Login

बापाचं काळीज...

बापाचं काळीज
लघुकथा
सेकंड इनिंग

शीर्षक -बापाचं काळीज

सागरराव नुकतेच जेवण करून सोफ्यावर बसले. तोच फोनची रिंग वाजली.

पलीकडून आवाज

"बाबा"

कोण?

रॉंग नंबर. म्हणत सागररावने फोन खाली ठेवला. आवंढा गिळत ते दुसऱ्या खोलीत जाऊन बसले. असं अचानक यांना काय झालं असं म्हणत सोनाली सुद्धा त्यांच्या पाठोपाठ तिथे गेली.

अहो काय झालं? कोणाचा फोन होता? सोनालीने दबकतचं विचारले.

समीराचा" सागरराव म्हणाले..

काय? अहो घेतला कां नाही फोन?

सोनाली, समीराने जेव्हा आपल्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केलं तेव्हाच ती आपल्यासाठी...


नका हो असं बोलू .आपली लेक आहे ती.

नाही. आता तिचा आणि आपला काही संबंध नाही.

समीरा, सागरराव व सोनाली यांची एकुलती एक मुलगी. लाडाकोडात वाढलेली. तळहातावरच्या फोडाप्रमाणे त्यांनी समीराला जपले होते.

समीरा कॉलेजमध्ये असल्यापासून एका मुलावर तिचे प्रेम होते. मात्र आई-बाबांना तिने त्याचा थांगपत्ता लागू दिला नाही. इतकेच नाही तर एक दिवस तिने त्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केले.

अर्थातच सागरराव सोनाली साठी हे अनपेक्षित होते. दोघांनी त्या घटनेपासून स्वतःला घरात कोंडून घेतले होते आणि आता तिच्याशी पुढे कोणताही संबंध न ठेवण्याचा सागरने निर्णय घेतला होता. सोनालीलाही त्याने तसे बजावले होते.

चार वर्षाचा काळ लोटला. मुलीच्या धक्क्यातून दोघेही कसेबसे सावरले होते. पण अचानक तिचा फोन. मनावर दगड ठेवून सागररावने समीराशी बोलायचे टाळले. परंतु त्याचा आतापर्यंतचा थोपवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. सोनालीने त्यांना खूप समजावले. पण सागरराव माघार घ्यायला तयार नव्हते.

पुन्हा फोनची रिंग वाजली .आता सोनालीने फोन घेतला. आईचा आवाज ऐकून समीरा ओक्साबोक्शी रडू लागली.

आई, मला माफ कर. मी असे करायला नको होते. भावनेच्या भरात मी निर्णय घेतला. आता मला खूप पश्चाताप होतोय गं.

सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निस्तब्ध होऊन ती फक्त ऐकत होती. समीराचे शब्द कानात साठवून घेत होती. चार वर्षानंतर आपल्या लेकीचा आवाज तिला ऐकायला मिळाला होता.


आईचं ती.

आई !आई !!

बोल नां गं. समीरा बोलत होती. आई, दरवर्षी दिवाळीला सर्व मुली माहेरी जातात. मलाही वाटतं गं माहेरी यावं. पण...

आई, बाबांना समजावून सांग नां. ते खूप नाराज आहेत माझ्यावर. आई यावर्षी मी एका व्हाट्सअप ग्रुप वर "हक्काचं माहेर"ची पोस्ट वाचली. एवढा आनंद झाला मला की काय सांगू. मी चौकशी केली.

मला कळलं की हे संकुल माहेर नसलेल्या महिलांसाठी तर आहेच परंतु अडचणीत सापडलेल्या, मदत पाहिजे असलेल्या सर्व महिलांसाठी आहे. हे वाचून माझ्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. मी चौकशी केली. इतकेच नव्हे तर मी तिथे जाऊन सुद्धा आली.

खूप छान वाटलं गं आई मला. तिथल्या खुशी ताईंनी माझी आपुलकीने विचारपूस केली. मला धीर दिला. माझी अडचण समजून घेतली व मला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि बाबांचा नंबर सुद्धा मिळवून दिला.

आज आपली फोनवर कां होईना भेट झाली, हे सर्व त्यांचेच उपकार आहेत. मला तर त्यांचे कोणत्या शब्दांत आभार मानावे कळत नव्हतं.

खरंच आजच्या काळात इतरांचा विचार करणारे लोक फार कमी असतात गं. परमेश्वर त्या ताईंना व त्यांच्या टीमला उदंड आयुष्य देवो व असेच कार्य त्यांच्या हातून नेहमी घडत राहो. त्याच्या रूपाने जणू देवच माझ्या मदतीला धावून आला गं.

मी लगेच बाबाला फोन लावला. पण त्यांनी फोन कट केला. असं म्हणत समीरा रडू लागली. मग मी तुला फोन लावला. तू निदान माझं ऐकून तरी घेतलं. तेवढेच बरं वाटलं गं मला.

आई बोल नां गं काहीतरी. तेवढ्यात सागररावांनी सोनालीच्या हातून फोन हिसकावून घेतला. "सोनाली मी तुला बजावले होते नां आता तिच्याशी आपला काहीही संबंध नाही म्हणून."

फोन कट झाला. सोनाली सागर दोघांनीही त्या दिवशी जेवण घेतले नाही.

"अहो करा नां समीराला फोन. खूप रडत होती होती ती. सोनाली सागररावला आर्जवी स्वरात म्हणाली.

अहो, किती दिवस आपण असे कुढत, रडत राहणार? मला माहित आहे तुम्हालाही मनातून ती हवी आहे. झाली असेल तिच्याकडून चूक. पण आता ती माफी मागत आहे नां करा नां तिला माफ.

सागरराव काहीच बोलले नाही. पण "बाप तो बापच असतो. मुलांची सारी दुःखे तो स्वतः अबोल राहून सहन करतो. आम्ही त्या देवाच्या सजीव प्रतिमेला बाप म्हणतो."


सागरराव काही न बोलता उठले. त्यांच्या मनातली प्रचंड खळबळ सोनालीला कळत होती. त्यांनी सोनालीला सोबत घेतले.

"अहो कुठे जायचं ते तर सांगा?

तू फक्त माझ्यासोबत चल.

सागररावांनी हक्काचं माहेरचे संकुल गाठले. तिथे गेल्यावर सर्वांनी आस्थेने केलेली विचारपूस, तेथील आपुलकीचे वातावरण पाहून ते भारावून गेले. त्यांनी खुशीताईंकडून समीराचा पत्ता मिळवला आणि तडक समीराचे घर गाठले. आपल्या आई-बाबांना असे अचानक पाहून समीराचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पण हे सत्य होते.

समिरा बाबाला बिलगली. व हमसून हमसून रडू लागली.

'बाबा मला माफ करा. माझे चुकले. बाबा, तुम्ही माझे हिरो, माझा आधार, माझा हक्काचा श्रोता, मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझे सपोर्ट होते.

पण बाबा माझ्या हातून फार मोठी चूक घडली. तुमच्या आशीर्वादाची आज मला खूप गरज आहे बाबा. मला माफ करा. तिचं रडणं पाहून सागर व सोनाली दोघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तेवढ्यात सत्यम् घरी आला. आई-बाबा हे माझे पती सत्यम्.सत्यमने समीराच्या आई-बाबांना वाकून नमस्कार केला. बाबा खरंच चुकलं आमचं. मोठ्या माणसांच्या आशीर्वादाशिवाय सगळं अपूर्ण असतं हे आता आम्हाला कळलं.

चल समीरा तयारी कर. आम्ही तुला घ्यायला आलो आहोत. यावर्षी दणक्यात दिवाळी साजरी करू आपण. आपल्या आयुष्याची ही सेकंड इनिंग समज. जावई बुवा तुम्ही सुद्धा चला. सोनाली व सागर जावई व लेकीला घेऊन घरी आले. आज खऱ्या अर्थाने त्यांनी दिवाळी साजरी केली. सर्वांच्या मनातील कटूतेचा अंधकार दूर झाला. व घर पुनश्च आनंदाच्या प्रकाशाने उजळून निघाले.

"खरंच बाप तो बापच असतो. बाप कधीच कसे जगायचे शिकवत नाही. तर कसे जगायचे हे तो स्वतः जगून दाखवत असतो."
समाप्त
सौ. रेखा देशमुख