बर्मुडा ट्रँगल
हवाई आणि सागरी रहस्याचा त्रिकोण…. ब्ल्यू होल्स
आज मानवी संस्कृती कितीही प्रगत झाली असली, त्यांच्या विज्ञानाच्या कक्षा कितीही रुंदावल्या असल्या तरीही या पृथ्वीवर काही ठिकाणे अशी आहेत की त्यांच्या अद्भुत गूढ शक्तीची उकल अजूनही होऊ शकली नाही. त्यापैकी एक म्हणजे बर्मुडा ट्रँगल..
विनामे आणि जहाजे गायब करणारा त्रिकोण.
अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस त्याच महासागराचा एक त्रिकोणी भाग म्हणजे बर्मुडा ट्रँगल होय. जगात बऱ्याच गोष्टी अशा घडतात की त्याला शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण मिळत नाही. या भागात आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्त आगबोटी व विमाने नाहीशी झाली आहेत. हजारपेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, पण नवल असे आहे की ते अपघात होऊनसुध्दा पाण्यात बुडून मेल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
साधारणतः अपघात झाला की समुद्रात किंवा जमिनीवर विमानाचे तुकडे, जहाजांचे तुकडे, माणसांची प्रेते, तेलाचे तवंग असे काहीतरी सापडते पण या बर्मुडा परिसरात काहीही पुरावे मिळत नाहीत. जणू काही ही दुर्दैवी विमाने, जीव, जहाजे आकाशाच्या किंवा समुद्राच्या पोटात गायब झाली.
१९४५ सालापासून ह्या सैतानी सागर प्रदेशात शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या! एक हजाराहून अधिक माणसं गुढपणे बेपत्ता झाली. मोठमोठ्या शोध मोहीम राबवूनही कशाचाच काहीही मागमूस लागला नाही. ह्या विलक्षण घटनांमागे परग्रहावरील लोकांचा तर हात नसावा ना? बर्मुडा ट्रँगल मध्ये आगबोटी व विमाने जणू प्रवाशांसह आवकाशात नाहीशी होतात किंवा पृथ्वीच्या पोटात गायब होतात.
बर्मुडा ट्रँगलचा सर्वात रहस्यमय भाग म्हणजे सर्गासो समुद्र या समुद्राला ‘आगबोटी स्मशानभूमी’ म्हणतात. गंमत अशी की, हा समुद्र अत्यंत शांत आहे. या समुद्रात सरगासम नावाची वनस्पती विपुल प्रमाणात होते. या वनस्पतीमुळेच त्याला सार्गासो समुद्र हे नाव पडले. आणखी एक मोठे चमत्कारिक संभाव्य कारण आहे. ते म्हणजे समुद्राच्या तळाच्या जमिनीत खड्डे व भुयारे असतात. या खड्ड्याच्या खाली परत एक खोल प्रदेश असतो. यांना ब्ल्यू होल्स (blue holes) असे म्हणतात. समुद्रात भरती आहोटी आली की या खड्ड्यात एखाद्या नरसाळ्यातून पसार झाल्यासारखे पाणी गरागरा भोवरा होऊन फिरते व लहान बोटी तळाशी ओढल्या जातात. असले भोवरे बर्मुडा ट्रँगलमध्ये आहेत यालाच बहामा भाग असेही म्हणतात. या भागात पुष्कळ भोवरे आहेत.पण सर्वांत प्रचंड भोवरा म्हणजे नॉर्वेच्या जवळचा. ह्या भोवऱ्याचे वर्णन एडगर ऑलान पो यांनी त्यांच्या एका गोष्टीत (A Descentinto Maelstorm) केले आहे.
सर्गासो समुद्राच्या तळाशी प्रत्येक युगातील जहाजे व बोटी आहेत. असा एक समाज आहे की, पूर्वीच्या फिनिशियंस व्यापाराच्या बोटींना चांदीचे नांगर होते व काही काही जहाजे तर सोन्याने गच्च भरलेले होती.
विमाने व बोटी नाहीसे होण्याचे आणखी एक संभाव्य कारण म्हणजे युद्धातीले टारपिडोज व माईन्स त्या कुठेतरी भरकटत जाऊन फुटतात. तरी पण बऱ्याच वेळा अपघातातील कोणतेच अवशेष सापडत नाही. गेल्या २६ वर्षात या आगबोटी व विमनामधील जवळजवळ एक हजार प्रवासी नाहीसे झाले आहेत.
आजवर शेकडो विमाने या परिसरात गायब झालीत त्यापैकी एका अपघाताविषयी आपण पाहू.
३ जुलै १९४७ रोजी अमेरिकन लष्कराचे सी - ५४ जातीचे एक विमान बर्मुडाहून निघाले. त्याला पाम बीचवराच्या मॉरिसन लष्करी विमानतळावर पोहोचायचे होते, पण ते पाम बीचवर पोहोचलेच नाही. बर्मुडा आणि पाम बीच यांच्या दरम्यान मध्येच कुठेतरी रहस्यमयरित्या गायब झाले.
गायब झाल्याचे कळताच लष्करी तसेच किनारपट्टी दलाने एक तातडीची शोध मोहीम हाती घेतली. आकाशातून व समुद्रातून मिळून एक लक्ष चौरस मैलांचा प्रदेश चाळून काढला. परंतु नाहीशा झालेल्या त्या विमानाचा काहीच पत्ता लागला नाही. कोणताही पुरावा न सोडता जणूकाही ते हवेतच विरून गेले.
बर्मुडा ट्रँगल मध्ये नाहीशा झालेल्या मच्छीमार बोटी, मालवाहू जहाजं, सफारी बोटी, प्रवासी जहाजं, यांची यादी पाहिली की मन विषण्ण होतं. हे सगळे अपघात उत्तम हवामान असताना झालेले आहेत. या जहाजांचे भग्नावशेष समुद्रात कुठेच आढळले नाहीत. समुद्रात तेलाचे तवंग कधी दिसले नाहीत. जहाजांवरच्या लाईफ बोटी, जॅकेट्स कुठे तरंगताना आढळली नाहीत की कुणाचे मृतदेह सापडले नाहीत.
ज्या झपाट्याने आकाशात विमाने नाहीशी झाली त्याच झपाट्याने समुद्रात बोटी, जहाजे नाहीशी झाली. आकाश अन् सागरातील सर्व घटना एकसारख्याच गूढ. एकसारख्याच अनाकलनीय. डॉ. व्हॅलेंटाईन आणि सॅंडरमन या दोघांनी एक उपपत्ती मांडली आहे की. समुद्राच्या गर्भात आपल्यापेक्षाही अतिशय प्रगत अशी एखादी संस्कृती वस्ती करून असावी.
समुद्र गर्भातले हे लोक आपली वाहनं आणि माणसं पळवून नेत असावेत. ज्याअर्थी अपघातानंतर कुठेही कुठलाच पुरावा मिळत नाही. त्याअर्थी या विधानात तथ्य असू शकतं. जोपर्यंत विज्ञान हे अद्भुत रहस्यमयी शक्तीची उकल करू शकत नाही. तोपर्यंत हे सत्य मानावयास हरकत नाही.
—------
सौ. वनिता गणेश शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा