बंधनातून मुक्तता (भाग - ३ अंतिम)

मुक्ता एक मध्यम वर्गीय घरातली शिक्षणाचं महत्त्व जाणणारी मुलगी. अचानक ओढवलेल्या परिस्थितीमुळे केलेल्या लग्नानंतर तिच्या आयुष्यावर झालेले परिणाम जाणून घेण्यासाठी वाचा; बंधनातून मुक्तता
"असे का बसलायत?"मार्केटला जायला निघालेल्या एकता ताई म्हणतात

"आज खूप अस्वस्थ वाटतंय.सकाळपासूनच मुक्ताची खूप आठवण येतेय.मी तिला फोन लावतो.तिच्याशी बोलल्यावर मला बर वाटेल" एकनाथ राव मोबाईल हातात घेतं तिला फोन लावतात, पण तिचा फोन लागत नसतो

तश्या एकता ताई मार्केटला निघून जातात

काहीवेळाने, एकनाथ रावांच्या नावाचं पत्र येतं. त्यांची सही घेऊन पोस्टमन निघून जातो.

"मोबाईल असूनसुद्धा मुक्ताने पत्र का लिहिलं असेल मला?" एकनाथ राव स्वतःशीच म्हणत पत्र उघडून वाचू लागतात

प्रिय बाबा,
           मोबाईल असूनसुद्धा मी पत्र पाठवल ह्याचं आश्चर्य वाटल ना. पण कधी कधी जे फोनवर बोलू शकत नाही, ते पत्रात व्यक्त होता येतं. लहानपणापासूनच काही सांगण्याआधी माझ्या मनातलं सगळं तुम्ही ओळखायचात पण माझ्या लग्नानंतर मात्र सगळचं बदललं. लग्नानंतर माझ्या आयुष्यात घडणाऱ्या कितीतरी गोष्टी मी तुमच्यापासून लपवल्यात. कारण; तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुमची मुलगी तिच्या सासरी सुखात आहे हा समज तुमच्या मनात कायम राहावा.बाबा मला माफ करा, उच्चशिक्षित होण्याचं तुमचं स्वप्न मी पूर्ण नाही करू शकले.माझ्या शिक्षणावर बंदी घातली.रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला.हे सगळ मी वेळोवेळी आईला सांगितलं पण तिने तुमच्या तब्येतीच कारण पुढे करून मला गप्प केलं पण आता मला सगळं असह्य झालंय.मला माफ करा.तुम्हाला पूर्वकल्पना न देता मी एक निर्णय घेतलाय.सगळ्यापासून दूर जाण्याचा.जिथे मी मुक्तपणे जगेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या!

तुमचीच मुक्ता.

पत्र वाचल्यावर एकनाथ रावांच्या डोळ्यांतून पच्छातापाच्या अश्रुधारा वाहू लागतात.ते तसेच पत्र खिशात ठेवत मुक्ताच्या घरी जातात

****

समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसतो.निपचित पडलेल्या मुक्ताला सौभाग्याचे अलंकार घालून नटवलेल असतं.

"काय सांगू हो.हल्ली खूप वेड्यासारखी करायची म्हणून डॉक्टरांनी तिला झोपेच्या गोळ्या दिलेल्या,पण ही घेतं नसल्याने रणविजय जबरदस्ती करू लागला.त्या रागाच्या भरात तिने गोळ्यांची अख्खी बाटली तोंडात ओतली" रूद्रावती ताई तोंडावर पदर घेतं खोटं रडत बोलतात

काहीवेळाने,अंत्यसंस्कारासाठी मुक्ताला स्मशानात नेण्यात येतं.समोर मुक्ताची चिता जळत असते.

"सगळ्यापासून दूर जाण्याचा.जिथे मी मुक्तपणे जगेन."एकनाथ राव जळणाऱ्या चितेकडे बघत पत्राची ओळ वाचतात आणि पत्र छातीशी कवटाळत खाली कोसळतात

समाप्त

✍️नम्रता जांभवडेकर