बंधू येईल माहेरी न्यायला.. भाग ४ (अंतिम)

भावाबहिणीच्या नात्याची गोड गुंफण
बंधू येईल माहेरी न्यायला.. भाग ४ (अंतिम)
©अनुप्रिया

आईबाबांच्या आठवणींनी मुग्धा व्याकुळ झाली. डोळयांतून पाणी झरत होतं. सणात तयारी करताना धावपळ करणारी आई तिला दिसू लागली. गौरी गणपतीच्या सणात तिने बनवलेल्या साजूक तुपातल्या उकडीच्या मोदकांची तिला प्रचंड आठवण झाली. प्रत्येक सणाला आईबाबा तिला आवर्जून बोलवत असत. तिचे सारे लाड पुरवत असत. मुग्धा घरी आली की, आईला काय करू आणि काय नको असं व्हायचं. चांगले चांगले गोडाधोडाचे पदार्थ लेकीसाठी बनवले जायचे.

“लेक माझी सासरी किती राबते! आता माहेरी आलीय तर थोडा आराम मिळू दे तिला..”

असं म्हणत आई तिला कोणत्याच कामाला हात लावू देत नसे. साक्षी, मुग्धाची वहिनी आल्यावरही तिने तसंच तिला सांभाळलं होतं. मुग्धा माहेरी आली की, साक्षी तिला हवं नको ते सगळं पहायची. आईने कधी मुग्धा आणि साक्षीमध्ये दुजाभाव केला नाही. आणि समजा प्रेमाचं पारडं कधी मुग्धाच्या बाजूला थोडं झुकलं तरी साक्षीला मुग्धा आणि आईच्या प्रेमाची कधी असुया वाटली नाही. उलट त्यांच्या नात्याचा तिने कायम आदरच ठेवला.

आईबाबा गेल्यानंतरचा तिचा पहिला गणेशोत्सव.. पण आज तिला अजिबात उत्साह नव्हता. बाहेर इतकं चैतन्याचं वातावरण होतं तरीही तिला उदासीचा दर्प साऱ्या घरभर जाणवत होता. आईची प्रचंड आठवण येत होती.

“आई, का सोडून गेलीस गं? सगळं संपून गेलंय बघ.. असं म्हणतात, मुलं झाली की आईची माया तिच्या पिल्ल्यांवरच राहते; पण तुझं तर कायम बाबांवरच प्रेम राहिलं. त्यांच्या मागोमाग लगेच निघून गेलीस. का आई? तुझ्याशिवाय तुझी लेक कशी राहील असा विचार पण तुझ्या मनात आला नाही?”

तिचं मन आक्रंदत होतं. आईला जाब विचारत होतं. तिला आठवलं, आई गेल्यानंतर भेटायला आलेल्यापैकी कोणीतरी म्हटलं होतं,

“पोरी.. आईबाबा असेपर्यंतच माहेर असतं बाई.. तोच एक मायेचा बंध असतो. ते असेपर्यंत माहेरवाशीणीचा मानपान.. माहेरी किंमत.. आपलं कोडकौतुक.. त्यांच्यानंतर कसलं माहेर आणि कसलं काय!”

आता मात्र ती धाय मोकलून रडू लागली.

“खरंच माझं माहेर संपलं? आई गेली आणि सगळं हरपलं. आता काय उरलंय? त्या काकू बोलल्या होत्या ते खरं आहे? माझ्याशिवाय आईबाबांच्या घरच्या बाप्पाची स्थापना झाली नव्हती. पण आता काय! दादा तरी कुठे आलाय? याआधी तो गणपती येण्याआधीच इथे हजर राहायचा. मला आणण्यासाठी आई सारखी त्याच्या मागे तगादा लावायची. वहिनीला तरी कुठे आठवण आहे माझी? आता काय! सासरच सगळं.. हीच मायेची माणसं आणि हेच प्रेमाचे बंध..”

मुग्धाने साडीच्या पदराने डोळ्यातलं पाणी टिपलं. मोकळं घर तिला खायला उठलं. सासुसासरे आधीच गणपतीसाठी गावी गेले होते. शेखरही जाणार होता पण ऑफिसच्या कामामुळे तो मागे थांबला होता. कामं उरकून दोन दिवसांची सुट्टी टाकून तो मुग्धा समवेत गावी जाणार होता. एकाकीपणा अगदी अंगावर धावून येत होता. उदास अंतःकरणाने ती उठून स्वयंपाक घराच्या दिशेने वळणार इतक्यात दारावरची बेल वाजली.

“आता दुपारी कोण आलं असेल? शेखर तर नसेल? पण तो इतक्यात कसा काय आला? की कोणी फेरीवाला? मग कोण असेल?”

असा विचार करत तिने दार उघडलं. पाहते तर काय! समोर तिचे दादा वहिनी, वरद आणि साक्षी मंद हास्य करत उभे होते. मुग्धाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या दोघांना असं दारात समोर पाहून मुग्धाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना असं अचानक समोर पाहून काय बोलावं तिला समजेना.

“दादा.. वहिनी तू?”

ती आश्चर्यचकित होऊन इतकंच विचारू शकली.

“अगं हो.. हो.. आत तर बोलावशील की नाही? की दारातच सगळं..”

वरद मिश्किलपणे हसत म्हणाला तसं मुग्धाने स्वतःच्याच डोक्यात हळूच टपली मारली आणि जीभ चावत हसून त्यांना आत बोलावलं.

“सॉरी दादा.. ये ना.. आत ये. ये ना वहिनी..”

दोघेही आत आले. मुग्धाने दोघांना बसायला सांगितलं. दोघे सोफ्यावर बसले. मुग्धाने पाणी आणून दिलं. इतक्यात शेखरही घरी आला. वरद आणि साक्षीला समोर पाहून त्यालाही खूप आनंद झाला. मुग्धा त्यांच्या चहापाण्याचं पाहण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. इतक्यात समोरच्या खुर्चीत बसत शेखरने विचारपूस करण्याच्या हेतूने वरदला प्रश्न केला.

“दादा, कसे आहात? आईबाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच घरी आलात. होप सो सावरले असाल. ऑफिसला जाणं सुरू केलंत ना?”

“हो.. ऑफिसला जातोय. आठवड्यातून दोन दिवस जावं लागतं. बाकी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. आम्ही ठीक आहोत शेखर.. खरंतर आईबाबांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय न.. ती कशानेही भरून निघणार नाही. काळ हेच त्यावरचं रामबाण इलाज आहे. वेळ जशी पुढे जाईल तसं सर्व गोष्टी मागे पडत जातील. पण माझी मनू कशी आहे?”

वरदने काळजीने विचारलं.

“दादा, मुग्धा अजूनही सावरली नाही. एकटीच रडत बसते. कोणाशी जास्त बोलत नाही. नीट खात पीत नाही. आता हेच बघा ना.. इतका मोठा गणपतीचा सण आहे पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नाही की उत्साह नाही. आम्ही तिला सावरण्याचा प्रयत्न करतोय पण तिचं दुःख आपल्यापेक्षा कैक पटीने मोठं आहे न. बाकी तुम्ही कसं काय येणं केलंत? म्हणजे आलात ते बरंच झालं. आता कुठे मुग्धाचा चेहरा आनंदाने खुललाय! कालपासून बघतोय मी.. पार हिरमुसून गेली होती. चेहरा अगदी पडला होता. आता बघा कशी टवटवीत झालीय!”

“आम्ही मनूला माहेरी घेऊन जायला आलोय. बाप्पाच्या आगमनाची तयारी करायचीय ना.. आमच्या मनूशिवाय कोण करणार? गौरी गणपतीचा सण तिच्याशिवाय पूर्ण कसा होईल?”

वरद त्याच्याकडे पाहत हसून म्हणाला.

“हो मग.. बरोबर आहे तुमचं.. लेकीबाळींशिवाय गौरी गणपतीच्या सणाला काही शोभा असते का? मुग्धाशिवाय आमच्या बाप्पाची स्थापना कशी होईल?”

साक्षीही मधेच हसून म्हणाली. तिचे शब्द चहा बिस्किटांचा ट्रे घेऊन येणाऱ्या मुग्धाच्या कानावर पडले. तिचे डोळे पाण्याने गच्च भरले.

“दादा, वहिनी.. तुम्ही मला माहेरी.. ”

चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत ती अडखळत म्हणाली आणि वरदच्या कुशीत शिरली. तिला असं कुशीत बिलगलेलं पाहून वरदला गलबलून आलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला,

“हो मनू.. आम्ही तुला घरी घेऊन जायला आलोय. दोन दिवसापूर्वीच येणार होतो पण ऑफिसच्या कामात पुरता अडकलो होतो म्हणून थोडा उशीर झाली.. सॉरी रे बाळा..”

“प्लिज दादा.. सॉरी नको म्हणू.. मला वाटलं आता आईबाबा नाहीत.. म्हणजे तू.. ”

“म्हणजे काय? आम्ही येणार नाही?”

मुग्धाला मधेच अडवत साक्षी म्हणाली.

“अगं म्हणजे.. आई बाबा नाहीयेत न आता.. ”

“मग काय झालं? मला माहित आहे मुग्धा, आईबाबांची जागा आम्ही घेऊ शकणार नाही. त्यांच्या इतकं प्रेम कदाचित आम्ही करू शकणार नाही; पण म्हणून आमचं प्रेम नाहीये का तुझ्यावर? जोवर तुझे दादा वहिनी जिवंत आहेत तोवर तुझं माहेर कधीच संपणार नाही. आता आम्हीच तुझे आईबाबा.. मुग्धा तुझा दादा आणि तुझी वहिनी तुला
तुझ्या माहेरी घेऊन जायला आलोत. तुझ्याशिवाय आपल्या गौरी गणपतीला शोभा नाही गं.. चल बाळा..”

हे बोलताना साक्षीलाही गहिवरून आलं. मुग्धा तिच्या गळ्यात पडून रडू लागली आणि साक्षी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिचं सांत्वन करत होती.

“ज्या बायका बोलत होत्या ते सगळं खोटं होतं. माझ्या दादा वहिनीच्या रूपाने माझे आईबाबा माझ्या सोबत आहेत. त्यांच्यात माझं माहेर आहे. मला काही मागत नाही पण बाप्पा, माझ्या दादा वहिनीला कायम सुखात ठेव.. माझं माहेर नेहमी आबाधित ठेव..”

मुग्धाच्या मनातली आंदोलने आता शांत झाली होती. देवाला आभार मानत आणि शेखरच्या परवानगीने तिने बॅग भरायला सुरवात केली. आज ती तिच्या माहेरी जाणार होती. दादा वहिनीच्या रूपात तिचं माहेर आता कायम तिच्या सोबत असणार होतं. मनातली सारी किल्मिष गळून पडली होती. आणि दुरवर सुरू असलेल्या डीजेवर गाणं वाजत होतं.

बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला..
गाडी घुंघराची येईल न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला..

समाप्त
©अनुप्रिया

🎭 Series Post

View all