बरोबरी (भाग २)
“काय रे अंकित? काय झालं?” अंकितचा पडलेला चेहरा बघून पल्लवीने त्याला विचारलं.
“माझ्या घरून हा फ्लॅट घ्यायला काही मदत होईल असं दिसत नाहीये. आत्ताच बाबांसोबत बोललो, घराचं रिनोव्हेशन करायचं म्हणत होते. मग त्यांना पैसे तरी कसे मागणार?” अंकित
“हो का? करू दे. आपलं काही सेविंग आहे आणि सोबतच थोडं गोल्डलोन घेऊ. माझ्या घरून काही मदत मिळतेय का ते बघू. मला वाटतं, हा फ्लॅट आपण हातचा जाऊ देऊ नाही. कारण बघ ना, इथून आपली कंपनी जवळ आहे, शिवाय अजून दोन-तीन कंपन्याही आहेत. शाळाही जवळ आहेत. पुढं चालून आपल्याला मुलं झाली की त्यांनाही शाळा जवळ पडेल आणि शिवाय पजेशनही लगेच मिळणार आहे.” पल्लवी
“हो गं, सगळं खरं आहे; पण तुझ्या घरून पैसे कसे मागायचे. राहू दे. त्यापेक्षा आपण घर घेणंच कॅन्सल करूया.” अंकित
“ते बघते मी काय करायचं ते, तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस. तू फक्त आपल्या पगारावर लोन किती बसतं ते बघ. बाकी वरची रक्कम आपण गोळा करू.” पल्लवीनं त्याला आश्वस्त केलं.
अंकित आणि पल्लवीच्या सेविंग्स आणि तिच्या माहेरच्या मदतीने दोघांचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण झालं. फ्लॅटच्या रजिस्ट्रीवेळी अंकितनं महेशरावांना आणि शालूताईंना बोलावलं होतं; पण घराच्या कामाचं कारण सांगून दोघे गेले नव्हते.
इकडं पल्लवीच्या मैत्रिणीनं अगदी कमी खर्चात तिच्या घराचं इंटेरिअर केलं आणि तिकडं शालूताई अंकितनं पाठवलेला सॅम्पल फ्लॅटचा व्हिडीओ बघून तसं तसं घरात फर्निचरचं काम करून घेत होत्या.
अंकित आणि पल्लवीच्या घराचं काम पूर्ण झालं आणि त्यांनी वास्तूशांतीचा कार्यक्रम ठेवला. महेशराव आणि शालूताईंना फोन करून तसं कळवलं.
“शालू, आता जावंच लागेल. लेकाच्या घरच्या पूजेला आपण न जाणं चांगलं दिसायचं नाही.” महेशराव म्हणाले आणि पूजेच्या दोन दिवस आधी दोघे अंकितच्या घरी पोहोचले.
पल्लवी आणि अंकित दोघे त्यांना नवीन फ्लॅट दाखवायला घेऊन गेले.
“अरे अंकित, हा फ्लॅट तर वेगळाच दिसतोय! तू आम्हाला व्हिडिओ पाठवला होता तसा नाहीये.” शालूताई अंकितला म्हणाल्या.
“अगं आई तो सँपल फ्लॅट होता. बांधकाम तसेच आहे पण बाकी फर्निचर वगैरे आपण वेगळं केलं. त्या फ्लॅटमध्ये बिल्डर लोकं दाखवतात की सामान ठेवल्यावर कसं दिसू शकतं. पल्लूची मैत्रीण इंटेरियर डिझायनर आहे. तिनं अगदी कमी पैशात सगळं करून दिलं.” अंकित
शालूताईंचा मात्र चेहराच उतरला. त्यांच्या रिनोव्हेशन केलेल्या घरापेक्षा हा फ्लॅट जास्त चांगला दिसत होता.
घराचं काम बघत बघत शालूताई स्वयंपाक घरात गेल्या आणि त्यांनी महेशरावांना आवाज दिला.
“अहो, हे बघा ही शेगडी कशी आहे! ओट्यात फिट्ट बसवली आहे. आपणही असे शेगडी बसवू.” शालूताई महेशरावांना म्हणाल्या.
“आताच तर आपल्या घराचं सगळं काम झालं आहे. ही अशी शेगडी बसवायची म्हणजे पुन्हा ओटा तोडफोड करावा लागतो आणि तसंही स्वयंपाक करताना तुला उतू घालवायची, सांडवायची इतकी सवय आहे की प्रत्येक वेळेला ही शेगडी बाहेर काढून दुरुस्त करणं आपल्या गावाकडल्या माणसांना जमणार नाही.” महेशराव म्हणाले.
“ते मला काही माहीत नाही. मला अशी शेगडी हवी म्हणजे हवी. मला वाटलं होतं माझं घर पल्लवीच्या घरापेक्षा जास्त चांगलं दिसेल पण इथं तिचं घर सगळ्या गोष्टीत सरस दिसतंय.” शालूताई हट्टाला पेटल्या होत्या.
“हे बघ, आता माझ्या जवळचे पैसे संपले. जी काही पेन्शन जमा होती, ती सगळी घराच्या दुरुस्तीमध्ये लावली. आता तू नवीन काही खुसपट काढू नको.” महेशराव शालूताईंना म्हणाले.
दोघांचा संवाद पल्लवीच्या कानावर पडला. आपली सासू आपल्या सगळ्या गोष्टींची स्पर्धा करते या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटलं. त्यादिवशीपासून तिचं शालूताईंसोबतचं वागणं बदललं.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा