पाश्वभूमी
ही कथा आहे महेशराव व त्यांच्या कुटुंबाची. नवरा व बायको यांच्यातील गोड अतूट नात्याचं, त्यांच्यातील समस्या, भांडण, समर्पण, त्याग, प्रेम, विश्वास या सर्वांचं चित्रण करणारी ही एक हृदयस्पर्शी कथामालिका.
मुख्य पात्र :
महेशराव : नायक
मीरा : महेशरावांची पत्नी
पल्लवी : महेशरावांची मुलगी
कल्पेश : पल्लवीचा पती
आराध्या : पल्लवी व कल्पेश ची मुलगी
सुयश : महेशरावांचा मुलगा
संध्या : सुयश ची पत्नी
भाग 1
महेशराव त्यांच्या केबिन मध्ये बसलेले होते. तेवढ्यात केबिन च्या दरवाजावर कुणीतरी नॉक केलं.
"एस, कम ईन."
ते उत्तरले. एक तरुणी केबिनमध्ये आली. तिच्या हातात एक फाईल होती. ती रिपोर्ट्स बद्दल स्पष्टीकरण देऊ लागली. ती रिया होती. त्यांच्या कंपनीत कालच जॉईन झाली होती. त्यांना रियाचं बोलणं ऐकून त्यांची मुलगी पल्लवी ची आठवण आली. अगदी तसेच हावभाव, तीच भाषाशैली. ती पण एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. एका चांगल्या कंपनीत जॉब करत होती. त्यांच्या मनात आनंद व व्याकुळता असे मिश्र तरंग निर्माण झाले.
त्यांचे मन क्षणात भूतकाळात जाऊन पोहोचले. चिमुकल्या पल्लवीच्या पायांतील चैनचा छुनछुन आवाज पूर्ण घरामध्ये गुंजत होता. तिचं गोड हास्य, तिची निरागसता, तिचा कर्णमधुर आवाज, तिची मस्ती यांमुळे त्यांचं घर आनंदाने गच्च भरून गेलं होतं. त्यातच त्यांना पुत्ररत्न देखील प्राप्त झालं होतं. त्यामुळे तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांच्या घरातील दुसरं मूल, त्यांचा मुलगा सुयश याचा त्या दिवशी जन्म झाला होता. त्यांचं कुटुंब पूर्ण झालं होतं.
ते विचारांतून बाहेर पडले. रियाने त्यांच्या टेबलवर फाईल ठेवली व ती निघून गेली.
महेशराव हे एका आय. टी कंपनीत कन्सलटंट म्हणून काम करत होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झालेले होते. त्यांचा मुलगा सुयश त्याची पत्नी संध्या सह बँगलोर ला राहत होता व त्यांची मुलगी पल्लवी ही तिचा पती कल्पेश व मुलगी आराध्या सह हैद्राबाद ला राहत होते.
महेशराव मात्र पुण्यामध्ये एकटे पडले होते. त्यांची पत्नी मीरा यांचा स्वर्गवास होऊन दहा महिने लोटले होते. आज मात्र त्यांना एकटेपण खायला उठलं होतं.
ते घरी पोहोचले होते. कमलाताईंनी त्यांचा स्वयंपाक करून ठेवलेला होता. कमलाताईंनी पाण्याने भरलेला ग्लास त्यांच्या दिशेने वळवला. ते विचारांतून बाहेर आले. त्यांनी ग्लास हातात घेतला व परत विचारांमध्ये बुडाले.
कमलाताईंना ते कुठल्यातरी चिंतेत आहेत हे जाणवलं. त्यांना चिंतेतून बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या.
"जेवण वाढू का?"
त्यांनी नकारार्थी मान हलवली.
"नाही काय नाही? चला जेवून घ्या पटकन. थंडा होईल नाहीतर स्वयंपाक."
त्या त्यांच्यासाठी ताट तयार करू लागल्या. त्यांनी ताट मांडलं. तेवढ्यात त्यांना कुणाचातरी फोन आला. त्यांच्या पतीचा होता.
"बरं मी निघते. तुम्ही जेवून घ्या नक्की."
त्यांनी मान हलवली. त्या निघून गेल्या. ते बाल्कनीत आले. कमलाताईंचे पती त्यांना घेण्यासाठी आले होते. त्या गाडीवर बसल्या. त्या दोघांना सोबत बघून त्यांना त्यांच्या पत्नीची तीव्रतेने आठवण येऊ लागली. ते घरामध्ये परतले.
स्वयंपाकाचा छान सुगंध घरामध्ये दरवळत होता. त्यांना मात्र जेवायची ईच्छा होत नव्हती. त्यांनी ताट उचललं व ते ताट किचनमध्ये ठेवून आले. त्यांना आज इतकं एकटेपण अगोदर कधीच भासलं नव्हतं.
अगोदर त्यांचं पल्लवी व सुयशशी अधूनमधून बोलणं तरी व्हायचं. पण आता तर त्याचीही वारंवारिता कमी झाली होती. मुलं त्यांच्या आयष्यात खूपच मग्न झाली होती. त्यांनी स्वतःहून कॉल करून बघायचं ठरवलं.
त्यांनी अगोदर सुयश ला कॉल लावला. त्याने उचलला नाही. त्यांनी परत एकदा लावून बघितला तरीही त्याने कॉल उचलला नाही. त्यांनी स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
"कामात असेल तो कदाचित किंवा मोबाईल सायलेंट वर असेल त्याचा. त्यामुळे कदाचित त्याने फोन उचलला नसेल. काही हरकत नाही, जेव्हा कामातून फ्री होईल किंवा जेव्हा तो मोबाईल हातात घेईन तेव्हा कॉल करेल. जाऊद्या, कशाला उगाच त्याच्या कामात व्यत्यय आणावा? तसंही काही अर्जेन्ट काम नाहीये. आपण पल्लू ला लावून बघूत. कदाचित ती फ्री असेल."
नंतर त्यांनी त्यांच्या लाडक्या पल्लवीला फोन लावून बघितला. त्यांना खात्री होती की ती त्यांचा फोन पहिल्या रिंग मधेच उचलेल. त्यांनी तिच्या क्रमांकावर क्लिक केलं. बेल जावू लागली. मात्र तिने त्यांचा फोन कट करून टाकला! त्यांना या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं. त्यांना खूप यातना होऊ लागल्या.
"मुलं इतकी मग्न झालीत त्यांच्या संसारात की साधं दोन मिनिट फोनवर बोलायला पण फुरसत नाही त्यांना. आणि पल्लवीने तर फोनच कट करून टाकला! एवढे नकोसे झालो आपण आपल्या मुलांना. खरंच एका वेळेनंतर सगळेच साथ सोडून जातात. त्यांच्या त्यांच्या आयुष्यात मग्न होऊन जातात. मंग ती स्वतःची मुलं का असत नाहीत.
एक व्यक्ती मात्र नेहमी साथ देते, बायको. साथी आयुष्याची. त्यामुळेच तर तिला जीवनसाथी म्हणतात. तिची साथ अगदी मरेपर्यंत ......."
ते विचार करता करता गंभीर होऊन गेले. त्यांनी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. घर व लाईट दोन्ही बंद करून ते अंथरुणावर जाऊन पडले. त्यांना झोप येईना. आता त्यांच्या मनात एकच विचार सुरु होता.
"मीराला वाचवणं आपल्या हातात होतं! आपण तिला वाचवू शकलो असतो."
क्रमश .........
पुढील भाग लवकरच.
या कथेच्या पुढील भागांच्या अपडेट्स मिळण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद
©Akash Gadhave
Email : shabdamajhe@gmail.com