बायको नावाचं वादळ..

प्रेम नवरा बायकोचं..
#बायको

आज पाहिलं..बायको नसली की आयुष्य कसं किचकट होतं.
"बायको..कोण असते ही बायको! घर सांभाळणारी बिनपगारी नोकर, आपल्या आईवडिलांना सांभाळणारी नर्स, आपल्या मुलांना सांभाळणारी आया की नवऱ्याचे नखरे उचलणारी किंमत शून्य व्यक्ती!
नाही माहीत ना.. मी सांगते.
बायको म्हणजे घराच स्वर्ग करणारी सुंदर परी असते. जादूची कांडी नसते तिच्याकडे पण अफाट मोठं मन असणारी एक सुंदर परी.
आपल घर सावरणारी.. एक अशी व्यक्ती जी स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नसते. ती जगत असते.. पण स्वतःसाठी नाही घरातल्या प्रत्येकासाठी. आवडी निवडी सगळ्यांच्या जपते पण स्वतःची आवड बाजूला ठेवते. कधी काही दुखल ना तर 'काही नाही ओ.. मी ठीक आहे' म्हणून पुन्हा कामाला लागते. आपल्याला बर नसल की किती प्रकारचे काढे बनवून आणेल त्याचा नेम नसतो. सगळ जेवण आपल्या आवडीच बनवून खायला घालत असते. त्यावेळी तिने आपल्याला हे आणू का.. ते आणू का.. हे सारखं विचारणं कटकट वाटत असते.
नकळत का होईना आपण बोलूनही जातो. 'इथे बर नाही वाटत आणि सारखं आपल काय देऊ..काय आणू.. म्हणून कटकट लावली आहेस. जरा शांत पडू दे मला.' आपल्या अश्या बोलण्याने ती किती दुखावते याच भानही नसत आपल्याला. डोळ्यात तरळलेले अश्रू गिळून ती गप्प बसते.
बायको...अशीच असते.
बायको नावाचं वादळ आपल्या पुढे खंबीर ठाकलेल असत म्हणून तिच्या पाठी आपण जगात वावरत असतो आणि तिने तिची मतं मांडली की 'तुला अक्कल आहे का मूर्ख कुठली' अस म्हणून चार लोकात आपण तिला अपमानित करतो.

नाही तिला अक्कल नाही तिला समज..म्हणून घर तुमचं सावरते.
तुम्ही घरी यायच्या आत सगळा पसारा आवरते.
घरी तुला काम काय असत बोलून जातात सगळे..
तू काय करतेस दुनियेच्या वेगळे!
नसते तिला हौस दागदागिने अन् पैशांची..
एकदा उबदार मिठी.. देऊन तर बघा तिला मायेची!

'तुझ्याशिवाय माझं काहीच अडत नाही' म्हणणार नवरा..बायको नसली की सगळच अडत आपल हे त्याला उमगत. बायको विना सगळ अधुर आहे हे त्याला समजत. नवऱ्या आधी जेंव्हा बायको जाते आणि नवरा एकाकी पडतो तेंव्हा त्याला बायकोची किंमत कळते. घरात आल्यावर पुढ्यात गरम गरम वरण भाताच ताट, साजूक तूप लावून गरम गरम वाढलेली पोळी आणि रोज आपल्या आवडीची भाजी असायची.. तरी त्यात 'मीठ कमी, मसाला कमी' अशी खोट आपण काढायचो याची जाणीव होते. बायको जेंव्हा सोबत नसते तेंव्हा तिची ती कटकट हवी हवीशी वाटते. तिचा अल्लडपणा आठवतो. घरातल्या भिंतींमध्ये तीच अस्तित्व जाणवत असत. बायको गेली की नवरा मनमोकळ रडूही नाही शकत कारण तो नवरा..एक पुरुष असतो. मज्जा मस्ती करणारा तो नवरा.. अचानक शांत होतो. त्याच्या विचारात राहू लागतो. एकाकी पडतो.

बायकोला अर्धांगिनी म्हंटल जात..पण तीच अर्धांगिनी जेंव्हा अर्ध्यावर साथ सोडते तेंव्हा तिच्याशिवाय आपली किंमत शून्य आहे याची जाणीव होते.
'थकली असशील दिवसभर..थोडा आराम कर.' एवढे प्रेमाचे दोन शब्द सुद्धा तिला दहा हत्तींच बळ देऊन जातात. महाग वस्तू नको असते तिला..तीच आयुष्य सुगंधित करणाऱ्या मोगऱ्याचा गजरा सुद्धा तिला स्वर्ग सुख देऊन जातो. प्रेमाने मारलेली एक मिठी नव्या दिवसासाठी नवीन ऊर्जा देत असते तिला.
बायको नावाची अल्लड,अवखळ स्त्री तुमच्या आयुष्यात आहे म्हणून तुमच्या आयुष्याला शोभा असते.
खरतर नवरा बायको दोघंही एकमेकांसाठी असतात. दोघांनी एकमेकांची काळजी घेणं..दोन क्षण प्रेमाचे सोबत घालवण हेच आयुष्य आहे. भांडण - तंटा, वादविवाद रोजच होतात पण त्यांना आपल्या आयुष्यात दुय्यम स्थान देऊन पहिल्या टप्प्यावर नेहमी प्रेमचं असावं...बायको नावाचं वादळ.. प्रत्येकाच्या आयुष्यात..प्रत्येक वळणावर..नेहमी सोबत असावं..
समाप्त....
©®
लेखिका :- श्रावणी लोखंडे