बंधन भाग 9

Love, Social Issues

भाग 9
( गेल्या भागात अनघा 'गुरुकुल ' मध्ये जॉबसाठी रुजु झाली. तिच्यासह अजुनही काही नवे प्राध्यापक रुजु झाले. प्राचार्य करंबेळकर आणि उपप्राचार्य निंबाळकर सरांनी सर्वांचं स्वागत केलं. अनघा कॉलेजमधल्या वातावरणाने खुश झाली. ती बॅचलर अॉफ मॅनेजमेंन्ट विभागासाठी प्राध्यापिका म्हणून जॉईन झाली होती. त्या डिपार्टमेंन्टच्या नव्या प्रमुख खंदारे मॅडमना ती जाऊन भेटली. मॅडमनी तिला बेस्ट लक दिलं. त्या दोघींमध्ये सहकारी म्हणून छान बोन्डिंग तयार होतं होतं पण त्यानंतर भेटलेले सामंत सर मात्र तिच्याशी रुक्षपणे वागले होते. कदाचित खंदारे मॅडमना एच.ओ.डी.केल्याचा राग अजुनही त्यांच्या मनात असेल पाहुया पुढे )

कंप्युटरलॅब मधुन विक्रमच्या चिडून जाण्यामुळे निकम सर आणि बर्वे सर चांगलेच धास्तावले होते. इथुन पुढे लॅबशी संबंधीत कोणताही हलगर्जीपणा न करण्याचं निकम सरांनी ठरवलं होतं तसेही ते प्रामाणिकपणे आपलं काम करणार्‍यांमधले होते पण लॅबमधले कंप्युटर्स ' गुरुकुल ' मध्ये  कंप्युटर सायन्स विभाग सुरु झाला तेव्हापासुनचे होते. अधुनमधुन कंप्युटर्सच्या दुरुस्तीची कामं निघत पण निकम सर ते सगळं सांभाळून घ्यायचे. विद्यार्थ्यांचं नुकसान अजिबात होऊ द्यायचे नाहीत. असं अचानक भाऊसाहेबांना कंप्युटर्स बदला असं कसं सांगायचं या संकोचापोटी ते गप्प राहायचे. बरं त्यातले सगळेच कंप्युटर्स काही खराब नव्हते पण त्या दिवशी लेक्चर दरम्यान प्रोब्लेम झाला. ते आणि बर्वे सर लक्ष देतच होते पण मुलांनी लॅबमध्येच गप्पा मारायला सुरुवात केली. गोंधळ नको म्हणून त्यांनी मुलांना बाहेर उभं राहायला सांगितलं होतं नेमकं तेच वरच्या केबिनमधुन विक्रमने पाहिलं होतं आणि तो लॅबमध्ये येऊन सगळ्यांची तासमपट्टी करुन गेला होता. त्याने सांगितल्या प्रमाणे पुढच्या दोन- तीन दिवसात लॅबमध्ये नव्याकोर्‍या कंप्युटर्सचं आगमन झालं आणि कंप्युटरलॅब एकदम चकचकीत दिसु लागली. मुलंही त्यामुळे खुश होती. विक्रमने एवढ्या तातडीने केवळ  विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून नवे कंप्युटर्स मागवले त्याला कॉलेजची किती काळजी आहे, विद्यार्थ्यांचा किती विचार तो करतो या विचाराने भाऊसाहेबांना बरं वाटलं. सगळे कंप्युटर्स लॅबमध्ये बसवल्यानंतर भाऊसाहेब स्वतः लॅबला व्हिजीट द्यायला आले तेव्हा प्राचार्य, निकम सर, बर्वे सर, दिनेश सगळे तिथे होते.
" साहेब सॉरी मी मी तुम्हाला आधीच जुन्या कंप्युटर्सविषयी सांगायला हवं होतं. "  निकम सर भाऊसाहेबांना म्हणाले.
" असु द्या हो आता आलेत ना नवे कंप्युटर्स आता पुन्हा काही अडचण असेल तर खुलेपणाने सांगत जा." भाऊसाहेब शांतपणे त्यांना समजावत म्हणाले.
" अहो पण ज्यांच्यामुळे लॅब एवढी छान झाली त्यांनी पाहिलं का हे !"   भाऊ हसत म्हणाले.
" नाही, विक्रम साहेब येतो म्हणालेत नंतर " दिनेश म्हणाला.
...................
लॅबमध्ये प्राध्यापकांची गर्दी पाहुन लॅबच्या समोरच्या क्लासमधून बाहेर पडणारी अनघा लॅबकडे पाहात होती. तिलाही काय झालंय याची उत्सुकता होती तसंही तिला जॉईन होऊन अवघे दोन दिवस झाले होते त्यामुळे कॉलेजमध्ये काय काय चाललंय याकडे लक्ष द्यायला आणि बाकी विभागांच्या प्राध्यापकांसोबत बोलायला त्यांच्याकडून कॉलेजविषयी ऐकायला तिला आवडत होतं. तिने तिच्याशेजारुन पुढे गेलेल्या शंकरला हाक मारली.
तिच्या पहिल्या हाकेसरशी त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो मागे आला.
" हा कारखानीस मॅडम बोला की "
" अरेच्चा ! तुला माझं नाव कसं माहित ?" ती आश्चर्याने म्हणाली.
" बस काय मॅडम अहो शिपायाचं काम आमचं कॉलेजातल्या स्टाफपासुन ते अॉफिसपर्यंत सगळ्यांची नावं आम्हाला म्हाईत असतात. कुनाला काय मदत पायजे ते पन आपल्याला म्हायत असतं आनी मी पन परवा तुमचं स्वागत झालं तेव्हा स्टाफरुमला होतो की!"  तो अगदी अभिमानाने म्हणाला.
" बरं बरं पण माझं काही काम नव्हतं. ते समोर लॅबमध्ये प्रिन्सिपल सर होते मघाशी आता बाकी प्राध्यापक पण जाऊन येतायत काय झालं ?" तिने विचारलं.
" हात्तीच्या मारी ते होय अहो ते लॅबमधे नवीन कँप्युटर आनलेत "
" हो का ओके ओके "  ती म्हणाली.
" आहो कँप्युटर राहिले बाजूला चार दिवसांपुर्वी सोल्लीड खरडपट्टी काडली निकमसरांची विक्रमसाहेबांनी मग हे कँप्युटर आलेत म्हणून जरा ज्यादा कौतुक " तो म्हणाला.
" कोण विक्रमसाहेब " तिने हे नाव याआधी कुणाकडूनच ऐकलं नव्हतं.
" अाहो विक्रम साहेब नायी म्हायत तुम्हाला हा तुमी नवीन नाही का. अाहो भाऊसाहेबांचे थोरले चिरंजीव तेच तर बघतात आता कॉलेजचं सगळं ते काय म्हनता तुम्ही ?"
" काय ? "  तिने विचारलं
" हा काय ते डायरेक्टर का काय ते हायेत ना ते !"  शंकर म्हणाला.
" हो का ? "  ती आश्चर्याने म्हणाली.
 तिला ह्यातील काहिच माहित नव्हतं. कारण ती कॉलेजला शिकत होती तोपर्यंत भाऊसाहेबच एम.डी. होते. विक्रमचं दहावी पर्यंतच शिक्षण त्यांच्याच शारदादेवी राजेशिर्के प्रशालेत पुर्ण झालं नंतर त्याला चेन्नईच्या कॉलेजला अॅडमिशन मिळाली. जितेंद्र आणि नीता हे सुद्धा अभ्यास करायचे पण विक्रमसारखी बुद्धीमत्ता आणि टॅलेंन्ट त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्या दोघांचं सगळं शिक्षण सांगलीतच झालं आणि त्यांनाही बाहेर जाऊन शिक्षण वगैरे घेण्यात रस नव्हता पण विक्रमचं तसं नव्हतं. त्याच्या हुशारीमुळे त्याला चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकता आलं. चेन्नईनंतर स्वतःच्या मेरिटवर त्याला यु.एस.ला एम.बी.ए. करण्याची संधी मिळाली. पोरगं एवढं हुशार आहे तर उगीच कश्याला त्याला अडवायचं म्हणून भाऊसाहेबांनाही त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं होतं. त्याने परदेशी जाऊन शिकावं ही भाऊसाहेबांचीच इच्छा त्यासाठी त्याने मात्र दिवसरात्र मेहनत घेतली होती आणि वडिलांची इच्छा पूर्ण केली तेव्हापासुनच भाऊसाहेबांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानेच पुढे 'गुरुकुल ' सांभाळावं हे त्यांनी मनोमन तेव्हाच ठरवलं होतं. या सगळ्यात विक्रम मात्र कायम सांगलीबाहेर राहिला त्यामुळे कॉलेजमध्येही त्याच्याविषयी फार कुणाला माहित नव्हतं फक्त साहेबांचा एक मुलगा परदेशात शिकायला आहे एवढंच कॉलेजच्या स्टाफला माहित होतं पण प्रत्यक्षात विक्रमने कॉलेजला डायरेक्टर म्हणून यायला सुरुवात केली तेव्हापासुन त्याची शिस्त, त्याचे नियम, त्याचं कडक शब्दांत बोलणं- वागणं, प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं याची जणू कॉलेजला हळूहळू सवय झाली म्हणूनच आता शंकरही अनघाला त्याविषयी सांगत होता.
" पण काय रे शंकर निकमसरांना तुमचे विक्रमसाहेब एवढं का ओरडले ? "  अनघाने न कळून विचारलं.
" तेच तर सांगतोय आहो विक्रम साहेब लय स्ट्रीक आहेत. सगळ्या गोष्टी त्यांंना वेळेत लागतात. लॅबमध्ये जुने कँप्युटर मुलं वापरायची आनी परवा ते नीट काम करत नव्हते मग पोरं बाहेर गेली साहेबांनी ते पाहिलं अन तडातडा लॅबमध्ये आले तो दिनेश लॅबचं काम बघतो तो लय काय काय सांगत होता त्या दिवशी "  शंकरने तिला सगळा वृत्तांत सांगितला.
" हो का बरं बरं "   ती शंकरने सांगितलेलं हे सगळं ऐकुन अवाकच झाली.
" तसं पन साहेब लय हुशार हायेत अाहो अमेरिकेतनं शिकून आलेत मोठे साहेब पन त्यांचं लय ऐकतात " तो म्हणाला हे सगळं बोलता बोलता चालत चालत ते पुढे आले होते तोच समोर लायब्ररीकडे जाणारा जिना त्याला दिसला.
" बरं आठवन झाली मी बोलत काय बसलो मला लायब्ररीतनं पेपर आनायचेत करंबेळकर सरांना द्यायला जातो मी मॅडम " तो म्हणाला आणि धावत निघून गेला. ती मात्र चालता चालता शंकरने जे जे सांगितलं ते आठवत होती आणि तिला विक्रमविषयी अजुनच कुतुहल वाटतं होतं.

क्रमशः

🎭 Series Post

View all