बंधन भाग 48

Love, Social Issues

बंधनचे आतापर्यंतचे सर्व भाग खालील लिंकवरती

https://irablogging.com/profile/sneha-vijay-dongare

भाग 48

(  गेल्या भागात विवाह निर्विघ्न पार पडतो त्यामुळे अनघाचे आईबाबा खूश होतात. तिला मन घट्ट करुन निरोप देतात पाहूया आजच्या भागात ती राजेशिर्केंच्या घरी गेल्यानंतर काय काय होतय )

राजेशिर्केंचा 'वात्सल्य ' बंगला रोषणाईत न्हाऊन गेला होता. बंगल्याच्या प्रवेशद्वारालाही फुलांची सजावट केली होती. प्रवेशद्वाराचे लोखंडी गज त्या फुलांतून ओळखूही येत नव्हते. प्रवेशद्वारापासून ते गाड्या जिथून बंगल्याच्या दिशेने येतात त्या मुख्य रस्त्यापर्यंत दुतर्फा आकर्षक रांगोळ्या घातलेल्या होत्या. गेले सात आठ दिवसांपासून लग्नाच्या निमित्त्ताने म्हणून बरीच वर्दळ सुरु होती. दुपारी लग्नाचे विधी पार पडले तशी संध्याकाळपर्यंत वरवधू येतील म्हणून त्यांच्या स्वागतासाठी पुन्हा तयारी सुरु झाली. पारंपरिक वेशभूषेतील बँण्डपथक दोघांच्या स्वागताला सज्ज होतं. ते पोचण्याआधीच नितू, जितेंद्र, आत्या घरी आले होते. वधुवराची गाडी जशी बंगल्याच्या जवळ आली तसा बँण्डपथकाच्या वाद्यांनी वातावरणात जोश आला. ते सगळ गाडीतून पाहताना अनघा भांबावून गेली. इतकी सारी माणसं, एवढं मोठं घर, जिथेतिथे हाक दिल्यावरती तत्परतेनं धावत येणारी नोकरमाणसं हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. 

...........................

गाडी प्रवेशद्वारातून आतमध्ये आली. ते दोघे गाडीतून खाली उतरले तर समोर त्यांचं हसतमुखाने स्वागत करायला बंगल्यातली सगळी नोकरमाणसं आणि कारखान्यावरचे कामगार उभे होते. सगळ्यांच्यापुढे माधवकाका उभे होते. त्यांच्या चेहर्‍यावरती छान हसु होतं आणि सुरकुतलेल्या हातात पुष्पगुच्छ होता. त्यांनी पुढे येत विक्रमच्या हातात गुच्छ दिला.

" हे आमच्या सगळ्यांकडून समजा! सुखी भव." ते प्रेमाने आणि आपुलकीच्या भावनेनं त्याचे हात हातात घेत बोलले.

" माधवकाका, थँक्यु !"  तो हसत त्यांचे आभार मानत म्हणाला.

" अाभार कसले! तुम्ही एवढेसे होतात तेव्हापासुन ओळखतोय तुमास्नी." माधवकाका हसत म्हणाले. तो अनघाकडे वळत म्हणाला,

" मॅडम हे माधवकाका आपल्या फार्महाऊसची सगळी जबाबदारी हेच पाहतात." तिने त्यांच्याकडे हसुन पाहिलं आणि वाकून त्यांना नमस्कार केला. 

" असु दे गं सुनबाई! नमस्कार करायला आमी मोठी नायीत. आमी नोकरमाणसं पन भाऊसाहेब तस कधी वागवत नाह्यीत आम्हाला." ते तिच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवत म्हणाले.

" काका, काहीही काय! तुम्हाला कुणी म्हटलं का असं!" विक्रमने त्यांना म्हटलं. आत्या आणि माधवकाकांना कुणी नोकर म्हणून हिणवलेलं त्याला अजिबात आवडायचं नाही. 

" पण आज रॉयल दिसता हा तुम्ही." तो त्यांची थट्टा करित म्हणाला. नेहमी गुडघ्यापर्यंत धोतर आणि सदरा अश्या पोशाखात असणारे माधवकाका आज डोक्यावर फेटा, सदरा पायापर्यंत धोतर अश्या वेशात उभे होते.

" मग आज इतका चांगला दिस म्हनल्यावर म्हटलं आपन बी बरं रहावं." ते पटकन छानस हसत म्हणाले.

" बरं, सुनबाईंना घेऊन या कधीतरी तिकडे!" त्यांनी अनघाकडे पाहत सुचक नजरेनं म्हटलं. त्याला त्यांच्या या मस्करीवरती काय बोलायचं कळेना तशी त्याने होकारार्थी मान हलवली.

.......................

सगळ्या नोकरमंडळींच्या शुभेच्छा आणि त्यांनी प्रेमाने आणलेले पुष्पगुच्छ स्वीकारुन दोघे आतमध्ये दरवाजापाशी आले तोपर्यंत भाऊसाहेबही त्यांच्यामागून आले. आत्या ओवाळणीचं तबक हातात घेऊन समोर उभी होती. आत्यासोबत नितू, जितेंद्र आणि कारखान्यावर काम करणार्‍या इतर बायका नव्या सुनबाईला भेटण्यासाठी आल्या होत्या. आत्याने ओवाळणीचं तबक अरुंधतीच्या हातात दिलं.

" वहिनीसायेब, या ना " आत्या मोठ्या मनाने म्हणाली तस अरुंधतीने ठचक्यात पुढे येत तबक अभिमानाने हातात घेतलं आणि दोघांचं औक्षण केलं. 

" वहिनी उखाणा " नीतू हट्टाने म्हणाली तस आत्यानेही अनघाकडे पाहत गोड हसत नितूच्या बोलण्याला हो म्हणत दुजोरा दिला. आता सगळ्यांचं लक्ष नव्या सुनबाईच्या बोलण्याकडे होतं. तिने एकदा मान वळवुन शेजारी उभ्या असणार्‍या विक्रमकडे पाहिलं. तो मंदसं हसला.

" विखुरलेल्या पाकळ्यांचे विखुरलेले रंग

विक्रमच्या साथीने आला जीवनी नवा गंध. " तिच्या तोंडून उखाणा ऐकला आणि सगळ्यांनी जोरात उत्साहात टाळ्या वाजवल्या. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्या शब्दांचा अर्थ त्याच्यापर्यंत पोचला. आत्याने नजरेनेच त्याला ठिकय म्हटलं. भाऊसाहेबांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला तसा त्याला धीर आला. अरुंधती हातातलं तबक घेऊन मागे सरकली. 

" चला सुनबाई या आत." आत्या तिला म्हणाली तस नीतू आणि जितेंद्र मोठ्याने ओरडले, "Welcome home वहिनी." 

तिने उंबरठ्यावरचं माप ओलांडलं आणि ती आतमध्ये आली. आत्याला सगळं निर्विघ्न पार पडल्याने भरुन आलं.

ते दोघे बाकी सगळ्यांसोबत चालत पुढे गेले. आत्या तिथेच क्षणभर उभी राहिली. मागून भाऊसाहेब आत आले.

" अगं कसला विचार करतेस ! त्या उखाण्याचा का?" त्यांनी विचारलं.

" हो म्हनजे अगदी तस नायी " आत्या सारवासारव करित म्हणाली.

" नको चिंता करुस. आता तर लग्न झालय त्यांचं. हळुहळु ती तिच्या आयुष्यातल्या जुन्या वाईट घटना विसरेल. आपल्या घरात एकदा रमली कि बघ सगळं ठिक होईल."

" हो बरोबर हाय तुमचं." आत्यालाही त्यांचं पटलं.

" चला मग सुनबाईंना घर दाखवा आणि तुमचा कौतुकसमारंभ आटपा लवकर आठ वाजले रात्र कधी होईल कळणारही नाही. त्यांना आराम करु द्या जरा."

 ते आत्याला समजावित म्हणाले तशी तिने होकारार्थी मान हलवली.

..............................

हॉलमध्ये तिला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी आलेल्या बायकांनी तिच्या दिसण्याचं, दागदागिन्यांचं कौतुक केलं. त्यात गुरुकुलच्या प्राध्यापिकांपैकी कुणीही नव्हतं. खंदारेमॅडमसारख्या सिनिअर प्रोफेसर्स लग्नविधींनंतर तिला तिकडेच भेटून शुभेच्छा देऊन गेल्या होत्या. अरुंधतीने फारसं कोणाला आमंत्रण दिलं नव्हतं त्यामुळे तिच्या मैत्रीणीही नव्हत्या आणि अश्या लो क्लास बायकांमध्ये आपण बसणं शोभत नाही म्हणून अरुंधतीही तिथे थांबली नव्हती. त्या सगळ्या बायकांमध्ये 'हायप्रोफाईल ' असं कुणीच नव्हतं. कारखान्यावर काम करणार्‍या बाया, तिथ काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या बायका, राजेशिर्के प्रशालेच्या शिक्षिका अश्या त्या सगळ्याजणी तिला भेटायला आल्या होत्या. आपापल्यापरीने शक्य होईल अश्या भेटवस्तूही त्यांनी आणल्या होत्या. त्यांचं प्रेम बघुन तिला भरुन आलं. ती सगळ्यांशी हसुन बोलली. विक्रम सकाळपासून तिच्या आजुबाजुला विधींच्या निमित्ताने होता त्याचं मनावर दडपण आलं होतं तिच्या आता काही वेळ तरी तो आजुबाजुला नाहीय याने तिला शांत वाटलं.  काही क्षण का होईना ती त्यांच्यात रमली. ते पाहून आत्यालाही बरं वाटलं. पण अनघाच्या मनात एकामागोमाग विचार सुरु होते. थोड्यावेळाने हे सगळं संपेल आणि आपण आपल्या बेडरुममध्ये असु या विचाराने तिला अक्षरशः भिती वाटली. सकाळपासून आपल्या दोघांभोवती माणसांचा गोतावळा होता म्हणून विक्रमसर छान वागत होते आपल्याशी आणि लग्नाआधी तर चांगलं वागणं हे मुलीच्या आईवडिलांना दाखवण्यासाठी तरी करावं लागतच पण आता लग्नानंतर काय ! विक्रमसर आपल्याला समजून घेतील आणि एका रेप झालेल्या मुलीच्या वेदना कळतील का त्यांना ! आपल्याला हे लग्न स्विकारण्यासाठीच अजून वेळ हवाय हे कसं सांगायचं त्यांना या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकु लागला तसं त्या बायकांच्या कौतुक करण्याकडेही तिचं लक्ष लागेना. इतक्यात नितू, जितेंद्र आणि विक्रम समोरुन हसत एकमेकाला टाळ्या देत हॉलमध्ये आले. तिची नजर त्या आवाजाने त्यांच्याकडे वळली.

" चला चला, वाजले किती बघा झोपायचं नाही का उद्यापण कौतुकचं करायचय की!" नीतू त्या सगळ्याजणींचं लक्ष वेधत म्हणाली. नीतूमागोमाग आत्याही मग त्या बायकांमधुन उठत उभी राहिली.

" हो, बरोबरय नितूचं. चला जरा त्यांना आराम तरी करु दे. दिवसभर दगदग झालीय." आत्याच्या बोलण्यासरशी सगळ्याजणी उठल्या आणि तिला येतो आम्ही उद्या भेटु म्हणतं निरोप घेऊन जायला निघाल्या. जितेंद्र बाहेर कोणाला काय हवय का ते पाहायला गेला. कोणी घरी जाणार असतील तर त्यांची व्यवस्था करणं आणि बंगल्यावरती राहणार असतील तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणं याकडे जितेंद्र स्वतः लक्ष देत होता. नीतूने मात्र अनघाचा हात धरून तिला वरती नेलं.

................................

" वहिनी ये ना " नितूने एका हातात तिचा हात धरला होता आणि दुसर्‍या हाताने तिने रुमचा दरवाजा लोटला आणि नीतू रुममध्ये तिला घेऊन आली. रुमच्या दारातूनच रुमवरती एक नजर टाकत ती अनघाला म्हणाली,

" This is your room म्हणजे तुझ्या विक्रमसरांची रुम " 

नितूच्या बोलण्याने तिने आत येत संपुर्ण रुमवरती नजर फिरवली. बापरे! किती मोठी आहे ही रूम! असा पहिला विचार तिच्या मनात आला. ती हळुहळु आतमध्ये आली.

चकचकीत व्हाईट कलरची फरशी, रुमला डाव्या बाजूला मोठाली खिडकी आणि त्यावरती सोडलेले फिकट पिवळ्या रंगाचे विन्डोंकर्टेन त्यावरची करड्या रंगातली फुलांची नक्षी,  खिडकीची तावदाने सकाळी उघडताच सुर्यप्रकाशाची किरणं बेडवरती पडतील अश्या बेताने ती खिडकी होती. खिडकीची जी भिंत होती तिथूनच पुढे दोन तीन पावलं चालत गेलं की रुमची गॅलरी होती. तिथे उभं राहिलं की खालचं गार्डन, बंगल्याचं प्रवेशद्वार दिसायचं. खिडकीच्या समोरच वॉटरप्रुफ प्लायवुडचा डबलबेड त्यावरती Centuary ची Sleepables स्प्रिंग मॅट्रेस अंथरलेली होती. अगदी टि.व्ही. सिरियल मध्ये दाखवतात तसा बेड सजवलेला नसला तरी नीतूने उत्साहाने मैत्रीणींसोबत गुलाबांच्या पाकळ्या बेडवरती पसरवल्या होत्या. बेडच्या बाजूलाच लागून एक कॉर्नरपिस होता  त्यावरती टेबललँम्प आणि शेजारीच विक्रमचा हसरा फोटो. कॉर्नरपिसच्या वॉललाच भिंतीत शेल्फवरती त्याच्या ट्रॉफिज मांडून ठेवलेल्या होत्या. कॉर्नरपिसच्या बाजुला ब्राऊन कलरचा लॉकेबल वॉर्डरोब होता. त्याशेजारी आर्क शेपचा मिरर आणि ड्रॉवर असणारं ड्रेसिंगटेबल होतं. त्याला मेट फिनिशिंगचा टच होता आणि त्यासमोर वुडन स्टुल. ड्रेसिंगटेबलकडे अनघाचं लक्ष वेधत नीतू म्हणाली,

" हे बघ आवडली का डिझाईन याची ?" 

" हो " अनघा त्यावरुन हात फिरवित म्हणाली.

" This is new हा म्हणजे आधीही होतं पण दादा फक्त आरश्यात उभं राहून ब्लेझर ठिक करण्यापुरताच वापरायचा तो मिरर हे नवीन मागवलन दोन दिवसांपूर्वी तुझ्यासाठी म्हणून !" ते ऐकुन तिची नजर वरती वळली. तिला नीतूचं बोलणं ऐकुन विश्वासच बसेना.

" एवढं मोठठ माझ्यासाठी !" ती आश्चर्याने म्हणाली.

" हो ग बाई! तुझ्याशिवाय दादाच्या रुममध्ये या स्टुलावरती बसून सजणारं कोण आहे दुसर!" नीतू तिची थट्टा करीत म्हणाली. ड्रेसिंगटेबलपासून दोन पावलांच्या अंतराने बरोबर बेडसमोर फोमची आर्मचेअर होती. त्यावरती बैठक मारित नीतू म्हणाली,

" मग कशी आहे रुम I know तुला आवडली असेल." नीतूची बडबड सुरु होणार इतक्यात उघड्या दरवाजातून विक्रम आतमध्ये आला. त्याच्या पावलांनी नितूने चेअरमधूनच मागे वळून पाहिलं.

" अरे, दाद्या आलास तू !" ती चेअरमधून उठत म्हणाली.

" हो, नीतूभाई माझ्या माहितीप्रमाणे मी माझ्याच रुममध्ये आलोय नाही का?" तो हसत तिला सतवायचं म्हणून म्हणाला.

" हो, ओके वैनुडी Good night उद्या बोलूया हा " ती अनघाजवळ येत म्हणाली तस तिने मान हलवुन नीतूला गूड नाईट म्हटलं. ती चालत बाहेर आली आणि जाताना हसत त्याला बाय बाय म्हटलं.

..................................

नीतू गेली आणि त्याने तिच्याकडे पाहत मंदसं हसत रुमचा दरवाजा बंद केला. त्याने आतून कडी घातली. तिच लक्ष आता पूर्णपणे त्याच्याकडे होतं. तिच्या हातांच्या तळव्यांना घाम सुटला. भीतीने पाय थरथरल्यासारखे वाटायला लागले. भीतीचा थंडगार शहारा अंगावरती आला आणि तिला तीन महिन्यापुर्वीची ती गॅदरिंगच्या दिवशीची रात्र आठवली. तिला वाटलं, आताच्या आता दरवाजा उघडून नीतूच्या रुममध्ये निघून जावं पण घरातले काय म्हणतील त्यांना कळलं तर यामुळे ती मन घट्ट करून तिथच उभी राहिली. तो दोन तीन पावलं चालत पुढे आला.

" मॅडम, तुम्हाला फ्रेश व्हायच असेल ना This way washroom " त्याने हातानेच तिला वॉशरुम दाखवली.

" नाही, आयमिन नको आता " ती फरशीकडे पाहत म्हणाली. त्याच्याकडे पाहायचा तिला धीर होईना.

" Ok, तुम्ही बसा ना मी येतो फ्रेश होऊन." असं म्हणून त्याने वॉर्डरोब ओपन केलं. हँगरला लटकवलेले शर्ट्स पुढे मागे केले आणि त्यातून Long sleeves चा Black & Grey checked चा शर्ट आणि ट्राऊजर चा सेट काढला आणि तो वॉशरूमला निघून गेला. 

........................................

ती अजूनही स्तब्ध उभीच होती मग ती जरा शांतपणे बेडवरती पाय मुडमुन बसली. विक्रम बाहेर आल्यावरती कसा बोलेल आपल्याशी, कसा वागेल आपल्याशी हाच विचार गेल्या काही वेळापासून तिच्या डोक्यात थैमान घालीत होता. ती बेडवरती अशी बसलेली, दोन्ही पायांवरती तिने घडी घातलेले दोन्ही हात ठेवलेले आणि त्यावरती डोकं टेकवलेलं इतक्यात विक्रम वॉशरुममधून बाहेर आला आणि हातातला टॉवेल त्याने बाजूच्या कोचावरती टाकला.

" काय मग कारखानीस मॅडम! कसं वाटतय ? उतरली का तुमची सगळी मस्ती, हुशारी and all." तो बेडवरती तिच्या जवळ बसत म्हणाला तशी तिने नजर त्याच्याकडे वळवली.

" विक्रमसर ! तुम्ही ! तु.....तुम्ही असं का बोलताय?" तिने घाबरतच विचारलं. आता मात्र तिला काहीच कळेना.

" चचच......कशी आहेस ग तू! मला वाटल होतं हुशार असशील तू ! पण एवढी बिनडोक असशील असं वाटलं नव्हतं!" त्याने मोठ्याने हसत म्हटलं. त्याच्या अश्या हसण्याने तर ती मनातून हादरूनच गेली.

" म्हणजे! " तिने विचारलं.

" आता म्हणजे....म्हणजे हेच ग तुला वाटलंच कस कि तुझ्यासारख्या एका रेप झालेल्या मुलीसोबत मी लग्न करेन! हे लग्न फक्त आणि फक्त भाऊसाहेबांसाठी झालेलं आहे लक्षात ठेवं. त्या समिहासारख्या मुलीला सोडून तुझ्याशी मी लग्न करेन असं वाटलच कसं ग तुला!" तो तिच्या नजरेला नजर देत अजून जवळ येत म्हणाला तशी ती थोडी मागे सरकली.

" म्हणजे तुम्ही साहेब म्हणाले म्हणून लग्नाला....." आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.

" ए बावळट रडू नकोस ग, छे! तुला बायको म्हणवून घ्यायलाही लाज वाटते मला! तुझी योग्यता तरी आहे का माझ्यासोबत उभं रहायची! आणि आधी निदान ब्युटी आणि कॉन्फिडन्स तरी होता तुझ्याकडे आता तोपण शून्य....कशी वागतेस, कशी राहतेस तू! त्या मल्होत्रासरांसमोर एवढी तुझी ओळख करुन दिली. साधं फोटोत हसतात हे पण आता समजत नाही ग तुला! " तो भडाभडा तिच्याकडे पाहत बोलत होता. त्याच्या बोलण्याने तिचे अश्रू थांबेचना. तो तिचा चेहरा एका हातात धरत म्हणाला,

" ए मुर्ख रडू नको,आणि सतत बघावं तेव्हा सुतकी चेहरा करुन फिरत असतेस! असो चल ज्वेलरी काढ " 

" का ? प्लीज सर तुम्ही " ती कळवळून बोलायला लागली.

" ए Don't teach me हा, I'm your husband now आणि काढ ना पटपट चल फास्ट." तो तिच्या गळ्यातल्या हाराला हात घालीत म्हणाला तशी ती घाबरली.

" नको सर प्लीज, मला.....मला थोडा वेळ द्या जुन्या गोष्टीतून बाहेर पडायला प्लीज." ती म्हणाली तसा तो चिडून तिच्यावरती ओरडला,

" ए तुझ ते सावरण बिवरणं मला सांगू नकोस चल "

" पण.......प्लीज मला समजून घ्या प्लीज सर मी हात जोडते हव तर."  ती त्याच्या हातापाया पडायला लागली.

" ए चल ड्रामा क्वीन " तो तिचे हात झटकत म्हणाला.

" आणि तसही मी जवळ आल्याने काही आभाळ कोसळतं नाहीय " कुत्सिकपणे बोलून त्याने तिच्या केसांना हात घातला तसे सगळे केस मोकळे झाले.

" पण.......मला झोप आलीय प्लीज मी रेस्ट घेते." ती रडून बोलायला लागली तशी त्याने तिच्या कानाखाली मारली.

" काय ग नाटकं तुझी ही.....I don't have mood मला नाही ना आली झोप सो......" तो तिच्या ओठांजवळ आपले ओठ नेत म्हणाला तशी ती मागे सरकली.  "प्लीज सोडा सर मला" म्हणत चेहरा ओंजळीत घेऊन ती  रडायला लागली.

..................................

" मॅडम, मॅडम काय झाल? पाणी देऊ का प्यायला तुम्हाला ?" या आवाजासरशी तिने स्वतःच्या चेहर्‍यावरचे हात बाजूला घेतले तर समोर विक्रम उभा होता.

" अरे! काय झाल रडलात कि काय तुम्ही ! " त्याने विचारलं तस ती मानेनच नाही म्हणाली आणि तिने डोळे पुसले. बापरे! मघाचं स्वप्न होतं तर ! आपल्याच मनाशी चाललेला खेळ होता तो! या विचाराने जरा तिच्या जीवात जीव आला.

" नाही काय! काजळ ओघळलय ना डोळ्यांतून " त्याच्या या बोलण्यासरशी तिने डोळ्यातलं पाणी अलगद पुसलं.

" तुम्ही कधी आलात फ्रेश होऊन ?" तिने मघाचा नक्की भासच होता ना याची खात्री करण्यासाठी त्याला विचारलं.

" अरे! आत्ताच तर आलो. तुम्ही चेहरा हातात घेऊन रडत बसलेलात! नका काळजी करु तुम्ही आईबाबांची रिया आहे ना त्यांच्यासोबत." तो तिला समजावित वॉर्डरोबजवळ गेला. त्याने पुन्हा वॉर्डरोब ओपन केला आणि आतून ब्लँकेट्स बाहेर काढली. तिच्या हातात घडी घातलेलं ब्लँकेट ठेवत तो म्हणाला,

" घ्या ना, एसी सुरु आहे ना तुम्हाला सवय नसेल न एसीची ? पहाटे गारवा जाणवेल मग." तिने थरथरत्या हाताने ते ब्लँकेट हातात घेतलं. आता तो आपल्याजवळ येऊन बसेल या विचारानेच तिला आतून अस्वस्थ वाटायला लागलं होतं. खुप भयानक वाटायला लागली तिला रात्र. 

.......................

जे होईल ते होईल...पण आपल्याला आता पुन्हा नाही आईबाबांकडे जायचय. आधीच आपल्यामुळे त्यांना त्रास झालाय त्यात कसबस हे लग्न जुळलं आणि नशिबाने व्यवस्थित पारसुद्धा पडलं. आता आपल्या आयुष्यात जे होईल ते आपणच सहन करु. साहेबांनापण त्रास नको उगीच! तिने शेवटी ठरवलं, आता काहीही न बोलता विक्रमच्या स्वाधीन व्हायचं. तिचे हे सगळे विचार सुरु होते तरी विक्रम मात्र अजून त्या वॉर्डरोबमध्येच काहीतरी शोधत होता. ती गप्पपणे बेडवरती बसून पाहत होती.

त्याने एक मॅट्रेस, पिलो,ब्लँकेट आतून काढलं आणि वॉर्डरोब बंद केला.

" कुठे निघालात ?" तिने त्याच्या हातातल्या मॅट्रेसकडे पाहत विचारलं. त्याने तिच्याकडे वळून म्हटलं, " नथिंग " त्याच्या ओठावरती नकळत शब्द आलेले,' नाही गं जात मी कुठेच तुला सोडून ' पण त्याने मनातले शब्द मनातच ठेवले. बेडच्यासमोरच्या मोकळ्या फरशीवरती त्याने मॅट्रेस अंथरली आणि त्यावरती उशी ठेवली आणि बिछाना तयार केला. ते सगळं पाहून ती बेडवरुनच म्हणाली,

" सर, तुम्ही असे फरशीवरती झोपणार !" 

त्याने अंथरलेल्या बिछान्यावरुनच तिच्याकडे पाहिलं अन म्हटलं,

" हो, काय हरकत आहे...."

" पण तुम्ही! तुम्हाला असं जमिनीवरती झोपायची सवय नसेल ना! उठा तुम्ही मी झोपते खाली तुम्ही झोपा ना इकडे बेडवरती तसही ही तुमची रुम आहे." तिच्या या तिच्याही नकळत हक्काने बोलण्याने त्याला मनातून बरं वाटत होतं.

" नको हो, तुम्ही आजच घरी आलात न आमच्या मग तुम्हाला असं जमिनीवरती कसं झोपू देईन मी आणि तुमची हेवी ज्वेलरी सांभाळत कसं झोपणार तुम्ही फरशीवरती. तुम्ही खरच झोपा ना वरती. I'm fine here." तो तिला समजावित शांतपणे बोलत होता. त्याने ब्लँकेट पांघरण्यासाठी घेतलं आणि तो पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला,

" मॅडम, You are my wife माझ्या आनंदासाठी मी हव तेव्हा वापर करुन घ्यायची वस्तू नव्हे! तुम्ही नका काळजी करू. तुमच्या इच्छेशिवाय आपलं नातं पुढे नाही जाणार. Your wish matters a lot." त्याच्या या शब्दांनी तिचं मन भरुन आलं. अनपेक्षित होतं हे त्याचं वागणं तिच्यासाठी! तिला मनातून वाटलं, त्याच्याकडे धावत जावं आणि त्याला मिठीत घ्यावं पण तिचं मन कितीही धावत असलं तरी शरिर तसुभरही हललं नाही. शरिराच्या सगळ्या भावना त्या एका घटनेनं केव्हाच मेलेल्या होत्या. 

" गुड नाईट " तो हसुन म्हणाला तिला आणि त्याने डोकं उशीला टेकलं. आजवरच्या आयुष्यात फरशीवरती झोपण्याची ही पहिलीच वेळ त्याची! त्याने मनाशी म्हटलं, ' अनु माझ्या त्या वागण्याने तुझी अशी अवस्था झाली ना मग आता हि माझी मलाच शिक्षा आहे आणि एक नवरा म्हणून स्वतःच्या पत्नीला आनंदाने, हक्काने जवळही न घेता येणं यापेक्षा मोठी शिक्षा एका नवर्‍यासाठी कुठली असणार पण मला मान्य आहे तुझ्यासाठी इतक तर मी नक्कीच करु शकतो ना!' या विचारासरशी त्याने डोळे मिटून घेतले.

क्रमशः

लग्नानंतरचं पती पत्नीचं नात नव्या वळणावरती जाताना नेहमीच पतीने पत्नीच्या भावनांचा आदर ठेवायला हवा. तिलाही ' हो ' किंवा 'नाही ' म्हणण्याचा अधिकार आहे हे लक्षात घ्यायला हवं. कारण Her wish also matters a lot !

Like, Comment & Khup khup share kra.

🎭 Series Post

View all