बंधन भाग 45

Love , Social Issues


भाग 45
( गेल्या भागात विक्रम अनघाला हॉस्पिटलला घेऊन जातो. तिला गेल्या काही दिवसांच्या घटनांमुळे आलेल्या ताणामुळे तिची तब्येत बिघडते. दिवसभर हॉस्पिटलला त्याला थांबावं लागतं. संध्याकाळी तिला घरी सोडल्यावरती तिच्या रजेविषयी तो तिच्या आईला सांगतो.)

अनघाच्या आईला सांगितल्याप्रमाणे प्राचार्यांकरवी तीन - चार दिवसाची रजा विक्रमने मंजुर करुन घेतली. लग्नाचा मूहूर्त आठवड्यावरती येऊन ठेपला होता आणि अश्या सगळ्या वातावरणातच तिची अशी तब्येत बिघडल्याने त्याला काळजी वाटू लागली होती. त्याने नीतू आणि जितेंद्रला तिची तब्येत ठिक नाहीय असं सांगून टाकलं. अनघाचा पहिला साखरपुडा हुंड्याच्या मागणीमुळे मोडला आणि याचाच तिला त्रास झालाय असच नितू आणि जितेंद्रला वाटत होतं त्यामुळे त्या दोघांनी तिला लग्नाच्या शॉपिंगसाठी विचारणं, तिला फोन करणं असे सगळे उद्योग बंद केले. कारखानीसांकडून रियाच तयारीच्या सगळ्या गोष्टीकडे जितेंद्र, नितूसोबत लक्ष द्यायची. बाकी सगळं कुमुद गंगाआत्याला फोन लावून विचारायची. अरुंधतीने काही फार  लग्नबस्त्याच्या खरेदीतही रस दाखवला नाही. कुमुदला एक दोन फोन अरुंधतीने वरमाईच्या नात्याने केले इतकच तेही भाऊसाहेबांच्या इच्छेसाठी बाकी तिने स्वतःहून कोणत्या गोष्टीत पुढाकार घेतला नाही. कुमुदला जरा हे विचित्र वाटलं पण श्रीधरनी तिची समजूत घातली. 
........................
अनघाच्या रजेला दोन दिवस झाले. विक्रमचं नेहमी कॉलेजला जाणं सुरु होतं पण कॉलेजला पोहचल्यावर, कॉलेज सुटल्यावर प्राध्यापकांच्या गराड्यात त्याची नजर नकळत तिला शोधायची. हॉस्पिटलमधून तिला त्याने घरी सोडलं त्या संध्याकाळपासून तिच्याशी काहीच बोलणं नव्हतं त्याला आता दोन दिवस उलटले होते. त्याला तिला भेटावसं वाटायला लागलं. कॉलेजमध्ये मात्र दुपारनंतर पुन्हा ट्रस्टींची मिटिंग होती त्यामुळे आज काही तिच्या घरी जाणं शक्य नव्हतं. मन म्हणालं, उद्या जाऊन येऊ. दुसरं मन उत्तरलं,' हो पण उद्याही काम निघालं मग! कामांची यादी कधी संपते का!' तो सकाळपासून कॉलेजलाच होता. संध्याकाळपर्यंत ट्रस्टींची मिटिंगही आटोपली. केबिनमध्ये आल्यानंतर जरा त्याने सुटकेचा श्वास घेतला. शिपायाकडून कॉफी मागवली. पुन्हा तिचा विचार मनात आला. संध्याकाळचे पाच वाजले होते. दिवसभरच्या दगदगीने त्याला खरतर घरी जाऊन निवांतपणे खाण्यापिण्याची गरज होती. शेवटी तो उठला आणि वॉशरुममधून फ्रेश होउन आला. आता जरा त्याला उत्साही वाटलं. केबिन लॉक करुन तो कॉलेजच्या आवारात आला तोपर्यंत साडेसहा झाले होते. त्याने गाडी मग घरी न वळवता तिच्याघराच्या रोडने वळवली.
.....................
" आई सर आलेत ग "विक्रम आलेला पाहून रिया झोपाळ्यावरुन उठली आणि दारातूनच तिने कुमुदला हाक मारली. तो गाडीतून उतरेपर्यंत कुमुद बाहेर आली होती.
" अरे, या ना अचानक आलात असे " कुमुद पुढे होउन पायर्‍या उतरत म्हणाली.
" अ हो येऊ का आत ?" त्याने विचारलं. तो एकदाच आला होता तेही परवा तिला सोडण्यासाठी म्हणून एरव्ही कॉलेजमधून दुपारी तिला घरी सोडायला तो यायचा तेव्हा घराबाहेरुनच जायचा. विनाकारण तिच्याघरी येणं त्याला नको वाटायचं त्यात तिचे आईबाबा, रिया सगळेच त्याला आदराने वागवायचे होणारा थोरला जावई म्हणून हे कारण होतच शिवाय त्याचं तिच्या कॉलेजमध्ये मोठ्या पदावरती असणं हेही कारण होतं. त्याला यामुळे संकोचल्यासारखं वाटायचं.
" या तुम्हाला काही चहा, कॉफी आणू का?" कुमुदने त्याला हॉलमध्ये आल्यानंतर विचारलं.
" नाही थँक्स " तो म्हणाला. त्याची नजर सबंध घरावरून फिरत होती. रियाने कुमुदला नजरेनच खूणावलं तसं कुमुद त्याला म्हणाली.
" तब्येत ठीक आहे आता तिची! तुम्ही भेटून घ्या बरं वाटेल तिला चार शब्द बोलल्यावर!"  कुमुदने म्हटलं. त्याला बरं वाटलं हा विषय तिच्या आईनेच काढला याचं.
" हो ओके " त्याने हो म्हटलं तसं रियाने या म्हणत अनघाची रुम दाखवलायला त्याला नेलं.
.................
रुमचा दरवाजा उघडाच होता.
" ताई बघ कोण आलय ?" रियाने पुढे होत म्हटलं तसं अनघा ने हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं. ती बेडवरतीच वाचत बसली होती.
" सर तुम्ही ! " त्याला असं अवेळी आलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं.
" बरं तुम्ही गप्पा मारा मी येते " म्हणत रिया तिथून निघून गेली.
....................
त्याने सबंध रुमवरुन नजर फिरवली. त्यांच्या बंगल्यातल्या त्याच्या रुमपेक्षा अगदीच छोटीशी रुम वाटली ही त्याला! तिचा सिंगल बेड, शेजारी छोटस वॉर्डरोब, बेडच्या मागे भिंतीत शेल्फवरती ती कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकत असताना तिला मिळालेल्या ट्रॉफिज माना उंचावून उभ्या होत्या त्यात बेस्ट टिचर अवॉर्डची ट्रॉफीसुद्धा होती. त्याचं लक्ष तिथे गेलं. त्याच्याही घरी रुममध्ये अश्या ट्रॉफिज ठेवलेल्या होत्या. दोघांच्याही ट्रॉफिज एकत्र केल्या तर एक कपाटभर होतील असा विचार त्यांच्या मनात आला आणि स्वतःचचं त्याला हसु आलं.

" बसा ना तुम्ही. " ती त्याला म्हणाली तसा तो विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.
" अ हो " त्याने समोरची चेअर ओढत म्हटलं.
" तुम्ही उगीच मुद्दामहून घरुन कश्याला आलात तेही एवढ्या संध्याकाळी "  तिने असं म्हटलं त्यावर लगेच त्याने बोलायला सुरुवात केली.
" नो, आयमिन कॉलेजवरुनच आलो.आज ट्रस्टींची मिटिंग होती म्हणून कॉलेजलाच लेट झाला म्हटलं घरी जाताना इकडे येऊन जाऊ."  त्याने एक्सप्लेनेशन दिलं. तिने त्याच्याकडे पाहिलं फक्त आणि नेहमीचा प्रसन्न चेहरा, टापटीप ड्रेस, पर्फ्युमचा गंध त्याच्याकडे पाहून तो दिवसभर बाहेरुन मिटिंग्ज वगैरे करुन आलाय अस तिला वाटलंही नाही. 
" Ok, tea or coffee ?" तिने उठत विचारलं.
" No Thanks, तुमची तब्येत ठिक आहे ना !" त्याने धीराने विचारल.
" अ म्हणजे हो feeling well " ती चेहर्‍यावरती कसनुस हसु आणीत म्हणाली.
" बरं, Get well soon " त्याने म्हटलं. नंतर दोन क्षण शांततेत गेले. दोघांनाही काय बोलावं कळेना शेवटी तोच उठला.
" बरं मीपण निघतो आता आत्या  वाट बघत असेल." त्याने असं म्हटलं आणि तो जायला निघाला तशी ती बेडवरुन उठली आणि दोन पावलं चालली न चालली आणि तिला भोवळ आल्यासारखं वाटलं. तिने त्यांच्या खांद्याला आधारासाठी धरलं तसा तो मागे वळला. त्याने पटकन तिच्या हाताला धरलं. तिचं अंग गरम असल्याचं जाणवलं त्याला.
" मॅडम, तुम्ही कश्याला उठलात या बसा तुम्ही जरा...You should take rest."  त्याने तिला हाताला धरुन बेडवरती बसवलं. आपला हात त्याच्या हातात आहे ते तिच्या लक्षात आलं तस विजेचा शॉक लागल्यासारखा तिने हात मागे घेतला. त्याला काही कळलंच नाही.
" ओके, तुम्ही रेस्ट घ्या बरं मी निघू का ?" तो शांतपणे आर्जवी नजरेनं म्हणाला. त्या नजरेत ' मी जाऊ ना नक्की ' अशी भावना जास्त होती. तिने होकारार्थी मान डोलावली.
" बाय See You " म्हणून तो तिच्या रुममधुन बाहेर पडला.
निघताना कुमुदने चौकशी केलीच त्यावर बर वाटेल त्यांना एवढच नेहमीसारखं उत्तर त्याने दिलं.
.......................
 तो घरी जाऊन भेटून आल्यानंतरचे पुढचे दिवस घाईगडबडीत गेले. त्यांच्या लग्नाची तयारीही आता अंतिम टप्प्यात आली होती. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसे नितू आणि जितेंद्र आनंदाने उड्या मारायला लागले. त्यांना असं आनंदी पाहून आत्यालाही बरं वाटलं. अरुंधती आणि भाऊसाहेबांच्या लग्नानंतर आता बर्‍याच वर्षांनी घरात पुन्हा सनईचे सूर घुमणार म्हणून आत्या आनंदात होती. अनघाच्या बाबतीत आधी घडलेल्या कुठल्याच घटनांचा आत्याच्या आनंदावर परिणाम झाला नव्हता त्यामुळे भाऊसाहेबांना बरं वाटलं. त्यांना तीच भिती होती, जुन्या वळणाची, जुन्या संस्कारात वाढलेली अशिक्षित ती या आपल्या निर्णयाला पाठिंबा देईल का याचीच भाऊसाहेबांना चिंता होती पण आत्याच्या पाठिंब्यामुळे आणि लग्नापर्यंतच्या सगळ्या गोष्टीत तिने पुढाकार घेतल्यामुळे त्यांना बरं वाटलं. भाऊसाहेबांना हल्ली आत्याकडे पाहून  वाटायचं, शिक्षणापेक्षाही कधीकधी माणूस कसा घडवला जातो त्यावरही त्याचे विचार अवलंबून असतात. आत्या लहानपणापासून भाऊसाहेबांसोबत एकाच छताखाली लहानाची मोठी झाली होती. त्यांच्या आईवडिलांनी जसं भाऊसाहेबांना घडवलं तसच आत्यालाही घडवलं होतं यामुळेच आत्याचं अनघा आणि तिच्या घरच्यांबाबतीतल आताचं वागणं भाऊसाहेबांना अभिमान वाटाव असं होतं. दुसरीकडे अरुंधती मात्र शांतच होती. विक्रम समोर आला की ती त्याला आपण खूश आहोत असं भासवायची इतकचं. पण अरुंधतीच्या अश्या शांत राहण्याने भाऊसाहेबांना सुटल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर अरुंधतीने त्यांच्याकडे पुन्हा समिहाचा विषयही काढला नव्हता म्हणून ते निर्धास्त होते. 
.............................
अनघाच्या घरी कुमुद - श्रीधरने त्यांच्या परीने आर्थिकदृष्टीने झेपेल इतकी तयारी केली होती. बाकी मेहंदीचा मोठा कार्यक्रम, संगीत नाचगाणं याची रियाला हौस होती. लहान वा मोठी सगळ्याच बहिणींना वाटतं आपल्या बहिणीचं लग्न आणि आधीचे सगळे कार्यक्रम छान थाटामाटात व्हावेत. अनघाचं श्रीकांतसोबत लग्न ठरलं होतं त्यावेळी रियाने मेहंदी, संगीत सगळे कार्यक्रम कसे करायचे याचं प्लॅनिंगच केलं होतं. अनघाच्या कॉलेजच्या मित्रमैत्रीणी, रियाच्या अॉफिसच्या मैत्रीणी, कॉलेजच्या मैत्रीणी, त्यांच्या आईच्या जवळच्या मैत्रीणी असा मोठा गोतावळा या कार्यक्रमांसाठी जमला असता पण आता असं मनमुराद एन्जॉय करण्याची इच्छा जशी अनघाची नव्हती तशी रियाचीसुद्धा नव्हती. मेहंदीचा कार्यक्रमही घरच्याघरीच झाला. सगळ्याजणींना बोलवा मग त्या शंभर तर्‍हेचे शंभर प्रश्न विचारणार, सगळ्यात पहिली शंका, भाऊसाहेबांनी हे लग्न कसं ठरवलं? एवढ्या मोठ्या घरातले लोकं साध्या घरातल्या मुलीशी लग्नासाठी कसे तयार झाले हा प्रश्न सगळ्यांना पडला असता त्यात अनघाची मानसिक स्थिती आणि आजारी असणं पाहता तिला त्रास नको म्हणून कुमुद रियाने कोणालाही फारसं घरी बोलावलं नाही. अनघाची हातावरची सजलेली मेहंदी पाहायला रिया रुममध्ये आली,
" वाव ताई! किती गडद रंग चढला बघ " रिया अनघाचे मेहंदीभरले हात पाहत म्हणाली. तिला वाटलं, मेंदी रंगली की नवर्‍याचं प्रेम जास्त असं म्हणतात तसच ताईच्या बाबतीत झाल तर किती छान होईल ना! पण तिने हे अनघाला बोलून दाखवलं नाही.
" छान आहे न " रियाने तिला म्हटलं तस तिने थोडस हसु आणत हो म्हटलं. रिया तिच्या मेंदीच्या हातांवरुन हात फिरवताना भावूक झाली,
" ताई, आम्हाला सोडून जाणार न आता, will miss you " 
" रियु मला पण आठवण येईन सगळ्यांची खूप " ती तिला मिठी मारत म्हणाली तशी रिया रडायला लागली.
" रडतेस काय! आता छोटी थोडी ना आहेस. आईला त्रास नको देऊस आणि जरा कमी झोपा काढा." रियाचं नाक ओढत तिने हसत म्हटलं. तिचे अश्रू तिच्या हसण्यात मिसळून गेले.
" हो ताई पण कॉल मी. रोज हा " रिया लहान मुलासारखी हट्टाने ताईच्या कुशीत शिरली.
" हो गं करेन " तिने तिचे डोळे पुसत म्हटलं.
................
मेंदीच्या कार्यक्रमानंतरचे मधले दिवस तर भुरर्कन उडून गेले आणि तयारी करता करता लग्नाचा दिवसही येऊन ठेपला. घर फुलांच्यामाळांनी, रंगीबेरंगी तोरणांच्या रोषणाईने न्हाऊन गेलं. श्रीधररावांच्या मित्रांनी आणि रियाच्या काही जवळच्या मैत्रीणींनी घर सुशोभित करण्यासाठी खूप मदत केली होती अगदी घराचं बाहेरुन रंगकाम करण्यापासून ते लग्नाच्या दिवशी हॉलला जाण्यासाठी गाड्या बुक करेपर्यंत सगळं त्यांनी मॅनेज केलं होतं. कुमुदच्या उत्साहाला उधाण आलं होतं पण मनातून धाकधूकही होतीच. श्रीधरने तिची कितीही समजूत काढली तरी त्यांनाही हे लग्न व्यवस्थित पार पडेपर्यंत जीवाला चैन पडणार नव्हती.
.........................
लग्नाच्या दिवशी सकाळी हॉलला जायला निघण्यापूर्वी बाबा तयारी करुन तिच्या रुममध्ये तिला शेवटचं भेटून घ्यायला आले. ती ड्रेसिंगटेबलसमोर स्वतःलाच आरश्यात निरखत बसली होती. ते दारावरती टकटक करुन आत आले.
" बाबा या ना परवानगी कसली ? आता तुमच्या सगळ्यांचीच रुम आहे ही  !" ती उठून त्यांच्याकडे वळली. लेकीला वधुवेशात पाहणं ही जशी प्रत्येक बापाची इच्छा असते तशी हा दिवस कधीतरी आयुष्यात पहायला मिळणार आणि आपल्या काळजाचा तुकडा असा स्वतःपासून दूर करावा लागणार याची भितीही असतेच श्रीधरचीही परिस्थितीही वेगळी नव्हती. ते चालत जड मनाने तिच्यापाशी आले. सोनेरी चंदेरी धाग्यांनी विणलेला भरजरी शालू, पदराच्या बाजूला खड्यांनी भरलेल्या चक्रीफुलाच्या डिझाईन्स, अंगावर पारंपरिक  दागिने त्यात मोहनमाळ, नाजूकसा तन्मणी, तीन पदरी सोन्याचा हार, चाफ्याच्या कळीसारखी लांबट मण्यांची सोनकळी माळ, हातात पानाच्या आकाराचे डिझाईन असलेले तोडे, हिरवा चुडा, बोटात सोन्याच्या भरीव अंगठ्या, मीनाकाम जडवलेले मोती असलेले बाजूबंद, भांगरेषेवरती रत्नजडीत चंद्रकोर असलेली बिजवरा जी तिच्या भांगसराच्या खाली टोकाशी कपाळावरती उठून दिसत होती. कोंदणाला जडवलेल्या मोत्याच्या रूपाकारातली नाकातली चमकी, कानातून मागे केशसंभारात अडकविलेला सोन्याचा सर, कानात सोन्याच्या कुड्या या सार्‍या आभूषणांनी सजलेली राजेशिर्केंची सुनबाई आपल्या समोर उभी आहे असच श्रीधरना वाटलं. तिचा शालू, चेहर्‍यावरचा मेकअप, अंगावरचे दागदागिने सगळं पाहून त्यांचे डोळे भरुन आले.
" बाबा, तुम्हीपण आईसारखं काय करता !" ती उसनं हसु आणित म्हणाली.
" का ग रडण्याचा हक्क काय तुम्हा बायकांनाच आहे ! आणि कितीही कडक बाप असला तरी या क्षणाला डोळे आणि बापाच काळीज पुरुषाच्या कडक स्वभावाला जुमानत नाहीत. डोळे वहायचे थांबत नाहीत आणि मन रडायचं थांबत नाही." श्रीधरनी स्वतःच डोळ्यातले अश्रु पुसण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. तिने त्यांच्या हातावरती दोन्ही हात ठेवले.
" बाबा नका ना असं करु मग आईपण सुरु होईल आणि ती माहितीय ना एकदा तिच्या गंगायमुना वाहायला लागल्या कि ऐकणार नाही हा ती."  
" हो तेही खरच म्हणा! " ते हसत म्हणाले.
" बरं, स्वतःची काळजी घे हा आणि तुझ्या घरच्यांची सुद्धा! भाऊसाहेबांना त्रास होईल असं काही करु नको. तुला आम्ही काही सांगण्याची गरज नाही म्हणा तरीपण " त्यांचं बोलण तोडीत ती म्हणाली,
" नका काळजी करु. माझ्यामुळे त्यांना कोणाला काही त्रास नाही होणार." 
" अनु अजुन एक सांगू ?" श्रीधरने विचारलं.
" हो सांगा ना " 
" अनु, तुझ्या आधीच्या आयुष्यात काय घडलय त्याचा परिणाम तुझ्या आताच्या नव्या येणार्‍या आयुष्यावरती होऊ देऊ नकोस. विक्रम खूप चांगले आहेत हो ना." बाबा काय म्हणतायत त्याची कल्पना तिला आली. तिने होकारार्थी मान हलवली.
" हे काय आणलत हातातून ?" तिने त्यांच्या हातातल्या रॅप केलेल्या भेटवस्तुकडे पाहत विचारलं.
" अरे विसरलोच, हे तुझ्यासाठी ! आमच्याकडून गिफ्ट. अस समज, सगळे जुने क्षण तुझ्यासोबत देतोय." तिने ते गिफ्ट हातात घेतलं अन बाबांच्या कुशीत शिरुन ती रडू लागली.
" अरे रडूबाई किती मोठ्ठी झालीस! " बाबा तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत म्हणाले. मुहुर्ताची घटिका जवळ आली होती. पुढल्या एक दीड तासात आपली लेक दुसर्‍याच्या घरी जाईल आयुष्यभरासाठी, आता सकाळी उठल्यावरती तिची लगबग नसेल, ती बाहेर गेल्यावरती वाट पाहणं नसेल, तिची बाबा बाबा अशी हाक नसेल, तिने हौशीने बनवलेले पदार्थ सगळ्यांच्या आधी आपल्याला टेस्ट करायला देणं नसेल श्रीधरच्या मनात असे सगळे विचार मागोमाग येऊन गेले. त्यांना वाटलं, कश्या असतात ना मुली कालपर्यंत बाबाशिवाय पान हलत नाही यांचं आणि मग एखाद्या दिवशी कोणीतरी येतो आणि आपण त्याच्या हातात विश्वासाने यांचा हात फक्त द्यायचा कि या फुलपाखरासारख्या त्याच्यासोबत उडुन निघून जातात या विचारातच तिच्या डोक्यावरुन फिरणारा त्यांचा हात जड झाला आणि मनसुद्धा!
...................
 

लग्नाच्या हॉलला पोचण्याची वेळ जवळ आली. श्रीधर कुमुद, रिया सगळ्या तयारीनीशी गाडी यायची वाट पाहत होते. रियाचे अॉफिसचे सहकारी, श्रीधरचे मित्र सगळे डिरेक्टली हॉललाच पोचणार होते तरी कालपासून कुमुदच्या अगदी जवळच्या काही मैत्रीणी, श्रीधरच्या मित्रांच्या घरातल्या काहीजणी कुमुद आणि रियाला मदत करण्यासाठी थांबल्या होत्या. अधूनमधुन भाऊसाहेबही स्वतः फोन करित होते काही गरज लागली तर निःसंकोचपणे सांगा असंही त्यांनी श्रीधरना सांगितलं होतं. आत्याने मदतीला बंगल्यावरची काही नोकरमाणसं सुद्धा गेले चार - पाच दिवस पाठवली होती. अनघासाठी राजेशिर्केंच्या घरचे पारंपरिक दागिनेसुद्धा आत्याने अगदी प्रेमाने पाठवून दिले होते. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसे सगळे हॉलला पळाले आणि घरातली लगबग आता बर्‍यापैकी कमी झाली होती.
.......................
 अनघाने सगळ्या घरावरुन एक नजर फिरवली. हॉल, किचन, बाहेरचं गार्डन, झोपाळा सगळ डोळे भरुन पाहून घेतलं. जन्मापासून हे घर, भिंती, इथली वस्तू न वस्तू एवढी ओळखीची झालेली आणि आज असं सगळ सोडून आपलं हे काहीच नाही अशी समजूत घालून निघून जायचं या विचाराने मन बैचेन झालं तिचं. तिला तिचे लहानपणीचे दिवस आठवले, शाळेतले, कॉलेजमध्ये शिकत असतानाचे दिवस, ते रिझल्टचं टेन्शन, चांगले मार्क मिळाल्याचा सेलिब्रेट केलेला आनंद, शाळेत बक्षिस मिळालं की होणारं घरी कौतुक, गणेशचतुर्थीची बाबांसोबत, रियासोबत बसुन तयार केलेली  आरास, दिवाळीतून आईला किचनमध्ये केलेली मदत आणि त्यातून फराळ तोंडात टाकायची घाई, घरात आईबाबांनी साजरा केलेला प्रत्येक वाढदिवस तिच्या नजरेसमोरुन गेला. रियाचं लहानपण, तिची शाळा, तिच्या अॉफिसचा पहिला दिवस तिच्यासोबतची दंगामस्ती सगळं कालपरवा पर्यंत तर सुरु होतं आणि आजपासुन आपण या कश्यातच नसणार आहोत याने तिला भरुन आलं. 
बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला तसे श्रीधरनी दारातूनच कुमुदला हातानेच निघण्याची खूण केली. 
" अनु चल निघायला हव ना !"  कुमुदने तिच्या खांद्यावरती हात ठेवत म्हटलं. तिने होकारार्थी मान हलवली पण आईकडे पाहावस तिला वाटेना. आईकडे पाहिलं तर रडु येईल या विचाराने तिने कुमुदकडे पाहिलं नाही आणि ती उंबरा ओलांडून बाहेर आली मागून रियाही बाहेर आली. श्रीधरनी पुढे जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. त्या तिघी अजूनही पायर्‍यांवरतीच उभ्या होत्या. कुमुदने डोळे पुसत अनघाला पुढे व्हायला सांगितलं. ती आई, रियासोबत चालत गाडीपाशी आली आणि पुन्हा मागे वळून पाहिलं. जुनं सगळं मागे सोडून आता नवा प्रवास सुरु करायचा होता. ती गाडीत बसली आणि सोबत रिया. दुसर्‍या गाडीत आईबाबा बसले. तिने गाडीच्या काचेतून शेवटचं घराकडे पाहिलं आणि डोळे मिटून घेतले.......
क्रमशः

🎭 Series Post

View all