बंधन भाग 50

Love, Social

बंधन भाग 50
भाग 50  - (  वेबसाईट अजून रेग्युलर सुरु झाली नाहीय...त्यामुळे पोस्ट होत नाहीय...पुढचे भाग लवकरच येतील..)

( गेल्या भागात घरी आल्यानंतर अनघाच्या मनातली भिती, त्यात आधीच दोन तीन महिन्यातल्या घटनांमुळे आणि धक्क्यांमुळे कमकुवत झालेलं तिचं मन लग्नासारखा आयुष्यातला मोठा बदल स्विकारायला तयार नसतं आणि सततच्या दडपणाने, विचारांनी तिला पॅनिक अॅटॅक येतो. दुसर्‍या दिवशी विक्रम याविषयी कोणालाच काही बोलत नाही पाहूया आजच्या भागात काय होतय)

अनघाची तयारी झाली कि नाही ते पाहायला आत्या नितूच्या रुममध्ये आली. गंगाआत्यानेच खरतर नीतूला विक्रमच्या खोलीत पाठवलं होतं आणि अनघाला तयारी करायला मदत कर असंही बजावलं होतं. बराचवेळ दोघी खाली आल्या नाहीत म्हणून मग आत्याच नितूच्या रुममध्ये आली.
" अरेवा! छान झाली तयारी की!" आत्या आतमध्ये येत म्हणाली तशी अनघा ड्रेसिंगटेबलसमोरून उठली.
" छान दिसतेस हा " आत्याने तिच्या जवळ येत म्हटलं तस ती नुसतचं हसली.
"बरं, चला लवकर खाली खोळंबलेत सगळे पुजेची वेळ होत आली."  
" हो आत्या चल जाऊया " नितूने हातातला हेअरब्रश ड्रेसिंगटेबलवरती ठेवीत म्हटलं.
आत्याने दोघींना पटकन खाली हॉलमध्ये यायला सांगितलं तस दोघीही आत्याच्या मागोमागच खाली आल्या.
...............................
खाली नुकतेच श्रीधर, कुमुद आणि रियासुद्धा आले होते. भाऊसाहेब आणि जितेंद्र त्यांच्यासोबत गप्पा मारित होते. अरुंधतीला त्यांच्या गप्पांमध्ये काही रस नव्हता. ती आपली शांतपणे सोफ्यावरती बसून ऐकत होती. इतक्यात नीतू अनघाला घेऊन पायर्‍या उतरित खाली आली तसं सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं.कुमुद उठली आणि धावतच लेकीपाशी गेली.
" अनु, कशी आहेस?" कुमुदने तिच्या चेहर्‍यावरुन हात फिरवित विचारलं. त्यावर नीतू लगेच म्हणाली,
" काय हो काकू, आधी तिला आमच्याकडे राहू दे तरी मग विचारा. अजून दोन दिवस पण नाही झाले आमच्याकडे येऊन तिला!" ती हसत म्हणाली.
" हो ग पण मुलांना आईचं मन नाही ना कळतं. कालपासून घर खायला उठलं आम्हाला." कुमुद तिला म्हणाली तसा जितेंद्र विक्रमसोबत वरुन खाली आला. त्याने मागून येत नीतूच्या डोक्यावर टपली मारली.
" ए ठमाबाई! तुझं लग्न झालं की कळेल तुला मग मम्मापण वहिनींच्या आईसारखीच रडत राहील." 
" हो रे मग बघुया ही काय करतेय!" विक्रमनेपण जितेंद्रच्या बोलण्याची रि ओढली.
त्यावरती कुमुदलाही हसू आलं आणि नीतूने जितेंद्रकडे डोळे वटारुन पाहिलं मग तो अजूनच हसायला लागला.
...................................
पुजेचा कार्यक्रम छान पार पडला. कालच्यासारखे कारखान्यावरचे कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह पुजेला हजर होते. पुजेची सांगता झाली तस दोघांनाही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. पुजेचा कार्यक्रम तर झाला आता आपणही निघावं म्हणून श्रीधर भाऊसाहेबांना म्हणाले,
" चला साहेब, आता आम्हीही येतो. उगीच फार वेळ इथे थांबणं बरं दिसत नाही." ते संकोचून म्हणाले.
" हो निघा पण निदान दुपारपर्यंत थांबून जेवूनच गेला असतात तर....." त्यांच्या या बोलण्यावरती कुमुदनेही नम्रपणे नको म्हटलं.
" अहो, साहेब म्हणतायत तर थांबा की आमच्याकडचा पाहुणचार तरी करुन जा. सगळ्यांच्या नशिबी नसतो असा पाहुणचार!" अरुंधतीने असं म्हटल्यावरती भाऊसाहेबांनी नजर वळवून तिच्याकडे पाहिलं. त्यांना तिचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मग विक्रमच पुढे आला,
" बाबा, थांबा ना " त्यावरती आपल्या जावयाला तरी हक्काने ते म्हणाले,
" नको सर, खरच निघतो आम्ही आणि जास्त वेळ थांबलो की मग निघताना पाय निघणार नाही." श्रीधरच्या या बोलण्यावरती कुमुदने मान हलवून हो म्हटलं.
" बरं बरं. आता निघताय पण अधुनमधुन येत जा आमच्या सुनबाईंना भेटायला." भाऊसाहेब सोफ्यावरून उठत म्हणाले. मंडळी जायला निघाली.
" अनु, काळजी घे हा."  कुमुद अनघाला पाणावल्या डोळ्यांनी म्हणाली. अजिबात आता अश्रु येऊ द्यायचे नाहीत असं कुमुदने ठरवलं होतं तरीही निघताना डोळे पाणावलेच.
" कुमुदताई नका चिंता करु ." आत्या तिला धीर देत म्हणाली.
" नीतू, ताईकडे लक्ष दे हा."
" हो ग रिया, You just don't worry " नीतूने रियाचे दोन्ही हात हातात घेत म्हटलं. 
.........................
तिघांना बाहेर गाडीपर्यंत पोचवायला म्हणून जितेंद्र आणि विक्रम बाहेर आले होते. नितू, आत्या आतमध्ये अनघासोबत बाकी बायकांंशी बोलत होत्या. गाडीत बसण्याआधी श्रीधर पुन्हा मागे वळले आणि त्यांनी विक्रमचे हात आपल्या दोन्ही हातात घेतले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एका बापाचे ते अश्रु पाहून त्याने खाली मान घातली.
" सर, काळजी घ्या तिची......" 
ज्या विश्वासाने त्यांनी त्यांच्या लेकीचा हात आपल्या हातात दिलाय त्यांना बिचार्‍यांना हे माहितही नाही, त्यांच्या लेकीची अशी अवस्था करणारा माणूस आणि ते ज्याला त्यांच्या लेकीची काळजी घ्यायला सांगतायत तो माणूस त्यांच्या दुर्दैवाने एकच आहे! या विचारानेच विक्रमचे हात क्षणभर थरथरले. काल लग्नाच्या दिवशी, कन्यादानासाठी जेव्हा श्रीधरनी अनघाचा हात विक्रमच्या हातात दिला. त्याआधीही त्याचे हात असेच क्षणभर थरथरले. आपण एका बापाशी खोट वागतोय आणि आपण एका पोरीच्या असहाय्य बापाला फसवतोय या भावनेनं त्याचं मन बैचेन झालं. त्याने मोठ्या धीराने श्रीधरच्या हातांवरती आश्वासकपणे थोपटलं.
....................... 
पुजेचा दिवस सगळ्यांचं नव्या सुनबाईंचं कौतुक करण्यातच गेला. इतकी सगळी भेटायला येणारी माणसं पाहून अनघा संकोचली होती. तिला प्रत्येकाशी कसं बोलावं म्हणजे त्यांना छान वाटेल कळेना तरी तिने आपल्या मनावरचा ताण बाजूला करुन सगळ्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. भेटायला येणार्‍या वडिधार्‍या मंडळींना नमस्कार केला, हसून त्यांची विचारपूस केली. आत्याप्रमाणे आग्रहाने सगळ्यांच्या जेवणखाण्याकडे लक्ष दिलं. तिचं हे वागणं पाहून आत्या आणि भाऊसाहेबांनाही बरं वाटलं. आत्याला समाधान याचं होतं की, भाऊसाहेबांची सुनबाईची निवड चुकली नाही. विक्रम हे सगळ दुरुनदुरुनच पाहत होता. तिला अवघडल्यासारखं चारचौघात वाटू नये म्हणून तो तिच्या आसपास जाणंही टाळत होता. संध्याकाळ झाली तशी आदल्या रात्रीचा प्रसंग त्याला आठवला आणि आजतरी तिला रात्री पुन्हा कसला त्रास होऊ नये म्हणून तो मनातून प्रार्थना करित होता. रुममध्ये ती नव्हती हे पाहून त्याने डॉ. विशालला फोन केला.
विक्रम - "  हॅलो विशाल, Vikram speaking " 
विशाल -  " हॅल्लो My friend Heartiest Congratualations ! सॉरी यार तू पत्रिका वॉट्सअॅप केलीस पण I couldn't come there." विशाल त्याला सॉरी म्हणाला तस विक्रमने लगेच म्हटलं.
" अरे It's ok. " त्याला कुठुन बोलायला सुरुवात करावी ते कळेना. डॉ.विशाल हा एक सायकोलॉजीस्ट असला तरीही आधी विक्रमचा मित्रसुद्धा होता त्यामुळे विशालने बर्‍याच दिवसांनी मित्राचा फोन आला म्हणून गप्पांनाच सुरुवात केली.
" बोल काय म्हणतोस! आणि शहाण्या एवढं लग्न आम्हाला न सांगता ठरवलस आणि करुनपण टाकलस. आम्हाला वाटलेल तुझं मॅरेज म्हणजे जबरदस्त असणार एकदम! कुठेतरी हिलस्टेशनला वगेरे! " त्याच्या या बोलण्यावरती विक्रम गप्पच होता.
"हॅलो, काय रे काही प्रोब्लेम आहे का भाऊसाहेबांची तब्येत ठिक ना!" विशालने काळजीने विचारलं.
" हो हो everything is all right ! बरं मी जयपुरला येतोय येत्या तीन एक दिवसात एका सेमिनारसाठी."
" OMG ! Really ये ये भेटू आल्यावरती मग " विशाल उत्साहाने स्वतःहून म्हणाला.
" Ok Done. मी आलो की भेटूया. विशाल एक बोलायचं होतं but आता फोनवरती नाही सांगता येणार. आपण भेटल्यावरती बोलूया." विक्रमने त्याला आधीच सांगून ठेवलं तस तो म्हणाला,
" हो रे बोलूया पण तू ये तर आधी जयपूरला मग भेटूच." विशाल उत्साहाने बोलला.
" ओके, आणि tell her Congrats." विशालने फोन ठेवताना म्हटलं.
" Ok and thanks " विक्रमने फोन ठेवला आणि मघाचं त्याच्या मनातलं चिंतेचं सावट आता दूर झालं. डॉ. विशालच्या रूपाने एक आशेचा किरण त्याला दिसत होता. त्याच्या मदतीने तरी निदान तिच्या आयुष्यातला अंधार थोडा तरी दूर होईल अशी आशा त्याला वाटत होती.
.........................
विक्रमला भिती होती पण त्या रात्री तिला आदल्या रात्रीसारखा त्रास झाला नाही. कदाचित आज आईबाबा भेटून गेले म्हणून तिला बरं वाटलं असेल असा त्याचा समज होता. रात्रीही पुन्हा आदल्या रात्रीप्रमाणेच विक्रम बिछाना अंथरुन फरशीवरती झोपला आणि ती बेडवरती. 
.........................
लग्नाच्या आधीची सगळी धावपळ आणि लग्नानंतरचे सगळे कौतुकसमारंभ यामुळे त्याचं सकाळी उठून जिमला जाणं थांबलं होतं. आता बर्‍यापैकी सगळे कार्यक्रम पार पडले होते त्यामुळे त्याने पुन्हा त्याचं नेहमीसारखं रुटीन सुरु केलं. तिला न उठवताच तो सकाळी लवकर जीमला जायचा आणि येऊन पटकन फ्रेशही व्हायचा ज्यामुळे ती सकाळी उठली की तिला फ्रेश होऊन तयारी करायला बरं पडावं आणि तिला आपल्या कुठल्याही वागण्याने अॉकवर्ड वाटू नये आणि भीती वाटू नये असा त्याचा प्रयत्न असायचा. लग्नानंतर पाच- सहा दिवस त्याचं हेच वागणं सुरु होतं.पण एका घरात एका खोलीत राहणारी माणसं सतत एकमेकांसमोर येणारच तसचं काहीसं झालं. त्याने नेहमीप्रमाणे आपली तयारी केली आणि तो आत्याशी बोलायला खाली हॉलमध्ये गेला. त्याला बाहेर जायचं होतं आणि नेमका मोबाईल रुममध्ये विसरलेला म्हणून तो पुन्हा पळतच वरती रूममध्ये आला. आपलीच रुम आहे तर नॉक कश्याला करा म्हणून तो पटकन रूमचा दरवाजा लोटून आत आला तर समोर अनघा ड्रेसिंगटेबलच्या आरश्यासमोर उभी होती. आरश्यात पाहत धुतलेले ओले केस ती टॉवलने पुसत होती. अॉरेंज कलरची काठपदरची साडी आणि ग्रीन कलरचा डिझाईनवाला ब्लाऊज त्याला डिझाईनवाली मण्यांची लटकन, तिच्या तिरप्या मानेमुळे ते मणीही किंचितसे हलत होते. तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्याचा किणकिण आवाज रूममध्ये पसरला होता. पाठी  तिच्या खांद्यावरती रुळणारे ओलेते केस तिने हातानेच खांद्याच्या एका बाजूला घेतलेले, केस पुसता पुसता तिची मान किंचितशी हाताच्या हिसक्यामुळे हलली आणि ओलेत्या  केसांच्या बटा कपाळावरती आल्या आणि बटांतून ओघळणारे पाण्याचे थेंब तिच्या उजव्या गालावरती ओघळले. विक्रमच्या आत येण्याची चाहूल लागली तस तिने नजर वरती वळवली आणि तो क्षणभर पाहतच राहिला. त्याला वाटलं आपण पटकन पुढे व्हावं आणि तिच्या कपाळावरच्या ओल्या बटा आपल्या हाताने अलगद बाजूला साराव्यात पण तो पुढे आला नाही. 
" सर काय झालं? "  तिच्या या बोलण्याने तो जरा भानावरती आला.
" आ.....नथिंग....काहीच नाही..I've forgot mobile." 
" ओके "  ती फक्त त्यावर ओके म्हणाली आणि पुन्हा आपले केस पुसण्यात गर्क झाली.
 त्याने पटकन बेडशेजारच्या कॉर्नरपिसवरचा त्याचा मोबाईल उचलला आणि तो जायला वळला. दोन पावलं पुढे होऊन पुन्हा त्याने मागे वळून पाहिलं.
" मॅडम, सॉरी तुम्ही नीतू काही बोलली तर मनावर नका घेऊ. लहान आहे ती!"  त्याने म्हटलं तस तिने होकारार्थी मान हलवली. क्षण दोन क्षण शांततेत गेले.
" अजून एक सांगायचं होतं." 
" काय ?"  तिने काळजीने विचारलं.
" मी पुढच्या दोन - तीन दिवसात जयपुरला चाललोय एका सेमिनारसाठी. "  यावर तिची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी त्याचे कान तरसले होते.
" बरं, किती days ?"  तिने विचारलं.
" जास्त नाही, सेमिनारचं माझं लेक्चर आटोपलं की निघेन मी. जाऊ ना ! "  त्याने  तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. त्याला छान वाटलं तिचं असं विचारणं !  याआधी आत्या, अरुंधतीने त्याला कधी येणार असं घराबाहेर पडताना विचारलच नव्हतं. जातोय तर कॉलेजच्या कामासाठीच जात असेल उगीच सारखं काय विचारत रहायचं असं त्या दोघींना वाटे. 
" बरं "  तिने फक्त इतकच म्हटलं आणि ती वळली तसा तो स्तब्धच झाला. केसांचा साजशृंगार, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तिने पाठिवरून लपेटुन घेतलेला पदर यामुळे तिच्या पाठिवरच्या व्रणांकडे त्याचं लक्ष गेलचं नव्हतं. तिने मानेच्या एका बाजूला घेतलेल्या केसांमुळे तिचे पाठिवरचे व्रण दिसले तसं अस्वस्थ वाटलं त्याला! ' बापरे! माझ्या एका वागण्याने तिच्या मनाचे आणि शरिराचे अक्षरशः हाल झालेत ' या विचारानेच जड पावलांनी तो रूममधून बाहेर पडला.
................................


ती घरी येऊन आठवडा होत आला तरी अजून किचनमध्ये जाणं आणि सगळ्यांसाठी खायला काहीतरी तिच्या हातून तिने बनवलेलं नव्हतं. स्वयंपाक, नाश्ता अशी स्वयंपाकघरातल्या कामांची सगळी जबाबदारी आत्याच पाहायची सोबतीला इतर नोकरमंडळी होतीच पण अनघाला आपण स्वयंपाकघरात जायला हवं, आत्याला मदत करायला हवी असं वाटायला लागलं. त्यातून आपण कश्यातच लक्ष देत नाही म्हणून भाऊसाहेब किंवा आत्या, अरुंधती नाराज होतील याची चिंताही होतीच. ती धीर करुन मग किचनमध्ये गेली. 
" अरे ये ये सुनबाई ! काय हवय का तुला ?"  आत्याने ती आतमध्ये येताच लगेच विचारलं. आत्या नाश्त्याची तयारी करीत होती. अनघा बोटांची चाळवाचाळव करित पुढे आली. त्यांचं इतकं मोठ स्वयंपाकघर पाहून अनघाला आपण इथे काय करायचं, आपल्याला नाश्ता बनवायला जमेल ना अशी शंका आली.
" काय झालं ग, अशी गप्प का ग बाई!"  आत्याने हसतच विचारलं. 
" काही नाही,  आत्या काय करताय तुम्ही ?"  तिने गॅसशेगडीवरती ठेवलेल्या कढईकडे पाहत आत्याला विचारलं.
" काही नाही ग, नाश्ता बनवतेय. का ग ?" आत्याने हाताने आपलं काम सुरु ठेवल होतं आणि ती अनघाशी बोलत होती.
" नाही.....मी बनवू का मग ?" तिने धीर करुन विचारलं.
" का ग ? माझ्या हातचा आवडत नाही ?"  आत्याने तिची मस्करी करायची म्हणून लटक्या रागाने विचारलं.
" नाही तस काही नाही. तुम्ही छानच बनवता पण मी काहीच मदत करित नाही ना तुम्हाला म्हणून विचारलं." अनघाने म्हटलं तस मग आत्या लगेच हसत म्हणाली,
" बरं, बनव तु आज. मला पण नव्या सुनबाईंच्या हातची चव चाखायला मिळेल." आत्या हसत तिच्याकडे वळून म्हणाली.
अनघाने आत्यांच्या बोलण्यावरती खूश होत मग पटकन ओट्यावरचं रवा ठेवलेलं भांडं हातात घेतलं.
" अरेवा ! उपमा बनवतेस का? काय पण योगायोग मी पण आता बनवणार होते."  आत्या आश्चर्यमिश्रित कौतुकाने म्हणाली.
" नाही हो, गोडाचा शिरा सगळ्यांसाठी !" तिने तुपाची बॉटल इकडेतिकडे शोधत म्हटलं. त्यासरशी आत्याचा चेहरा हिरमुसला.
" आत्या चालेल ना !"  तिने पुन्हा विचारलं मग आत्या थोडासा विचारी चेहरा करुन म्हणाली, " बरं, चालेल." आत्याने असा ग्रीन सिगनल दिला म्हटल्यावरती तिने पटापट शिरा बनवायची तयारी  सुरु केली.
.....................................
" आत्या, नाश्ता नाश्ता लवकर..." नितू बाहेरुन डायनिंगटेबलवरुनच बसल्या बसल्या ओरडायला लागली. तिच्या मोठाल्या ओरडण्याने अनघाने पटापट छान तयार झालेल्या कढईतल्या शिर्‍यावरती काजु, बदामाचे पातळ काप चिरून वरून हलक्या हाताने सगळीकडे कढईत पसरवले. 
" वा! छान झाला हा !"  आत्याने कढईत नजर टाकीत तिचं कौतुक केलं तस तिला बर वाटलं.
" बरं, चला आता सगळे वाट बघतायत. " आत्या म्हणाली तस तिनेही हो म्हटलं. बाहेर सगळ्यांना नाश्ता आवडेल का, सगळे काय म्हणतील याची उत्सुकताही तिला आता लागली.
........................
किचनमधून नोकराने सगळ्यांसाठी नाश्त्याच्या प्लेट्स भरून डायनिंगटेबलवरती आणल्या.
" वाव! आज शिरा मस्त." नितूने आनंदाने तिची नाश्त्याची प्लेट स्वतःकडे घेतली. 
" पण शिरा......" जितेंद्रचा असा चेहरा पाहून अनघाने विचारलं, " काय झाल? तुम्हाला नाही आवडत का भावोजी?" त्यावर जितेंद्र आढेवेढे घेत म्हणाला,
" आ...नाही म्हणजे अस काही नाही म्हणजे आवडतो."
अनघाने स्वतः भाऊसाहेबांसमोर नाश्त्याची प्लेट ठेवली तसे ते तिच्याकडे पाहून कौतुकाने हसले. इतक्यात अरुंधती येऊन बसली तशी आत्याने शिर्‍याची प्लेट तिच्यासमोर सरकवली. प्लेटमधला शिरा बघून तिचा चेहरा पडला तरी न बोलता तिने इकडेतिकडे पाहिलं इतक्यात विक्रम रुममधुन खाली आला. डायनिंगटेबलची चेअर  ओढतच त्याने नितूच्या  प्लेटमध्ये पाहिलं,
" हे काय! आज शिरा ! रवा संपला नाही म्हणून बनवला की काय इतका!" त्याने चेअरवरती बसत विचारलं. अनघाला वाईट वाटलं ते ऐकून ! एखादा पदार्थ बनवलाय म्हटल्यावरती तो खाण्याआधीच त्याला नावं ठेवायची नाहीतर त्या पदार्थांवर जोक बनवायचे हेच जमतं सगळ्या नवर्‍यांना असं वाटलं तिला. तिने खाली मान घातली आणि नीतूला नजरेन वाढू का अजून विचारलं. 
त्याने चेहरा पाडून प्लेट स्वतःकडे घेतली. आत्याला माहितीय, मला हे असलं गोडाचं काही आवडत नाही तरी कश्याला बनवला हा गोडाचा शिरा! बरं, दुसरं तरी काहीतरी बनवायचं अजून या विचारातच त्याने आत्याकडे पाहिलं. ती अनघाच्या मागे उभी होती. तिने हाताच्या बोटानेच ' मी नाही बनवलेला ' म्हटलं आणि अनघाकडे गालातल्या गालात हसत बोट दाखवलं तस त्याने प्लेटमधला चमचा उचलून एक घास तोंडात टाकला.
' बापरे! किती साखर घातलीय यात!' त्याने मनाशीच म्हटलं तरी तिच्याकडे पाहत दोन घास खाल्ले.
' मॅडम तुम्हीच इतक्या गोड आहात म्हणून शिरा पण गोड झाला तुमच्यासारखाच! छान झालाय. तुमच्या हाताने बनवलात मग मी खाणार नाही अस कस होईल!' त्याच्या या विचाराचं त्याला स्वतःलाच हसु आलं. पण तिच्यासमोर बोलणं त्याने टाळलं. त्याने आता प्लेटमधला शिरा संपवायला सुरुवात केली. अरुंधती त्याच्यासमोरच्याच चेअरवरती बसली होती. तिला मात्र त्याचं हे वागणं अजब वाटलं. अजून दहा दिवस नाही झाले या मुलीला घरात येऊन आणि हिच्यासाठी याने सवयीसुद्धा बदलल्या. एरवी ह्याला स्विट डिश आवडत नाही नी आज काय प्रेम ओतू चाललय!' स्वतःचा नाश्ता संपवता संपवता अरुंधतीच्या मनात हे विचार सुरु झाले. नितूने मात्र अनघाचं खूप कौतूक केलं.
" ए वहिनी, आज कारखान्यावरती जाऊया ?" नितूने विचारलं तस जितेंद्रही मान हलवित हो म्हणाला,
" चला ना वहिनी, तसही आता पाहुण्यांची गर्दीपण कमी झालीय तर चला आपला कारखाना पाहून या!" जितेंद्रच्या या बोलण्यावरती अरुंधतीने जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं तसा तो नरमला. मग भाऊसाहेबच म्हणाले,
" हो सुनबाई तुम्ही जाऊन या. तिकडे काही सारखं जाणं होणार नाही तुमचं म्हणून आता वेळ आहे तर बघून या एकदा."  ते म्हणाले तस नितू आणि जितेंद्रला सुटल्यासारख वाटलं. 
" ए दाद्या, चल तू पण " नीतू म्हणाली.
" नाही नको, मला जयपुरला जाण्याआधी कॉलेजला जाऊन यायचं आहे. गेले काही दिवस कॉलेजकडे दुर्लक्ष झालय." विक्रम म्हणाला तसा नितूचा चेहरा हिरमुसला पण तीच अनघाकडे पाहत म्हणाली,
" असु दे ग वहिनी, आम्ही येऊ तुझ्यासोबत. आपल्याला नको 'बिझी माणसं ' " विक्रमला तिने टोमणा मारला. सगळे म्हणतायत तर जाऊया म्हणून तीही तयार झाली.
......................
दिवसभर कारखान्यावरती भटकुन जितेंद्रसोबत दोघीजणी संध्याकाळी घरी आल्या. अनघाला फार वेळ तिथे थांबायची इच्छा नव्हती पण नीतू बर्‍याच महिन्यांनी तिकडे गेली होती त्यामुळे सगळ्यांशी गप्पा मारण्यात, आजुबाजुचा परिसर अनघाला दाखवण्यात तिचा वेळ गेला. जितेंद्रच्या अॉफिसमध्ये मग तिघांनी दुपारचं जेवण घेतलं. लग्नाच्या आधीचे काही दिवस तिच्या घरातली माणसांची लगबग आणि लग्नानंतर पण राजेशिर्केंच्या घरातले पाच सहा दिवस तसेच घाईगडबडित गेलेले त्यामुळे मोकळा वेळ असा नव्हताच तिला. कारखान्यावरती गेल्यावर जरा तिला बरं वाटलं. संध्याकाळी मग जितेंद्रसोबतच दोघी घरी आल्या.
.......................
रात्रीचं जेवण आटोपल्यावरती अनघा रुममध्ये गेली तोपर्यंत त्याने त्याच्यासाठी खाली बिछाना अंथरला होता. अनघा आतमध्ये आली आणि बेडवरती बसली.
"मग कशी झाली फॅक्टरी व्हिजिट?"  विक्रमने उशी नीट करित विचारलं.
" मस्त, भावोजी छान सांभाळतात नाही सगळं!" यावरती त्याने नुसतच हं म्हटल. 
" सगळ्या कामगारांशी छान वागतात अगदी आपल्या घरातलं माणूस असल्यासारखं क्षणभर भाऊसाहेबांचीच आठवण आली."  ती अस बोलत होती आणि त्याला ते बोलणं म्हणजे त्याला टोमणा मारल्यासारखं वाटलं. आपण कॉलेजमध्ये स्टाफ पासून ते प्राध्यापकांपर्यंत सगळ्यांशीच स्ट्रिकली बोलतो, असं भाऊसाहेब नी जितेंद्र सारखं गोड बोलून काम करवून घ्यायला आपल्याला जमत नाही त्यामुळे मुद्दामहून ही अस म्हणाली असच वाटलं त्याला! त्याने पटकन उशीला डोक टेकलं आणि तिला गुड नाईट म्हटलं आणि तो दुसर्‍या कुशीवरती झोपला. आपण कॉलेजसाठी इतक करतो पण त्याचं कुणाला काही वाटत नाही असाच विचार अंथरुणावरती पडल्यावर विक्रमच्या मनात आला. खरतर त्यालाही माहित होतं, प्रत्येकाला आपल्या कामाचं कौतुक असतं. कॉलेजची गेल्या तीन वर्षातली प्रगती आपल्यामुळे झाली अस भाऊसाहेब सुद्धा मानतात तरीही आज  जितेंद्रच्या कारखाना सांभाळण्याचं तिने केलेलं कौतुक ऐकुन त्याचा हिरमोड झाला. त्याला झोप लागली असेल असा विचार करितच तिही बेडवरती आडवी झाली.
मनातून वाटलं, सरांनी निदान विचारायचं तरी दिवसभर काय केलत. सकाळचा नाश्ता कसा झाला तेही नाही सांगितलं. या विचारासरशी तिने डोळे मिटले. दिवसभराच्या फिरण्यामुळे तिला पटकन झोप आली.

क्रमशः

🎭 Series Post

View all