Login

बेवारस (भाग:-१)

मुले असूनही बेवारस म्हणून अंतिम संस्कार करण्यात आलेल्या लोचनाबाईची हृदयद्रावक कथा
शीर्षक:- बेवारस

भाग:-१

"अहो, मावशी तुम्हाला किती वेळा सांगू? कोणी नाहीये घरी तर जा ना तुम्ही इथून." सुरेखा वैतागून लोचनाबाईला म्हणाली.

"आज रात थांबू दे गं, बाय. उद्या सकाळपारी जातो की म्या." लोचनाबाई ठाण मांडून बसत विनंती सुरात तिला म्हणाली.

"अहो, पण घरी कोणीच नाही म्हणून मी एकटीपुरतेच जेवणं बनवलं होतं जे मी खाल्लं. आता पुन्हा गॅस पुढे जायचा कंटाळा आलाय मला. काही नाही खायला आधीच सांगतेय आणि काही बनवणार पण नाही हं मी." जेवणं नाही असे ऐकून ती जाईल असे वाटून सुरेखा तिरीमिरीत तिला म्हणाली.

"नसू दे की मंग काय होतंय? म्या वाईज पाणी पिऊनश्यानी झोपतो. असं बी मला भूक न्हाई. तू नगो फिकिर करूस माझी." लोचनाबाई स्वतःजवळ लुगड्याच गाठोडे उशाशी घेत लवंडत म्हणाली.

"काय हट्खोर म्हतारी आहे, मुलगा-सुनेला रिकाम सोडून आली इथे आमच्या उरावर बसायला. जणू घर हिच्या बापाचं आहे, असे समजते म्हतारी!" तोंड वेंगावत सुरेखा ओठातल्या ओठात पुटपुटली.

लोचनाबाईचे जरी वय झाले असले तरी तिचे कान आणि डोळे तीक्ष्ण होते. सुरेखा जे पुटपुटली ते तिने ऐकले व ती म्हणाली,"अगं ए सुर्के, तू जे बोललीस नव्हं, ते समद म्या ऐकलं. हे घर माझ्या बापाचं न्हाई हे ठाव हाय मला. पर माझ्या भावाचं घर हाय. तुझ्या बापानं न्हाई बांधलं, तवा बोलताना जरा भान ठिवं. अन् अजून गोष्ट तू कान खोलून ऐक, तू बी या घरात आश्रीत हाईस, हे विसरू नगोस." लोचनाबाईही तिला खुन्नस देत म्हणाली.

तिच्या बोलण्याने सुरेखाच्या मनाला तर लागलंच पण नाकालापण मिरच्या झोंबल्या. तिला तर तिचा खूप राग आला होता पण ती जे बोलली होती ते पण खरंच होतं.

सुरेखाचा नवरा वारल्यानंतर ती तिच्या मुलीला घेऊन सासर सोडून माहेरी राहत होती. तिच्या दिराच्या लग्नानंतर तिच्या जावेच्या म्हणण्यावरून तिच्या सासऱ्याने तिला पुन्हा इथे आणले होते. दिराने आणि जावेने तिची आणि तिच्या मुलीची सगळी जबाबदारी घेतली होती. हे लोचनाबाईला माहिती होतं. तिला तसे म्हणायचे नव्हते पण सुरेखाचा माजोरीपणा तिला आवडले नाही म्हणून तिने तिची जागा दाखवून दिली.

लोचनाबाई ही सुरेखाच्या सासऱ्याची बहीण होती. तिला एक मुलगा, सून, मुलगी,  जावई होते. पण तरी तिचे भावाच्या घरी येणे सुरेखाला पटतं नव्हते.

त्यात तिची जाऊ आणि दिर घरी नव्हते तर आपला राज्य असं समजून सुरेखा बेडवर बसून मस्त पाय हालवत टि. व्ही बघत होती. त्यात लोचनाबाई आल्याने तिच्या टि. व्ही. पाहण्यात व्यत्यय आल्याने ती चिडली होती.

"म्हतारी खूपच आगाव आहे. एवढं ओठांत पुटपुटली तरी ऐकलं तिने." ती दात ओठ खात हाताची मूठ आवळून तिच्याकडे बघत या वेळी मनात म्हणाली.

क्रमशः

लोचनाबाई जातील का?

जयश्री शिंदे


प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all