Login

बेरीज वजाबाकी आयुष्याची( भाग १ ला)(आर्या पाटील)

जेव्हा क्षणिक मोहापायी आयुष्याची गोळाबेरीज चुकते.

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग १ ला)

©® आर्या पाटील

नेहमीसारखीच त्याने प्राजक्ताच्या फुलांनी तिची ओंजळ भरली. ती फुलं म्हणजे त्यांच्या प्रेमाचं सुवासिक प्रतिक. सरत्या संध्येला नदीकाठी प्राजक्ताच्या झाडाखाली बसून त्याने तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. भावनिक झालेल्या तिने त्या दिवशी आपल्या ओंजळीत त्यांचं प्रेम ओतप्रोत भरलं होतं. मंदधुंद सुगंध लेवून त्याचं नातंही बहरलं होतं.

ती मेघना आणि तो हर्षराज. दोन विरुद्ध टोके.विजातीय टोके एकमेकांकडे नेहमीच आकर्षित होतात विज्ञानाचा हा नियम त्यांच्या नात्याला तंतोतंत लागू पडला. मेघना अगदिच शांत, सुस्वभावी, प्रेमळ,सगळ्यांना जीव लावणारी. हर्षराज अवखळ, सळसळत्या उत्साहाचा.त्याला थांबणं माहित नव्हतं. बेभान वाऱ्याप्रमाणे तो नेहमीच प्रवाही असायचा. कॉलेजच्या दिवसांत दोघांच्या मनात प्रीतीच्या तारा छेडल्या गेल्या आणि त्याचं आयुष्य प्रेमगीत बनलं. कॉलेजनंतरही प्रेमाच्या आणाभाका त्यांनी प्राणप्रणाने जपल्या. तो तिची सावली बनला तर ती त्याची प्रेरणा. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून दोघेही आपआपल्या क्षेत्रात कार्यरत झाले.आधी शिक्षण आणि आता नोकरी यानिमित्ताने हर्षराज आपल्या घरच्यांपासून दूर शहरात राहत होता.मेघनाने त्याच्या आयुष्यातील आपल्या माणसांची कमतरता हक्काची व्यक्ती बनून नेहमीच भरून काढली होती.

           ऑफिसच्या कामानिमित्ताने परगावी गेलेला हर्षराज आज जवळ जवळ महिन्याभराने परतला होता. त्याला भेटायला मेघना त्याच्या रुमवर आली. तिचं असं त्याला भेटायला येणं नविन नव्हतं पण आज हिच भेट त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होती.ओंजळीतील प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध सबंध खोलीत दरवळला होता. या दरवळाने मात्र हर्षराज मेघनाकडे आकर्षिला जात होता.तिच्या निरागस सौंदर्याला डोळ्यांत भरत असतांना मनात मिलनाची अनामिक ओढ निर्माण होत होती.प्रेमाचं पावित्र्य त्यांनी नेहमीच जपलं होतं. आज मात्र तिला पाहून त्याला भारावल्यागत झालं होतं. तिच्या जवळ जात त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला. ओठांना तिच्या कपाळावर टेकवित स्पर्शखूण उमटवली. तिच्यासाठी हे नविन नव्हतं. आज मात्र ही स्पर्शखूण तिला वेगळीच जाणिव देती झाली. तो तिच्या गहिऱ्या मधाळ डोळ्यांत हरवत चालला होता.त्याचा उष्ण झालेला श्वास तिला स्पष्ट जाणवत होता. मर्यादेच्या पलिकडे जाऊन आज त्याचं मन जणू बंड करत होतं.आपल्या हक्काच्या व्यक्तीवर आपल्या प्रेमाची मोहोर उमटविण्याचं स्वप्न आता आसक्ती बनू पाहत होतं. मेघना तात्काळ सावध झाली.

" राज, आपल्या नात्याचं पावित्र्य आपण नेहमीच जपलं आहे. ही मर्यादा आपल्याला पाळावी लागेल." म्हणत तिने त्याला मर्यादेची जाणिव करून दिली.

" आता कोणतीही मर्यादा नकोशी वाटते. नाही सहन होत हा दुरावा." म्हणत तात्काळ त्याने तिला मिठीत घेतले.

आज त्याची ती आश्वासक मिठी तिला बंधन वाटत होती.

" आपण लग्न करुयात म्हणजे हा दुरावा कायमचा संपेल." तिने मार्ग सुचवला.

" ते तर आपण करणारच आहोत पण आधी मला स्थिरस्थावर होऊ दे.बाबांकडून तुझा हात मागतांना कोणतीच उणीव ठेवायची नाही मला." त्याने पुन्हा तेच कारण सांगितले.

" एकमेकांची सोबत म्हणजे फक्त प्रेमाची जाणिव आणि उणीव राहिलीच तर एकमेकांच्या साथीने भरून काढू." म्हणत तिने मिठी आणखी घट्ट केली.

" लवकरच आपण कायमचे एक होऊ काळजी करू नकोस." तो म्हणाला. तिच्या मुखकमलाला न्याहाळत त्याने पुन्हा एकदा स्पर्शखुणेने तिच्या चेहऱ्याचा ताबा घेतला. त्याच्या त्या हालचालीने ती बावरली. क्षणभर त्याच्या स्पर्शात असेच हरवून जावे असेही वाटले पण पुढच्याच क्षणी तिने मनाला आवर घातली.

" राज, आपण थांबायला हवं." म्हणत तिने मिठी सैल केली.

" विश्वास नाही का माझ्यावर ?" तो हक्काने म्हणाला.

" स्वतःपेक्षा जास्त पण..." बोलता बोलता ती थांबली.

" प्रेमाची ही जाणिव आयुष्यात सुखाची बेरीज करेल." तो समजावत म्हणाला.

" तु सोबत असतांना आयुष्य सुखीच आहे." ती आश्वासकपणे म्हणाली.

" मग सुखाच्या या हक्काच्या सरींत चिंब न्हाहू या." तो पुन्हा आग्रही झाली.

त्याच्या स्पर्शातून तो आग्रह स्पष्टपणे जाणवू लागला.

" नको राज. निदान आपल्या आईवडिलांच्या संस्कारांसाठी तरी आपण इथेच थांबूयात." म्हणत दुसऱ्याच क्षणी ती त्याच्यापासून लांब झाली.

ती लांब जाताच त्याच्या काळजात खोल कालवाकालव झाली. पुढच्याच क्षणी या भावनिक गुंत्यातून बाहेर पडत त्याने दिर्घ श्वास घेतला. ती दुसऱ्या बाजूने तोंड करून उभी होती.

" आय ॲम सॉरी मेघना.मी मर्यादा विसरलो. मला थांबायला हवं होतं" तिच्या पुढ्यात बसत त्याने नजर खाली घेतली.

 त्याला असं अगतिक झालेलं पाहून आता तिच कालवाकालव तिच्या काळजात झाली.

त्याला दुःखी पाहतांना तिला तिचाच राग आला.

' आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जायला नको.' तिची बुद्धी सांगत होती.

' तो सर्वस्व आहे तुझा मग त्याला सर्वस्व सोपवायला कसली भीती ? त्याच्या हक्काचं प्रेम त्याला दे.' मनाने बंड केला.

शेवटी बुद्धी हरली आणि तिने मनाचा कौल स्विकारला. त्यांच्या प्रेमाला मिलनाचा रंग चढला. तिने त्याला सर्वस्व बहाल केले.

' हे तु काय केलस ? क्षणीक मोहापायी तु वाहत गेलीस.' बुद्धीने पुन्हा डोकं वर काढलं. चुकीच्या जाणिवेने डोळ्यांच्या कडा भरल्या. त्याच्या कुशीत सामावलेल्या तिच्या नयनांतून अश्रुधारा ओघळू लागल्या. तिला रडतांना पाहून त्याचा जीव कासावीस झाला.

" मेघना, आय ॲम सॉरी.मी स्वतःला आवरायला हवं होतं. तुझ्या भावनांना जपणे हेच माझे कर्तव्य. मी आजच घरी कॉल करून आपल्या लग्नाविषयी बोलतो. लवकरच घरी येऊन तुझ्या बाबांकडे लग्नासाठी तुझा हात मागतो." म्हणत त्याने आपला निर्धार पक्का केला.त्याच्या निर्धाराने तिच्या डोळ्यांतील अश्रुधारा आनंदाश्रू बनल्या.ती आश्वासकपणे त्याच्या कुशीत स्थिरावली.

तोच तिचा फोन वाजला.आईचा फोन होता.

" मला निघावं लागेल." आवरत ती म्हणाली.

" मेघना, मी येतो घरी." तो उठत म्हणाला.

" आता नको. उद्या बाबा घरी असतील तेव्हाच ये." म्हणत तिने त्याचा हात हातात घेतला.

" लवकर ये. उशीर करू नकोस." ती भावनिक होत म्हणाली.

त्याने होकारार्थी मान हलवली. ती निघाली पण का कुणास ठाऊक तिची पावले कमालीची जड झाली होती. जाता जाता तिने पुन्हा मागे वळून पाहिले. त्याच्यावर नजर पडताच ती गहिवरली.

" मी येतो उद्या." त्याने तिच्या नजरेला शाश्वती दिली.

ती शाश्वती घेऊन ती मागे वळली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीला डोळ्याआड होईस्तोवर तो न्याहाळत होता.

क्रमश: