बंधू येईल माहेरी न्यायला.. भाग १

भावा बहिणीच्या नात्याची गोड गुंफण..
बंधू येईल माहेरी न्यायला..
©अनुप्रिया


“मुग्धा, ए मुग्धा.. अगं काय करतेयस? झाली का तयारी बाप्पाच्या स्वागताची?”

शेजारची कृतिका मुग्धाच्या घरात प्रवेश करत म्हणाली. तिचे आवाजाने मुग्धाच्या विचारांची शृंखला तुटली.

“अगं कृतिका, ये.. ये ना..”

मुग्धा किंचित हसून भानावर येत म्हणाली खरी; पण चेहऱ्यावरची उदासी तिला लपवता आली नाही. कृतिकालाही तिची चूक लक्षात आली. ती ओशाळून मुग्धाच्या शेजारी येऊन बसत तिच्या हातावर तिचा हात ठेवत म्हणाली,

“सॉरी यार मुग्धा.. मी तुला असं विचारायला नको होतं. पटकन तोंडातून निघून गेलं. मला कल्पना आहे की, तू आता कोणत्या अवस्थेत आहेस. पण तरीही मी तो मूर्खपणा केलाच. ”

“ठीक आहे गं.. तू काय मुद्दाम केलंस का? अनावधानाने आलं ते.. ते सगळं सोड.. बोल काय काम काढलंस?”

मुग्धाने विषय बदलत कृतिकाला विचारलं.

“अगं काही नाही गं.. ते आपल्या घराच्या बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी सुरू आहे नं.. मखर बनवत होतो.. नेमकं फेविकोलची बॉटल संपली. म्हटलं तुला विचारावं..आहे का तुझ्याकडे?”

“हो आहे.. थांब देते..”

कृतिकाच्या बोलण्यावर मुग्धाने उत्तर दिलं आणि ती फेविकोल आणण्यासाठी आतल्या खोलीत गेली. मुग्धाने कृतिकाला फेविकोलची बॉटल आणून दिली. कृतिका घरातल्या बाप्पाच्या आगमनाची सुरू असलेली लगबग सांगत होती. राजीव, तिचा नवरा डेकोरेशन करण्यात तिला मदत करत होता. थोडा वेळ बोलून कृतिका तिच्या घरी निघून गेली. मुग्धाच्या मनात जुन्या आठवणींची आवर्तनं सुरू झाली. आज तिच्या माहेरच्या गणपती बाप्पाची तिला प्रचंड आठवण होत होती.

“गेल्या वर्षीपर्यंत किती थाटामाटात आपण बाप्पाच्या येण्याची तयारी करायचो. किती छान दिवस होते ते! बाप्पा येणार म्हणून किती आतुरतेने वाट पाहायचे मी!”

मुग्धा स्वतःशीच पुटपुटली. खरंतर मुग्धाला कायम तिच्या माहेरच्या बाप्पाचं प्रचंड कौतुक वाटायचं. तिथल्या गणेशोत्सवाचं वर्णन करताना ती अजिबात थकायची नाही; पण यावेळीस मात्र तिचं मन बिलकुल थाऱ्यावर नव्हतं. मनाचे वारू अगदी उलट्या दिशेने धावत होते आणि खूप प्रकर्षाने तिच्या मनात तिच्या माहेरच्या आठवणी पिंगा घालू लागल्या. डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. मुग्धाला तिचं बालपण आठवू लागलं. तिचं बालपण एखाद्या लहान मुलासारखं तिच्या अवतीभवती बागडू लागलं. सगळ्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. त्या आठवणींनी तिचा चेहरा आनंदाने भरून गेला.

पूर्वी मुग्धाच्या गावी कोकणात चिपळूणला गौरी गणपतीचा सण मोठ्या जल्लोषात साजरी व्हायचा. मुंबईतली चाकरमानी माणसं काही झालं तरी दहा बारा दिवसांची रजा घेऊन गावी यायचे. वाडा पानाफुलांनी सजला जायचा. घराघरातून गोडाधोडाचा सुवास दरवळत राहायचा. एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात हा सण साजरा व्हायचा. कालांतराने काळ बदलत गेला. पोटापाण्यासाठी भाकरीच्या शोधात गाव मागे पडत गेला. गावच्या वाड्यातून बाहेर पडून मुग्धाचे आईबाबा मुंबईला आले आणि तिथेच स्थायिक झाले.

हळूहळू काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत होता. तिला लहानपणीची आजीने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने एकदा आज्जीला विचारलं,

“माई, आपल्या घरी बाप्पा कधी आला गं?”

“तुझ्या वरद दादाचा जन्म झाला आणि तेंव्हापासून आपण मुंबईच्या घरी बाप्पा आणायला लागलो. त्याच्या कृपेनेच तुला तुझा दादा मिळाला. नवसाचा आहे बाई तो.. ”

आज्जी हसून म्हणाली. मुग्धाचे इवलेसे डोळे आनंदाने चमकले. बाप्पाने तिला तिचा दादा दिला या भावनेने ती सुखावून गेली. आणि तेंव्हा पासूनच दादा आणि बाप्पा एक घट्ट नातं तिच्या मनात रुजलं गेलं. ती कायम दादाच्या जवळ असायची. माई, आई बाबा आणि दादा हेच तिचं विश्व होतं. वरदचंही मुग्धावर खूप प्रेम होतं. मोठा भाऊ म्हणून कायम तो तिला जपायचा. तिची काळजी घ्यायचा. मुग्धाच्या घरी सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरी व्हायचे. आई सगळे सोपस्कार, कुलाचार आवडीने करायची. वरद मुग्धालाही तिने तसेच संस्कार दिले होते. वरद आणि मुग्धाही आई बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळे सण मनापासून साजरे करायचे; पण सर्वांत जास्त ‘गणेशचतुर्थी’ हा सण दोघांच्याही प्रचंड आवडीचा होता. संपूर्ण वर्षभर बाप्पाच्या आगमनाची ते आतुरतेने डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे. त्यांची ‘आई, बाप्पा कधी येणार?’ आईच्या मागे पिरपीर लागलेली असायची.

खरंतर बाप्पाच्या येण्याची तयारी पंधरा दिवस आधीपासूनच सुरू व्हायची. घरातला कोपरा नं कोपरा धुऊन पुसून स्वच्छ केला जायचा. चमचा वाटीपासून ते तांब्या पितळीच्या भांड्यापर्यंत सगळी भांडी घासून पुसून अगदी चमकवली जायची. अंथरुण पांघरून धुवून वाळवली जायची. साफसफाईच्या कामापासून अगदी फराळ करण्यापर्यंत चाळीतल्या सगळ्या बायका एकमेकींच्या मदतीला धावून जायच्या आणि मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आगमनाची तयारी करायच्या. गौराईच्या साड्या, दागिने, सजावटीच्या वस्तूंची, लहान मुलांच्या कपडेलत्तांचीही खरेदी व्हायची. साऱ्याजणी मिळून हरतालिकेचा उपवासही करायच्या. उपवासाचा फराळ एकमेकींना दिला घेतला जायचा. घरातली पुरुष मंडळीही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत मागे नव्हती बरं! ते रात्रभर जागून डेकोरेशनची तयारी करायचे. आपल्या स्वतःच्या घरचं डेकोरेशन तर करायचेच पण त्यानंतर सोसायटीच्या मंडळाच्या डेकोरेशनसाठी ते एकत्र यायचे. यात बच्चे कंपनीही मागे नसायची. बाप्पाच्या येण्याच्या तयारीत त्यांचा खारीचा वाटा असायचाच. फार धमाल असायची. त्या सगळ्यां गोष्टी अगदी जशाच्या तश्या तिच्या डोळ्यासमोर फेर धरू लागल्या.

मुग्धा जुन्या आठवणींनी उदास का झाली? तिचे डोळे भरून का आले? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
@अनुप्रिया


🎭 Series Post

View all