#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून जर त्यात नाव, स्थळ, प्रसंग , जीवंत अथवा मृत्यू व्यक्तींशी किंवा गोष्टींशी साम्य आढल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा.
विषय:- उपकार
शीर्षक:- बांधील भाग -१
"बाळा, तुझी इच्छा आहे तर आम्ही मदत करतो." मागून मामा बोलत आले.
नीरव हा अठरा वर्ष पूर्ण झालेला मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तुटपुंज्या पैशावर त्यांचे दिवस जात होते. पुढे शिक्षण बंद म्हणून ह्यावर चर्चा होत असताना नीरवचा मामा बबन आला होता.
"मी तुला मदत करतो पण पुढे कधी मला तुझी गरज लागली तर तू तेव्हा माझे ऐकायचे आहेस." मामांनी सांगितले.
स्वाभिमानी असलेले नीरवच्या वडिलांना मात्र हे काही पटत नव्हते. कारण उपकार जेव्हा कोणी माणूस करतो तेव्हा खूप वेळा बोलून न दाखवणारा मानव ह्या पृथ्वीतळावर सापडणे दुर्मिळच!
"मामा मी तयार आहे." नीरवची शिकण्याची इच्छा त्याच्या डोळ्यांत दिसत होती. त्यामुळे त्याने पुढचा विचार न करता लगोलग होकार दिला.
"अरे पण.." त्याचे बाबा जरा साशंक होते.
"अहो असू द्या. भाऊ आहे तो माझा. काय जीव मागणार नाही तो त्याबदल्यात." नीरवची आई कांता म्हणाली.
त्यानंतर सर्वांनी होकार दिल्याने नीरवने पुढे शिक्षण घेण्यास मामाच्या मदतीने सुरूवात केली.
नीरवचे पुढील शिक्षण जोरात चालू होते. जेव्हा त्याला सुट्टी असायची तेव्हा तो मामाच्या शेतात जावून काम करायचा.
वर्ष सरत गेली आणि नीरवला चांगली नोकरी लागली. हे सर्व आपल्या मामामुळे झाले त्यामुळे पहिल्या पगाराचा पेढा त्याने
त्यांनाच पहिला दिला.
त्यांनाच पहिला दिला.
"पाहीलं का माझ्या भावाने मदत केली म्हणूनच आपला नीरव शिकला आणि आज नोकरी पण लागली." घरी आलेल्या आपल्या मुलाने पेढा दिला तेव्हा कांता म्हणाली.
"माझ्या पोराने पण काय फुकट नाही घेतले. त्याची सर्व कामे पण केलेत आणि ते पण स्वतः चा अभ्यास सांभाळून." त्यांना ते पटलेच नव्हते म्हणून त्याचे बाबा म्हणत होते.
"कशाला आई आणि बाबा तुम्ही भांडत आहात? तुमच्या सगळ्यांमुळेच मी हे सर्व करू शकलो." त्याने वाद होऊ नये म्हणून सर्वांना एकसमान श्रेय दिले.
आईने मस्त आपल्या मुलाला आवडतो तसा जेवणाचा बेत बनवला होता आणि सोबतच भावालाही जेवण्यासाठी बोलावले होते.
मामा आलेला पाहून नीरव खूप खुश झाला आणि त्याच्यासोबत गप्पा मारत बसला.
सर्व जेवण झाले आणि मामाने त्याला त्याच्या आई बाबांना बोलवायला सांगितले.
"काय रे भाऊ, तू का बोलावले? काय हवयं तुला?" कमरेला खोचलेला पदर काढत ती सावरून उभी राहत म्हणाली.
"बसा, सांगतो मी." त्यांनी त्यांना त्यांच्यासमोर असलेल्या चटईवर बसायला सांगितले.
थोडा वेळ तिथे शांतता पसरली.
"आता नीरवला चांगली नोकरी लागली आहे. तुमचे पण वय होत आले. तर तुम्हाला सून आणि ह्याला बायको म्हणून मी एक मुलगी पसंत केली आहे. तर तुमचा त्यावर काय विचार आहे?" त्यांनी मुद्द्याला हात घालत विचारले.
"म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला?" नीरवचे वडील म्हणाले.
"मी एक मुलगी आपल्या नीरवसाठी पसंत केली आहे. तर तुम्ही त्याला होकार द्याल ह्याची मला खात्री आहे." मामाने आपल्या मनातील विचार त्यांना कोणताही विचार न करता समोर ठेवला.
"कोण मुलगी आहे? आधी पाहू तर द्या. मग ठरवू की." त्याचे बाबा म्हणाले.
"का माझ्यावर विश्वास नाहीये का?" मामाला नकार पचतच नव्हता.
"एक काम करू आपण त्यांना भेटू मग पुढचे ठरवू." नीरवची आई म्हणाली.
"बरं, तसेच करू पण नीरव तू विसरू नकोस मी तुला शिक्षणासाठी मदत केली आहे. तुझे चांगले व्हावे हाच मी विचार करणार त्यामुळे तू माझे ऐकशील असे बोलला होतास हे आठवतेय ना?" असे म्हणून ते तिथून कोणाचे काहीच न ऐकता निघून गेले.
पाच दहा मिनिटे तिथे पुन्हा शांतता होती.
"मी बोललो होतो ना? असे कोणीही आपल्याला पैसे देणार नाहीं. काहींना काही हेतू असणारच त्यामुळेच मी तेव्हा पैसे घेण्यास नकार देत होतो. आता पाहा काय झाले ते?" डोक्याला हात लावून ते तिथेच बसले.
"तुम्ही शांत व्हा आधी." त्याची आई म्हणाली.
ह्या सगळ्यात कोणी नीरवला त्याला लग्न करायचे आहे का नाही हे विचारलेच नव्हते. नुकतीच नोकरी लागून एक महिना झाला होता. थोडे पैसे गाठीशी असणे जरुरीचे होते. यामुळे इतक्यात लग्न न करण्याचे त्याने ठरवले होते पण मामाने आता लग्नाचा विषय काढून त्याला धर्मसंकटात टाकले होते.
"मामा, मी मुलगी पाहायला तयार आहे. तुम्ही त्यांना विचारून कधी पाहायला जायचे ते विचारा." त्याने फोन करून तसे दुसऱ्यादिवशी सांगितले.
नीरवच्या बाबांना हे पटत नव्हते पण बायको अन् मुलापुढे त्यांनी हात टेकले.
मामाने मुलीच्या घरी कळवून एक दिवस पाहण्यासाठी ठरवला आणि नीरवच्या घरीही त्यांना त्याबद्दल माहिती दिली.
काय होईल पुढे?
नीरव हो म्हणेल का ह्या लग्नाला?
नीरव हो म्हणेल का ह्या लग्नाला?
क्रमशः
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा