प्रिय कृपासिंधू,
गणपती बाप्पा…
गणपती बाप्पा…
साष्टांग दंडवत..
पत्र लिहिण्यास कारण की, मला मनापासून तुझे आभार मानायचे आहेत. तू माझ्या आयुष्यात भरभरून प्रेम, वात्सल्य धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य दिलस. आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यासोबत कुंडली जुळावी म्हणून साकडं घातलं आणि तू ते अगदी निरपेक्ष मनाने, सढळ हातानी दिलंस. माझ्या संसार रुपी वेलीवर एक सुंदर तुझ्यासारखी गोडुली दिलीस. तिच्यावर विद्येचा वरद हस्त ठेवीला. आणखीन काय मागावं की सगळंच न मागता दिल आहेस. आज पुन्हा तुझ्याकडे विनवणी मांडतेय रे...
‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दरवर्षी आम्ही तुझं मोठ्या उत्साहानं स्वागत करतो. नेहमीची आमची दु:खं, आमच्या वेदना, आमची संकटं बाजूला ठेवून खर्याखुर्या भक्तिभावाने तुला पुजतो. अगदी अनंत चतुदर्शी पर्यंत तुझं पूजन करतो. इथं झाडं हलतात, हवा मिळते, समुद्राच्या तर्हेवर चंद्राची कोर ठरते, नद्या समुद्राला मिळतात, समुद्र आकाशला मिळतो अन् आकाशातून पाण्याचा वर्षाव होतो, रोज कित्येक प्राणी जन्म घेतात, कित्येक तुझ्या भेटीसाठी येतात, युगं संपतात, युगं सुरु होतात, पण आम्ही मात्र जगत राहतो, मरेपर्यंत, मरण हातात घेऊन. केवळ तुझ्यावर भरवसा ठेऊन. हे सगळं तुझ्यामुळेच घडतं ना! कदाचित तुला हे सारं सारं घडण्यापूर्वीच माहिती असेलही...
बाप्पा, आमचा भोळा भाव, तू समजून घेतोसच. पण यंदाच्या वर्षी आमचं थोडं ऐकशील. खरंच आम्ही दररोज मरण हातात घेऊन जगतो रे, अक्षरश: मरण हातात घेऊन. केवळ तुझ्या आशेवर. कधी, कोठे, कसे आणि काय घडेल याची कल्पना आम्ही सामान्य करूच शकत नाहीत. कदाचित तू करू शकशील. कधी धरणी फुटेल अन् आम्ही तिच्या पोटात जाऊ, सांगता येत नाही. कधी चंद्राची कोर बदलणारा समुद्र खवळेल आणि आम्हाला कवेत घेऊन जाईल, सांगता येत नाही. तर कधी कोठे आकाशातून बरसणारे पाणी आम्हाला आकाशात घेऊन जाईल, सांगता येत नाही. कदाचित हे तुला सांगता येत असेल पण आजतरी चंद्राला स्पर्श करणार्या आमच्यासाठी आमचाच जीव कधी जाईल याचा शोध अजून लागायचा आहे. का आमच्या बांधवांचे निष्पाप प्राण स्वत:कडे घेऊन जातोस? त्यांचा त्यात काय दोष असतो?
गणराया, नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत आम्ही तुझ्यावर भरवसा ठेऊन जगतो. पण कैकवेळा आमच्याच बांधवांनी निर्माण केलेल्या मानवनिर्मित आपत्तींचे काय? कधी एखाद्या निष्पाप जीवावर बलात्कार होतो तर कधी एखाद्या आई बापाची म्हातारपणीची काठी अलगद हिरावून जाते. कधी कुणा लहान लेकरावरच छत्रछाया हिरवली जाते. कधी कोणत्या लोकलमध्ये बॉम्ब फुटेल, कधी कोठे दंगल उसळेल, सांगता येत नाही. कधी कोठे मारामार्या होतील आणि आम्हाला आमचा प्राण घेऊन तुझ्या भेटीला यावे लागेल याची आम्हाला शाश्वती नाही. बाप्पा, हातात बंदुका घेऊन मानवतेचा खून करायला निघालेल्या माणसांना तू अशी दुर्बद्धी का देतोस. देश, वर्ण, धर्म, पंथ, संप्रदाय आणि तुझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग जरी निरनिराळा असेल तरी सगळे मार्ग तुझ्यापर्यंतच पोचतात ना... कोणी तुला अल्ला म्हणतो, कोणी खुदा म्हणतो, कुणी ‘गॉड’ म्हणतो पण सगळ्याचा अर्थ ‘देव’च ना... आणि जगातील कुठल्यातरी ग्रंथात तुच निर्माण केलेल्या माणसांना मारून तुझ्यापर्यंत पोचण्याचा संदेश दिला आहे काय?
आम्हाला माहिती आहे, प्रत्येक माणसाच्या ठायी ईश्वर असतो. मग अशा सगळ्याच माणसांना तू सुबुद्धी का देत नाहीस. का त्यांना तुझ्या घरून या मृत्युलोकात पाठविताना मानवतेचा संदेश देत नाहीस. का त्यांच्या हातातील बंदुका निष्पापांचा प्राण घेताना थरथरत नाहीत. आम्ही बापडे काय करणार जमेल तेवढी हळहळ व्यक्त करणार, फार-फार तर रक्ताच्या नसलेल्या नातांकरिता चार अश्रू ढाळणार अन् पुन्हा आमचं मरण आणि तुझी सोबत घेऊन जगण्याकडे मार्गस्थ होणार...
कोरोना रुपी राक्षसाने आत्ताच्या घडीला पृथ्वीवर हाहा:कार माजवला आहे.आज सर्व मानव जात घाबरलेली असून तोंडावर मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, कोणालाही स्पर्श न करणे, घरातून बाहेर न पडणे, सण, उत्सव एकत्र साजरे न करणे या समस्यांतून जात आहे. थोडक्यात काय पूर्वी जसे एखाद्या राक्षसा बरोबर युद्ध करून समस्त देव,मानव जातीला त्या राक्षसाच्या तावडीतून तुम्ही सोडवले तशी परिस्थिती आहे. बाप्पा तु विघ्नहर्ता आहेस. हें विघ्न दूर करशील ना..?
बाप्पा, आम्हाला नुसतेच हाड, मांस, रक्त दिसले की अनामिक भिती वाटते, मग याच सर्वांचा मिळून बनलेला जिवंत माणूस भेटला की आम्हाला अनामिक आनंद वाटतो. हाच आनंद आम्हाला आमच्या गावाकडचा माणूस भेटला की वाटतो, दुसर्या राज्यात गेल्यावर आमच्या राज्यातील माणूस भेटला की वाटतो, परदेशात देशात गेल्यात आमचा देशवासी भेटला की आनंद वाटतो! मग परगृहावर गेल्यावर नुसता माणूस दिसला की आनंद वाटेल ना! मग इथंच फक्त ‘माणूस’ भेटला की आम्हाला आनंद वाटतो का? तो ‘आनंद’ आम्ही आज तुझ्याकडं मागत आहोत. जगातील प्रत्येक मानवाची दुष्कर्म करण्याची बुद्धी काढून घे आणि त्याजागी केवळ सद्बुद्धी दे! मग बघ...
घराघरात मांगल्याचे, संस्कारांचे, मूल्यांचे धडे मिळतील. प्रत्येकजण आपल्या माता-पित्यांना वंदनीय मानेल. वृद्धाश्रमांना टाळा लावावा लागेल. कोणीही भांडणं करणार नाहीत. त्यामुळे ती निवारण्यासाठी कोणत्याही व्यवस्थेची गरज उरणार नाही. कारण प्रत्येकाला तू सद्बुद्धी दिलेली असशील. ...बघता बघता प्रत्येक देश यशाच्या परमोच्च शिखरावर पोचला असेल. त्यावेळी जगातील कोणतेही राष्ट्र कधीही कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही. कारण प्रत्येकाला तू सद्बुद्धी दिलेली असशील. ...अचेतनाला चेतना मिळेल. अनितीला मोक्ष मिळेल. असत्याला अंधार मिळेल. सत्याला प्रकाश मिळेल. प्रकाशाला तेज मिळेल. त्या तेजातून दिव्यत्वाची प्रचिती मिळेल... सारी सृष्टी दिव्य तेजाने झळाळून निघेल... कारण सर्वांना सद्बुद्धी मिळाली असेल.
तुझीच प्रिय,
सौं संध्या गणेश भगत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा