Login

बापरे...! दुसरी ही मुलगीच? भाग चार ( अंतिम भाग )

विनयच्या मुली नाव कमावतात.
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा

बापरे..!दुसरी ही मुलगीच?? भाग चार (अंतिम भाग)



मागील भागात आपण पाहिलं की लोकांच्या बोलण्यामुळे विनय दुखावतो पण साक्षी त्याला छान समजावते. आता पाहूया पुढे,


हसता हसता विनय म्हणाला,

“लोकं काहीही बोलोत, माझ्या या दोन मुली माझं खरं बळ आहेत. एक दिवस या समाजाला दाखवून देतील की मुलीही मुलापेक्षा कमी नसतात.मी नाही त्याच उत्तर देतील.”तेवढ्यात दोन्ही मुली खेळून धावत आल्या आणि आपल्याला आईवडिलांना बिलगल्या.


विनयचे विचार तर बदलले पण घरच्यांनी त्याला चैन पडू दिली नाही. त्याची आई म्हणत होती,


“तुम्ही तिसरा चान्स घ्या, यावेळी मुलगा होईल.”
तर आजीच म्हणणे होते कि,

“साक्षी मुलाला जन्म देऊच शकत नाही, उलट त्याने दुसरं लग्न केलं तरच मुलगा मिळेल.”पण हे ऐकून विनय ठामपणे म्हणाला,

“ मला ना तिसरा चान्स हवा आहे, ना दुसरं लग्न करायचं आहे. मला माझ्या मुलीच्या आयुष्याच सोनं करायचं आहे. मला मुलाची अपेक्षा नाही. यापुढे कुणी हा विषय काढला तर मी माझ्या बायकोसोबत मुलींना घेऊन हे घर कायमचंच सोडेन. "


साक्षी ते ऐकून मनापासून हसली. तिला जाणवलं तिचा नवरा खरा पुरुष आहे, जो समाजाच्या दडपणाला न जुमानता आपल्या मुलींचा अभिमानाने स्वीकार करतो.घरच्यांनी देखील त्यांच्याकडून वंश पुढे नेतील अशी अपेक्षा करणे सोडून दिल.


काळ पुढे सरकत गेला.अन्वी आणि सिया विनयच्या दोन्ही मुली अभ्यासात खूप हुशार होत्या. खेळात सुद्धा त्या प्रवीण्य मिळवायच्या. त्यांचे शिक्षक नेहमी कौतुक करायचे,

“विनय, तुझ्या मुली म्हणजे सोनं आहेत. चांगल्या संस्कारांचं फळ आहे हे. तुझं नाव नक्कीच पुढे नेतील त्या. "


त्या मोठ्या झाल्या तसं त्यांनी अभ्यासासोबत आईला घरकामात मदत, बाबांना मान-सन्मान, आणि समाजात आपलं नाव उज्ज्वल केलं. अन्वीने इंजिनिअरिंग करून नोकरी मिळवली, तर सियाने डॉक्टरी शिकून हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं.

स्वतःच्या पायावर उभ राहून आपल्या आई-वडिलांसमोर उभ्या राहून म्हणाल्या,

“आई बाबा, आता तुमच्या चिंता संपल्या. घराची जबाबदारी आम्ही उचलू. तुम्ही फक्त आराम करा.”

विनयच्या तर डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

“आज मला खऱ्या अर्थाने जाणवतंय, मी किती भाग्यवान आहे.मुली म्हणजे देवाचं खरं वरदान आहे.”

दुसरीकडे, परेशचे मुलगे रितेश आणि रजत लाडाने वाढलेले. मोठं झाल्यावर अभ्यासाला कंटाळा, वाईट संगती, दारू-पार्टी सगळ्यात गुंतले. एकाने नोकरी टिकवली नाही, दुसरा पोलिस केसमध्ये अडकला.
घरात वाद, कर्ज, अपमान वाढला. आईवडिलांना ते दोघेही घालून पाडून बोलत असत.


परेश संतापून मुलांना म्हणत असे,
“मी तुमचे लाड केले, सगळं दिलं… आणि त्याचं हे फळ? त्या विनयला मुलीच असून तो मात्र बिनधास्त आहे आणि मला ह्या वयात देखील काम करावे लागत आहे. आता मला समजतंय, नशीबवान मी नव्हतो तर तो होता.”


ह्यावर दोन्ही मुलं मात्र उलट उत्तरं देत बाहेर निघून जायची.तो हताश होऊन गावकऱ्यांना सांगू लागला,

“दोन मुलगे असूनही आज मी एकटा पडलो. सुख शांती हरवली. विनयला मी नेहमी हिणवत होतो पण खरा सुखी तर तो आहे, त्याच्या मुली त्याचा आधार बनल्या आहेत."
पण विनय लोकांना म्हणत असे,

"मुलगा मुलगी असा भेद करू नका कारण फारतर दोन पिढ्यांपर्यंतच नावे टिकतात. मगं एवढ्या ‘वंशाच्या’ गर्वाचा उपयोग काय? खरं नाव टिकवतात ते आपल्या मुलांचे संस्कार आणि चांगली कामं. मगं तो मुलगा असो अथवा मुलगी."

त्या दोन्ही भावांची परिस्थिती बघून गावात कुणीही ‘मुलगा हवा’ किंवा ‘मुलगी ओझं’ असं आता बोलायचे नाहीत.
उलट लोकं म्हणू लागले,

“मुलगा असो वा मुलगी, जो पालकांना आधार देईल तोच खरा वारस. "