Login

बरोबरी (भाग ३)

बरोबरी करावी; पण कुणासोबत?
बरोबरी (भाग ३)

अंकितच्या घराची वास्तुशांती झाल्यावर शालूताई आणि महेशराव बरेच दिवस तिथे राहायला होते. अंकितनं दोघांना राहायचा आग्रह केलाही होता. पल्लवी मात्र शालूताईंसोबत अगदी काहीच न बोलता राहू लागली आणि अंकितच्या लक्षात ही गोष्ट आली होती.

एक दिवस त्याने रात्री बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला.

“अंकित, तुम्ही तिघे जाऊन या ना. माझं खूप डोकं दुखतंय. प्लिज.” पल्लवी त्याला म्हणाली.

“हरकत नाही. आपण तिघे जाऊन येऊ.” शालूताई लगेच अंकितला म्हणाल्या. त्याचाही नाईलाज झाला. आई बाबांना सोबत घेऊन तो हॉटेलमध्ये गेला.

“पल्लवी, तुला असं वाटत नाहीये का तू माझ्या आईसोबत नीट वागत नाहीयेस.” हॉटेलमधून परत आल्यावर त्यानं पल्लवीला विचारलं.


“अंकित तुला माझं वागणं, तुसडेपणा, न बोलणं सगळं दिसतंय; पण तुझ्या आईचं वागणं दिसलं नाही.” पल्लवी म्हणाली.

“म्हणजे नीट काय ते सांग.” अंकित

“एका हाताने टाळी वाजत नाही अंकित.” पल्लवी म्हणाली.

“हे बघ पल्लवी, जे काही आहे ते स्पष्ट स्पष्ट बोल.” अंकित म्हणाला.

“स्पष्टच सांगते. मला नाही आवडत अंकित असं माझ्या सगळ्या गोष्टींची बरोबरी केलेलं, स्पर्धा केलेली. स्पर्धा करावी रे. पण कुणासोबत?” पल्लवी म्हणाली.

“बरोबरी! कोणी केली बरोबरी?” अंकितनं पल्लवीला विचारलं.


“आईंनी.. बघ ना आपण नवीन घर घ्यायचं म्हटलं की लगेच त्यांनी त्यांच्या गावातल्या त्या घराचं रिनोव्हेशनचं काम काढलं.”पल्लवी म्हणाली.

“अगं, त्यात काय एवढं. चालायचं अशा गोष्टी. आपल्या दोघांच्या वेळा एकच आल्या म्हणून.” अंकित म्हणाला

“तसं नाहीये अंकित. ही एवढीच एक गोष्ट नाहीये. त्यादिवशी पण बघ, तू आणि मी फोनवर डोसे खायची गोष्ट केली होती. घरी आल्यावर मी इन्स्टंट डोसे करता यावेत म्हणून रवा भिजू घातला आणि त्याच्यासोबतच नुसती नारळाची चटणी केली; पण आईंनी लगेच दुसऱ्या दिवशी डाळ-तांदूळ भिजू घालून, सांबर बटाट्याची भाजी, चटणी असा साग्रसंगीत डोसा करून हा डोसा किती चांगला लागतो हे सिद्ध केलं.

नंतरही मी नुसती फ्लावरची भाजी केली तर त्यांनी अगदी दुसऱ्याच दिवशी फ्लावर सोबत बटाटा कसा चांगला लागतो हे सिद्ध करत फ्लावर बटाटा भाजी केली. हे तर आत्ताच झालं रे पण मी लग्न झालं तेव्हापासून बघते, आई नेहमी अशाच करतात. लग्नानंतरही आपण दोघं हनिमूनला गेलो तर त्या लगेच बाबांना घेऊन तीर्थयात्रेला गेल्या. घरात मी पंजाबी ड्रेस घालू लागले तर त्यांनीही घरात लगेच गाऊन वापरायला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी कधी गाऊन घातलाही नव्हता. अशा कित्येकच गोष्टी आहेत. फिरायला जाणं असो, कपडे घेणं असो किंवा आता हे घराच बघ.

इथेही एका हाताने टाळी वाजत नाही. बाबांची त्यांना प्रत्येक गोष्टीत साथ असते. तुला आठवतं, आपण मागच्या वर्षी कार घेतली आणि तुझ्याही घरी लगेच महिन्याभरात कार घेतली.”पल्लवी म्हणाली.


“मग, तुझ्या मते आता काय करायला हवं?” अंकित तिला म्हणाला.

“माहित नाही. अंकित मी माझ्या मनातली सल फक्त तुला बोलून दाखवली- पण तुही बघ आई कशा माझ्या सगळ्या गोष्टींत बरोबरी करतात, स्पर्धा करतात.” पल्लवी

“तसा आईचा स्वभाव होताच आधीपासून असा. माझ्या काकू, आत्या यांच्यासोबत आई नेहमी अशीच करायची; पण तुझ्यासोबतही तिने असं वागावं ही अपेक्षा नव्हती.” अंकित म्हणाला आणि काय करता येईल विचारात गुंग झाला ।

क्रमशः