चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
लघुकथा
शीर्षक:- बंधन
©® सौ.हेमा पाटील.
गुढात्मा हे नारायण धारप यांचे पुस्तक तिने दोन दिवस झाले आणून ठेवले होते. त्यातील काही कथा वाचून झाल्या होत्या. 'सहा आठ फास्ट' ही कथा वाचायला दुपारी सुरुवात केली होती, पण एका पानाच्या पुढे जाताच आले नव्हते. मधूनच उठावे लागल्याने खूप चिड आली होती, पण काय करणार?
वाचनाची तीव्र इच्छा उफाळून येत होती. घरकामातून वेळच मिळत नव्हता. रात्री सगळी कामे आटोपली, की तिने कानोसा घेतला. सगळे घर शांत झाले होते. तिने पुस्तक घेतले व मागचे दार गाठले. आता सगळ्या कथा वाचल्याशिवाय उठायचेच नाही असे तिने ठरवले.
ती, मनुजा. तिला पुस्तक वाचनाची खूप आवड. त्यामुळेच आज ती
पुस्तक वाचत मागच्या अंगणात बसली. निवांत वेळ फक्त रात्रीच मिळे. घरात उकडत होते म्हणून ती मागच्या अंगणात बसली. दुसरे असे की, कुणी पाणी पिण्यासाठी उठले तर तिला तेवढाही व्यत्यय नको होता. तिला रहस्यमय, गूढकथा फार आवडत.
मागच्या अंगणात आड होता. आडापाशी एक बल्ब लावलेला होता. पहाटे पाणी शेंदण्याची वेळ आली, तर उजेड असावा यासाठी. तिने तो बल्ब लावला व आडाच्या मधल्या कट्ट्यावर ती पुस्तक घेऊन बसली.
रात्रीचा किर्र अंधार पसरला होता. तिला अंधाराची अजिबात भीती वाटत नव्हती, कारण ती स्वतःच्याच घराच्या अंगणात होती. तिथे तिचा रोजचा वावर होता. मग भीती कशाची? दुसरे असे की, तिला ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता शांत बसू देत नव्हती. ते पुस्तक वाचण्याच्या नादात तिला दुसरे काहीच सुचत नव्हते, तर भीतीची भावना कुठून उत्पन्न होणार?
तिने पान नंबर पंच्याण्णव उघडले. दुपारी खुणेसाठी दुमडलेला पानाचा कोपरा सरळ केला आणि ती कथेत गुंतून गेली. किती वेळ झाला याचे तिला भानच नव्हते. एकेक कथा एकसे-एक होत्या. त्यातील गूढ रहस्य समजले की लगेच पुढच्या कथेकडे तिचे डोळे वळत होते. दिवसभर कामे करून आलेला कंटाळा दूर झाला होता.
ती अशीच वाचनात गुंग झाली असताना एकदा तिने सभोवताली नजर फिरवली. सगळीकडे सामसूम झाली होती. परसात आडाच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावल्या जमिनीवर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. तिच्या अंगावरही काही सावल्या पडल्या होत्या. 'इथे आमचे राज्य आहे,' असे त्या सावल्या जणू तिला म्हणत होत्या असे तिला वाटले. हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे असे म्हणत तिने स्वतःशीच हसत पुन्हा पुस्तकात नजर वळवली.
तिने आता 'कवठी चाफा' ही कथा वाचायला सुरुवात केली होती. त्यात
मीराला अचानक दिसणारी स्त्री, आणि त्याबाबत पुढील कथा वाचण्यात ती गढून गेली. वर्तमानातील जगाशी जणू तिचा संपर्क तुटला होता, इतकी ती त्या कथेशी एकरूप झाली होती.
मीराला अचानक दिसणारी स्त्री, आणि त्याबाबत पुढील कथा वाचण्यात ती गढून गेली. वर्तमानातील जगाशी जणू तिचा संपर्क तुटला होता, इतकी ती त्या कथेशी एकरूप झाली होती.
समोरच्या जांभळाच्या झाडावर वेगाने सळसळ झाली. एकाग्र होऊन वाचताना तिने एक क्षण झाडाकडे नजर टाकली. परत पुस्तकाकडे वळत तिने वाचन सुरू केले. झाडावर काय चाललंय यापेक्षा मीराच्या खोलीत काय चाललंय हे जाणून घेण्याची तिला उत्कंठा लागली होती.
अचानक शेजारी कुणीतरी बसले आहे अशी तिला जाणीव झाली. तरीही तिने पुस्तकातील आपली नजर हटवली नाही. आपल्याला इथे बसलेले पाहून मनीमाऊ शेजारी येऊन बसली असेल असे तिला वाटले. तिने वाचनातील नजर न उचलता डावा हात शेजारी नेला, जेणेकरून मनीमाऊला जवळ ओढावे, अन् ती दचकली. तिच्या हाताला बर्फासारखा थंडगार स्पर्श झाला होता. जणू बर्फाची लादी तिच्या शेजारी ठेवली असावी.
आता मात्र तिने पुस्तकातील आपली नजर उचलून शेजारी बघितले, तर शेजारी ती अगदी तिच्याजवळ बसली होती व रोखून तिच्याकडेच पहात होती. भीतीची एक सणक तिच्या मस्तकात गेली. हातपाय बधिर झाले. तिथून उठावे अशी इच्छा असूनही शरीर साथ देईना. ती रोखून पहातच होती. 'राम, राम, राम,' असा जप करावा हे अचानक तिच्या लक्षात आले. म्हणून तिने "राम, राम, राम," म्हणायला सुरुवात केली. तिचे ते उच्चारण ऐकून शेजारी बसलेली ती कुत्सितपणे हसली.
"राम येणार आहे का इथे?" ती म्हणाली. मनूने नजर उचलून तिच्याकडे पाहिले.
या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे तिला सुचले नाही. आजवर कधी असा प्रसंग आलाच नव्हता. जग सांगते म्हणून मनूने रामनाम घेतले होते. तिचा प्रश्न ऐकून रामनाम तिच्या घशातच अडकले.
"आमच्या भूतयोनीचे पण काही नियम असतात. ते नियम आम्ही पाळले, तर राम आम्हाला काही करू शकत नाही. आम्ही जर मनुष्यवर्गाला त्रास दिला, तर राम आम्हाला शासन करतो. नाही तर तो फिरकत पण नाही." हे तिचे बोलणे ऐकून मनू अधिकच घाबरली.
ती घाबरून एकदा पुस्तकाकडे आणि एकदा तिच्याकडे पाहू लागली. ही खरी आहे, की वाचत असलेल्या पुस्तकामुळे आपल्याला भास होतोय हेच तिला कळेना.
मनूच्या मनातील प्रश्न तिला समजला असावा, कारण ती म्हणाली,
"मी इथे आलेय हा भ्रम नाही. आत्ता तू जी मीरेची कथा वाचत होतीस, ती तुझ्यासोबत मी पण तुझ्या शेजारी बसून वाचली. तुला समजले देखील नाही, इतकी तू त्या कथेत तल्लीन झाली होतीस."
"क..क..कोण...आहेस...तू? इथे का...आली...आहेस?" मनूने घाबरुन अडखळत तिला विचारले.
"तुला रहस्यमय कथा वाचायला आवडतात ना! आता मी माझे रहस्य तुला सांगते. ते ऐकून आवडले का मला सांग." मनूची तर दातखीळ बसायचीच बाकी होती. गूढ कथा वाचायला आवडणे वेगळे, पण असे काही प्रत्यक्षात पहावं लागेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. आता तिच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता.
मनूने तेवढ्यात हळूच तिच्या पायांकडे पाहिले. तिचे पाय आपल्या पायांसारखेच सरळ होते हे पाहून मनूच्या जीवात जीव आला.
'म्हणजे आपण समजतोय तशी ही भूत नाही, माणूसच आहे.' हा तिच्या मनात आलेला विचार तिला कसा समजला, कोण जाणे? ती म्हणाली,
'म्हणजे आपण समजतोय तशी ही भूत नाही, माणूसच आहे.' हा तिच्या मनात आलेला विचार तिला कसा समजला, कोण जाणे? ती म्हणाली,
"हा तुम्हां माणसांनी केलेला अपप्रचार आहे की, भूतांचे पाय उलटे असतात. असे काहीही नसते." हे ऐकून मात्र मनूला कापरे भरले. आता आपली हिच्या तावडीतून सुटका होणे अवघड आहे असे तिला वाटले.
ती पुढे म्हणाली,
"तुझे लग्न होऊन इतकी वर्षे झाली, पण आजवर तुला मी कधी दिसले होते का? मी या जांभळाच्या झाडावरच राहते." यावर मनूने नकारार्थी मान हलवली.
"आज तुला मी दिसले याचे कारण तू वाचनात इतकी तल्लीन झाली होतीस, की तू त्या कथेतील वातावरणाशी एकरूप झाली होतीस. तुझ्या मनाची आणि कथेतील नायिकेच्या मनातील विचारांची पातळी एका समेवर आली होती. त्याक्षणी तुझ्या लक्षात आले नाही, पण तुझ्या सूक्ष्म शरीराने गूढ आत्म्यांच्या जगात प्रवेश केला होता. मी इथेच असल्याने तुझ्या व माझ्या आत्म्याची तार जुळली. त्यामुळे आज मी तुला दिसतेय. नाही तर गेली अनेक वर्षे मी तुला पहात होते. तू आडावर आलीस की, अंगणात झाडायला आलीस की, तिन्हीसांजेला आडाजवळ दिवा लावायला आलीस की, मला दिसायचीस."
ती जे काही बोलत होती, ते मनू ऐकून घेत होती. काही बोलण्यासाठी तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
"मघापासून इतक्या कथा वाचल्यास, आता माझी कथा पण ऐक. ही कुठल्याही पुस्तकात लिहिलेली नाही, तर खरीखुरी घडलेली कथा आहे. या पीढीपासून आधी पाचव्या पीढीतील मी सावित्रीबाई. तुझ्या सासऱ्याच्या आजोबांची मी पहिली बायको, दिसायला सुंदर, देखणी म्हणून मला माझ्या सासऱ्यांनी आपल्या मुलासाठी सून म्हणून करून आणलं. घरात सगळं चांगलं होतं, पण मीच कमनशिबी. मला मूलबाळ झालंच नाही. नाईलाजाने यांनी दुसरे लग्न केले. घराण्याला वारस तर हवा ना!
जानकी, माझी सवत दिसायला चारचौघींसारखी होती. मी बडीबाई, म्हणून संसारावर माझाच वचक होता. त्यात माझ्या रुपात अडकून पडल्याने माझे यजमान पण मी म्हणेन तेच करायचे. काही दिवसांनी जानकीला दिवस गेले. मी तिची खूप काळजी घेतली. तिला पहिला मुलगा झाला. तो फक्त दूध पिण्यापुरताच तिच्याजवळ असे. मला आई म्हणायची मी त्याला सवय लावली होती.
तो जसजसा मोठा होत गेला, तसतसा तो माझ्याभोवती वावरू लागला. जानकीबाईच्या नशीबी फक्त घरात राबणे उरले. मुलगा, अन् यजमान तर माझ्या शब्दाबाहेर नव्हते. तिला खूप वाटायचे की, मुलाला जवळ घ्यावे, पण मी कधीच तिला मुलाजवळ जाऊ दिले नाही. तिला खूप वैफल्य आले. तिने इथे एक पिंपळाचे झाड होते, त्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला.
नवरा आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आपला स्वतःचा मुलगा असूनही त्याला मायेनं जवळ घेता येत नाही, याच वैफल्यातून तिने आत्महत्या केली होती. आम्हाला कुणालाच त्याचे फारसे वाईट वाटले नाही. पुढे जेव्हा माझ्या मृत्यूची वेळ जवळ आली, तेव्हा मला ती दिसायला लागली. या घराच्या अवतीभवती ती फिरताना मला दिसायची.
अशातच एक दिवस माझा मृत्यू झाला, त्यादिवशी ती मला घेऊन जाण्यासाठी आली होती. ही आपल्याभोवती का फिरतेय ते मला कळत नव्हते. तिला जो त्रास मी दिला होता, त्याची परतफेड मला करावी लागणार होती. मी तिच्या जगात गेले, आणि त्याक्षणी तिची भूतयोनीतून सुटका झाली."
ही कथा मनू त्या स्थितीतही अगदी कान देऊन ऐकत होती. हे पाहून ती पुढे म्हणाली,
" तेव्हापासून माझी रवानगी या जांभळाच्या झाडावर झाली आहे. ती त्या योनीतून मुक्त झाली, पण मी मात्र यात अडकले आहे."
हे ऐकून पहिल्यांदाच मनूच्या तोंडातून शब्द बाहेर पडले,
"मग तुमची या योनीतून सुटका कशी होईल?" ते ऐकून ती म्हणाली,
" जानकीबाईसारखीच...!"
"म्हणजे?" न समजून मनूने विचारले.
"समजले नाही तुला?"
याचा अर्थ ध्यानात यायला मनूला दहा सेकंद वेळ लागला, पण जेव्हा याचा अर्थ तिला समजला तेव्हा ती पळतच दाराकडे गेली. दार उघडून तिने घरात पाय ठेवला व दार बंद करण्यासाठी ती वळली तेव्हा तिने समोर पाहिले. सावित्रीबाई तिच्याकडे पाहून छद्मी हसत होती. 'कशी मज्जा केली एका मुलीची!' असे भाव त्या नजरेत होते.
'म्हणजे तिने सांगितली ती कथा खरी की खोटी?' असा विचार करत मनूने रात्र जागून काढली. सकाळी तिने घराण्याची वंशावळ असलेली वही नवऱ्याला काढायला लावली. त्यात वाचत मागे गेल्यावर ती सावित्रीबाई व जानकीबाई या नावांपाशी अडली. ती नावे तिला सापडली.
' म्हणजे ती कथा खरी होती तर...याचा अर्थ पुढचा नंबर आपला आहे? हा प्रश्न तिला पडला, पण आपण तर या दोघींच्या साखळीत कुठेच नाही, मग आपण का? याचा अर्थ सावित्रीबाईने खरंच आपली गंमत केली होती तर...' असे तिला वाटले. मृत्यूसमयी जर सावित्रीबाई दिसू लागली तर आपली रवानगी या जांभळाच्या झाडावर होणार, अन् ती दिसली नाही तर आपण मुक्त होणार...तेव्हाच समजेल आपले काय होणार आहे ते!
आता सावित्रीबाई परत कधी दिसतेय का? हे पाहण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तिला ती पुन्हा दिसली नाही. अधूनमधून जांभळाची पाने खूप सळसळ करीत. ती तिथेच आहे याची मनूला खात्री होती. मनात दाटलेल्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल याची मनू वाट पहात होती. बहुतेक मृत्यूसमयीच याचे उत्तर मिळेल अशी तिने मनाची समजूत घातली.
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
नमस्कार, पहिल्यांदाच गूढकथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कथा आवडल्यास लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा.सदर कथा ही काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे.