बंधनातून मुक्तता (भाग - २)

मुक्ता एक मध्यम वर्गीय घरातली शिक्षणाचं महत्त्व जाणणारी मुलगी. अचानक ओढवलेल्या परिस्थितीमुळे केलेल्या लग्नानंतर तिच्या आयुष्यावर झालेले परिणाम जाणून घेण्यासाठी वाचा; बंधनातून मुक्तता
मुक्ता अन् रणविजय मुक्ताच्या माहेरी येतात.दोघे हॉलमध्ये गप्पा मारत असतात,मुक्ता किचनमध्ये आईला मदत करत असते.केस वर बांधताना तिच्या मानेवरच्या खुणा एकता ताईंना दिसतात.

"नवरा बायकोचं खाजगी नात असं चार चौघात दाखवू नये"एकता ताई तिचे बांधलेले केस सोडतात

"त्यांनी थोडासुद्धा माझ्या मनाचा विचार केला नाही.सासूबाई तर आता वेगळ्याच वागायला लागल्यात."मुक्ता रूद्रावती बाईंचं बदलेल वागणं एकता ताईंना सांगते

"मुक्ते,लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आल्यावर मुली सासरच्यांच किती कौतुक करतात आणि तुझं मात्र भलतचं!आल्यापासून सासरच्यांच्या तक्रारी सांगतेयस.बास झालं शिक्षण.संसाराकडे लक्ष दे."एकता ताई तिला गप्प बसवतात

मुक्ताच्या लग्नाला सहा महिने होतात.तिचा मानसिक अन् शारिरीक छळ सुरूच असतो.मुक्ता मात्र सगळं निमूटपणे सहन करत असते.

कॉलेजला निघालेल्या राजन शर्टच बटण तुटल्यामुळे आईला हाका मारतो,मुक्ता बाहेर येऊन त्या देवळात गेल्याचं सांगते.त्याला उशीर होत असल्यामुळे मुक्ता स्वतः त्याच्या शर्टच बटण लावते.बटण लावल्यावर दोरा तोडण्यासाठी ती त्याच्याजवळ जाते

तेवढ्यात,बाहेरून आलेले रणविजय आणि रूद्रावती ताई भलताच कांगावा करतात.रूद्रावती ताईंना पाहून मुक्ता पटकन राजनपासून वेगळी होते.

"बाई,बाई हल्ली घरात काय काय पाहायला मिळतंय.रणविजय पाहिलंस,मुक्ता सख्ख्या दिरासोबत लाज शरम सोडून कसे गुण उधळतेय.आईवडिलांचेच संस्कार म्हंटल्यावर पोरीला दोष कसा देणार!"रूद्रावती ताई

"बास!खूप बोललात तुम्ही.आज त्यांच्या संस्कारांमुळेच मी शांत आहे, नाहीतर तुमची खरी रूप जगाला दाखवली असती."मुक्ता पहिल्यांदा चढ्या आवाजात आणि रागात बोलते

मुक्ताच रौद्र रूप पाहून रूद्रावती ताई क्षणभर घाबरतात

"रणविजय,अरे बघतोस काय!पुरूषासारखा पुरूष तू,तुझी बायको मला वाट्टेल तसं बोलते.तू फक्त ऐकतोयस"रूद्रावती ताई रणविजयला भडकवतात

दुसऱ्याक्षणी मुक्ताच्या गालावर रणविजयच्या हाताची पाच बोटं उमटतात.

"माझ्या आईला उलट बोलतेस."रणविजय तिला ओढतच बेडरूममध्ये नेतो.

काहीवेळाने,त्यांच्या रूममधून पट्ट्याने मारण्याचा आणि मुक्ताच्या व्हिवळण्याचा आवाज येऊ लागतो

एकता ताई मुक्ताला फोन करतात

"कशी आहेस मुक्ता?"एकता ताई

"नवऱ्याने हात उगारलेली मुलगी कशी असणार आई! मी आपल्या घरी येऊ का कायमची?मला नाही राहायचय ईथे.कधीतरी वाटतं,रोज मरणयातना भोगण्यापेक्षा एकदाचं जीव दिलेला बरा"मुक्ता रागात म्हणते

"मग दे जीव!समाजाची रीतच आहे,लेकीच कन्यादान केलं की,दिली तिथे मेली"एकता ताई म्हणतात

मुक्ता सुन्न होते.आपली जन्मदातीच असं बोलेल तिला वाटलं नव्हतं.एकता ताईंचे शब्द तिच्या कानात घुमत असतात

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर