बारामोटेची विहीर- स्थापत्यकलेचा ऐतिहासिक वारसा

इतिहासात दुर्लक्षित झालेल्या एका ऐतिहासिक वास्तूची संक्षिप्त स्वरूपात माहिती
महाराष्ट्र राज्यात बरेच प्रसिद्ध अन् अद्भुत स्थळे आहेत त्यापैकीच एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील लिंब गावात दिमाखात उभी असलेली विहीर- बारा मोटेची विहीर. बारा मोटेची विहीर याचा शब्दशः अर्थ सांगायचा तर बारा मोटा असलेली विहीर. खरंतर या विहिरीला एकूण पंधरा मोटा आहेत परंतु विहिरीतील पाणी उपसण्यासाठी एकावेळी पंधरापैकी फक्त बारा मोटा लावल्या जात असे व इतर तीन मोटा दुरुस्तीच्या काळात पर्यायी मोटा म्हणून वापरल्या जात; त्यामुळे त्या काळात या विहिरीचे नाव 'बारा मोटेची विहीर' असे प्रचलित झाले अन् तेच नाव आजतागायत जनसामान्यांना ज्ञात आहे. ही दगडी विहीर स्थापत्यकलेचा एक उत्तम अन् नेत्रसुखद नमुना आहे.

या विहिरीचा व्यास सामान्यतः ५० फूट आणि खोली ११० फूट आहे. विहिरीचा आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. विहिरीसन्मुख मोडी लिपीत लिहिलेला शिलालेख पर्यटकांना विशेष आकर्षित करताना आढळतो. विहिरीच्या इतिहासाविषयी सांगायचे झाले तर १७१९-१७२४ च्या दरम्यान अर्थात शिव उत्तरकालीन काळात श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हे बांधकाम करण्यात आल्याची नोंद इतिहासात केली गेली आहे.

लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. त्या आमराईसाठी व त्या परिसरातील रहिवाशांच्या सोयीसुविधेसाठी बारा मोटेची ही प्रशस्त विहीर जमिनीखालील महालात बांधण्यात आली. या जमिनीखालील महालाच्या मुख्य दारावर आकर्षक कलाकुसरीचे काम केलेले असून आतील भागात शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विभिन्न चित्रे कोरलेली असून गणपती, हनुमान, कमलपुष्पे यांसारखे शुभशिल्पे उत्तर दिशेला आढळतात परंतु हत्ती आणि घोड्यावर आरूढ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प कोरलेले खांब पाहिल्यावर सच्च्या मावळ्यांचे मन सद्गदित झाल्याविना राहत नाही.

प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्यापूर्वी आड विहिरीकरीता प्रशस्त पायऱ्यांसह एक भक्कम पूल आहे आणि तेथूनच छुप्या महालात व विहिरीत जाण्यासाठी अन् परिस्थितीपरत्वे शत्रूच्या तावडीतून स्वरक्षण करण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत. इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की भारतात मुख्यत्वे उत्तरेकडूनच परकीय आक्रमण होत होते; त्यामुळे उत्तर दिशेचा संदर्भ घेऊन त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त महालाच्या भिंतींवर उत्तर भागात अप्रतिम शिल्पाकृती व कोरीव नक्षीकाम केले गेले होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

विहिरीच्या दक्षिण भागातील शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्ती असून त्या शिल्पाचा अर्थ असा होतो की मराठ्यांनी (महाराजांनी) दक्षिण प्रांतावर अधिपत्य गाजवून तेथे भगवा ध्वज फडकवला आहे. तसेच उत्तरेकडील शिल्पात आकाशाकडे पाहत डरकाळी फोडणारा वाघ कोरला असून त्याचा अर्थ असा होतो की आता महाराज उत्तरेकडील प्रांत पादाक्रांत करण्याचे ध्येय उराशी गाठून आहेत. थोडक्यात महाराजांचे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची शाश्वती त्या दोन्ही दिशेतील शिल्परचनेतून मिळते. प्राचीन स्थापत्यशैलीनुसार वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य, धैर्य, दृढता, वीरता आणि समृद्धीचे शुभप्रतिक मानले जाते; त्यामुळे अर्थातच त्या महालात आणि विहिरीत कोरलेले एकूण एक शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे वर्णन करते.

बारा मोटेच्या विहिरीला प्रशस्त जिना आणि काही चोरवाटा सुद्धा आहेत. विहिरीवर १५ थारोळी असून चोरवाटांच्या साहाय्याने वर आल्यावर बारा मोटांची जागा आणि दरबाराच्या जागेसह सिंहासनाची जागाही पाहायला मिळते. शाहू महाराजांच्या अनेक बैठकांची साक्षीदार असणारी वास्तू म्हणजे बारा मोटेची विहीर. त्यामुळे त्या स्थळी गेल्यावर इतिहासाच्या पुस्तकात कधीकाळी वाचलेल्या त्या ऐतिहासिक बैठकांची कल्पना आपसूकच आपलं मन करायला लागतं.

केवळ बारामोटेची विहीरच नव्हे तर तो भुयारी महाल सुद्धा लक्षवेधी आहे कारण महालातील प्रत्येक शिल्परचना, शुभशिल्पे, सुबक नक्षीकाम आणि दगडी खांबावर केलेले कोरीव काम हे गूढ, आकर्षक, प्रतिकात्मक आणि नयनरम्य भासते; म्हणजेच जेवढे आपण त्या शिल्पांचा आणि त्या वास्तूचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेवढीच आपल्याला नवनवीन आणि इतरत्र उपलब्ध नसलेली माहिती प्राप्त होत जाते. त्यामुळे माझ्या मते, आजच्या युगातील वास्तुविशारदांनी व स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांनी एकदा तरी या वास्तुला भेट द्यावी आणि त्या वास्तुच्या स्थापत्यशैलीचे निरीक्षण करून प्रेरणा घेऊन पाहावी. तसेच इतिहासतज्ञांनी या ऐतिहासिक वास्तुला भेट देऊन शिव उत्तरकालीन इतिहासाच्या ज्ञानसागरात पोहायला हरकत नाही अन् तुमच्या-आमच्यासारख्या महाराष्ट्रीय बांधवांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात न उल्लेखलेली ही दुर्मिळ बारा मोटेची विहीर पाहण्याचे सौभाग्य प्राप्त करून आयुष्यात एकदा तरी या वास्तूला भेट देण्याची योजना जरूर आखावी.

जय जिजाऊ!
जय शिवराय!
जय महाराष्ट्र!


©®
सेजल पुंजे.