बेडूक आणि विंचू (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
बेडूक आणि विंचू

राजाच्या आदेशानुसार रामाला तुरुंगात टाकण्यासाठी नेत होते.

“आता आयुष्यभर पश्चात्ताप करत बस रामा. तुला आता समजेल या आचार्य तथाचार्य सोबत वैर घेऊन तू काय केलं आहेस.” तथाचार्य म्हणाला.

“ही..ही..ही.. असं तुम्हाला वाटतंय मान्यवर. मी इथे जास्त वेळ राहणारच नाहीये. फक्त एक तास! एका तासाच्या आतच मी तिथून निघून जाणार. जरा इकडे या. तुमचा कान तर इकडे करा.” रामाने त्याला जवळ बोलावलं.

तथाचार्य त्याच्याजवळ कान घेऊन गेला.

रामाने त्याला कानात सांगितलं; “सगळ्यात आधी मी तुमच्या या कोतवालला बुद्धू बनवून त्याच्याकडून चाव्या मिळवीन आणि मग तुरुंगाचे दार उघडून फुर्र! उडून जाईन तिथून. कोणी हवेला कितीही पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य आहे का? नाही ना! मी हवा आहे हवा. चला आता आज्ञा द्या. तासभर तुमच्या बंदिगृहाचे आदरातिथ्य घेतो.” असं म्हणून तो तिथून निघाला.

त्याला घेऊन जाताना आचार्य गोंधळून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता.

“काय झालं गुरुजी? तो पंडित असं काय म्हणाला की ज्यामुळे तुमचं तोंड श्राद्धाच्या प्रसादासारखे झाले आहे?” मणीने विचारलं.

स्वतःचे उपरणे रागाने झटकून देत आचार्य तिथून निघून गेला.

“हे काय केलंस मूर्खा? एवढ्या मोठ्या मोठ्या बाता का मारल्यास?” बंधू म्हणाली.

“आचार्यला काहीतरी उत्तर द्यायचं होतं म्हणून जे तोंडावर आलं ते बोललो.” रामा म्हणाला.

“आता काय?” बंधू म्हणाली.

“नाही माहित अजून विचार केला नाहीये.” रामा म्हणाला.

“मरणार! मरणार तू रामा आणि सोबत मलाही मारणार.” बंधू म्हणाली.

“आता का थांबला आहेस? चल.” कोतवाल म्हणाला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले.
*****************************
इथे गावात अम्मा आणि गुंडप्पा यांना रामासोबत काय घडले आहे हे काहीच माहीत नव्हते. अम्मा लाडू खात बसली होती. ती एक घास तोंडात घालणार इतक्यात ते ज्यांच्या घरात राहत होते त्यांनी तिच्याकडून ते काढून घेतले. गुडप्पा देखील अंघोळीला गेला होता त्यालाही तिथून बाहेर काढले आणि सगळ्यांना घरातून हाकलून दिले.

अम्मा आणि गुंडप्पा बाजारातून चालत होते. इतक्यात रडत रडत शारदा तिथे आली.

“उचला. उचला.” ती रडत रडत बोलत होती.

“अले काय उतला?” गुंडप्पाने विचारलं.

“माझी तिरडी उचला. सगळं संपलं.” ती रडत बोलत होती.

“हा सदल संपल. त्या पापी दोबीने यांना घलातून काडल आनी मला स्नान ग्लूहातून.” गुंडप्पा म्हणाला.

अम्माने त्याला खूण करूनच गप्प केलं आणि शारदाला काय झालं म्हणून विचारलं.

“आपण आता बरबाद झालो. रामाला खोट्या आरोपाखाली अटक केली आहे. आजीवन कारावासाची शिक्षा त्याला सुनावली आहे.” ती रडत म्हणाली.

अम्मा खुणेने बोलू लागली आणि शारदाने ते गुंडप्पाला सांगितलं. ती म्हणत होती; “मला आत्ता लक्षात आलं त्या धोब्याने आपल्याला घरातून का बाहेर काढलं ते. महाराजांनी ज्या माणसाला अपराधी म्हणून पकडलं आहे त्याच्या कुटुंबाला कोणी स्वतःच्या घरात का ठेवून घेईल.”
************************************
इथे कोतवालने तुरुंगाला कुलूप लावलं आणि बोलू लागला; “अजून वैर करून घे तथाचार्य सोबत. आता बस इथे आयुष्यभर सडत.” असं म्हणून तो तिथून जाऊ लागला.

इतक्यात रामाला काहीतरी सुचलं आणि तो जोरजोरात हसू लागला. त्याचा हसण्याचा आवाज ऐकून कोतवाल पुन्हा मागे आला.

“वेड लागलं आहे का? हसतोय कशाला?” त्याने विचारलं.

“काही नाही एक गमतीशीर गोष्ट आठवली.” रामा म्हणाला.

“गोष्ट? कसली गोष्ट?” कोतवालने विचारलं.

“ऐकवतो.” असं म्हणून रामाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. “एका नदी किनारी एक विंचू राहत होता. एक दिवशी नदीला पूर आला आणि विंचवाचा जीव धोक्यात आला. त्याने नदीतून एका बेडकाला जाताना पाहिले आणि त्याला आपले प्राण वाचवण्याची विनंती केली. यावर बेडूक म्हणाला; मी तुझा जीव तर वाचवेन पण तू मला दंश केलास तर? तर विंचू म्हणाला; अरे असं कधी होतं? कोणी जीव वाचवणाऱ्याला दंश का करेल? मी वचन देतो. मी तुला दंश करणार नाही. बेडकाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपल्या पाठीवर घेऊन तो नदीच्या पलीकडे गेला. जसा बेडूक त्याला नदी पार करून घेऊन गेला विंचवाने त्याला दंश केला. यावर बेडूक म्हणाला; तू तर वचन दिले होतेस तू मला दंश करणार नाहीस. मग? यावर विंचू म्हणाला; काय करू? माझी वृत्तीच ती आहे. दंश करणे हा माझ्या वृत्तीचा भाग आहे. तुझी चुक आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवलास.”

रामाने गोष्ट संपवली आणि म्हणाला; “यावरून काही लक्षात आलं कोतवाल साहेब?”

कोतवाल विचारात गढलेला होता. त्याला तसं बघून रामा पुन्हा बोलू लागला; “विंचू प्रवृत्तीच्या माणसाची मैत्री फक्त तोवरच आहे जोवर त्याला स्वतःचा खरा स्वभाव उघड करण्याची संधी मिळत नाही. एकदा संधी मिळाली की यांचा खरा स्वभाव बाहेर येतो. तुमच्या सोबत देखील तेच होणार आहे.”

“हे कोणाबद्दल बोलतोयस तू?” कोतवालने विचारलं.

“विचार कर. पन्नास - शंभर विंचू तर तू पाळले नसशील.” रामा म्हणाला.

त्याच्या बोलण्याने कोतवाल विचार करू लागला.
********************************
इथे तथाचार्य आनंदात पहुडला होता आणि लाडू खात होता. रामाला आजीवन कारावासाची शिक्षा मिळाल्याने तो खूपच आनंदी झाला होता.

“त्याला तडपून तडपुन मेलेलं पाहायला मजा येणार आहे.” तो म्हणाला.

“पण गुरुजी तोवर तुम्ही तर असला पाहिजेत ना.” धनी म्हणाला.

त्याने त्याला एक चापटी मारली आणि त्याच्या छातीत एक कळ आली.

“पालखी काढा लवकर.” तो म्हणाला.

“चला चला गुरुजींची जाण्याची वेळ झाली.” मणी म्हणाला.

“ए चूप! त्याने मला चिखलात पाडलं होतं त्याचं दुखणं असं सहजासहजी बरं होणार नाही. पालखी काढा आणि बंदीगृहात घेऊन चला.” तो म्हणाला.
*************************************
इथे रामा आपण मारलेला बाण बरोबर लागतोय का बघत होता. अजूनही कोतवाल विचार करतच होता.

“सगळं व्यर्थ आहे रामा हा कोतवाल हुशार आहे. तुझ्या या बोलण्यात येणार नाही.” बंधू म्हणाली.

“एक प्रयत्न तर करून बघू दे. काय माहित कदाचित बाण कुठेतरी लागेल.” रामा म्हणाला.

“तथाचार्य! तथाचार्य एक असा माणूस आहे जो वरुन चांगला दिसला तरीही विंचवासारखा धूर्त आहे.” कोतवाल म्हणाला.

“शु! जरा हळू बोला. असं ऐकलं आहे की भिंतींचे पण कान असतात. तुम्हाला सावध करणं हा माझा धर्म होता. आता बाकी तुमची इच्छा. बरं! मला एक पांघरूण आणि आसन तरी आणून द्या.” रामा म्हणाला.

कोतवाल त्याला ते आणून देण्यासाठी गेला.
************************************
इथे राजा त्याच्या महालात जेवायला बसला होता. तो कसल्यातरी विचारात आहे हे राणीला जाणवत होतं.

“जेवायला सुरुवात करा ना.” राणी म्हणाली.

“हो.” राजा म्हणाला आणि त्याने एक घास तोंडात टाकला.

तो काही बोलायला जाणार तर राणी म्हणाली; “मला माहितेय तुम्हाला काय म्हणायचं आहे. जेवण छान झालं आहे. माझ्या हातचं जेवण तुम्हाला फार आवडतं. हो ना?”

“हो.” राजा थोडं हसून म्हणाला.

“मला हेही माहीत आहे आज तुमचं लक्ष दुसरीकडे आहे. जीवनाकडे नाही.” राणी म्हणाली.

“जर तुमचा इशारा छोट्या महाराणी कडे असेल तर…” राजा बोलत होता पण त्याला तोडत राणी बोलू लागली; “नाही महाराज. मला ते नाही म्हणायचं. तुमचं लक्ष रामाकडे आहे. आज तुम्ही सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते म्हणून त्याला अटक करून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली पण तुमचं मन तो अपराधी आहे हे मानायला तयार होत नाहीये. बरोबर ना?”

“होय महाराणी.” राजा म्हणाला.
**********************************
इथे बंदी गृहात कोतवाल अंथरूण पांघरूण घेऊन आला. तेव्हा रामा एका पायावर उभे राहून वर दोन्ही हात करून उभा होता.

“हे घे अंथरूण पांघरूण आणि असं समजू नकोस तुझ्या बोलण्यात येऊन मी सगळं करतोय. मला माहित आहे तू मला तथाचार्यच्या विरोधात भडकवू पाहत आहेस पण मी तुझ्या या जाळ्यात अडकणार नाही.” कोतवाल म्हणाला.

रामा त्याची ती ध्यान मुद्रा सोडून दाराजवळ आला.

“तुम्ही शेवटचा आंबा कधी खाल्ला होता?” त्याने विचारलं.

“आत्ता काही दिवसापूर्वी.” कोतवाल गोंधळून म्हणाला.

“सोडा.” रामा म्हणाला.

“काय? आंबा खाणं सोडू?” कोतवाल म्हणाला.

“पांघरूण सोडा. असं कितीवेळ धरून उभे राहाल?” रामा म्हणाला आणि त्याने त्याच्या हातून ते घेतलं.

“आणि आंब्याचं काय?” कोतवाल ने विचारलं.

“सोडा.” रामा म्हणाला.

“सोडलं तर आता पांघरूण.” कोतवाल म्हणाला.

“आंबा खाणं सोडा. जेव्हा जेव्हा तुम्ही आंबा खाल तेव्हा तेव्हा काहीतरी समस्या या येतील. आठवा! मागच्या वेळी जेव्हा तुम्ही आंबा खाल्ला असेल तेव्हा काहीतरी नक्कीच झालं असेल.” रामा म्हणाला.

“हा! तू माझ्या हातून निसटला होतास. परंतु…” कोतवाल विचार करून म्हणाला.

“सोडा या सगळ्या गोष्टी. तुम्हाला तर माझ्यावर विश्वास नाही. पण खरी गोष्ट तर ही आहे की, तुमच्या आंब्यावर जादूटोणा करणारा तांत्रिक तथाचार्यच आहे. त्याला हेच वाटतंय तुम्ही ते आंबे खावेत आणि उपायासाठी त्याच्याकडे जावं म्हणजे तो तुमच्या कडून माल हडपत राहील. मला काय मला फक्त तुम्हाला त्या मायावी तांत्रिकापासून वाचवायचं होतं पण तुम्हाला तर ही माझी चाल वाटत असेल. माझा खेळ तर संपला आता. आलो ना आजीवन या कोठडीत. खरं सांगू? कोणाचं भलं करण्याची वेळ नाहीये आता.” रामा म्हणाला.

कोतवाल त्याच्या बोलण्याने विचारात गेला होता.

रामाने त्याची तंद्री मोडली; “ऐका! जरा मला हवन करण्याची सगळी सामग्री आणून द्या आणि तुमची इच्छा असेल तर तुमच्या जादुटोण्याच्या मंत्राचा जप देखील मी यात करू शकतो. जर तुमची इच्छा असेल तर.” रामा म्हणाला.

“हा देतो आणून.” कोतवाल म्हणाला आणि तिथून गेला.

“हे काय करतोयस तू रामा? नक्की कसलं चक्कर आहे हे?” बंधू म्हणाली.

“हे रामाचं चक्कर आहे बंधू. जर सगळ्यांना समजलं तर काय?” रामा म्हणाला.

कोतवालने त्याला सगळं सामान आणून दिलं. रामाने त्यालाही टिळा लावला.

“हे काय?” त्याने विचारलं.

“तुम्ही माझ्या अनुष्ठानासाठी सामग्री आणून दिली म्हणजे यात तुमचं ही योगदान आहेच की.” रामा म्हणाला.

“ठीक आहे ठीक आहे.” कोतवाल म्हणाला आणि तो बाजूला गेला.
***********************************
“आम्हाला समजलं आहे तुम्ही या संदर्भात काय विचार केला आहे ते.” राणी म्हणाली.

“आम्ही?” राजाने घास तोंडात टाकत विचारलं.

“हम्म. यावर उपाय म्हणजे उद्या पुन्हा सभा बोलावून त्याला तो निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक संधी द्यायचा विचार तुम्ही करताय ना!” राणी म्हणाली.

“अजून जो विचार आमच्या मनातही आला नाही तोही तुम्ही बोलून दाखवला. व्वा!” राजा स्मित करत म्हणाला.

“चला आता जेवा.” राणी म्हणाली.

राजाने तिलाही जेवायला सांगितले आणि दोघे जेवू लागले. इतक्यात छोटी महाराणी आली.

“हे काय महाराज तुम्ही जेवण सुरू पण केलं? मी तुमच्यासाठी खास पदार्थ आणला आहे.” ती म्हणाली.

राजाने आवंढा गिळत “काय आणलं आहे?” असं विचारलं.

“असा पदार्थ आहे जो बघून तुम्ही अचंबित व्हाल.” ती म्हणाली.

“अचंबित तर आम्ही होऊच याची पूर्ण खात्री आहे. आता तुम्हीच करा अचंबित.”

“हे बघा.” राणीने भांड्यावरचे झाकण काढून राजाला दाखवले.

भांड्यात हिरव्या रंगाचा कसलातरी लगदा दिसत होता. राजा कसेबसे स्वतःचे चेहऱ्यावरचे भाव लपवत म्हणाला; “वांग्याचं भरीत?”

असं म्हणत राजाने ते भांड हातात घेण्यासाठी हात पुढे केला.

“नाही नाही महाराज. वांग्याचं भरीत तर काय कोणीही बनवतं. मी हा वांग्याचा हलवा बनवला आहे तुमच्यासाठी.” छोटी महाराणी म्हणाली.

ते ऐकून राजाने हात मागे घेतले आणि म्हणाला; “हलवा? वांग्याचा हलवा? अद्भुत.”
********************************
इथे रामाने त्याला मिळालेल्या यज्ञाच्या सामग्रीतून हवन कुंडात आग लावली होती आणि त्यावर घोंगडी टाकली. कोतवाल बाहेर आला होता तितक्यात समोरून राजगुरू येताना त्याला दिसला.

“आचार्य तुम्ही? मी स्वतः भेट घेऊन तुमच्याकडे येत होतो. तुम्ही का कष्ट घेतलेत? ही घ्या तुमची भेट. जसं आपलं ठरलं होतं अगदी तसंच.” कोतवाल म्हणाला.

राजगुरूने ती थैली हातात घेतली आणि हातात उडवली.

“हे काय? एवढी कमी भेट? देवाला भेट देताना कमी देतोस आणि फळाची अपेक्षा मात्र जास्त ठेवतोस.” राजगुरू म्हणाला.

“समजून घ्या कोतवाल. इथे भेट अशी द्या आणि अशा अशी ठेवा.” धनी पहिल्यांदा मोठा हात करून आणि मग लहान करून म्हणाला.

त्याच्याकडे आचार्यने रागाने पाहिलं तेव्हा मणीने त्याला हळूच मारलं आणि म्हणाला; “जाऊ दे गुरुजी अजून लहान आहे. माफ करा.”

“हम्म! कोतवाल आमचा प्रिय शत्रू आहे कुठे?” आचार्यने विचारलं.

“तिथेच जिथे असायला हवं. कोठडीत.” तो म्हणाला.

“चला.” राजगुरू म्हणाला आणि त्याने ती नाण्यांची पिशवी धनी मणीकडे भिरकावली. त्या दोघांनीही त्यातून हळूच एक एक नाणे काढून घेतले आणि ते दोघं एका कोपऱ्यात थांबले.

“जोपर्यंत मी त्या पंडितला तडपताना बघत नाही तोवर माझ्या हृदयात होणारी जळजळ थांबणार नाही. आणि ऐक! एकदम सावध रहा. त्या पंडितने मगाशी माझ्या कानात सांगितलं होतं की तो पळून जाईल. तो इथून निसटता कामा नये.” आचार्य म्हणाला.

बोलता बोलता ते दोघे आत आले होते.

“आग! आग! कोतवाल साहेब आग लागली.” गोपण्णा त्याला सांगत आला.

“कुठे?” त्याने विचारलं.

“त्याच चोराच्या कोठडीत ज्याला राजगुरूंनी पकडून दिलं होतं.” तो म्हणाला.

ते तिघे पळत तिथे गेले.
**********************************
इथे राजा कसेबसे स्वतःचे तोंड सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एका वाटीत छोट्या राणीने त्याला वांग्याचा हलवा दिला होता आणि राजा खाऊ की नको खाऊ या संभ्रमात कसंबसं स्वतःच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने पटकन डोळे मिटून एक घास तोंडात टाकला.

“कसे लागले?” छोट्या राणीने विचारलं.

राजा काही बोलणार इतक्यात; “आग लागली.” म्हणून आवाज आला.

“काय?” छोटी महाराणी म्हणाली.

राजाने पटकन मी नाही बोललो म्हणून स्वतःच्या तोंडावर हात ठेवला.

एक शिपाई आत आला आणि त्याने बातमी दिली; “बंदिगृहात आग लागली महाराज आणि तो पंडित रामा पळून गेला.”

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all