Login

अर्धांगिनी - भाग -50

बायको

अर्धांगिनी – भाग - 50


कोर्टाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना शर्वरी थोडी थांबते, आत जे घडलं, ते तिला अनपेक्षित होतं, अजूनही तिच्या अंगावर काटा येत होता, आरोपीचे वकील त्याला वाचवायचा प्रयत्न करतील असं तिला अजिबात वाटतं नव्हतं..

ती खोल श्वास घेते…आज तीने सत्य उघड केलं होतं, पण बाहेरचं जग सत्याला कसं स्वीकारणार, ह्याची तिला कल्पनाच नव्हती, पायऱ्यांच्या खाली उतरताच कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकू लागतात.


माईक पुढे सरसावतात, प्रश्नांची सरबत्ती सुरू होते.“तुमचं नाव काय?”हे “आरोप खरेच आहेत का?”


“इतकी वर्षं गप्प का राहिलात?” कुठे होतात...“हे प्रसिद्धीसाठी तर नाही ना?”शर्वरी क्षणभर गोंधळते तिचं सगळ्यांच्या गोंधळाने डोकं दुखायला लागतं.

दादा पुढे येतो, आणि ओरडून बोलतो - माझ्या बहिणीला अजून काही बोलायचं नाही.”पण पत्रकार ऐकत नाहीत, प्रत्येक जण बातमी शोधत असतो, माणूस नाही.

एका रिपोर्टरचा प्रश्न येतो? “तुम्ही समीरला ओळखत होतात म्हणे…मग हे प्रेमप्रकरण तर नव्हतं ना?”..हा प्रश्न ऐकून शऱूच्या डोळ्यांत पाणी तरळतं…पण ती ते ढासळू देत नाही, ती एक पाऊल पुढे टाकते, सगळे शांत होतात.

“माझं नाव, माझा चेहरा, माझं आयुष्य...हे तुमच्यासाठी बातमी असू शकतं,”ती थरथरत्या पण ठाम आवाजात म्हणते.
“पण माझ्यासाठी हा लढा आहे...जगण्यासाठीचा.”

क्षणभर शांतता पसरते, कॅमेरे चालूच असतात…पण आता तिचा आवाज त्यांच्यावर भारी पडलेला असतो.

घरी परतल्यावर दुपार ओसरलेली असते, पण घरातलं वातावरण जड झालेलं असतं, टीव्ही चालू असतो, पण शर्वरीच्या डोक्यातून आजच्या दिवसात घडलेल्या घटना जातंच नसतात.. सगळं आठवून तिच्या डोळ्यांत अश्रू दाटतात.
“दादा…हे सगळं मी सहन करू शकेन ना?”
ती दादाला विचारते..
दादा तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो “लढाई कोर्टातच संपत नाही शऱू....हे समाजाचं कोर्ट आहे…...आणि इथे संयम हा सगळ्यात मोठं शस्त्र आहे.”


रात्री उशिरा शर्वरी एकटीच बाल्कनीत उभी असते.ती स्वतःशीच पुटपुटते...“मी थांबणार नाही, मी माघार घेणार नाही.
माझ्या आवाजामुळे कुणी तरी उद्या बोलण्याचं धाडस करेल.” शर्वरी म्हणते.....आज खरी परीक्षा सुरू झाली आहे,न्यायासाठी नाही…तर स्वतःवरचा विश्वास टिकवण्यासाठी.

(पुढील भागात — समीरची उलटतपासणी, कोर्टातलं धक्कादायक वळण आणि शर्वरीसमोर उभा राहणारा नवा प्रश्न…)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

कथेचे 50 भाग पूर्ण झाले आहेत, येणाऱ्या पुढील भागात आपण- शर्वरीचा भविष्यकाळ, तिचं लग्न असं सगळं बघणार आहोत, त्यामुळे वाचकहो, कथा जरूर वाचत राहा...
0

🎭 Series Post

View all