बरोबरी (भाग ४)
पल्लवीनं शालूताईंचं वागणं अंकितच्या कानावर घातलं होतं. तेव्हापासून अंकितही शालूताईंच्या वागण्याचं निरीक्षण करू लागला.
एक दिवस पल्लवीनं भेंडीची भाजी केली. दुसऱ्या दिवशी लगेच शालूताईंनी मसाला भेंडी बनवली. अंकित जेवायला बसला होता
“कालच भेंडीची भाजी खाल्ली होती ना! आज परत भेंडी…” ताटात भेंडीची भाजी बघून अंकित शालूताईंना म्हणाला.
“अरे काल खाल्ली ती साधी भेंडीची भाजी होती. पण बघ, त्यापेक्षाही मसाला भेंडी जास्त चांगली लागते की नाही.” शालूताई त्याला म्हणाल्या.
“भेंडी ती भेंडी. मसाला केली काय किंवा साधी केली काय.” अंकित म्हणाला.
“पण चवीत फरक पडतो की नाही?” शालूताई म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी पल्लवी ऑफिसमधून येताना मार्केटमध्ये गेली. तिनं स्वतःसाठी ऑफिसमध्ये घालता येण्यासारखे काही कपडे खरेदी केले. घरी आल्यावर तिनं अंकितला आणि शालूताईंला दोघांनाही कपडे दाखवले.
दुसऱ्या दिवशी अंकित आणि पल्लवी ऑफिसमध्ये गेल्यावर दुपारी शालूताई महेशरावांना घेऊन मार्केटमध्ये गेल्या आणि त्यांनी स्वतःसाठी साड्या घेतल्या.
संध्याकाळी अंकित आणि पल्लवी ऑफिस मधून आल्यावर त्यांनी त्या साड्या दोघांना दाखवल्या. अंकितला मात्र आता खात्री पडली शालूताई पल्लवीची सगळ्या गोष्टी बरोबरी करायचा प्रयत्न करत होत्या.
साड्या आपल्या खोलीत नेऊन ठेवून त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागल्या.
“आज बघ आलू-वांग्याची भाजी होते की नाही ते कारण काल मी वांग्याची भाजी केली होती.” पल्लवी अंकितच्या कानात खुसपुसली आणि स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली.
शालूताई वांगे आणि बटाटे चिरत होत्या. अंकितही पल्लवीच्या मागोमाग गेला.
“हे काय! आज परत वांगे.. कालच वांगे खाल्ले होते ना?” अंकित म्हणाला.
“अरे,काल नुसती वांग्याची भाजी खाल्ली होती. ती काय चांगली लागते का? हे बघ वांगे बटाट्याची भाजी कशी लागते ते.” शालूताई म्हणाल्या.
“आता काहीच म्हणू नकोस. उद्या अजून एक मज्जा बघ.” पल्लवी त्याच्या कानात खुसपुसली.
दुसऱ्यादिवशी पल्लवी ऑफिसमधून जरा उशिराच आली.
“अंकित, हे बघ. मी काय आणलं ते.” पल्लवी अंकितला म्हणाली तशा शालूताईही तिथं आल्या. पल्लवीनं कुठल्याश्या सोनाराच्या दुकानातून एक हार आणला होता.
“मस्त आहे ना! हिऱ्याचा आहे! अरे माझ्या ऑफिसमध्ये ती सायली नाही का, तिच्यासोबत दुकानात गेले होते. मला जाम आवडला. मग काय घेऊन टाकला.” पल्लवी त्या हाराचा बॉक्स ती अंकित समोर धरत म्हणाली. तो हार बघून शालूताईंचे मात्र डोळेच चमकले. पल्लवीनं लगेच तो बॉक्स कपाटात ठेवून दिला.
“अगं, हे काय? एवढे पैसे तुझ्याकडून कुठून आले.” रात्री झोपायला गेल्यावर अंकित पल्लवीला म्हणाला.
“अरे बॉक्स फक्त सायलीचा आहे. हार दोनशे रुपयांचा आहे फक्त. आता तू मजाच बघ.” पल्लवी म्हणाली आणि तोंडावर पांघरूण घेऊन झोपून गेली.
दुसऱ्यादिवशी अंकित आणि पल्लवी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेले आणि परत आले. शालूताई घरात तोंड पाडून बसल्या होत्या.
“आई, काय झालं? बरं वाटतंय ना?” अंकित
“अरे काल तुझ्या बायकोने हिऱ्याचा हार घेतला. मला किती दिवसांपासून छोटं मंगळसूत्र करायचं आहे. तुझ्या बाबांना म्हटलं मला घेऊन द्या तर त्यांच्याजवळ पैसे नाहीयेत. तू चल माझ्यासोबत आणि मला घेऊन दे.” शालूताई लगेच अंकितला म्हणाल्या.
क्रमशः
©® डॉ.किमया मुळावकर
©® डॉ.किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा