बंधन भाग 49

Love Social

भाग 49

(  गेल्या भागात अनघा विक्रम घरी पोचतात तेव्हा सगळे आनंदाने त्यांचं स्वागत करतात. घरी आल्यानंतर विक्रम कसा वागेल तिच्याशी हिच चिंता तिला असते पण गेल्या भागाच्या शेवटी तो स्वतःहूनच तिला त्यांचं लग्न स्विकारण्यासाठी वेळ द्यायचं ठरवतो. पाहुया त्याच्या या निर्णयाने तरी तिची चिंता मिटते का)

विक्रम शांतपणे त्याच्या बिछान्यावरती झोपलेला पाहून तिही मग झोपण्यासाठी वळली. तिने उशीवरती डोकं टेकण्याआधी जवळच्या वॉलवरची लाईटची बटन्स स्विच अॉफ केली आणि ती शांतपणे बेडवरती आडवी झाली. दिवसभराचा थकवा, दगदग यातून जरा आता तिला बर वाटलं. तिने शांतपणे डोळे मिटले.

.............................

रात्रीचे तीन साडेतीन वाजत आले. आपण कितीही झोपलेलो असलो तरी आपलं शरिर निद्रावस्थेत आहे असं वरून दिसत असलं तरी मन निद्रावस्थेत नसतं. मनाच्या तळाशी खोल कुठेतरी विचारांची चक्र धावतच असतात. घडलेल्या बर्‍यावाईट घटना मनाच्या तळाशी साठत असतात जसा सगळा कचरा समुद्राच्या तळाशी साठत जातो पण कधीतरी त्सुनामी येते, वादळ येतं अन समुद्राच्या गर्भातला सगळा कचरा किनार्‍याला येतो तसच मनाचही असतं. मनातही असचं सगळं साठत जातं आणि अचानक उफाळून वरती येतं तसचं अनघाचही झालं. गेल्या दोन तीन महिन्यात एकामागोमाग घडलेल्या घटना आणि एका बदलाशी जूळवून घेण्याआधी दूसरा बदल असे सगळे धक्के तिच्या मनावरती आदळले होते आणि या सगळ्याचं मूळ त्या एका घटनेत होतं. रात्रीच्या त्या अंधारात तिच्यावरती झालेले अत्याचार. तिच्या नजरेसमोर पुन्हा ती डिसेंबरमधली रात्र उभी राहिली. गॅदरिंगचा तो कार्यक्रम, त्याआधीचं तिचं कॉलेजला सजूनधजुन जाणं, फेसबुकवरती पोस्ट केलेले स्वतःचे छान छान फोटोज, हॉस्टेलवरती बोलावणारी ती चिठ्ठी, हॉस्टेलला तिने एकटीने जाणं, त्यानंतर कुणीतरी येउन कॉलेजच्या आवारात तिला क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करणं आणि ती काळीकुट्ट अंधारी खोली सगळ काल घडल्या सारखं तिच्या नजरेसमोरून सरकत होतं. त्याला थांबवण्याचे तिचे अपुरे पडलेले प्रयत्न, तिच्याजवळ येणारा तो, त्या पर्फ्युमचा तिच्या शरिरात भिनत जाणारा तो गंध, पाठिवरून, गळ्यावरून फिरणारे त्याचे हात सगळं डोळ्यासमोर आलं आणि ती मोठ्याने किंचाळली त्या दिवशी रात्रीसारखीच.

" प्लीज लिव्ह मी....मला घरी जाऊ दे प्लीज सोडा मला प्लीज..........." 

तिचे हे शब्द त्याच्या कानात बाण घुसल्यासारखे घुसले तसा तो पटकन बिछान्यावरून उठला.

" अनघा, काय झालं " तो उठेपर्यंत ती बेडवरती उठुन मोठ्याने किंचाळत होती आणि रुममधल्या अंधाराने तर ती अजुनच घाबरली. तो अंधारात चाचपडत बेडजवळ यायला लागला तशी ती मोठ्याने ओरडली,

" जा ना तू माझ्या जवळ नको येऊ......प्लीज नको."

त्याला काहीचं सुचेना. 

" ऐका ना  प्लीज Cool down " त्याने अंधारात धावत जात तिला शांत करण्यासाठी तिच्या खांद्यावरती हात ठेवला तर ती दचकलीच. तिने त्याचा हात झटकला आणि ती बेडवरून उठली आणि रुमच्या दरवाजाच्या दिशेने धावायला लागली. तो धावत तिच्यापाशी जात तिला शांत करायचा प्रयत्न करित होता.

" ऐका ना जरा माझं प्लिज..." तिने त्याचा हात पुन्हा झिडकारला. " प्लिज....Don't touch me " आणि ती मोठमोठ्याने हुंदके देऊन आता रडायला लागली. ती धावाधावीत कुठेतरी पडेल अडखळून म्हणून त्याने कसाबसा भिंतीजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि स्वीच अॉन केला तसा सबंध रुममध्ये प्रकाश पसरला. ती दाराजवळ जात होती तोच त्या उजेडाने ती क्षणभर थांबली. त्याने तिच्याकडे पाहिलं तर भितीने थरथरणारी, घामाने निथळणारी ती आपले दोन्ही हात स्वतःभोवती घट्ट धरुन उभी होती.

" मॅडम, शांत व्हा.......बसा थोडावेळ या इकडे." तो तिच्याजवळ गेला आणि त्याने कसबस तिला हाताला धरुन पुन्हा बेडजवळ आणलं.

" हळु.....या बसा जरा Cool down & relax " 

ती पुन्हा बेडवरती बसली. कपाळावरती घामाचे थेंब, थरथरणारे हातपाय ती घाबरून लहान मुलं जस एखाद्या कोपर्‍यात बसतं तसं अंगाचं मुटकुळ करुन बसली. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता आणि भितीने ह्रदयाचे ठोके वाढले. तिची ती अवस्था बघून त्याच्या पायाखालची जमिनच क्षणभर सरकली. विक्रमला पहिल्यांदा काय होतय कळेना पण आता जस लक्षात आलं तसं त्याच्या हातांनाही घाम सुटला. तिला पॅनिक अॅटॅक आला होता. त्याने स्वतःला सावरत आधी शेजारच्या कॉर्नरपिसवरचा पाण्याने भरलेला जग उचलला आणि ग्लासमध्ये पाणी भरलं. ग्लास तिच्यासमोर धरला.

" पाणी घ्या थोडं. बरं वाटेल हा तुम्हाला." तो शांतपणे तिला समजावित म्हणाला.

 तशी आपल्याच विचारात असणारी ती दजकली आणि तिचा हात लागून त्याच्या हातातला ग्लास फरशीवरती पडला. सगळं पाणी फरशीवरती सांडलं आणि तिला त्या रात्रीचा तो प्रसंग आठवला. तिने त्याच्याकडे पाणी मागितल तेव्हा त्याने ग्लास तिच्यासमोर धरुन जमिनीवरती आपटला होता. त्यालाही दोन क्षण तो प्रसंग डोळ्यासमोर आला. ग्लासच्या पडण्याने ती अजूनच बिथरली. 

" पाणी....पा...णी सांडलं.....मला ह..व होतं....त..हान." ती विक्रमकडे बघत स्वतःशीच बडबडायला लागली. त्याला तिची अवस्था बघवेना.

" मॅडम,कुल डाउन....आपण घरी आहोत कि नाही आपल्या....बघा लाईट सुरु आहेत....अंधार नाहीय की नाही.." तो लहान मुलासारखं तिला समजावित होता.

" हा हा लाईट सुरू......हात नको....Don't touch me....मी....मी....घाबरत नाही कुणा....कुणाला..." तिचं आपल्याच विचारात राहून बडबडणं ऐकुन त्याला तिची दयाही येत होती आणि पुन्हा पुन्हा आपण किती नालायकपणे वागलो ही भावना मनाला डंख मारित होती. तो शेजारचा स्टुल ओढून बेडसमोर बसला. त्याने पुन्हा ग्लास भरुन तिच्या ओठांसमोर धरला.

" घ्या, पाणी प्या थोड.." तिने ग्लासातलं पाणी संपवलं.

" आता Don't worry & शांतपणे झोपा हा...." त्याच्या या बोलण्याने तिने मान हलवली आणि उशीला डोक टेकत ती बेडवरती आडवी झाली. तो गप्पपणे स्टुलावरती तिच्याशेजारी बसून राहिला. 

' My God! असा पॅनिक अॅटॅक तिला आधी आला होता का काय माहित. नशीब लक्षात आलं आपल्या. बिचारी अनु माझ्या एका चुकीने काय अवस्था झालीय तिची. यातून बाहेर काढायला हवं तिला लवकर नाहितर एखादवेळी Panic desorder नाहीतर Depression ची शिकार होईल ती!' या विचारांसरशी त्याला The Gurdian न्युजपेपरने पब्लिश केलेलं पॅनिक डिसोर्डरविषयीचं वाचलेलं आर्टिकल आठवलं. सुमारे अर्ध्या पाऊण तासानंतर तिला गाढ झोप लागली. ती झोपल्याचं लक्षात आल्यावरती त्याने लाईट अॉफ केले आणि तो त्याच्या बिछान्यावरती झोपायला गेला.

त्याने डोकं बिछान्यावरती टेकलं तरी झोप लागेना. तिची मघाची अवस्था पाहून थक्क झाला होता तो आणि विचार करता करता त्याला डॉ.विशालची आठवण झाली. त्याच्याशी या विषयावर बोलायला हवं या विचारातच पहाटे त्याला झोप लागली.

......................................

सकाळचे सात वाजत आले. त्याने कुस बदलली आणि डोळे उघडले. भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं तर सात वाजायला आले होते. तो उठून बिछान्यावरती बसला. बेडवरती शांतपणे झोपलेल्या अनघाकडे त्याचं लक्ष गेलं. त्याने पटकन  उठून बिछाना आवरला. तिला जाग येईल म्हणून त्याने खिडकीचे पडदेही दूर सारले नाहीत तसाच तो फ्रेश व्हायला गेला.

...........................

विक्रम फ्रेश होऊन आला तरी तिला जाग आली नव्हती. तिचा चेहरा खूप थकलेला दिसत होता. गेल्या तीन महिन्यात इतकं काही घडून गेलं होतं तिच्या आयुष्यात की झोप, जेवण याकडे तिचं लक्षच नव्हतं. हसणं- सजणं आनंदी राहणं, स्वतःकडे लक्ष देणं सगळचं ती जणू विसरली होती. तो येऊन स्टुलावरती बसला. आपल्या हाताला हनुवटी टेकवून तिच्याकडे पाहताना त्याचं तिच्या उशाशी असलेल्या हाताकडे लक्ष गेलं. तिच्या मेंदीभरल्या हातावरचं त्याचं नाव बघून छान वाटलं त्याला.

" अरेवा! मेंदी किती छान आहे. मला दाखवली पण नाही ना ! अनु  Do you know, काल तुझे डोळे खूप सुंदर दिसत होते. Simply beautiful, my whole world was reflected in them. तो तिच्याकडे पाहत स्वतःशीच मंदसं हसत म्हणाला.

त्याने बेडवरती पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या अलगद आपल्या हाताच्या तळव्यावरती घेतल्या आणि फुंकर मारली तस तळव्यावरच्या पाकळ्या फुंकरीने तिच्या गालावरती उडाल्या.

" Yes! Now it's perfect एका गुलाबाजवळ गुलाबाच्याच पाकळ्या." असं बोलून तो स्वतःशीच छानसं हसला.

................................

तो तिथून उठला आणि खिडकीचे पडदे दूर सारणार तोच रूमच्या दारावरती टकटक झाली. दारावरच्या आवाजाने तिला जाग आली. ती अंगावरचे दागिने सावरत उठुन बेडवरती बसली. तिने चेहर्‍यावरून तिचे दोन्ही हात फिरवले.

" Very Very Good Morning " विक्रमने खिडकीचे पडदे दूर सारित तिला हसुन गुड मॉर्निंग म्हटलं. खिडकीतल्या  सुर्यप्रकाशाच्या कोवळ्या किरणांनी तिला जरा बर वाटलं.

" तुम्ही कधी उठलात? फ्रेश पण झालात! " ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. इतक्यात दारावरती पुन्हा टकटक झाली.

" एक मिनिट हा " म्हणून त्याने दारापाशी जात कडी काढली आणि दरवाजा उघडला तर समोर नितू उभी! 

" काय रे इतका वेळ दार उघडायला !" तिने दोन्ही हात कमरेवरती ठेवले आणि आजीबाईसारखा त्याला जाब विचारला. तो काही बोलण्याआधीच त्याच्याकडे पाहत नेहमीच्या थट्टेच्या सुरात ती म्हणाली,

" Ohhhh तुझ आटोपून झालं म्हणजे मला वाटलं उठला नसशील....आज काय ब्लॅक वाटतं...Looking classy हा!" ती त्याला ब्लॅक शर्टवरुन चिडवत म्हणाली आणि त्याचा हात बाजूला करुन आतमध्ये आली.

" ए.....वैनुडी, गुड मॉर्निंग " म्हणत धावत जाऊन तिने अनघाला उत्साहाने मिठी मारली.

" तुझा फस्ट डे आज आमच्या घरातला....का ग तुझे डोळे का लाल ! याने खूप त्रास दिला कि काय...." ती अनघाला चिडवित म्हणाली तस अनघाने त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही क्षणभर काय बोलावं समजेना. 

नीतूची बडबड मात्र सुरु झाली.

" काय रे दाद्या, कश्याला तिला त्रास देतोस...आराम करू द्यायचास ना तिला...." नीतूच्या या मस्करीवरती अनघाला काय रिअॅक्ट व्हाव ते कळेना. विक्रम मात्र हाताची घडी घालून नीतूचे टोमणे आणि मस्करी ऐकत होता.

" बिचारी माझी वहिनी.....बघ ना डोळे कसे सुजले तिचे!" 

" नीतू Shut up हा काय चाललय आल्यापासून हे! Try to behave like mature girl लहान नाहीयस तू! and you know मला असली मस्करी आवडत नाही. मस्करीलापण एक लीमिट असते." 

त्याच्या रागाचा पारा चढलेला पाहून नितू गप्प झाली. तिला माहित होतं, त्याला अशी मस्करी आवडत नाही. तो स्वतःही कोणाच्याही लग्नाला जाउ देत किंवा वेडिंगपार्टीला कुठल्याच मित्राची अशी मस्करी करायचा नाही. त्याला एखाद्या कपल्सच्या पर्सनल गोष्टींवरुन चिडवाचिडवी आणि थट्टा अजिबात आवडायची नाही. त्याचं बघून मग जितेंद्रही असल्या मस्करींना खतपाणी घालायचा नाही. अनघाने नितूच्या खट्टू झालेल्या चेहर्‍याकडे पाहिलं. 

" सर, It's ok मला नाही राग आला." तिने नीतूची बाजू घेतली तशी नितू अनघाच्या शेजारून उठली आणि त्याच्याकडे दाराजवळ विक्रम उभा होता तिथे आली.

" दाद्या, सॉरी." तिने असं म्हटल्यावरती तो मग तिला समजावित म्हणाला,

" नीतू....एखाद्याला awkurd वाटेल अशी थट्टा नये करु. एखाद्या अगदीच पर्सनल गोष्टींवरुन अशी मस्करी करणं not good." 

" हममम पुन्हा नाही करणार!" ती म्हणाली तसा तो हसला आणि तिच्या डोक्यावर टपली मारिली.

" जा त्यांना घेऊन तुझ्या रूममध्ये....त्यांची तयारी पण व्हायचीय ना." 

त्याला माहित होतं, काल रात्रीही तो रुममध्ये होता म्हणून तिने फ्रेश होणं टाळलं होतं. तोच लग्नातला शालू आणि तेवढे दागिने घालून ती राहिली पण तिने साधा ड्रेसही बदलला नव्हता. तिला अॉकवर्ड वाटेल म्हणून त्याने नीतूला तिला तिच्या रूममध्ये तयारीला घेऊन जायला सांगितलं.

या दोघांचं बोलणं सुरु होतं पण तिचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे! तिने ब्लँकेटची घडी घातली तोपर्यंत नितू तिच्याकडे वळून म्हणाली,

" वहिनी, चल ना माझ्या रूममध्ये तुला तयार व्हायला हेल्प करते." तिच्या या वाक्याने अनघाला बरं वाटलं. ती बेडवरुन उठली आणि नीतूजवळ आली. तो बाजूला सरकला.

" आलो आम्ही " म्हणत नीतू तिला तिच्यासोबत घेऊन गेली.

..........................

" या वेलकम, सो ही माझी रूम." नीतूने रूमचा दरवाजा लोटत तिला आत बोलावलं. नीतूच्या मागोमाग ती आत आली.

" कशी वाटली? हा तुमच्या रूमपेक्षा जरा छोटीच आहे म्हणा!" नीतू तिला म्हणाली तस अनघाने म्हटलं,

" असं काही नाही, छान आहे." ती थोडस हसत म्हणाली.

" ये, तू फ्रेश होऊन " तिने तिला बाथरुमचा दरवाजा दाखवला.

" ओके, थँक्स." 

" ए ह्यात काय थँक्स! चल मी तुझ्यासाठी छानशी साडी choose करुन ठेवते. " नितू हसत म्हणाली. नितूच्या अश्या आपुलकीने तिला रियाच तिच्यासोबत असल्यासारखं वाटायचं.

......................

नीतूने तिला तयार व्हायला मदत केली. तिने फ्रेश होउन येण्याआधीच छानशी लाल कलरची पैठणी, त्याला मॅचिंग दागिने सगळं व्यवस्थित बेडवरती मांडून ठेवलं होतं. शेवटी एकदाची तिची तयारी झाली आणि नीतूने तिच्या हाताने वहिनीचा छानसा मेकअपसुद्धा केला. ती मात्र ड्रेसिंगटेबलच्या आरश्यात बघत आपल्याच विचारात दंग होती. नीतू तिच्या मागे उभी होती. टेबलवरचा नेकलेस तिच्या गळ्यात घालीत नितू म्हणाली,

" ए कसला विचार करतेस एवढा!" नितूने तिच्या खांद्यावरती हात मारला तशी ती तिच्या विचारांतून बाहेर आली.

" आ काही नाही ग." 

" मग, अग डोन्ट व्हरी, सिरियल मध्ये आमदारांच्या सुना दाखवतात तस अशी पैठणी आणि ज्वेलरी घालून रोज नाही रहावं लागणार तुला! आजची पुजा झाली की झालं मग तुला हव्या तश्या नेहमीच्या साड्या नेस." नीतू मोत्याचा हार अनघाच्या गळ्यात चढवित हसतच म्हणाली.

" नीतू, सर असच वागतात का ग नेहमी!" तिने शंकास्पद नजरेनं विचारलं.

" असं म्हणजे हा ते मघाशी मला बसकन ओरडला ते होय! अग ते असच वागण्याबोलण्याचे मॅनर्स पाळणारा माणूस तो त्यात एवढा परदेशातून शिकून आलेला, कामामुळे पण मोठ्यामोठ्या माणसांसोबत वावरणं असतं त्याचं सो....नी आम्ही काय ग लहानपणापासून घर आणि बंगल्यावर गावागावातनं येणारी माणस याशिवाय काही पाहिलेल नाही मग आमचं वागणं मोकळढाकळं असतं अगदी." ती हसुन म्हणाली त्यावर अनघाने फक्त हं म्हटलं.

" आणि वयिनी, दाद्या गोड आहे खूप स्वभावाने हा! म्हणजे एखाद्याला जीव लावला की मग काहीही करेल त्याच्यासाठी. आता आत्या, मम्मा, माधवकाकांवर खूप जीव त्याचा लहानपणापासून. त्यांना कोणी काही म्हटलं तर अजिबात चालत नाही त्याला. तुला गम्मत सांगते, लहानपणी एकदा त्याच्या बेस्ट फ्रेंन्डची बॅट क्रिकेट खेळताना याच्या हातनं मोडली. दोन तुकडेच झालेले त्या बॅटचे आणि याचा मित्रपन भारी रडायलाच लागला की ग ! "

" मग ?" अनघाने विचारलं उत्सुकतेनं.

" मग काय! ह्याने याचे खाऊचे पैसे piggy bank मध्ये साठवले आणि भरपुर जमले तेव्हा मित्राला नवीन बॅट घेऊन दिली. आम्ही म्हटलं कश्याला नसता उद्योग तर म्हणाला, माझ्यामुळे तो रडला  मग मीच त्याचं नुकसान भरुन देणार. नी मेन म्हणजे भाऊसाहेबांना यातलं काहीच माहित नव्हतं. नंतर कळलं तेव्हा ते खूश झालेले." नीतूने हसत तिला जुन्या आठवणी सांगितल्या आणि ती म्हणाली,

" असाच आहे ग तो. तू मला ओरडला ते नको मनावर घेऊस तसही आमच्यासारख्या तुझ्यावरती पण खूप जीव आहेच की त्याचा." नीतूच्या या बोलण्याने तिने मागे मान वळवून नीतूकडे पाहत थोडस चेहर्‍यावर हसु दाखवलं.

" बरं चल चल आटोप लवकर आणि हे तुझे अॅलर्जीचे डाग मानेवरती पण आहेत गं! एकदा डॉक्टरांकडे जाऊन ये." नीतू कॅच्युअली बोलून गेली तशी ती गोंधळली मग मानेनच तिने हो म्हटलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all