Login

बांधील भाग-२

उपकाराची परतफेड करताना झालेल्या चुकीची कहाणी!
#जलदलेखनस्पर्धा

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून जर त्यात नाव, स्थळ, प्रसंग, जीवंत अथवा मृत्यू व्यक्तींशी किंवा गोष्टींमध्ये साम्य आढल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा.

विषय:- उपकार

शीर्षक:- बांधील भाग-२

नीरव तयार होऊन मुलगी पाहण्यासाठी आपल्या आई आणि बाबांसोबत मुलीच्या घरी जाण्यास निघाला.

"मला काही हे पटत नाही." नीरवचे बाबा बाबुराव म्हणाले.

"तुम्ही तर नकार घंटा आतापासूनच वाजवा." कांता रागात म्हणाली.

तिथे गेल्यावर त्यांना समजले की मुलगी ही मोठ्या घराण्यातील आहे. मुलीच्या घरच्यांशी त्यांनी ओळख करून दिली. तिथे स्वत:ची ओळख कमी आपल्या श्रीमंतीचे गोडवे जास्त गायले जात होते.

मुलगी आली ते मुळातच साध्या कपड्यांवर तिने एक नजर सर्वांना पाहून तोंड बारीक करून घेतले.

तिला मोजके प्रश्न विचारले तेव्हा ती तेवढेच उत्तर देत होती. समोर मोठी माणसे बसलेली असूनही तिचे लक्ष तिथे कमी मोबाईलमध्ये जास्त होते. हीच पहिली गोष्ट बाबुराव ह्यांना खटकली.

"मला सांगा. तुमचे घराणे एवढे चांगले असून तुम्ही आमच्या सारख्या कुटुंबाशी सोयरिक करत आहात म्हणजे आम्ही तुमच्या एवढे श्रीमंत नाही." मध्येच बाबुराव म्हणाले.

"अम्म, ते असे झाले की तुमच्या मुलाबद्दल आम्ही ऐकून आहोत. आम्हाला तसाच मुलगा ह्या घरचा जावई म्हणून हवा होता. काय आहे मुलगा चांगले असला म्हणजे त्यात सर्व आलेच की." मुलीचे वडील हसतच म्हणाले.

"हो बरोबर. बाकी तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका. आमचे दाजी काय जास्त शिकलेले नाहीत म्हणून त्यांना काही समजणार नाही." मामाने असे बोलून बाबुरावांवर एक कटाक्ष टाकला.

नीरवला मामाने आपल्या बाबांना असे बोललेले आवडले नव्हते पण पुन्हा त्याने आपल्याला मदत केली आहे हे आठवून तो गप्प बसला.

नीरव आणि क्षितिजाला दोघांनाही बोलण्यासाठी एकांत दिला.

"तुम्ही हे लग्न करायला स्वतःहून तयार आहात ना? नाही म्हणजे कोणती जबरदस्ती नाहीये ना?" त्याने तिला विचारले.

"नाही." ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली.

"अजून काही तुला विचारायचे आहे का?" क्षितिजाने विचारले.

त्याने नाही म्हणताच ती कोणाला तरी फोन करून बाजूने निघून गेली.

नंतर तिघेही आपल्या घरी निघून आले.

"मला माणसे चांगली वाटली. किती मोठी माणसे पण सर्व कसं नीट नेटके होते. होकार द्यायला काही हरकत नाही." कांता लगेच आपले मत नोंदवत म्हणाली.

"तुला काय वाटते नीरव? तुला कसे वाटले तिचे घर आणि ती मुलगी?".  बाबांनी कांताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यालाच थेट विचारले.

"मला ठीक वाटले. मी तिला जबरदस्ती लग्न करत नाही ना असे विचारले तर ती नाही म्हणाली." तो म्हणाला.

"मग तुझा होकार आहे ना?" आईने कुतुहलाने त्याचे उत्तर काय असेल म्हणून विचारले.

"हो. ती दिसायला पण चांगली आहे आणि मामाने निवडली आहे तर सर्व पाहूनच घेतले असेल." मामावरचा विश्वास त्याला नकार द्यायला अडवत होता.

एका महिन्यानंतरचा लगेच मुहूर्त निघाला. लग्न मुलीकडचे करणार होते. कारण त्यांच्या ऐपतीप्रमाणे करायला नीरवच्या घरच्यांना जमले नसते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खरं तर  अर्धा खर्च आपण करावा असे मत बाबुरावांचे होते पण कोणी त्यांचे ऐकत नव्हते.

लग्नाचा दिवस उजाडला. लग्न विधी होऊन आता मुलीची पाठवणी करण्यात येत होती. क्षितिजा रडत होती.

"बाळा, रडू नको. आम्ही तुला आधुनमधून भेटायला येवू. चल आता तू तुझ्या सासरी जा. काळजी घ्या आजच्या मुलीची." आधी थोडा हळवा स्वर आणि नंतर नीरवच्या घरच्यांना आवाजात जरब आणत तिचे वडील म्हणाले.

एक कार तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला सोडण्यासाठी पाठवली होती.

काही तासांच्या प्रवासाने नीरवच्या घरी सर्व पोहोचले.

"थांबा आतमध्ये येवू नका." असे म्हणत काही मुलींनी त्यांना अडवले आणि उखाणा घ्यायला सांगितला.

"तुम्ही सर्व जरा शांत बसा हा. आधीच मला कंटाळा आलाय त्यात काय हे तुमचे चालू आहे." क्षितीजा रागाने त्या मुलींना म्हणाली.

परिस्थिती लक्षात घेता तिथे सर्व जमले होते त्यांना ती प्रवासाने थकली असेल असे त्याच्या आईने सांगितले आणि वेळ न दवडता लगेच त्यांनी गृहप्रवेश करून घेतला.

आतमध्ये गेल्यावर तिच्या सोबत आलेल्या पाठराखीण होती तिला ती घेवून एका खोलीत जावून त्याचा दरवाजा बंद केला.

"जरा नीट वागं की, काय तुझा हा उद्धटपणा! म्हणूनच कोणी तुझी पाठराखीण बनून इथे यायला तयार होत नव्हते." आत्याला पण तिचे वागणे मुळीच पटले नव्हते.

"असू दे. मी कशी आहे माहीत आहे ना तुला." असे म्हणून तिने पलंगावर झोपून घेतले.

...

"नीरवच्या बायकोचे काय हे वागणे ?" नीरवची आत्या कपाळावर आठ्या आणत विचारत होती.

"मोठ्या घरची आहे म्हणे." भावकीतील एक बाई हसतच म्हणाली.

नीरवलाही थोडे हे खटकले होते पण नवीन आहे म्हणून त्याने पुन्हा त्याकडे लक्ष दिले नाही.

रात्री जेवून सर्व झोपले पण नीरव मात्र एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता आपण लग्न करून बरोबर केले की नाही ह्या विचारत तो होता. बाजूला त्याचे चुलत आणि मावस भावंडे जागा मिळेल तसे झोपले होते.

क्षितिजाचे वागणे बदलेल का?

पुढे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.

क्रमशः

© विद्या कुंभार

कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all