बंधन भाग २( जलद कथालेखन स्पर्धा)

राहुलची आई रुपाली जवळ वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखे गिफ्ट मागते
बंधन

भाग..२)

रुपाली ची परीक्षा झाली. तिला सुट्टी मिळाली.तिची घरी जाण्याची तयारी सुरू झाली.इतक्यात तिचा फोन वाजला." हॅलो...!!!"

" ओ हाय बोल राहुल कसा आहेस?"

" अरे तुझी परिक्षा संपली की नाही अजून? "

" हो रे संपली.आता दोन आठवडे सुट्टी आहे मग आजच निघायचे म्हणते घरी.बाबांचा वाढदिवस आहे पुढील आठवड्यात मग मी येईन."

" ओहो मग स्वारी खुश.अरे पण जाण्या आधी आपण भेटू शकतो का? मस्त पैकी फिरुन येऊ.तुझा पण अभ्यास, परीक्षा यामध्ये आलेला कंटाळा दूर करु.मग तू उद्या जा ना घरी."

ती किती ही नाही नको म्हटली तरी राहूल ने तिला आपल्या बरोबर नेण्याचे ठरविले.

राहुल बरोबर वेळेवर तिला नेण्यासाठी आला.

" हाय रुप्स "

" ओ हाय राहूल आणि हे काय नवेच रुप्स."

" अगं रुपाली पेक्षा रुप्स किती सुट होतंय तुझ्या वर."

" नको रे बाबा रुप्स,गिप्स मी आपली रुपालीच बरी."

दोघेही बोलत बोलत गाडीत बसून निघाले.गाडी आता शहराच्या बाहेर पडली." ऐक न इथे एक मस्त रिझॉर्ट आहे आपण तिथेच जाऊ."

राहुलने गाडी एका आलिशान रिझाॅर्ट समोर थांबवली.
दोघेही आत गाडी पार्किंग मध्ये लावून टेबल रिकामे आहे याची चौकशी रिसेप्शनिस्ट कडे करत होते.तेव्हा नुकतेच एक रिकामे झाले आहे असे त्याने सांगितले.

दोघेही तेथे जाऊन बसले.

" बोल काय खाणार." राहूल ने विचारले.

" इथे काय स्पेशल आहे तेच मागव ना."रुपाली म्हणाली.

राहूल ने जेवणाची आॅर्डर दिली.ते दोघे बसले होते तिथे समोरच स्विमिंग पूल होता.काही तरुण तरुणी मनसोक्त आनंद घेत स्विमिंग करत होते. संगीताच्या सुंदर लहरी पण सुरू होत्या. त्यांच्या तालेवर काही तरुण डान्स करत होते.

हे दोघे आपल्या बोलण्यात मग्न होते.रुपाली आपले बालपण मग इथे होस्टेल लाईफ याबद्दल सांगत होती.राहूल ही आपले बालपण कसे गेले.वडिल बाहेर देशात कामाला असलेमुळे आईनेच एकटीने सांभाळ केला. आता आणखीन चार वर्षे आहेत त्यांची सेवा निवृत्ती ची .मग ते परत येतील . राहुल , त्याची धाकटी बहीण आणि आई इतकाच परीवार.

दोघेही दिवसभर एकत्र होते.आता संध्याकाळ होत आली .

" चल निघू आपण.मला वेळ होईल" रुपाली म्हणाली.

" हो हो चल." राहुल म्हणाला.

दोघे गाडीत बसले. राहूल ने गाडी सुरू केली.जरा पुढे एका वळणावर गाडी थांबवली . राहुल ने एकदम रुपालीचा हात हातात घेत म्हणाला " रुपाली तुला एक सांगायचे आहे .कसे सांगू दिवस भर प्रयत्न केला पण जमलेच नाही. मी...!!!माझे...!!!!
‌रुपाली आय लव्ह यू"

रुपाली ने एकदम त्याचा हात आपल्या हातातून वेगळा करत म्हणाली " राहूल ..
काय हा मुर्खपणा."

" नाही रुपाली खरेच गं मी जेव्हा तुला पाहिले तेव्हाच मला असे वाटले की हो ही तीच आहे जी माझ्यासाठी योग्य आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे पण जर तुझे माझ्या वर प्रेम नसेल तर मला वाईट वाटणार नाही.पण तुला सांगितले नाही तर माझ्या मनात एक रुखरुख लागून राहिली असती."

रुपाली काही बोलली नाही.दोघेही शांतच होते.रुपाली होस्टेलमध्ये आली.
*************
रुपाली घरी आल्यावर तिचे आई-वडील यांनीही आपली सगळी कामे जरा स्थगित करुन तिच्या बरोबर राहाण्याचा निर्णय घेतला.हे तिघे आणि तिची आया माई अगदी आनंदात होते.

तिच्या आवडीचे जेवण , तिच्या बरोबर बाहेर फिरायला जाणे.हवे नको त्या वस्तू खरेदी करून देणे यामध्ये तिची सुट्टी कशी संपली हेच कळले नाही.

बाबांचा वाढदिवस देखील फक्त या तिघांनीच आया माई सोबत साजरा केला.आता रुपाली परत जाण्याची तयारी करत होती.ती आपल्या बॅगा भरत होती तोच तिचा फोन वाजला.

ओह राहूलचा फोन. "हॅलो...!!!बोल राहूल कसा आहेस" रुपाली म्हणाली.

" मी आहे बरा.तू कशी आहेस?" राहुलने विचारले.

" मी बरी आहे.उद्या निघतेय." रुपाली म्हणाली.

" ओके.मी वाट पाहत आहे"राहुल म्हणाला.

रुपाली परत आपल्या होस्टेलमध्ये आली.तिच्या मैत्रीणीपण परत आल्या होत्या.सगळ्या आपल्या घरी जाऊन काय काय केले हे सांगत होत्या तोच रुपाली ला राहुल चा मेसेज आला." हाय..!!!
मला तुला भेटायचे आहे.मी खुप नर्व्हस आहे.

संध्याकाळी दोघेही एका हाॅटेलमध्ये गेले.समोरासमोर बसले तोच राहूल ने रुपालीच्या समोर आपल्या फोनमध्ये एका महीलेचा फोटो दाखवत म्हटले " हे बघ आमच्या बाबांनी दुसरे लग्न केले आहे तिकडे. म्हणुनच ते इकडे येत नाहीत. हे आम्हाला आता कळाले ते ही माझा मित्र तिथे गेला आहे नोकरी साठी.काय योगायोग तो बाबांच्याच कंपनीत नोकरीला लागला आहे. तो तिथे गेल्यावर ह्या दोघांना एकत्र पाहीले.आधी त्याला वाटले कि दोघे कुलीग आहेत पण नंतर कळाले कि दोघांचे लग्न झाले आहे . यांना एक मुलगा ही आहे.मग त्याने मला फोन करून सांगितले .मला तर पटलेच नाही. मी त्याला खुप ओरडलो पण नंतर त्याने पुरावा म्हणून फोटो पण पाठविले.
हे ऐकल्यानंतर आई पार खचून गेली आहे.तिने आजपर्यंत आम्हाला एकटीने सांभाळले पण कधी ती थकली नाही किंवा कंटाळली नाही तिला बाहेर का असेना पण बाबांचा आधार होता पण आता या वयात हा धक्का तिला सहन नाही होत." असे म्हणत तो रडू लागला.

रुपालीला काय बोलावे तेच सुचेना.पण तरीही तिने त्याला आधार दिला आणि म्हणाली" अरे तुच रडत बसला तर आईंना कोण सांभाळणार.तु त्यांचा खरा आधार आहेस." असे म्हणत म्हणत तिने त्याच्या हातात हात घालुन त्याच्या पाठीवर हात फिरवला.

आता हे दोघे रोजच भेटत होते.रुपाली समोर आपले मन मोकळे केले हे राहूल ला बरे वाटले.कधी कधी रुपाली राहूल च्या घरी देखील जायची.

राहूल ची आई देखील आपले मन रुपाली समोर मोकळे करायची.नकळतच ती आता या घरचीच एक मेबंर झाली.जर घरी काही नवे पदार्थ बनले तर रुपाली ला डबा किंवा तिला घरी बोलावले जायचे.बघता बघता तिचे घनिष्ठ नाते निर्माण झाले. आज राहूलच्या आईचा वाढदिवस मग रुपाली ने साजरा करायचा ठरवला. " आई आज तुमचा वाढदिवस आहे.बोला तुम्हाला काय गिफ्ट हवंय" रुपाली म्हणाली.

आई जरा शांतच बसली आणि म्हणाली " हे बघ तू मला गिफ्ट देणार आहेस तर मला जे हवं ते देशील का ?

" हो तर नक्कीच " रुपाली म्हणाली.

" बघं हां".आईने विचारले.

" हो आई तुम्ही फक्त काय हवं ते सांगा."रुपाली म्हणाली.

आईने जे मागितले ते ऐकून रुपाली स्तब्ध होऊन बसली.

" बघ तुला मी म्हंटले होते की तू खरंच देशील ना."आईने विचारले.

" हो आई मला जरा वेळ द्या."रुपाली म्हणाली.

रुपालीला आज रात्रभर झोपच येत नव्हती.ती आपल्या खोलीतील खिडकीतून बाहेर बघत होती.विचाराने तिच्या डोक्यात काहूर माजवले होते.मग शेवटी तिने मनाशी पक्का निर्णय घेतला आणि झोपली.

सकाळी लवकर उठून ती बाहेर पडली.ती तड्डक एका मोठ्या वकीलाच्या आॅफिस मध्ये.तिथे जाऊन तिने त्यांची अपाॅइंनमेंट फिक्स केली. त्यांनी दिलेल्या वेळेवर त्यांना भेटली. सगळे पेपर घेऊन ती राहूलच्या घरी आली.
" आई हे घ्या तुमचे गिफ्ट"असे म्हणत पेपर्स आईच्या हातात दिले.

आईने ते पेपर घेतले. त्यांच्या डोळ्यात नकळतच पाणी आले पण त्यांनी ते लगेच आपल्या पदराने पुसून टाकत म्हणाल्या" ज्या माणसाने मला इतके वर्ष धोक्यात ठेवले . माझा विश्वास घात केला.त्याच्यासाठी मी माझे मोती का वाया घालवू.मी माझ्या मुलांबरोबर सुखी आहे. पुढे ही जितके आयुष्य आहे तितके मी सुख समाधानी, आनंदी राहणार.हे एक माझ्या साठी पडलेले वाईट स्वप्न होते असेच समजेन.दे पेन मला मी या डिव्होर्स पेपरवर सही करते....!!!"

क्रमशः
©® परवीन कौसर...