भाग -एक.
"हे डिवोर्स पेपर आणि हा पेन. तुझी सही झाली की आपला संबंध संपला." अजितने सुचिता समोर पेपर ठेवले तशी ती एकदम चरकली.
अजित, काय बोलतोस तू?" तिच्या आवाजाला कंप सुटला होता.
"मला घटस्फोट हवाय." तो शांत स्वरात म्हणाला.
"अरे, पण आपला इतक्या वर्षांचा संसार.."
"आपला संसार? खरंच तो आपला संसार होता?" 'संसार' या शब्दावर जोर देत तो बोलला.
"आणि अभी?"
"आठवड्याभरपूर्वीच त्याचा विसावा वाढदिवस साजरा झालाय. चांगलं वाईट कळतं त्याला. तो लहान नाहीये त्यामुळे त्याची कस्टडी वगैरे कोणाकडे हा प्रश्नच नाहीये. त्याला ज्याच्याकडे वाटेल त्याच्यासोबत राहू शकतो. तुझ्यासोबत राहिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्यासोबत आला तरी स्वागतच आहे." अजित निर्विकारपणे म्हणाला.
"हे पेपर इथेच ठेवतो. शक्यतो उद्या सायंकाळ पर्यंत सही करून ठेव. निघतो मी." तिच्या उत्तराची वाट न पाहता अजित खोलीतून बाहेर पडला.
ती मात्र तिथेच डोक्याला पकडून खुर्चीवर बसली. अजित किती स्पष्टपणे बोलत होता, त्याच्या मनात या नात्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. ती मात्र काहीतरी कारण पुढे करून एक संधी मागण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता तर कारणही संपले होते.
"आई, काही खायला देतेस का? भूक लागलीय."
अभीचा आवाज कानावर आला तशी सुचिता भानावर आली. डोळे उघडले तर खोलीत अंधार पसरलेला दिसला. 'म्हणजे किती वेळ मी अशीच बसून आहे?' तिने स्वतःला प्रश्न केला.
"आईऽऽ " अभीचा पुन्हा आवाज आला तशी ती उठून उभी राहिली. उठताक्षणी गरगरल्यासारखे झाले म्हणून तिने भिंतीचा आधार घेतला आणि चाचपडत बटण दाबून ब्लब चालू केला.
अभी मोबाईल बघत डायनिंग चेअरवर बसून तिची वाट बघत होता. गालावर ओघळलेले अश्रू पुसून तिने घाईघाईत खिचडीचा कुकर लावला.
"ईऽय! खिचडी किती पुळचट झालीये गं?" तोंडातील घास तोंडात फिरवत तो म्हणाला.
इतक्या वेळापासून ती अंधारात आपलं दुःख घेऊन एकटी बसली होती, त्याने आवाज दिल्याबरोबर त्याच्यासाठी काही खायला केले होते. त्याला मात्र त्याचे काहीच पडले नव्हते. खिचडीला चव नाही म्हणून त्याने ताट बाजूला सारले तसा इतका वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका बाहेर पडला.
"अभी, सगळे पुरुष सारखेच असतात का रे?" आक्रन्दलेल्या स्वराने तिने त्याला विचारले.
"ते मला माहित नाही पण तुझ्या अशा स्वभावमुळेच बाबाने तुला सोडण्याचा निर्णय घेतला असावा." त्याने तिच्या जखमेवर फुंकर घालण्या ऐवजी मीठ चोळले.
"अभीऽऽ" सुचिताच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.
" बाहेर पॅसेज मध्ये मला बाबा भेटले होते, त्यांनी सांगितलंय सगळं. मी कोणासोबत राहणार हेही विचारत होते." तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तो म्हणाला.
'किती सहजपणे बोलतोय हा? इतकी वर्ष याला हे कसे सांगायचे याचं दडपणात मी होते आणि अजित याच्याशी बोलून मोकळा देखील झाला.' तिच्या मनात स्पर्शून गेले.
"मी तर बाबांसोबत राहणं प्रिफर करेन. ती मोना कसली भारी आहे. तिचे स्टायलिश राहणे, बोलणे.. सारेच भारी."
"तू भेटलास तिला?" सुचिता आश्चर्याने म्हणाली.
"हो, वाढदिवसाच्या दिवशी बाबा मला बाहेर घेऊन गेले होते, तेव्हा तिला भेटलो मी."
"आणि तू मला हे आत्ता सांगतो आहेस?" तिने डोळे रोखून विचारले.
"तुला दोन वर्षापासून, कदाचित त्या पूर्वीपासूनच ठाऊक आहे पण तू तरी मला केव्हा बोललीस? इव्हन आता सुद्धा सांगितलं नाहीस." त्याचा स्वर दुखावला होता.
"अभी, मी काय आणि कसे सांगणार होते?" तिच्या डोळ्यातील पाणी खळकन गालावर ओघळले.
"मला तुझं हेच आवडत नाही आई. प्रत्येक गोष्टीला रडणं हे सोलुशन नसतं ना? तुझं दिसणं, राहणं, वागणं.. सगळेच्या सगळेच टिपिकल आहे. म्हणूनच बाबांनी हा निर्णय घेतला. माझं काय गं? मी तर होस्टेलवर निघून जाईन, पण तुझं काय? अशी एकटी राहू शकशील?" तिच्याकडे खेदाने नजर टाकत तो त्याच्या खोलीत निघून गेला.
सुचिता तशीच खुर्चीवर बसून राहिली. तिच्या भावनेचा बांध फुटला होता. अभीचे वागणे तिच्यासाठी अनपेक्षित होते. त्याला त्याच्या बाबाच्या बाहेरच्या संबंधाबद्दल माहिती होते आणि त्याबद्दल त्याचा काहीच आक्षेप नव्हता. हे सगळं तिला अनाकलनीय होते.
त्याचे एकेक शब्द तिच्या काळजाला चीर पाडत होते. अजित जसा तिच्या दिसण्या असण्याबद्दल बोलायचा, आज अभीसुद्धा तेच बोलला होता.
दुखावलेली सुचिता काय निर्णय घेईल? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा