बंधन भाग 52

Love, Social

भाग 52
  
(   गेल्या भागात जयपूरच्या हॉटेलमध्ये विक्रमची एका मुलीसोबत ओळख झाली जिने त्याला स्वतःचं नावही खोटं सांगितलं. कोण असेल बरं ती! कळेल नंतर आता थोडं पुन्हा सांगलीला जाऊयात. विक्रम घरी नाहीय आणि अनघा आता एकटी घरी असताना तिकडे काय घडतं पाहू.)

सकाळी अनघा उठली आणि नेहमीसारखं तिचं पहिलं लक्ष फरशीकडे गेलं. विक्रम जयपूरला गेल्या दिवसापासून तिची सकाळ अशीच ठरलेली असायची. समोर बिछाना पाहायची गेल्या आठवडाभर सवय झाली होती. तो लवकर उठायचा त्यामुळे वॉशरुममधल्या शॉवरच्या पाण्याचा आवाज, किंवा सकाळी तयार होताना त्याचं नेहमीसारखं आरश्यासमोर उभं राहणं, ती रुममध्ये एकटीच बसलेली असताना मग तिच्यासमोर येऊन संकोचून सतत काही ना काही विचारुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं हे सगळं गेले दोन दिवस नव्हतं. तिने उठून खिडकीचे पडदे दूर सारले तसे सूर्यनारायण खिडकीतून आत डोकावले. फ्रेश व्हायला जाणार तोच मोबाईलची रिंग वाजली तर विक्रमचाच कॉल होता. तिने कॉल रिसिव्ह केला आणि पलिकडून हसत त्याने 'गुड मॉर्निंग मॅडम ' म्हटलं.
" गुड मॉर्निंग मॅडम, कश्या आहात?" 
" गुड मॉर्निंग, छान तुम्ही ? " तिने विचारलं. त्याला वाटलं सांगाव तिला, ' छान आहे, मिस यु ' पण त्याने फक्त ठिक इतकच म्हटलं.
" बरं, लेक्चर आज ना तुमचं ?" तिच्या हे लक्षात आहे हे ऐकून त्याला भारी आनंद झाला.
" हो, आता अकराला " त्याने म्हटलं इतक्यात ती थांबा म्हणाली. रुमच्या दारावरती टकटक ऐकू आली.
" जरा होल्ड करा, कुणीतरी आलय ".
" कुणीतरी नाही, ती तुमची 'नीतू ' असेल. " त्याने असं म्हटलं आणि तिने तोपर्यंत दरवाजा उघडला तर समोर नीतू उभी!
" हा वैयनी उठलीस तू? कोण कोण ?" तिने धावत आत येत डोळे मिचकावीत विचारलं. नीतूचा आवाज त्याने ऐकला.
" बघा काय म्हणते ती!"  तो म्हणाला.
" काही नाही " अनघाने असं म्हटलं आणि नीतूने तिच्या हातातून मोबाईल काढून स्वतःकडे घेतला.
" हॅलो दाद्या, अरे तुला माहितीय का तुझ्या मॅडमचं बोटं कापलं बघघघघ किती जखम झालीय बोटाला!" नीतूने असं म्हटलं आणि अनघाला वाटलं, हिने उगीचच त्याला सांगितलं. तो पटकन नीतूला म्हणाला,
" गधडे तू काय करत होतीस ग. तुला सांगितलं होतं ना, त्यांची काळजी घे. तू ना हल्ली सॉलीड उंडारत असते बाहेर. तुझ्याकडे एकदा बघणारच आहे मी!" तो फोनवरून नीतूला असं म्हणाल्याबरोबर ती हसायला लागली.
" हा हा बघ! मी काय तुझ्यासारखी लपवाछपवी करित नाही. तू नाही एवढं प्रेमात पडलास नी आमच्यापासून लपवून ठेवलस. तरी मला डाऊट होताच, कॉलेजला जाताना हा इतका नटून थटून का जातो! " नीतू त्याची थट्टा करित होती पण अनघाला अवघडल्यासारखं वाटलं.
" ए गप्प गं आणि फोन दे त्यांच्याकडे " तो म्हणाला आणि तिने हसतच मोबाईल अनघाच्या हातात दिला.
" धर घे! काय पण तुझे विक्रमसर! कसा भेटला ग तुला हा" नीतूने हातानेच तिला बाय म्हटलं आणि दरवाजा बाहेर जाताना ओढून घेतला. 
नीतू गेल्यावरती तिने मोबाईल कानाला लावला तसा तो पटकन बोलला,
" तुम्ही नका लक्ष देऊ तिच्या बोलण्याकडे! खूप लागलं का बोटाला! " त्याने काळजीच्या सुरात विचारलं.
" नाही, भाजी चिरताना थोडस " असं तिने सांगितलं आणि तिला तो फोटो फुटल्याचा रात्रीचा प्रसंग आठवला.
" तुम्ही उगीच कश्याला भाजी वगैरे चिरायला जाता! तुम्ही विचारात असलात कसल्या की मग असं काहीतरी होतं." त्याने तिला समजावित म्हटलं.
" हं " तिने त्याच्या एवढ्या बोलण्यावरती फक्त हं इतकच म्हटलं.
" बरं, टेक केअर, मी निघेन दोन दिवसात " तो पलिकडून म्हणाला.
" बरं, सावकाश ड्राईव्ह करा." ती असं म्हणाली आणि तो छानस हसला. तिला वाटलं, छे! आपण उगीच असं बोललो. आपण कुठे फोरव्हिलर चालवतो उगाच नसते उपदेश!' 
" बरं ओके ठेवतो बाय " त्याने बाय म्हणत फोन ठेवून दिला. तिच्यासोबत बोलल्यानंतर खूप मस्त वाटलं त्याला. त्या आनंदातच त्याने सेमिनारला जायला तयारी केली.
......................

दुपारी अनघा किचनमध्ये आत्यासोबत गप्पा मारित थांबली. रुममध्ये बसून तिला कंटाळा आला होता. नीतूही बाहेर गेली होती. बाहेर अरुंधती हॉलमध्ये कुठल्यातरी तिच्या मैत्रीणीसोबत गप्पा मारित बसली होती. अरुंधतीची मैत्रीणही अनघाला आपल्या सासुबाईंसारखीच पाहता क्षणी वाटली. अंगावरती कांचीवरम साडी, गळ्यात, कानात नाजुकसे मोत्याचे दागिने, हातात सोन्याच्या बांगड्या, छानसा मेकअप ते सगळ पाहून स्वतःहून अरुंधती आणि तिच्या मैत्रीणीसमोर  जाण्याची अनघाची हिम्मत झाली नाही. आधीच सासुबाईंना आपण आवडत नाहीत त्यात त्यांच्या पाहुण्यांसमोर अस पटकन जाणं त्यांना आवडलं नाहीतर अस तिला वाटलं म्हणून ती हॉलमध्ये न घूटमळता गप्पपणे किचनमध्ये आली. आत्या दुपारचं जेवण बनवण्यात व्यस्त होती. बाकी किचनमध्ये एक दोन नोकरमंडळी होती ती आपलं काम शांतपणे करित होती. कुणी भाजी साफ करित होतं तर कुणी कणिक भिजवित होतं. इकडेतिकडे पाहत न राहवून तिने आत्यापाशी जात हळु आवाजात विचारलं.
" आत्या, त्या बाहेर कुणी पाहुण्या आल्यात का?" त्यावर परडीतून मिरच्या उचलत आत्या उपहासाने म्हणाली.
" कोन ती होय! पाव्हनी ना झाली असती की फक्त व्हता व्हता राह्यीली बग " 
" म्हणजे ?"  तिने न कळून विचारलं.
" अग ते मोठ्ठ दागिन्याचं दुकान आहे त्याची मालकीनबाई ती! मोठं व्यापारी हायेत ते लोक. विक्रमसाठी वहिनीसायेबांनी शोधलेलं पहिलं स्थळ. काय ते नाव बाई तिचं!  भारिच हाये कायतरी बग " आत्या अस म्हणाली आणि लगेच तिने विचारलं.
"  समिहा ना !" आत्याला अनघाच्या तोंडून हे ऐकताना आश्चर्य वाटलं.
" तुला कस ग माह्यीत ?" आत्याच्या या प्रश्नावर ती काही बोलणार तोच बाहेरुन अरुंधतीने अनघाला हाक मारली.
' सुनबाई बाहेर तरी या ' अश्या हाकेवर आत्याने लगेच म्हटलं,
" बघा सासुबाई बोलवतायत " आत्या हसतच हाताने तिला जा म्हणाली पण अनघाला बाहेर जायला संकोच वाटायला लागला तरी बोलावलय म्हटल्यावरती जावं लागणार म्हणून ती हॉलमध्ये गेली.
..................................
ती जाऊन दोघींसमोर स्तब्धपणे उभी राहिली जस शाळेतल एखादं मुल शिक्षा केल्यावरती उभं राहतं. त्या दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. ती समोर आली तरी दोघींनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही.
" ए छान आहेत ग फोटो राजेश्वरी ! " अरुंधती राजेश्वरीचा मोबाईल अनघाला दिसेल अश्या पद्धतीने मांडीवरती धरत म्हणाली.
" हो ग नी समिहा बघ....किती छान दिसते ना! " अस राजेश्वरी अरुंधतीला मोबाईलमध्ये बोट फिरवित म्हणाली तशी अनघाची उत्सुकता ताणली गेली. तिलाही समिहा कशी दिसते ते पहायचं होतं. तिने मान थोडी उंचावत पाहण्याचा प्रयत्न केला तोच अरुंधतीने अनघाकडे नजर वळवली.
" हि आमची सुनबाई अनघा. " राजेश्वरीचं लक्ष वेधत अरुंधती म्हणाली. राजेश्वरीने जणू अनघाला पायाच्या नखापासून न्याहाळलं.
" हि होय्य अनघा ! विक्रमची वाईफ " राजेश्वरीचं बोलणं अनघाला टोमणा मारल्यासारख वाटलं.
" हो........विक्रमची बायको "  अरुंधती राजेश्वरीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. त्या दोघींच्या नजरा हसल्यासारख्या तिला वाटल्या.
" बरं, काय करते तुझी सुनबाई ?" राजेश्वरीने अरुंधतीला विचारलं.
" प्रोफेसर आहे आमच्या गुरुकुलला " अरुंधतीने म्हटलं.
" हो का छान! बरं ये, तू पण बघ ना फोटोज ! आम्हीपण तेच बोलत होतो आत्ता "  असं म्हणत राजेश्वरीने मुद्दामहून अनघाच्यासमोर मोबाईल धरला. तिला खरतर पटकन सगळे फोटोज पाहून घ्यावेसे वाटले पण संकोचतच तिने मोबाईल घेतला आणि ती पाहतच राहिली. मुंबईतल्या एका मोठ्या फॅशनशोचे फोटोज होते ते! समिहा फॅशन डिझायनर असल्याने बॉलिवूडचे कलाकार, मॉडेल्स यांच्याशी तिचे चांगले संबंध होते. एका फोटोत आलिया भट, समिहा आणि एक दुसरी मॉडेल अश्या तिघी स्माईली फेसने उभ्या होत्या.समिहाचा पिंक कलरचा पार्टीवेअर गाऊन, चेहर्‍याचा मेकअप, पॉकर स्ट्रेट हेयर. त्या तिघींजणींमध्ये समिहालाही कुणीतरी बॉलिवूडची एॅक्ट्रेस अस सहज म्हटलं असत असा तिचा सगळा थाट होता.   ते सगळ जगच आपल्या जगापासून वेगळ आहे हे अनघाला जाणवलं. अनघाला वाटलं, किती सुंदर आहे ही समिहा! विक्रमसोबत तिचं जास्त छान दिसली असती ! परफेक्ट कपल असतं हे ! खरंच आपण हिच्यासमोर पालापाचोळ्यासारखे आहोत. विक्रमनी का लग्नाला हो म्हटलं. हे सगळे विचार तिच्या मनात सुरु असतानाच राजेश्वरी तिला म्हणाली,
"  कसे वाटले फोटोज " या विचारण्याने ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली.
" छान आहेत " मोबाईल राजेश्वरीच्या हातात देत अनघा कसनुस हसत म्हणाली. तिच्याही नकळत तिचा चेहरा उतरला होता जे अरुंधती आणि राजेश्वरीच्या लक्षात आलं.
" बरं, सुनबाई जरा चहापाण्याचं पहा " अरुंधती अस म्हणाल्यावरती तिला बरं वाटलं कारण त्यांच्यासमोर फार वेळ थांबायची तिची इच्छाच नव्हती. ती हो म्हणून किचनमध्ये निघून गेली. इकडे अरुंधती आणि राजेश्वरीने हसतच एकमेकीला टाळ्या दिल्या.
..................
 

इकडच्या तिकडच्या गप्पा मारित राजेश्वरी थोडा वेळ थांबून निघून गेली. अनघाच्या डोक्यात मात्र समिहाचे ते फोटोज आणि तिचं दिसणं - राहणं हे सगळचं डोक्यात घर करुन राहिलं. राजेश्वरी गेली तरी अनघा समिहाच्याच विचारात होती. तिला एकदा वाटलही की, आत्याला विचारावं विक्रमला समिहा आवडली होती का पण तिचा धीर झाला नाही. मग ती तशीच विचार करित एकटीच रूममध्ये जाऊन बसली.
............................
अरुंधती दुपारी सहज मासिकं चाळत हॉलमध्येच बसली होती. भाऊसाहेबही लग्नामुळे बाहेर कुठे गेले नव्हते. आता लग्न एकदाच पार पडलं आणि त्यांच्या नेहमीच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली. जितेंद्रही पुन्हा त्याच्या कारखान्याच्या कामात बिझी झाला तरी अरुंधतीला जेवताना कंपनी म्हणून तो दुपारी जेवायला घरीच यायचा. नीतूने लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भरपूर मजा करुन घेतली होती. तिच्या एनजीओच्या कामाकडेही तिचं दुर्लक्ष झालं होतं लग्नाच्या तयारीत त्यामुळे तीही आता पुन्हा तिच्या कामाला लागली होती. सगळे पुन्हा बिझी झालेले, अरुंधतीने पुन्हा आपल्या मैत्रीणींसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. राजेश्वरी घरी आली म्हणून अरुंधतीला बरं वाटलं. तिला वाटत होतं, राजेश्वरी नाराज झाली असेल आणि आता ती काही पुर्वीसारखं आपल्याशी वागणार नाही पण अरुंधतीचा समज खोटा ठरला आणि राजेश्वरीनेच तिला भेटलो नाही बरेच दिवस भेटूया की अस सांगणारा फोन केला. त्यामुळे अरुंधती खूश होती. स्वतःच्याच नादात ती मासिकांची पानं पलटत होती इतक्यात तीन नोकर दारातून हॉलमध्ये येत होते आणि त्यांनी दोन्ही हातात गोदरेजचं वॉर्डरोब धरलं होतं. त्यांच्याकडे लक्ष गेलं तस अरुंधती बसल्या सोफ्यावरूनच म्हणाली,
" एक मिनिट, काय हे ! कुठे घेऊन चाल्लायत?" तिच्या आवाजाने आत्या बाहेर आली. ते तिघे गोंधळले. त्यातला एकजण दारातूनच म्हणाला,
" ते वहिनीसाब, विक्रमसाहेबांनी सांगतलय त्यांच्या खोलीत ठेवाय! नव्या वहिनींना !" या वाक्यासरशी अरुंधती आश्चर्यानेच उठून उभी राहिली.
" काय! केव्हा ?" 
" ते सायेब बाहेर जानार व्हते ना मंग म्हनूनच आधी सांगतलं."  त्यातला दुसरा एकजण म्हणाला. तशी आत्या पुढे आली.
" ए जा रे तुम्ही. ती बघा सायेबांची रुम." आत्याने जिन्याच्या दिशेने बोट करुन विक्रमची रूम त्यांना दाखवली तसे बरं म्हणत ते तिघेजण ते कपाट सांभाळत आत आले आणि अरुंधतीच्या समोरुन वॉर्डरोब सावकाश सांभाळीत जिन्याने वरती गेले. अरुंधतीला विक्रमच्या या वागण्याचा राग आला होता. तिच्यासाठी खास वेगळ वॉर्डरोब ! कश्याला! काय गरज आहे ! असं काय मोठठ सामान असणारय तिचं! पाचशे सहाशेच्या त्या साड्या आणि ड्रेस त्याच्यासाठी एवढी काय गरज होती! अरुंधतीने हे मनातले विचार लगेच आत्याला बोलून दाखवले.
" बघा! आता ह्याची काय गरज होती का? " ती आत्याकडे पाहत पुन्हा सोफ्यावरती येऊन बसली.
" असु द्या हो! नवं लग्न आहे. असते की हौसमौज !"  आत्या शांतपणे डायनिंगटेबलवरचे ग्लासेस उचलत म्हणाली.
" हो का! मी लग्न करुन आले तेव्हा आमची नव्हती असली हौसमौज !"   अरुंधतीने आत्याला टोमणा मारला पण आत्याला याचा चांगलाच राग आला. तिने हातातला नॅपकीन डायनिंगटेबलवरती आपटत म्हटलं,
" वहिनीसायेब, साहेबांचं तुमच्यावर किती प्रे..." ती पुढे काही बोलणार तोच अरुंधती चिडून तिथून उठली.
" किती वर्ष तुम्ही मला तेच ऐकवणार!" इतक्यात पुन्हा मागून दोन नोकर आत आले.
" बाईसायेब, हे टेबल.....सायेब काय म्हटले हा काय ते अभ्यासाचं टेबल " दोघांनी स्टडीटेबल आतमध्ये आणीत विचारलं. अरुंधती ते पाहून अजूनच चिडली आणि तिथून निघून गेली.
" ए तेपन वर नेऊन ठेव." आत्या बोलली तसं दोघांनीही ते उचललं आणि वरच्या रूमकडे ते पायर्‍या चढत गेले. आत्याला मात्र विक्रमचं हे वागणं पाहून खूप आनंद झाला.
......................
नोकरांनी एकामागोमाग एवढ्या वस्तू रूममध्ये आणलेल्या पाहून अनघाला काहीच समजेना.
" कुणी मागवल हे ?" तिने नव्याकोर्‍या वार्डरोबकडे पाहत विचारलं.
"ते विक्रमसायेबांनी सांगितलय तुमच्यासाठी " एकजण स्टडीटेबल नीट ठेवीत म्हणाला.
" बरं, असु द्या ते. मी करते नीट"  अनघा त्यांना म्हणाली तसे ते बरं वहिनी म्हणून तिथून बाहेर गेले.
नवा वॉर्डरोब आणि स्टडीटेबल बघून तिलाही नवल वाटलं. तिने वॉर्डरोब उघडला. 'खरच याची काय गरज होती !' तिने मनाशीच म्हटलं. पण सामानाच्या बॅगा उघडून कपडे त्यात ठेवण्याचं तिने टाळलं. 

क्रमशः

🎭 Series Post

View all