बंधन भाग 58

Love, Social

भाग 58

( गेल्या भागात नीतू, जितेंद्र आणि आत्या दोघांनी बाहेर फिरायला जायला हवं याकरता प्लॅन करतात. विक्रम चिडतो पण आत्याने समजावल्यामुळे तोही तयार होतो. तो अनघाला समजावतो आणि नाईलाजाने ती तयार होते. पाहूया पुढे)

आत्याच्या आग्रहाखातर आणि नीतू, जितेंद्रच्या अति उत्साहामुळे विक्रम आणि अनघाने पुढल्या दोन दिवसातच गोव्याला जायची तयारी केली अर्थात दोघच फिरायला जाण्याचा उत्साह त्यात नव्हता. गेल्यानंतर चार दिवस थांबण्याइतपत कपडे त्यांनी आपापल्या बॅगेत भरले बाकी तिकडे पोचल्यानंतर कुठे कुठे फिरायचं, शॉपिंग काय करायची अश्या कसल्याच गप्पा त्यांच्यात नव्हत्या पण नितू आणि जितेंद्र खूश होते तरीही नितूने विचारलच अनघाला बाहेर कुठेतरी जा कि कुलूमनाली, मसुरी वगैरे पण अनघाने नंतर मोठी सुटी असेल कि जाऊ असं सांगून विषय बदलला होता. जितेंद्रने हौशीने विक्रमला कॅमेरासुद्धा सोबत घ्यायला सांगितला आणि गोव्यातल्या फिरण्यासारख्या छान छान स्पॉट्सची माहितीसुद्धा दिली. दोन तीन हॉटेल्सची माहितीसुद्धा जितेंद्रने काढली होती. त्याची सगळी बडबड विक्रमने शांतपणे ऐकून घेतली. आत्याला दोघे जायला तयार झाले याचा आनंदच होता. तिने भाऊसाहेबांच्या कानावर घातलं तेव्हा तेही खूश झाले. विक्रमला आपण निवडलेल्या मुलीशी लग्न करावं अशी इच्छा आपण सांगितली आणि त्याने लगेच हो म्हटलं पण तरीही तो या लग्नाने खूश असेल ना कि फक्त आपल्याला तसं भासवत असेल ही शंका लग्न झाल्यापासून त्यांच्या मनात होती. अनघाच्या बाबतीत आधी घडलेल्या सगळ्या घटनांमुळे तो तिला समजून घेतोय का हे कळायलाही मार्ग नव्हता पण आत्याने त्याच्यासोबत झालेलं बोलणं भाऊसाहेबांना सांगितलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. दोघे फिरायला निघणार म्हणून सगळे खूश होते पण अरुंधतीने मात्र यात फार रस दाखवला नाही फक्त निघण्याच्या आदल्या रात्री ती विक्रमसोबत बोलायला आली.  

" काय रे झालं का पॅकिंग ?" आतमध्ये येत तिने विचारलं.

" हो झालं ना केव्हाच " तो म्हणाला तशी ती दारातून पुढे आली. अनघा सामानाच्या बॅगा पुन्हा एकदा चेक करत होती.

" ओके, लवकर झोपा आता " अनघाकडे पाहत तिने मंदस हसत म्हटलं.

" आणि विक्रम टेक केअर नीट जा. मित्रांसोबत नाही जात आहेस सो take care of her " ती चेहर्‍यावरती हसू ठेवित म्हणाली तस त्यानेही मानेनेच हो म्हटलं.

" चला, गूडनाईट, गूडनाईट ग " हसत ती म्हणाली.

" गूडनाईट मम्मा " अनघाने म्हटलं तस अरुंधतीची नजर पटकन वरती वळली. 

" मम्मा Good night " अरुंधती निघताना विक्रम बोलला मग या दोघांनाही बाय म्हणून ती झोपायला निघून गेली.

.....................

दुसर्‍या दिवशी सकाळी आवरुन नाश्ता करुन दोघे जायला निघाले.सामानाच्या बॅगा नोकराने गाडीत नेवून ठेवल्या. दरवाजापर्यंत आत्या आणि नीतू, जितेंद्र सोबत आले. त्यांनी आपापल्या सूचना द्यायला सुरुवात केली. ते पाहून अनघाला वाटलं, किती प्रेमळ माणसं आहेत हि सगळी अगदी जिव लावणारी आणि विक्रमसर सुद्धा !

" विक्रम नीट जा रे आणि मी सांगितलेले स्पॉट्स नक्की बघा" जितेंद्रने पुन्हा आठवण केली तशी नीतू उड्या मारित अनघाजवळ आली.

" वैनी एन्जॉय आणि ह्याला जरा त्रास दे त्याशिवाय सुधारणार नाही हा!" नीतूने हसत त्याला चिडवलं.

" हो का ! तुला बघतो मी नंतर " विक्रमने तिचा कान पिरगळला तशी ती कळवळून आत्याकडे बघायला लागली.

" ए सोड तिला आणि निघा लवकर आता " आत्याने दटावलं तस दोघे गाडीत बसले. 

" नीट जा आणि पोचल्यावरती फोन कर रे बाबा" आत्याने काळजीने म्हटलं.

" हो आत्या मी करेन.नका काळजी करु " अनघा आत्याला बोलली.

" ए आणि खूप फोटोज काढा नी वैनी तू पण ना साडी कश्याला नेसलीस ! ट्रिपला जाताय तर मस्तपैकी वनपिस वगैरे घालायचा कि तू पण ना!" नितू मस्करीत बोलली पण तिला ते पटलं आणि वाटलं आपण किती काकूबाई टाईप आहोत! तिने लेमन कलरची साडी नेसली होती. त्याने मरुन कलर आणि त्यावर ब्लॅक चेक्सचा कॅज्युअल वेअरिंग शर्ट घातला होता आणि त्यावर Uniqlo च्या जॅपनीज ब्रँडचं ब्लॅक जॅकेट. तो रुममधून हातात कारच्या किच फिरवत बाहेर आला आणि तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ती क्षणभर पाहतच राहिली होती. नेहमीच्या फॉर्मल ड्रेसमध्ये त्याला पाहण्याची सवय त्यामुळे तिला जरा वेगळ वाटलं. खरतर ते दोघही एकाच वयाचे होते तरीही गेल्या काही महिन्यांपासूनच्या तणावामुळे ती हसणनटणं विसरली होती. तिला स्वतःला त्याच्यापेक्षा दहाएक वर्षांनी मोठी असल्यासारखं आता त्याच्याकडे पाहताना वाटलं. नेहमी एवढा स्ट्रिक वागणारा हा माणूस असा कॉलेजच्या मुलांसारखा सुद्धा राहू शकतो याचं तिला नवल वाटलं.  

" काही नको....चल आता तुझ्या तोंडावर बोट ठेव. आम्ही निघतो."  विक्रमच्या या बोलण्याने ती तिच्या विचारातून बाहेर आली. विक्रम पटकन नितूला चिडवत म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. तिघांनी त्यांना हात हलवून मोठ्याने एन्जॉय म्हटलं.

.............................

दोन- तीन किमी गाडी गेली न तोच त्याने गाडीच्या काचेतून पाहिलं तर एक बाईकवाला त्यांना फॉलो करतोय अस त्याला वाटायला लागलं. त्याने नीट निरिक्षण केलं तर त्या बाईकवरतीही तरुणच होता आणि त्याने हेल्मेट घातलं होतं आणि गाडी बंगल्यातून बाहेर पडल्यावरती दहा पंधरा मिनिट झाली असतील तेव्हापासून तो त्यांचा पाठलाग करत होता. विक्रमने गाडी मुख्य हायवेला वळवली आणि थोड्या वेळाने पुन्हा काचेतून नजर टाकली तर पाठि कुणीही नव्हतं. तो मघाचा बाईकवाला गायब झाला होता! त्याला हा काय प्रकार चाललाय गेल्या काही दिवसांपासून ते कळत नव्हतं.

याच विचारात तो ड्राईव करत होता इतक्यात अनघाने बोलायला सुरुवात केली,

"  आपण कुठे चाललोय नक्की! I know Goa पण नक्की कुठे?" 

" हं....good question. साऊथ गोव्याला ' Colva ' म्हणजे गावचं आहे but It's pleasing coastal village in South Goa."  तो उत्साहाने म्हणाला.

" Ok, मी काही फार आले नाहीय गोव्याला एकदा कॉलेजला असताना कॉलेज ट्रिप म्हणून आले होते तेवढचं." तिने तिच्या कॉलेजची आठवण सांगितली.

" Ok पण हे गाव असलं तरी छान आहे. Do you know, It has connection to Portugal ?  People are also migrants from Portugese territories." तो सांगत होता.

" हो का! छानच असेल मग तुम्ही इतकं सांगताय तर " 

" Yes आणि मंदिरंसुद्धा पहाण्यासारखी आहेत.  " तो ड्राईव करता करता बोलत होता आणि ती  कान देऊन ऐकत होती. 

" I like Colva for two reasons " 

" कोणती ?" तिने कुतुहलाने विचारलं.

" If you need solitude and peace you have the option of beach and If you love crowd and party mood atmosphere then Colva is also a right place !"  तो हसतच म्हणाला.

" ओह, म्हणून तुम्हाला आवडत का तिकडे ?" तिनेही त्याची मस्करी करत म्हटलं.

" हो, मित्रांसोबत आलोय मी आधी आता तुम्ही सोबत आहात म्हटल्यावर no parties only peace " तिला थोडस चिडवत तो बोलला तशी ती हसली. ते पाहून त्याला सांगावस वाटलं, अस नेहमी हसा ना पण तो बोलला नाही.

...................................

त्या बाईकवाल्याने थोडा वेळ त्यांचा पाठलाग केला आणि बाईक रस्त्याला बाजूला उभी केली आणि मोबाईल खिश्यातून बाहेर काढत एक नंबर घाईघाईने डायल केला आणि डेस्परेटली फोन समोरुन उचलण्याची वाट पाहायला लागला. शेवटी फोन पलिकडून उचलला गेला.

" हॅलो, हॅलो साहेब मी संदिप अहो ते गेले ना मी त्यांच्याच मागे " तो घाईघाईत बोलत होता. त्याचा चेहरा घामेजला होता आणि आपल्यावर समोरुन साहेब भडकणार हे त्याला माहित होतं तस तो एक्सप्लेनेशन द्यायला लागला.

" मूर्ख! ते गोव्याला जातायत ही खबर तूच दिलीस ना मग बाईकने तू गोव्याला जाणार होतास का!"

" सॉरी साहेब " त्याने म्हटलं.

" Shut up, Don't give excuses. Go as early as possible " फोनवरुन त्या माणसाने ह्याला झापलं.

" होय साहेब " म्हणत त्या संदिपने फोन ठेवला.

............................

रात्रीचे आठ साठेआठ होत आले. मध्येमध्ये थोडावेळ थांबायचं आणि पुन्हा प्रवासाला निघायचं तरी पोहचेपर्यंत रात्र झाली. हायवेवर त्याने बाजूला गाडी थांबवली आणि काचा खाली करत त्याने रस्त्यावरुन चालणार्‍या एका गृहस्थांना हाताने थांबवलं,

" Excuse me,  How far is Colva from here ?"

" It's 10- 15 KM, It's better you should stay here for night " त्यांनी सांगितलं.

" Ok , Thanks " त्याने हसत म्हटलं आणि हॅपी जर्नी म्हणून ते गृहस्थ निघून गेले.

...........................

" मॅडम, मी जरा बघतो थांबण्यासाठी लॉज वगेरे आहे का " तो कारचा दरवाजा उघडत म्हणाला.

" बरं "   ती गाडीतच थांबली आणि काचेतून आजूबाजूला पाहू लागली.

तो उतरुन मोबाईलला नेटवर्क मिळतय का ते पाहायला गाडीपासून थोडस अंतर बाजूला गेला. पाच दहा मिनिटं झाली. तिला कंटाळा आला बसून म्हणून ती कारमधून खाली उतरली. तिने इकडे तिकडे पाहिलं तर रस्त्यावरती अगदी तुरळक वर्दळ होती. पलिकडून कुणीतरी दुकानातून ' किदेरे बॉस्मरे ' असा आवाज कुणाला तरी दिल्याचं तिच्या कानावर पडलं आणि गोव्यात पोहचल्याचं ' फिलिंग ' आलं. स्वच्छ रस्ते, पोर्तुगिज सोबत मराठी मिरवणार्‍या दुकानांच्या पाट्या आणि मधूनच कानावरती पडणारे कोकणी शब्द या वातावरणात तिला छान वाटलं. ती तशीच चालत विक्रमला शोधत थोडी पुढे आली. आता मघाची दुकानं थोडी लांब पडली होती. इतक्यात समोरुन एक साधारणतः चाळीशीचा गृहस्थ गुडघ्यापर्यंत हाफ पँन्ट, अर्धवट इन केलेला लांब हाताचा शर्ट आणि गळ्यात रुमाल अडकवून लटपटत येत होता. तो इतकी प्यायला होता कि धड उभही राहता येत नव्हतं त्याला. त्या माणसाला न पाहिल्यासारखं करुन ती त्याच्यासमोरुन खाली मान घालून चालू लागली तसा तो तिच्यासमोर आला. त्याचं गूटख्याने रंगलेलं तोंड आणि दारुचा उग्र वास तिला असह्य झाला. तो रस्ता अडवून तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याची नजर नकोशी वाटली तिला. तिला तिथून पळत सुटावस वाटलं. तो लटपटत्या पायाने एकेक पाऊल तिच्याजवळ येत होता. डिसेंबरमधली ती काळी रात्र तिच्या नजरेसमोर उभी राहिली. शरिर भितीने थरथरलं. ती मोठ्याने ओरडली.

" Leave me " 

तो माणूस पुढे होत म्हणाला," ए चुप....एकदम ओरडते काय गो " इतक्यात त्या माणसाच्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवल्याचं त्याला जाणवलं.

" ओ मिस्टर ! What चलो Go Go निघायचं गप्पपणे " विक्रमच्या रागाने बोलण्याने तो माणूस भांबावला. विक्रमला अस धावत आलेला बघून धीर आला तिला.

" ते....मी जस्ट टाईम विचारत होता " 

" ओह......ओके It's 9.30 सो Go now " त्याच्या गळ्यातला रुमाल ठिक करत विक्रमने म्हटलं. त्याच्या जळजळीत नजरेने तो माणूस ओके ओके म्हणत लटपटत पुढे निघून गेला. तो पुढे गेला तरी ती भितीने थरथरत होती.

" मॅडम तुम्ही....तुम्ही चला गाडीत बसा थोडावेळ " 

" सर आपण...पण निघूया ना घरी. मला भि..भिती वाटते आपण प्लीज घरी....घरी जाऊया " भितीने तिला नीट बोलताही येईना. तिचे हात थरथरत होते. 

" तुम्ही शांत व्हा आधी. या मी आहे न सोबत मग! या चला" त्याने हाताला धरुन तिला कारपाशी आणलं.

" घरी जाऊया ना आपण "

" हो हो जाऊ या हा " त्याने कारचा दरवाजा उघडून तिला आतमध्ये बसवलं. तो ड्रायविंगसीटवरती बसला आणि बिसलेरीची बॉटल ओपन केली. स्वतःच्या हातात धरुनच तिला पाणी प्यायला दिलं.

" बरं वाटेल.....Just relax " तो शांतपणे बॉटलचं बूच लावत म्हणाला. तिचे हात अजूनही थरथरत होते. भितीने कपाळावर घामाचे थेंब गोळा झाले. त्याने बॉटल ठेवली आणि खिश्यातून रुमाल काढला.

"तुम्ही शांत व्हा...कुणी नाहीय इथे..अस घाबरतात का " तिला समजावत त्याने अलगदपणे रुमालाने तिच्या कपाळावरचे घामाचे थेंब पुसले. 

" आपण नको पुढे जायला. घरी जाऊया " त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. त्याला मनातून त्या माणसाला शिव्या द्यावश्या वाटल्या. ' कुठे तडमडला हा ' असं मनातून वाटलं त्याला.

" हो हो जाऊया घरी पण असं मधूनच आपण घरी गेलो तर सगळे किती प्रश्न विचारतील आणि तुमच्या नीतूने हौसेने इतकी तयारी केली मग तिला वाईट वाटलं तर तुम्हाला नाही ना आवडणार " त्याच्या या बोलण्यावर मान हलवून तिने नाही म्हटलं.

" सो आपण आलोच आहोत तर चार दिवस थोडं फिरुया आणि जाऊया म्हणजे घरच्यांनाही बरं वाटेल." त्याचं असं लहान मुलाला समजावतात तस समजावणं पाहून तिने बरं म्हटलं आणि डोक मागे सीटला टेकलं. त्याने थांबण्यासाठी म्हणून जवळच्याच एका लॉजच्या दिशेने गाडी वळवली. ती गाडीच्या काचेतून बाहेर पाहत होती. काचेतून दिसत होती अंतर कापत चाललेली अंधारी रात्र. रात्रीची वेळ म्हटलं की मन घाबरुन जायचं तिचं आणि शरिरसुद्धा गोठून जायचं. त्याने ड्रायविंग करताना तिच्याकडे पाहिलं. 

" मॅडम जस्ट डोन्ट वरी. मी आहे न तुमच्यासोबत " आश्वासक नजरेनं तो बोलला. 

तिने या वाक्यावरती त्याच्याकडे पाहिलं नी कसनुसं ती हसली. त्याच्या नुसत सोबत असण्यानेच तिला धीर आला.

क्रमशः

🎭 Series Post

View all