत असताना रिया बोलताना नेहमी काळजी घ्यायची पण बाकी लग्नाची खरेदी, तयारी यात तिघांचा उत्साह सारखाच होता. रियाला जिजू आवडला होता आणि या दोघांना अनघावहिनी म्हणून पसंद होती. एकीकडे ही लग्नाची तयारी सुरु असताना अरुंधतीला मात्र यात अजिबात रस नव्हता. पत्रिका छापल्यानंतर तिने मैत्रिणींना वॉट्सअॅपवरुनच पत्रिका पाठवली. सगळ्याजणींनाच विक्रमचं लग्न ठरल्याचं आश्चर्य वाटलं. अरुंधतीला मैत्रीणींचे टोमणे ऐकून घ्यावे लागतच होते शिवाय समिहाची आई, राजेश्वरी तिचा मात्र हिरमोड झाला होता. अरुंधतीने प्रत्यक्ष घरी जाऊन तिला समजावलं की आपण किती प्रयत्न केले पण साहेब कसे त्यांच्याच शब्दावर ठाम राहिले मग आपला कसा नाईलाज झाला सगळं अगदी इमोशनल होउन सांगितलं मग काय राजेश्वरीलाही बरं असु दे आता म्हणावं लागलं. कारण समिहाने विक्रम आपल्याशी नीट वागत नाही हे तिच्या आईला सांगितलं होतं. त्यामुळे अरुंधती कितीही म्हणत असली तरी राजेश्वरी विक्रम- समिहाच्या लग्नाबद्दल साशंकच होती तरीही अगदीच योग जूळून आला तर बरंच अस राजेश्वरीला वाटतं होतं. राजेश्वरीने समजूतदारपणा दाखवल्याने अरुंधतीचा जीव भांड्यात पडला. तिला मनातून वाटलं, बरं झालं विक्रम- समिहाची मैत्री वगैरे झाली नाही नाहीतर हि हट्टी मुलगी काही ऐकली नसती आणि विक्रमच्या मागेच पडली असती शिवाय भाऊसाहेब समिहासाठी कधीच तयार नसते झाले दोन्हीकडून आपणच कात्रीत सापडलो असतो. 

.......................

दोघांच्याही घरी लग्नाची तयारी जय्यत सुरु होती पण त्यामुळे कॉलेजच्या कामांना काही सुट्टी नव्हती. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा जवळ येत होत्या. त्यासोबतच फेब्रुवारीच्या 28 ला येणार्‍या राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या तयारीलाही  मुलं लागली होती. या दिवशी खास वेगवेगळी एक्सिबिशन, सेमिनार्स कॉलेजमध्ये दिवसभर सुरु असायचे. त्यासाठी शहरातल्या इतर कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापकही उपस्थित असायचे. यंदाही विज्ञानदिनाची तयारी पूर्ण झाली. 28 ला सकाळी दहाला एका सेमिनारने कार्यक्रमांची सुरुवात होणार होती. ठरल्याप्रमाणे सर्व प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, विद्यार्थी कॉलेजच्या सेमिनारहॉलला जमले. सेमिनारला विक्रम बोलणार होता याची सगळ्या विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. त्याचं लेक्चर मुलांना ऐकायला नेहमीच आवडायचं. सगळे आपापल्या खूर्च्या पकडून बसले. प्राचार्य, उपप्राचार्य, प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख, पाहुणे प्राध्यापक स्टेजवरती उपस्थित होते. पुढे विद्यार्थ्यांसाठी चेअर्स होत्या आणि मागे शेवटी प्राध्यापकांना बसण्याची सोय केली होती. 

उपप्राचार्यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि विक्रमला बोलण्याची विनंती केली. हॉलमध्ये शांतता पसरली.

"  Hello everyone, Hi to all my dear students, First of all I would like to welcome you all students, our honourable principal Mr. Karmbelkar sir, Our vice principal Mr. Nimbalkar and all respected professors. Wish you all Happy National Science Day. Today is 28th Feb. As you know, 28th Feb. is celebrated in the honors of Sir C.V.Raman for his legacy in the field of Science and today we all're here to pay tribute to Sir C.V. Raman. Before proceeding further I would like to share with you one quote of Sir C.V.Raman. He said, ' In the history of Science we often find that the study of some natural phenomenon has been the starting point in the development of a new branch of knowledge.'  What I wanted to say that....

तो माईकवरुन बोलत होता आणि सगळेजण शांतपणे ऐकत होते. अनघा कॉलेजला जॉईन झाल्यापासून पहिल्यांदाच त्याचं असं लेक्चर वगैरे ऐकत होती. त्याचं शब्दांवरचं प्रभुत्व, भाषा, उच्चार, आवाजातली स्पष्टता, हावभाव आणि माईकवरुन बोलतानाचा प्रचंड आत्मविश्वास पाहून तिला वाटलं, हा तोच विक्रम आहे का ज्याच्यासोबत पुढल्या पंधरा एक दिवसात आपलं लग्न होणार आहे! असा विचार तिच्या मनात आला आणि कावळा बसायला अन फांदी तुटायला एकच गाठ पडावी तसच झालं. तिच्यापुढेच त्यांच्याच कॉलेजच्या काही विद्यार्थीनी बसल्या होत्या ज्या मघापासून शांत होत्या आणि आता आपापसात कुजबुजु लागल्या.

" वाव यार! काय भारी बोलतात ना विक्रम सर...I'm fan of him "   एकजण एक्साईट होत म्हणाली. त्यावर त्या मुलीच्या शेजारच्या चेअर्सवरच्या आणि पुढच्या चेअर्सवरच्याही मुली मागे वळून बोलायला लागल्या.

" हो ना ग उर्वी, He is talented person हा." दुसर्‍या एकीने म्हटलं.

" किलिंग लुक ना!" एकजण त्या उर्वीकडे पाठी वळून म्हणाली.

" यार यांना कसं जमतं कधीही बघ...Constant energetic, क्लिन शेव्हिंग, डिफरंन्ट कलरचे ब्लेझर्स, कलर कॉबिंनेशन पण कडक असतं हा."  दुसरी एकजण म्हणाली. 

" हो ग नैना आणि एवढ सगळ करूनपण काम पण खूप करतात. " तिसरी एक म्हणाली.

" हं मिताली राईट But he is good speaker अगं एवढं कॉलेज हॅन्डल करून बाहेरच्या कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जातात ते हा फि पण तेवढी आहे त्यांची म्हणा." उर्वी म्हणाली.

" हो माझा भाऊ आहे ना IIT चेन्नईला तो सांगत होता त्यांच्या इथेपण सरांचं लेक्चर होतं सेमिनारला. पोरं अक्षरशः वेडी झाली ऐकून.....छान समजावतात ते टॉपीक." त्या मितालीने म्हटलं.

" हो ना पण यार He's so smart & charming ए त्यांची  Gf पण भारी असेल ना!" त्यातल्या नैनाने विषय काढला आणि अनघाचे कान आता जीव ओतून त्यांचं संभाषण ऐकु लागले.

" कसलं काय ए वेडी कुठल्या जगात तू! He's already engaged " मिताली त्या नैनाला वेड्यात काढत म्हणाली.

" हो का कोण ग?" उर्वी आणि नैनाने उत्सुकतेने विचारलं.

" कोण काय? मॅनेजमेंन्टच्या कारखानीस मॅडम!" असं ती मिताली म्हणताच दोघींनी ई.....त्या असं वाकडी तोंडं करित म्हटलं.

" हो ठरलं पण त्यांचं मॅरेज " मितालीने ज्यादाची माहिती दिली. त्यावर उर्वी म्हणाली,

"  तश्या काय कारखानीस मॅडम वाईट नाहीत but he deserves a lot त्यांच्या मानाने मॅडम नथिंग यार." त्यावर बाकीच्यांनीही ओ तो सही है म्हणत माना डोलावल्या. 

त्यांचं बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटलं. आधीच कॉलेजचे सहकारी प्रोफेसर्स, शिपाई बोलतच होते त्यातून मुलंही आता बोलायला लागली होती. तिने डोळे रुमालाने पुसले आणि ती त्याच्या भाषणाकडे लक्ष देऊ लागली.

...................

दिवसभराच्या कार्यक्रमांनी थकून ती संध्याकाळी घरी आली.  कुमुदने नेहमीप्रमाणे विचारलं काय काय झालं आज तुमचा सायन्स डे होता ना पण आईच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं त्राण तिच्यात नव्हतं आणि तिला सांगायला आवडलं असतं पण त्या विद्यार्थींनीचं संभाषण अजुनही तिच्या डोक्यात होतं. ती फ्रेश होऊन रुममध्येच बसली. Syllabus ही लवकर संपवायचा होता त्यामुळे तिने नोट्स काढायला घेतल्या आणि तेही काम तासाभरात संपलं. आई रात्री जेवायला बोलवायला आली तर मला नको कॉलेजला दिवसभर खाणं झालय मी झोपते नंतर असं तिने सांगून आईला रुममधून बाहेर पाठवलं. तिला जरा एकटीला शांतता हवी होती.  इतक्यात मोबाईल वाजला. विक्रमचा मेसेज होता,

'  Hiiiii जेवलात का? ' 

तिने मेसेज वाचला आणि तिला ते मुलींचं आपापसातलं बोलणं आठवलं, कँन्टिमधलं तिच्याच सोबतच्या मॅडमचं टोमणे मारणं आठवलं. शिपायांची कुजबुज आठवली. हे लग्न ठरल्याचं जेव्हापासून कॉलेजमध्ये समजलं होतं तेव्हापासून ती दररोज तेच ते टोमणे, तिच्यावरती हसणं हेच पाहत होती. तिला वाटत होतं, खरच किती विरुद्ध आहोत आपण एकमेकासाठी! आपण विक्रमसमोर काहीच नाही सगळ्याच बाबतीत आपण कमी आहोत हा विचार जणू तिच्या मनावरती गोंदला गेला होता एव्हाना. तिच्या मनात हेच विचार सुरु होते इतक्यात त्याचा दुसरा मेसेज आला,

' बिझी आहात ?' 

तिने पटकन नंबर डायल केला पलिकडून त्याने लगेच कॉल उचलला. तो बोला ना म्हणण्याआधीच तिने भराभरा बोलायला सुरुवात केली,

"  मला नाही बोलायच समजतं नाही का तुम्हाला! ओ, कि लग्न ठरल. तुम्ही माझ्यावर उपकारच केलेत तर जबरदस्ती आहे आता बोलायची. आणि तुम्ही कश्याला स्वतःचा वेळ असा फुकट घालवता. Don't waste your time for me ! मी कोण आहे खरतर ! तुमच्यापुढे झिरो बावळट, घाबरट, काकूबाई हो ना आणि प्लीज मला काही समजावण्याची गरज नाही हे असच आहे. प्रत्येकाच्या तोंडी हेच आहे ओ....असो तुम्हाला काही फरक पडतो का पण! तुम्ही मुळात कश्याला तयार झालात या लग्नाला....माझच चुकलं जे मी हो म्हटलं...माझी तुमच्याशी बरोबरी नाही होऊ शकत ते मलाच कळायला हव होतं...." 

तिचं हे धडाधडा बोलणं तो स्तब्धपणे ऐकत होता. तिचा आवाज फोनवर बोलताना इतका वाढला की हॉलमधून आईबाबा, रिया वरती आले. त्यांना काही क्षण समजलच नाही ती कुणासोबत इतक्या मोठ्या आवाजात बोलतेय आणि लक्षात आलं तेव्हा श्रीधर आणि कुमुद घाबरलेच इतक्या चढ्या आवाजात बोलून विक्रम चिडले आणि काही बिनसलं तर हा एकच विचार त्यांच्या मनात आला. तिघं धावत तिच्या रुमपाशी गेले. दरवाजा बंद होता. श्रीधरने दारावरती थापा मारायल्या सुरुवात केली.

" अनु ए अनु दार उघडं अगं सरांसोबत बोलतेस कि काय?" श्रीधर तिच्या रुमच्या दारावरती थापा मारित होते.

 " अनु बाबा काय विचारतात? विक्रमसर आहेत का फोनवर अगं काय बडबडतेस!"  कुमुद घाबरुन म्हणाली.

" ताई ताई दार उघड " 

हा सगळा गोंधळ त्याला फोनवरुन ऐकू जात होता. शेवटी फोन कट झाल्याचा आवाज आला. तिच्या या बोलण्याने पुढे काय होणार ? हे तिचं शेवटचं उत्तर तर नसेल हे लग्न मोडलं तर हे सगळे विचार त्याच्या मनात आता सुरु झाले.

क्रमशः

जुने सर्व भाग माझ्या ब्लॉग प्रोफाईलला आहेत. या पार्टच्या खाली 'Serial list ' मध्येही आतापर्यंतचे सर्व भाग अनुक्रमे आहेत. नवीन भाग पटकन वाचण्यासाठी प्रोफाईलला फॉलो करा. नवीन भागाची नोटिफिकेशन तुम्हाला मेलला येतील.

🎭 Series Post

View all