Login

अर्धांगिनी - भाग -49

बायको

अर्धांगिनी – भाग 49


दुसऱ्या दिवशी घरात शांतता असते…पण ती शांतता आता दडपणाची नसते, ती तयारीची असते.

शर्वरी खिडकीजवळ बसलेली असते. बाहेर अंधार पसरतोय, पण आत तिच्या मनात विचारांची उजळण चालू असते, सात वर्षांची वेदना, आज दोन दिवसांतच जगासमोर उघडी पडलेली असते …आणि उद्या न्यायालय.

साक्षी तिच्यासाठी चहा घेऊन येते.चहा “घे…असं म्हणते, शर्वरी कप हातात घेते, आणि म्हणते...“ वहिनी …मी कोर्टात बोलू शकेन ना?”

साक्षी तिच्या समोर बसत आणि म्हणते.....शऱू...“तू आतापर्यंत जे केलंस, ते सगळ्यात कठीण होतं.उरलेलं…तू करू शकतेस....आम्ही दोघे आहोत.” तेवढ्यात दादा बाहेरून येतो. त्याच्या हातात एक कागद असतो.

वकिलांचा मेसेज, पहिली तारीख उद्या सकाळी अकराला, तो कागद शर्वरीकडे देताना त्याचे हात थोडे थरथरतात, तो बाप, भाऊ आणि संरक्षक ह्या तीन्ही भूमिका एकाच वेळी निभावत असतो.


त्या रात्री शर्वरीला झोप येत नाही,डोळे मिटले की जुन्या आठवणींचे दरवाजे आपोआप उघडतात...तो आवाज…तो स्पर्श…ती भीती…ती उठून देवघरात जाते, आज पहिल्यांदाच ती देवासमोर रडत नाही, फक्त हात जोडते आणि हळूच म्हणते...“बाप्पा उद्या मला ठाम राहायला शिकव.”

दुसरा दिवस, न्यायालयाबाहेर गर्दी असते.

वकिल, पत्रकार…आणि त्या गर्दीत शर्वरी-  साध्या पंजाबी ड्रेसमध्ये - चेहऱ्यावर थोडी भीती, आणि एका क्षणी तिचं पाऊल अचानक थांबतं.

समोर…तो मित्र - समीर - ज्याने तिला फसवून गाडीत बसवलं, आणि मग पुढचं सगळं घडलं, सात वर्षांच्या नरकाचं मूर्त रूप - त्याला बघून क्षणभर तिचा श्वास अडकतो, हात थंड पडतात, जमीन सरकतेय असं वाटतं.

दादा तिच्या समोर उभा राहतो, आणि म्हणतो, पोलिसांनी शोधलं त्याला, पकडला गेलाय तो..”... आता सुटणार नाही तो कधीच, आणि ते आसिफ आणि आयशा पण अडकतील आता...सगळ्यांना धडा शिकवू आपण...

शर्वरी समीरला बघून जोरात रडायला लागते, त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते, अरे नालायकां वीस लाख तु घेतलेस आणि मला फसवलंस, मी तिकडे नरक यातना भोगल्या आणि तु इथे वीस लाखात मज्जा मारलीस, देव तुला कधीच माफ करणार नाही... ती त्याच्या अंगावर मारायला धावून जाते पण साक्षी तिचा हात घट्ट धरते आणि शऱू चल तू, असं बोलून तिला कोर्टात नेते..


कोर्टरूममध्ये शिरताच वातावरण बदलतं,कठोर शांतता,न्यायाधीश येतात, केस क्रमांक वाचला जातो.

वकिल उभा राहतो.“ शर्वरीला साक्षीसाठी बोलावलं जावं.”तो क्षण, शरुसाठी सगळ्यात कठीण असतो, शर्वरी उभी राहते, पाय जड वाटतात, पण ती चालते.

शपथ घेताना आवाज थरथरतो…पण ती बोलू लागते.
हळू हळू …पण स्पष्टपणे सगळं सांगते.

....

आरोपीचा वकील उभा राहतो.
तीक्ष्ण प्रश्न…संशय…
“तू उशिरा तक्रार का केलीस?”“तू विरोध का केला नाहीस?”“हे सगळं तुझ्या संमतीने झालं नाही ना?”
प्रश्न घावासारखे असतात.
शर्वरी क्षणभर गप्प होते, संपूर्ण कोर्ट तिच्याकडे पाहतं.
मग ती चिडते आणि म्हणते...
“मी उशिरा बोलले…कारण मनात भीती होती.
कोणताही अन्याय कधीच संमतीने होत नाही.”


कोर्टरूममध्ये शांतता पसरते.न्यायाधीश गंभीरपणे तिच्याकडे पाहतात, तो क्षण शर्वरीसाठी विजयाचा नसतो…पण स्वतःला परत मिळवण्याचा असतो.

साक्ष संपते, तिला बसायला सांगितलं जातं, दादा तिच्याकडे पाहतो, डोळ्यांत अभिमान.साक्षीच्या ओठांवर हळूसं हसू, तिथून बाहेर पडताना शर्वरीच्या पायात अजूनही थरकाप असतो…ती पायऱ्यांवर उभी राहते, आजही आकाश ढगाळलेलं असतं.
पण तिला माहिती असतं न्याय लगेच मिळेलच असं नाही…पण आज तिने सत्याला आवाज दिलाय, आणि तो आवाज कधीच पुन्हा गप्प होणार नाही.


(पुढील भागात - मीडियावरचा हल्ला आणि शर्वरीच्या संयमाची खरी परीक्षा…)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all