Login

बरसती अमृतधारा भाग 3 अंतिम

एका सामान्य गृहिणीची असामान्य गोष्ट
बरसती अमृतधारा भाग 3 (अंतिम )

मागील भागात आपण पाहिले की योगिनी डॉक्टरकडे गेल्यावर दूध जास्त येत असल्याने तिला त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले . तर दुसरीकडे हार्मोन्स प्रॉब्लेम मुळे अपुरे दूध येते अशी एक घटना तिला दिसते . आता पाहूया पुढे .


दुसऱ्या दिवशी बाल झोपल्यावर योगिनी आपले काढलेले दूध व्यवस्थित आईस बॅग मध्ये पॅक करून निघाली . शिल्पा मॅडम दवाखान्यात पोहोचत होत्याच . त्याच वेळेला योगिनी येताना पाहून त्यांना करा काळजी वाटली .

" योगिनी , पुन्हा काही त्रास होतोय का ? "
" नाही , उलट मला काहीतरी उपाय सापडला आहे . "
योगिनी आत आली .

तिने स्नेहा बर्वे कोणत्या रूम मध्ये आहेत विचारून घेतले आणि सरळ तिथे पोहोचली .
" स्नेहा आत येऊ का ? "
योगिनीकडे स्नेहा अनोळखी नजरेने बघत होती .

" माफ करा , आपली ओळख नसताना मी थेट आत आले .. काल शिल्पा मॅडमनी तुमच्या बाळाबद्दल सांगितले . घरी जाईपर्यंत मन अस्वस्थ होते .

एक मी आहे जिला जास्त दूध असल्याने गाठी होऊन त्रास होतोय आणि एक अशी आई आहे जिला तिच्या बाळाचे पोट भरायला पुरेसे दूध नाही . खरतर ह्या अमृतधारा प्रत्येक बाळाला मिळायला हव्या . म्हणूनच मी तुम्हाला एक सुचवू इच्छिते . " योगिनी आपले मत मांडून थांबली .


" ताई , माझ्या बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे . "

" काहीही नको , पण माझे दूध तुमच्या बाळाला पाजले तर चालेल का ? "
स्नेहा सरळ उठली आणि तिने योगिनीला मिठी मारली .


" खरतर त्याला अंगावर पाजणे मला शक्य नाही . माझेही बाळ लहान असल्याने . पण माझ्या घरून मी इथे दूध पोहोचवेल . "

योगिनी दूध देऊन बाहेर पडली आणि तिथे उभ्या असलेल्या डॉक्टर शिल्पाने तिला मिठी मारली .


" जे डॉक्टर असुनही मला सुचले नाही . तू करून दाखवले ."

" पण हे एका बाळाचे झाले . अशी मदत लागणाऱ्या बाळांसाठी काहीतर करायला हवे . "


योगिनी घरी आली ते हाच विचार मनात धरून . तिथूनच जन्म झाला बरसती अमृतधारा ह्या संस्थेचा . असे अजोड कार्य करणाऱ्या ह्या दोन्ही भगिनी म्हणूनच ह्या पुरस्काराला लायक आहेत . त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा अशी. त्यांना नम्र विनंती . "

मिसेस प्रधान थांबल्या परंतु टाळ्या मात्र थांबत नव्हत्या . पुरस्कार घेऊन घरी येताना योगिनी तृप्त झाली होती .



दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटताना योगिनीची वाट बघत मिसेस प्रधान थांबल्या होत्या .
" कॉफी घेऊया ? "
होकार मिळताच त्या समोर कॅफे मध्ये तिला घेऊन आल्या .


" योगिनी , मी देखील ह्या त्रासातून गेले आहे . आपले जास्त झालेले दूध फेकून देताना झालेल्या वेदना झेलल्या आहेत . परंतु मला असा मार्ग सापडला नाही . "

" काकू,मला लाजवू नका . एक चांगले काम मला सुचले आणि मी ते पुढे चालवले इतकेच . "

" पण तुझ्या ह्या कार्यात मलाही सहभागी व्हायला आवडेल . "


" खर सांगू , हे काम करताना जागा आणि मनुष्यबळ दोन्ही खूप कमी पडत आहे . तुम्ही द्याल ती मदत मला हवीच आहे . "

त्यानंतर छान गप्पा मारून दोघी बाहेर पडल्या .



" अहो , ह्या योगिनी कदम तुमच्या ऑफिसात काम करतात ना ? "
मिसेस दामले म्हणल्या .

" हो, मानवी दुधाची डेअरी चालवते . " दामले खवचट हसले .


" खबरदार , पुन्हा असले शब्द वापरले तर . आपल्या चिऊचे ऑपरेशन विसरलात की काय ? स्तनात झालेल्या गाठी , त्यानंतर आलेल्या शंका , झालेली ऑपरेशन आठवतात का दामले ?

मी ह्या पोरीसोबत काम करणार . आपल्या एरियात अशा मुलींची मदत करणार . नंबर देता ना ? "

दामले निमूट नंबर देऊन बाहेर गेले तरी त्यांना कुठेतरी ते पटले होतेच .



" योगिनी , आज संध्याकाळी भेटशील ? "
डॉक्टर शिल्पा मॅडमचा फोन आला आणि तिने होकार कळवला .

ऑफिसची कामे आटोपून तिथे जायला जवळपास सात वाजून गेले होते.

" सॉरी शिल्पा मॅडम . इतक्या अचानक का बोलावले ? "

" सिस्टर त्यांना आत पाठवा . "
मिसेस प्रधान आणि त्यांच्या सोबत आणखी एक त्यांच्याच वयाची महिला आत आली .

" हीच का योगिनी ? पोरी भारीच काम करते आहेस बरं . " त्या दुसऱ्या बाई म्हणाल्या .

" सुधा अग आधी ओळख करून दे . "

" अगबाई तूच सांग माधवी . "

" योगिनी , ही माझी मैत्रीण सुधा परांडे . तुला म्हणाले होते की मलाही तुला मदत करायची आहे . तर माझ्या मैत्रिणीचा शहराच्या मध्यवर्ती भागात बंगला आहे. "


" पुढचे मी सांगते. योगिनी , माझी मुलगी अपुऱ्या दुधामुळे अशक्त राहून नंतर गेली . त्यानंतर दोन मुले झाली . ही अडचण परत आली नाहीच . तरीही , त्या अमृतधारा पोरीला देऊ शकले नाहीच गं .


आता मुलांना माझ्या बंगल्याचा उपयोग नाही . आजपासून बंगल्यातील काही भाग आणि सोबत मी तुझ्यासाठी . "


" आता माझी पाळी , ब्रेस्ट मिल्क बँक साठी परवानग्या, यंत्रणा वगैरे माझी जबाबदारी . पोरींनो कामाला लागा . "

दोन्ही मैत्रिणी एक वेगळीच ऊर्जा देऊन गेल्या .



" योगिनी , आवर लवकर . अमोघ , दोन्ही पोरांना घेऊन खाली ये . "
सगळे कदम कुटुंब इच्छित स्थळी पोहोचले .


समोरच पाटी होती . बरसती अमृतधारा . समोरच मिसेस दामले उभ्या होत्या . गेले महिनाभर त्या माधवी प्रधान आणि सुधाताई सोबत काम करत होत्या .



" योगिनी , चल लवकर रिबीन कापायची आहे . शिल्पा मॅडम असे म्हणताच डोळ्यात आलेले पाणी पुसून योगिनी पुढे झाली .


" आपण सगळ्याच मिळून रिबीन कापू . मानवी जीवन पुढे चालवायची शक्ती निसर्गाने स्त्रीला प्रदान केली . सोबत दिले त्या लहान जीवाला जगवायचे अमृत . कधी कधी देव अमृतकुंभ भरताना कमी जास्त करतो . पण त्या अमृताला धारण करणाऱ्या आपण ती कमी भरून काढूयात . "



आज खऱ्या अर्थाने अमृतधारा अखंड प्रवाहित होणार होत्या . म्हणतात ना, ज्योतीने ज्योत पेटते आणि अंधारला दूर पळवते . एका छोट्याशा घटनेची प्रेरणा घेऊन आज एक वटवृक्ष उभा राहत होता . योगिनी आज खऱ्या अर्थाने आनंदाच्या अमृतधारा झेलायला सज्ज झाली होती.


अष्टपैलू 2025 स्पर्धा .
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all