बंधू येईल माहेरी न्यायला.. भाग २

भावा बहिणीच्या नात्याची गोड गुंफण..
बंधू येईल माहेरी न्यायला.. भाग २
©अनुप्रिया


मुग्धा माहेरच्या आठवणींनी हळवी झाली. डोळ्यातली आसवं भळभळा वाहू लागली. बालपणीच्या आठवणी पुन्हा समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. हळूहळू मुलं मोठी होत होती; पण तरीही गणपती बाप्पाची ओढ, ती श्रद्धा काही कमी झाली नव्हती. दरवर्षी तितक्याच उत्साहात बाप्पाचं स्वागत व्हायचं. अनंत चतुर्दशीपर्यंत अगदी जल्लोष असायचा. पण बाप्पाला निरोप देताना मात्र मुग्धा अगदी धाय मोकलून रडायची. समजवता समजवता मुग्धाच्या आईच्या नाकी नऊ यायचं. एकदा असंच सर्वजण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत होते पण मुग्धा मात्र बाप्पाच्या मूर्तीला विळखा घालून बसली होती. बाप्पाला जाऊ देणार नाही म्हणून रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं. आई बिचारी केविलवाणा प्रयत्न करत म्हणाली,

“अगं बाळा, बाप्पा आता त्याच्या आईकडे निघालाय. पुन्हा तो पुढच्या वर्षी आपल्या घरी नक्की येणार..”

“मग तो त्याच्या आईसोबतच का येत नाही? एकटा कशाला आला? ते दोघेही आले तर परत जाण्याचा प्रश्नच उरणार नाही नं.. नाही आई, मी बाप्पाला जाऊ देणार नाही.”

बाप्पाच्या मूर्तीला मिठी मारत मुग्धा रडत रडत म्हणाली. तिच्या बाबा तिला समजावून दमले; पण ती काही केल्या कोणाचंच ऐकत नव्हती. शेवटी आईबाबांनी मुग्धाला समजवण्याची जबाबदारी तिच्या लाडक्या भावावर म्हणजे वरदवर सोपवली. आईबाबांना चांगलंच माहित होतं, तिला समजवण्याचं काम त्याच्याशिवाय कोणाला जमणारच नाही. दादा म्हणजे तिचा जीव की प्राण! फक्त त्याचंच बोलणंच मुग्धाला पटायचं. वरदने तिला समजावून सांगायला सुरुवात केली,

“बाप्पाला त्याच्या आईकडे जावं लागतं मनू.. असा हट्ट करू नये. पुढच्या वर्षी परत येणार आहे तो.. आपण त्याची वाट पहायची आणि त्याला बोलवत राहायचं. तो नक्की येईल बघ. पण आता बाप्पाला आपला निरोप घ्यावा लागेल नं मनू? चला नमस्कार करा आणि बाप्पाला निरोप देऊया.”

वरदच्या बोलण्याने मुग्धा रडायची थांबली. बाप्पाला मारलेली मिठी सैल करत त्याच्यापासून दूर होत म्हणाली,

“ठीकेय दादा.. तू म्हणालास म्हणून जाऊ देतेय बाप्पाला.. पण तो पुढच्या वर्षी येईल नं?”

वरद दादाने होकारार्थी मान डोलावली तशी तिची कळी खुलली.

“हो नक्की येईल.. चला मग मोठ्याने बोला. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. ”

वरदच्या मागोमाग मुग्धानेही जोरात जयघोष केला. अखेर भरल्या डोळ्यांनी सर्वांनी बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी हे असंच घडायचं. मुग्धा बाप्पाला निरोप देऊ द्यायची नाही. बाप्पा निघाला की, भोकाड पसरून सारं घर डोक्यावर घ्यायची. मग नेहमीप्रमाणे वरद आपली जबाबदारी पार पाडायचा.

हळूहळू दिवस पुढे सरत होते. मुलं मोठी होत होती. बालपण सरून आता त्यांनी तारुण्यात प्रवेश केला. वरद इंजिनियर झाला. आयटी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला लागला आणि मुग्धा वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. मुलांची प्रगती पाहून मुग्धाच्या आईबाबांना त्यांच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. मुलांनीही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि आपलं शिक्षण पूर्ण करत आपल्या करियरवर लक्ष केंद्रित केलं होतं. वरद नोकरीला लागला आणि आणि कुटुंबाच्या जबाबदारीचा थोडा भार त्याने उचलला. बाबांच्या डोक्यावरचं जबाबदारीचं, कर्तव्याचं ओझं थोडं हलकं करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. अजून मुग्धाचं शिक्षण, लग्न बरीच कर्तव्ये पार पाडायची होती.

मुलं मोठी झाली खरी; पण बाप्पाच्या आगमनाची आतुरता आणि त्यांचा तो उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. उलट दरवर्षी तो आनंद, उत्साह द्विगुणित होत होता. वयाने वाढले असले तरी मनाने मात्र मुलं कायम लहानच राहिली. अल्लड मुग्धा अधून मधून डोकवत राहायचीच. मुळातच देखणी असलेली मुग्धा तारुण्याच्या तेजामुळे अजूनच सुंदर दिसू लागली. कॉलेजचं शेवटचं वर्ष पूर्ण होण्याआधीच तिला चांगली स्थळं सांगून येऊ लागली. आणि एक दिवस तिच्यासाठी तिच्या बाबांच्या मित्राच्या मुलाचं म्हणजे शेखर देसाई याचं स्थळ सांगून आलं. गावी त्यांची थोडी शेतीवाडी, मुंबईसारख्या शहरात स्वतःचा टू बीएचके फ्लॅट.. शेखरच्या घरी त्याचे आईबाबा, एक छोटी बहीण आणि तो असं चौकोनी कुटुंब.. गेल्या वर्षीच शेखरची बहीण लग्न करून सासरी गेली होती त्यामुळे सध्या शेखर आणि त्याचे आईबाबा इतकंच छोटं कुटुंब होतं. सरकारी नोकरी असलेला, दिसायला सावळा रंगाचा पण रुबाबदार शेखर मुग्धासह घरातल्या सर्वांना आवडला. दोन्ही कुटुंब एकत्र आली. पाहण्याचा कार्यक्रम झाला. शेखर आणि मुग्धा यांनी एकमेकांना पसंत केलं. शेखर आणि त्याच्या घरची मंडळी खूप चांगली, समजूतदार होती. सगळं छान जुळून आलं म्हटल्यावर उगीच थांबण्यात अर्थ नव्हता. सासरच्या संमतीने मुग्धाने तिचं शिक्षण पूर्ण केलं. मुग्धा पदवीधर झाली. त्यानंतर तिच्या आईबाबांनी मोठ्या थाटामाटात तिचं शेखरसोबत लग्न लावून दिलं. सासरी जाताना सगळं बालपण एखाद्याला चित्रफितीसारखं पुढे पुढे सरकत गेलं. कधी इतके मोठे झालो त्यांना कळलंच नाही. तिला निरोप देताना सारेच गलबलून गेले होते. आईच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. बाबांच्या अंगाखांद्यावर खेळलेली, तळहातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलेली त्यांची लाडकी लेक आता परक्याच्या घरी नांदायला निघाली होती. वरदही आपली लाडकी बहीण सासरी निघालेली पाहून आपले अश्रू आवरू शकत नव्हता. मुग्धा त्याच्या कुशीत शिरून रडू लागली. तिचा दादा आता तिच्यापासून दूर होणार होता. मुग्धाला सावरत तिच्या डोक्यावरून हात फिरवत वरद म्हणाला,

“मनू, अशी लहान मुलांसारखी काय रडतेस? डोळे पूस बरं.. अगं प्रत्येक मुलीला मोठी झाली की, एक ना एक दिवस तिच्या सासरी जावंच लागतं. आपली विजुताई, श्रुती ताई नाही का गेल्या? अगदी तसंच.. आणि आपलं घर का तुझ्यासाठी परकं आहे? कधीही येऊ शकतेस तू.. समजलं?”

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
@अनुप्रिया

🎭 Series Post

View all