Login

बायको नको मैत्रीण हवी

लग्नाआधी होणाऱ्या बायकोला भेटण्याची ओढ आणि फुलत जाणारी मैत्री
बायको नको मैत्रीण हवी

टीम : सोनल शिंदे

लघुकथा

"काय, मुलीला भेटायचं म्हणतायतं? ते सुद्धा लग्नापूर्वी? अहो भाऊसाहेब, तुमच्या शहरात चालत असेल हो, पण आमच्या गावात नाही पटतं हे लोकांना. त्यात आमचे साहेब पण बाहेरगावी म्हटल्यावर, तुम्ही पेचात पाडलं बघा आम्हाला." सुमनताई फोनवर बोलत होत्या.

सुमनताईंच्या मुलीला म्हणजेच मुग्धाला, शहरातलं स्थळ सांगून आलं होतं. एका मुलीला श्रीमंताच्या घरी, शहरात देऊन सुमनताई आधीच पस्तावत होत्या. शहरातल्या माणसांवर त्यांचा अजिबात विश्वास राहिला नव्हता. मुग्धाच लग्न आपल्या बरोबरीच्या, सर्वसामान्य घरात करायचं ठरवलं होतं त्यांनी, परंतु मध्यस्थी केलेल्या भाऊसाहेबांनी विश्वास दिला. म्हणाले, "सगळेच लोक वाईट नसतात" त्यांनी समजावून सागितलं आणि त्यांच्या मध्यस्थीने मुग्धाचं लग्न ठरलं.

लग्न ठरल्यानंतर, निरंजन आज पहिल्यांदाच मुग्धाला भेटायला येणार होता. सुमनताईंनी स्पष्टच सांगितलं, "भेट एक वेळ ठीक आहे, पण लग्न होईपर्यंत एकट्यात फिरायला वगैरे.. आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका." मध्यस्थानी सुद्धा याबाबत निरंजनला कळवलं होतं. निरंजनला ते मान्य होतं; त्यामुळेच आज तो भेटायला निघाला होता. लग्नाआधी आपल्या जोडीदाराला भेटायची ओढ त्याला लागली होती.

"काय, नवरा मुलगा आजच येणार आहे. निघाले पण.. अरे देवा!" सुमनताईंना कळलं आणि त्यांची धावपळ सुरू झाली.

"मुग्धा, अगं जावई येतायेत. निघालेत पण ते. जा तू तयार हो पहिले. साडी नेस छानशी." सुमनताईंनी सुचवलं.

"आई, अगं बघायला येत आहेत का ते? आणि आज असे मध्येच, अचानक कशाला येत आहेत? उगाच. आज मी नाही नेसणार साडी वगैरे." मुग्धाने स्पष्टच सांगितलं.

"जा मग छानसा एखादा सलवार सूट घालं." सुमनताईंनी सांगितलं.

हॉलमधला होता नव्हता सगळा पसारा त्यांनी एका झटक्यात आवरून घेतला. फडक्याने फटाफट सोफा झटकला. टेबलावरची धूळ फडक्याने पुसून घेतली. अंगणातली चार फूल आणून ती फुलपात्रात खोचली. पंखा सुरू करून ठेवला आणि एका कोपऱ्यात छान सुगंधित उदबत्ती लावली. दरवाजात नवीन पायपुसण ठेवलं.

मुग्धा आईची लगबग बघत होती. "आई एवढं सगळं कशाला गं? तू न जरा जास्तीच करतेस? मुलगा झाला म्हणून काय जावयाचं पाय धुवून पाणी प्यायचं नसतं." मुग्धा चिडलीच होती जराशी.

"तुला नाही कळणार." सुमनताईंनी तिला गप्प रहायला सांगितलं .

तुम्हा पोरींना नाही कळायचं त्यातलं काही. मुलाकडली मंडळी हे सगळं बघतात. बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असतं त्याचं. थोड जरी कमी जास्ती झालं तरी आयुष्यभर मग मुलीला ऐकून घ्यावं लागतं. चूक कोणाची का असेना, पण सहन मात्र मुलीला करावं लागतं. येऊन जाऊन टोमणे ऐकावे लागतात." सुमनताईंच्या शब्दात काळजी होती.

"आता तुझे बाबा बघ बरं. आमच्या लग्नात वांग्याची भाजी कमी पडली होती. आज पंचवीस वर्ष झालीत आमच्या लग्नाला, पण त्यावरून ऐकवतात आजही. लग्नात रुखवताच्या लोणच्यात मीठ जास्ती झालं तर तुझ्या आजीने मला किती दिवस सुनावलं होतं."  सुमनताईंची बडबड सुरू होती.

"आई, अगं आपण मुलीकडले लोक ना! मुलाकडच्या लोकांना जास्तीच डोक्यावर चढवून ठेवतो. हेच मला पटत नाही." मुग्धा बोलत होती.

"आठवतंय, आपल्या मोठ्या जिजाजींचा, किती मानपान केला तुम्ही लोकांनी. तरी पळसाला पानं तीन अशी गत झाली. शेवटी जिजाजी मानपानाला रुसलेच होते ना! काय तर म्हणे ताईच्या डोहाळे जेवणात माझ्या घरच्यांना आहेर नाही केला.. त्यादिवासापासून त्यांनी आपल्या घरी यायचं बंद केलं. या मुलाकडच्या लोकांचा किती पण मानपान करा.. आपण पुरून उरूच शकत नाही. आपण केलेल्या मानपानाने त्यांचं पोट भरत नाही हेच खरं." मुग्धा चिडून बोलत होती.

"आता, निरंजन पहिल्यांदा येतायत म्हणून सगळं करायचं आहे, की यापुढे प्रत्येक वेळी तो येणार तर त्यांची खातिरदारी करावी लागणार आहे आपल्याला." मुग्धाने विचारलं.

"अगं बाई, जावयाचा मान असतो तो. आपल्याकडून होईल तेवढा सन्मान आयुष्यभर करावा लागणार. यापुढे आजन्म हे घर त्याचं ऋणी राहणार. माहेरच्या अंगणात, पहिल्या पाहुण्यांचा मान घेऊन मिरवतात ही जावई लोक." सुमनताई शांतपणे बोलल्या.

"आणि हो, लग्नानंतर तुम्ही दोघे जोडीने येणार, तेव्हा लक्ष्मी नारायण म्हणून पुजलं जाईल तुम्हा दोघांना." सुमनताई म्हणाल्या तसं मुग्धाच्या चेहऱ्यावर सौख्य दरवळलं.

"आई, माझ्या सासरी होईल ना गं माझा सन्मान! या घरात होणाऱ्या जावयाचा होतो तसा." मुग्धाने प्रश्न विचारला.

"हो तर.. आजकाल काय जल्लोषात स्वागत करतात नव्या सुनेच. आतिषबाजी करतात, फुलांच्या पायघड्या घालतात. आता आपल्या गावात एवढ करतात तर शहरात अजून किती छान स्वागत होत असणारं नवीन सुनेच." आपली लेक आता लग्न करून सासरी जाणार, या विचाराने सुमनताई बोलताना हळव्या झाल्या.

"आई, अगं लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी स्वागत सगळेच करतात. ताईच्या लग्नात पाठराखीन म्हणून गेले होते मी, तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं, ताईच्या भविष्याच्या वाटेवर काटे पसरले असतील म्हणून. जगातली सगळी सुख ताईच्या पायाशी लोटांगण घालतील असं वाटलं होतं, पण झालं उलट.. आज मात्र ताईला पदोपदी अपमान सहन करावा लागतोय. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं दिसतंय सगळीकडे हल्ली; म्हणून भीती वाटते अगं." मुग्धाने लांब श्वास घेतला.

"आई, माझ्या सासरी आयुष्यभर होईल ना गं माझा सन्मान?" मुग्धाने प्रश्न विचारून सुमनताईना विचारात पाडलं.

"पोरीच्या जातीने फार अपेक्षा लावून बसू नये, पोरी."

"माझी आजी म्हणायची, नवरा देवाच्या प्रसादासारखा असतो. गोड मानून घ्यावा लागतो." सुमनताई शांतपणे बोलल्या.

दारात निरंजन उभा होता.. दारावरची कडी वाजवणार तेव्हाच सुमनताईंच दाराकडे लक्ष गेलं.

सुमनताईंनी खांद्यावरचा पदर डोक्यावर चढवला. "जावई आले गं!" हळूच कुजबुजल्या आणि मुग्धाला हळूच आवाज दिला. आणि म्हणाल्या, "जा पाणी घेऊन ये पटकन." मुग्धा स्वयंपाक घरात जाऊन, पिण्यासाठी पाणी घेऊन आली.

"अगं!" सुमनताई धावपळ करत, स्वयंपाकघरात गेल्या आणि तांब्याभर पाणी घेऊन आल्या.

"घ्या जावई, पाय धुवा!" आर्जवी आग्रह करत त्यांनी निरंजनला पाय धुवायला सांगितलं. सुमनताईंनी लगेच हातपाय पुसायला नॅपकिन निरंजनाच्या हातात दिला. हात पुसतच, निरंजन घरात येऊन सोफ्यावर बसला.

"मुग्धा पाणी दे गं." त्यांनी मुग्धाला सांगितलं.

मुग्धा ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली. निरंजन समोर पाण्याचे ग्लास असलेला ट्रे धरला.

निरंजनने पाण्याचा एक ग्लास उचलला. पाणी पिताना नजर वर करून त्याने हळूच मुग्धाकडे बघितलं. घटाघटा पाणी घशात ओतलं. "जाम तहान लागली होती. पुन्हा एक ग्लास."असं म्हणत त्याने मुग्धाकडे बघितलं. तिने आता ट्रे मधला ग्लास त्याच्या हातात दिला. ग्लास घेताना तिच्या बोटांना स्पर्श झाला आणि निरंजनच्या पहिल्या स्पर्शाने ती मोहरली. तिच्या चेहऱ्यावर क्षणात लाजेची लाली पसरली.

मुग्धा आणि निरंजनच नुकतंच लग्न ठरलं होतं.  निरंजन शहरात राहणारा तर मुग्धा गावात राहणारी. ती गावातल्या शाळेतच शिकली होती. आवाजात गोडवा होता तिच्या. भजन छान म्हणायची. आजकाल तर कार्यक्रम देखील करायची. अशाच एका कार्यक्रमात निरंजनच्या आईने तिला बघितलं आणि फक्त तिच्या सुरेल आवाजानेच नाही, तर तिच्या चेहऱ्यावरच्या तेजाने ही त्या मुग्ध झाल्या. निरंजनसाठी त्यांनी मनोमन तिला पसंत केली. पुढे योग जुळून आला. बघण्याच्या कार्यक्रमात बघता क्षणी निरंजनला देखील मुग्धा आवडली. लग्नाची तारीख चार महिन्यांनंतरची निघाली होती. लग्नापूर्वी मुग्धाला एकट्यात भेटावं असं निरंजनला मनातून वाटतं होतं.. आणि आज त्याच हेतूने तो मुद्दाम वेळ काढून मुग्धाला भेटायला आला होता. भल्या पहाटे निघून तो सकाळी सकाळीच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या त्याच्या सासरी पोहचला होता.

निरंजन चहा पित नाही, सुमनताईंना माहिती होतं. त्यांनी मुग्धाला लिंबू सरबत बनवायला सांगितलं. मुग्धाने लिंबू सरबत आणून निरंजनला दिलं. नाश्त्याची तयारी करायची; म्हणून आता दोघी स्वयंपाक घरात गेल्या. सुमनताई रव्याचा उपमा बनवत होत्या तर मुग्धा त्यांना मदत करत होती.

"काय गं जावयाने ऐकलं असतं म्हणजे. तू त्याचं नाव घेऊन बोलत होतीस. आता तू त्यांना अहो.. जाहो म्हणायला हवं. होणारा नवरा आहे, लक्षात ठेव. त्याचं नाव घेत जावू नको. बरं नाही वाटतं."  सुमनताईंनी दटावलं.

मुग्धाने हळूच होकारार्थी मान हलवली.

"अहो!" ती स्वतःशी पुटपुटली. तसं तिला हसूच आलं.

निरंजनला तिने नाश्ता नेवून दिला. सोबत बाजूला लिंबाच्या लोणच्याची फोड ही ठेवली होती.

"वाह! लोणच, तेही लिंबाचं!" त्याने पटकन लोणच्याच बोट चाटलं. ओठांचा टिचकन आवाज आणि जराशी ओठांची चाळवाचाळव केली तसं तिला धस्स झालं. त्याने चोरून मुग्धाकडे बघितलं. नजरानजर झाली, मुग्धा लाजली होती. मुग्धा धावतच, स्वयंपाक घरात निघून गेली.

सुमनताईंनी आज जाण्यासाठी मुद्दामच पुरणपोळीचा घाट घातला होता. जावयाच्या आदरसत्कारात काहीच कमी ठेवायची नाही, त्यांनी ठरवलं होतं.  स्वयंपाक करताना अधूनमधून त्या बाहेर येऊन काही हवं नको ते सुद्धा बघून जात होत्या.

मुग्धाचे वडील आज बाहेरगावी गेल्याच कळलं आणि मुद्दाम निरंजनने आज तिला भेटायला जायचा प्लॅन बनवला होता. 'बघतो तर काय?' सुमनताई जावयाच्या आदरसत्कारात व्यस्त आणि मुग्धा आईला मदत करण्यात गुंतून गेली होती.

जेवणाची वेळ झाली आणि पदार्थांनी भरलेलं ताट मुग्धाने निरंजन समोर ठेवलं. एक एक पदार्थ निरंजन चवीने खात होता. सुमनताईंनी फार आग्रहाने जावयाला जेवण वाढलं. दुपार झाली होती, निघायची वेळ येऊन ठेपली तरी दिवसभरात एकट्यात मुग्धाशी चार शब्द बोलणं तर दूर, पण तिला मनभरून बघता देखील आलं नव्हतं.

"पान खाणार का?" सुमनताईंनी निरंजनला विचारलं.

"आई अहो, बसा तुम्ही निवांत.. नकोत एवढे सोपस्कार." असे म्हणत सुमनताईंनी हातात दिलेला सुपारीचा डब्बा सुद्धा त्याने बाजूला ठेवला.

"आम्ही मुलगी बघायला आलो होतो तेव्हा, बघता क्षणी मला मुग्धा आवडली. आईला तर ती पहिलेच आवडली होती. तुम्ही केलेला सन्मान सर्वांना फार भावला. तुम्ही अंगणात आमच्यासाठी पाय धुवायला पाणी ठेवलं होतं. आज सुद्धा मी बघतोय, तुम्ही किती काय काय केलं, सकाळपासून बघतोय, किती आटापिटा चालू आहे तुमचा. या सन्मानाच्या खरंच मी लायकीचा आहे का, मला प्रश्न पडलाय?" निरंजन सद्गदित झाला होता.

"मुग्धा आणि तुम्ही बोलत होतात, ऐकलं मी तुमचं बोलणं. मुग्धा तुम्हाला म्हणाली, जावयाचा त्याच्या सासरी जेवढा मान होतो त्यातला एक टक्का तरी सुनेचा तिच्या सासरी होतो का? तिला प्रश्न पडला होता.. तुम्ही तिला मुलींनी फार अपेक्षा ठेऊ नये असं सांगितलं."

आज मी मुद्दामच मुग्धाला भेटायला आलो होतो. अनोळखी असलेले दोघे, नातेवाईकांच्या संमतीने भेटतात. लग्नाच्या पवित्र बंधनाने बांधले जातात. त्यांचा संसार सुरू होतो आणि विश्वासावर पती पत्नीच आयुष्य उभं राहतं. नवरा बायकोच्या या नात्यात मात्र मैत्री व्हायची राहून जाते असं मला वाटतं."
निरंजन बोलत होता आणि त्या दोघी फक्त ऐकत होत्या.

"मला बायको नाही, तर आजन्म समजून घेणारी चांगली मैत्रीण हवी आहे. त्यासाठी हट्टाने आज मी तुला भेटायला आलेलो आहे. होशील माझी मैत्रीण." निरंजनने मुग्धाकडे बघत विचारलं.

"आपल्या दोघांची चांगली मैत्री होईल, मन जुळतील तेव्हाच तर आपलं नवरा बायको म्हणून लग्न यशस्वी होईल." निरंजन म्हणाला.

"आणि सन्मान म्हणशील तर.. आज तुला मी विश्वास देतो, की तुला आजन्म सन्मान देण्याची जबाबदारी माझी." निरंजन पूर्ण विश्वासाने बोलत होता. सुमनताईंना सुद्धा निरंजनने म्हटलेलं पटलं होतं.

"जा गं! जावयाला आपलं शेत दाखवायला घेऊन जा!" असे म्हणत त्यांनी दोघांना सोबत पाठवलं. मुग्धाने आईच्या बोलण्यावर हलकेच मान डोलावली आणि निरंजन ला सोबत घेऊन शेतात गेली. गावातून शेताच्या मधून पायवाटवरून वाट काढताना, निरांजनने विचारलं. "माझ्या आयुष्याच्या वाटेवर चालताना.. देशील मला साथ." मुग्धाने होकारार्थी मान हलवली. आज निरंजनची मुग्धाला भेटायची इच्छा पूर्ण झाली होती. बायको नको.. मैत्रीण होशील का? त्याने तिला विचारलं आणि तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं.

"मैत्री ते लग्न".. हा प्रवास आता दोघांच्या नात्याचा आठवणीत जपता येईल असा अध्याय असणार होता.

शुभांगी मस्के
0