शीर्षक- बरोबरी
जलदकथा लेखन - नोव्हेंबर २०२५
विषय - एका हाताने टाळी वाजत नाही / दुरून डोंगर साजरे
जलदकथा लेखन - नोव्हेंबर २०२५
विषय - एका हाताने टाळी वाजत नाही / दुरून डोंगर साजरे
बरोबरी भाग (१)
“काय हो शालूताई, तुमचा अंकित आजकाल येत नाही इकडं?” शालूताईंच्या शेजारच्या बाई त्यांना विचारत होत्या. गावातल्या मंदिरातल्या कीर्तनासाठी सगळ्या बायका जमलेल्या होत्या. कीर्तनकार अजून यायचे होते. तितक्यात सुनंदाबाईंनी शालूताईंना प्रश्न विचारला.
“एका हातानं टाळी वाजत नाही हे म्हणतात ते खरंच आहे.” शालूताई स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या डोळ्यासमोर मात्र मध्यंतरी घडलेल्या घटना फेर धरू लागल्या.
***************************************
“आई, आवडला ना तुला फ्लॅट? हा सॅम्पल फ्लॅट आहे. आपण जर फ्लॅट घेतला तर सगळं फर्निचर वगैरे केल्यावर तो असा दिसेल. बाबा घरी आले की त्यांना सांग माझा फोन येऊन गेला म्हणून. त्यांनाही मी व्हिडीओ काढून पाठवतो. बोलतो नंतर.”अंकित शालूताईंसोबत म्हणजेच त्याच्या आईसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता.
“ठीक आहे. बोलू नंतर.” शालूताईंनी फोन बंद केला. तितक्यात महेशराव संध्याकाळचा फेरफटका मारून घरी परत आले होते.
“अहो, आताच अंकितचा फोन येऊन गेला म्हणजे व्हिडिओ कॉल. तो आणि पल्लवी कोणतातरी फ्लॅट बघायला गेले होते. त्यांना तो फ्लॅट आवडला म्हणत होते. मला विचारत होते आवडला का म्हणून.” शालूताईंनी लगेचच महेशरावांना ही गोष्ट सांगितली.
“हो का, मग?” महेशराव
“मग काय,, काही नाही. अंकित तिकडंच राहणार आहे असं दिसतंय.” शालूताईंचं तोंड वाकडं झालं.
“तिकडंच राहणार ना, आता आय.टी. कंपनीत काम करणाऱ्यांना पुणे, मुंबई, बेंगलोर अशाच शहरात नोकऱ्या मिळतात. इकडं येऊन तो काय करणार?” महेशराव
“ते ही आहेच म्हणा.” शालूताई
“तुझा चेहरा का पडलाय? आवडला नाही का तुला फ्लॅट?” महेशराव
“न आवडायला काय झालं? नशीबवान आहे पल्लवी. नाहीतर आम्ही. एवढा पस्तीस वर्षांचा संसार झाला पण अजूनही ह्याच जुन्या घरात पडून आहोत. तेच जुने कपाटं, त्याच जुन्या रॅक, तोच जुना ओटा अगदी भांडे-कुंडेही तेच. आम्हाला कधी स्वप्नं नव्हती की आमच्या कोणत्या इच्छा नव्हत्या.” शालूताई बडबड करत होत्या.
“असं का म्हणतेस?” महेशराव
“मग, म्हणू नको तर काय. मलाही कधी वाटलं असेल ना की घरात बदल करावेत, आपल्या मनानं घर सजवावं; पण काटकसरीनं संसार करायचा होता ना, तिथं स्वप्नांना जागाच नव्हती. पल्लवीला मात्र सगळं तिच्या मनासारखं मिळतंय.” शालूताईंचा कंठ दाटून आला होता.
“तिचा काळ वेगळा आहे, आपला काळ वेगळा होता.” महेशराव
“का बरं? आपल्या काळात काय कुणी चांगली घरं बांधली नाहीत का? की जुन्या घरांची दुरुस्ती केली नाही.” शालूताईंची चिडचिड सुरू होती.
“नव्हता माझा पगार तेवढा. झालं? हेच ऐकायचं होतं ना.” महेशराव
“पण आता रिटायर्टमेंटनंतर मिळालेत ना पैसे. ते काही नाही. मलाही हे घर व्यवस्थित करून पाहिजे. अंकितचा फोन येईलच. त्याच्या घरासाठी त्याने पैसे मागितले तर तुम्ही सरळ नाही म्हणा. आणि आपल्या घराचं काम सुरू करा. इतके वर्ष कधी माझ्यासाठी काही केलं नाही, आता एवढं तरी करा.” शालूताई म्हणाल्या. व्हिडिओ कॉलवर अंकितनं दाखवलेला पॉश फ्लॅट त्यांच्या डोळ्यांसमोरून काही केल्या जात नव्हता.
थोड्या वेळाने महेशरावांना अंकितचा फोन आला.
“अरे अंकित, मी तुला फोन करणारच होतो. संध्याकाळी एका मित्राकडे गेलो होतो, ठेकेदारच आहे तो. अरे आपल्या एरियात समोरच्या गल्लीत सिमेंट रोड झाले आहेत. आता काही दिवसांत ते लोकं आपल्याकडे रस्ता करायला येतील. आपलं अंगण खाली दबेल. मी म्हणत होतो की अंगणात भर टाकून घेऊ आणि सोबतच घरातलंही थोडं काम करून घेऊ. स्वयंपाकघरातला ओटा वगैरे.” अंकित काही बोलायच्या आतच महेशरावांनी आपली गोष्ट त्याच्यासमोर मांडली.
“हो, करा ना बाबा. मी पाठवलेला व्हिडीओ पाहिलात का तुम्ही?” अंकित
“हो रे. चांगला आहे फ्लॅट. बघ, तुझ्या बजेटमध्ये बसत असेल तर घे. पल्लवीही कमावती आहे, दोघे मिळून ठरवा.” महेशरावांनी बोलून फोन ठेवला. त्यांचं बोलणं ऐकून शालूताई मात्र मनोमन सुखावल्या.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा