Login

बाहेरचे जेवण भाग-१

बाहेरचे जेवण ह्याबद्दल मतभेद!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: बाहेरचे जेवण भाग-१

" काय रे? कुठे चालला आहात तुम्ही तिघेजण?"  अनुराधाताईंनी आपल्या सुनेला आणि मुलाला विचारले.

"आम्ही बाहेर जेवायला जात आहोत." अनुराधाताईंच्या मुलाने सांगितले.

" आजी, आम्ही मस्तपैकी आता छान छान जेवणार." त्यांचा लहान नातू विभोरसुद्धा आपल्या आजीकडे बघून आनंदाने म्हणाला.

त्याला बाहेर जेवायला जायचे म्हणजे मस्त नवीन कपडे घालून चमचमीत जेवण आणि आईस्क्रीम खायला मिळणार म्हणून आनंद व्हायचा.

तितक्यात वेळ होतोय, म्हणून तिघेजण बाहेर जेवणासाठी निघून गेले.

" बघितले का ? साधं सोबत येता का, म्हणून आता विचारण्याची सुद्धा पद्धत राहिलेली नाही. आजकाल जे म्हणतात ते खरंच आहे, एकदा मुलाचे लग्न झाले की, तो काही आपला ऐकतच नाही." रागातच अनुराधाताई बाजूला आपल्या बसलेल्या नवऱ्याला म्हणाल्या.

"ह्याला सुद्धा कारणीभूत तूच आहेस ना! " त्यांनी उपहासाने सांगितले.

अनुराधाताईंचा नातू विभोर याचा वाढदिवस होता आणि तो घरात त्याच्या छोट्या मित्र-मैत्रिणींना बोलून साजरा केला होता. बाहेर जेवायला जायचा बेत होता, तर ते तिघेजण गेले होते.

आता आपल्याला जेवण बनवावे लागणार म्हणून अनुराधाताई पटकन स्वयंपाकघरात निघून गेल्या. सुनेला आणि आपल्या मुलाला बोल लावत त्या जेवण बनवत होत्या.

" अनुराधा, तुला आधी पण सांगितले आहे. आता आपल्या मुलाचे सुद्धा कुटुंब बनत आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या गोष्टींमध्ये पडायची तुला गरज नाही. आई-वडील म्हणून त्यांना सुद्धा त्यांच्या मुलाचे संगोपन करता यायला हवे आणि त्याचे स्वातंत्र्य आपण त्यांना द्यायला हवे, हे मी तुला पुन्हा एकदा सांगत आहे." जेवताना अनुराधाताईंच्या नवऱ्याने सांगितले.

"काही गरज लागली की आम्ही लागतो आणि असं कुठे काही बाहेर काही साजरा करायचं म्हटलं तेव्हा मात्र आमचा पत्ता कट असतो." अजूनही त्यांच्या मनातून राग गेलेला नव्हता, म्हणून त्या तोच विषय घेऊन बोलत होत्या.

"बाबा, घरी जाताना आजीला आईस्क्रीम घेऊन जाऊया. तिला खूप आवडते." छोटा विभोर आपल्या आई-वडिलांकडे बघून म्हणाला.

" हो, बाळा. आपण जाताना नक्की घेऊन जाऊया." त्याची आई म्हणजेच अनुराधा त्यांची सून म्हणाली.

हॉटेलमध्ये आपण छान जेवण जेवणार म्हणून घरातून निघाल्यापासूनच विभोर खूप आनंदात होता. तसेच आज त्याला त्याच्या मित्र-मैत्रिणींनी, आजी-आजोबांनी आणि आई-वडिलांनी सुद्धा छान वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिल्या होत्या, त्यामुळे तो खुशीत दिसत होता.

विभोरच्या आईला अजून एक अपत्य हवे होते, परंतु तिला पहिल्याच गर्भधारणेवेळी कॉम्प्लिकेशन्स आल्याने दुसऱ्या अपत्याचा विचार न करण्याबद्दल डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाला आपण नीट वाढवायचे, हा विचार त्यांनी केला होता.

"खरंतर,मी हे आधी कधी बोललो नव्हतो, परंतु आज मला त्याविषयी बोलायचं आहे." विभोरचे बाबा, त्याच्या आईकडे बघत म्हणाले.

" तुम्हाला काय म्हणायचे आहे?"  विभोरची आई विचारत होती.

" एक तर तू लग्नाआधी शहरात राहिलेली आणि त्यातूनच तू इथे आमच्या गावात राहायला तयार झालीस. तसेच तू आपल्या घराला स्वतःचे घर मानले आणि माझ्या आईचा स्वभाव वेगळा असून सुद्धा तू नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न केला. तू घरात आल्यापासूनच आपल्या घराला घरपण आले, असे वाटते." विभोरचे बाबा आईला म्हणत होते.

" असे काही नाही. शहर असो किंवा गाव माणसं फक्त स्वभावाने चांगली हवीत, हेच माझ्या बाबांनी मला सांगितले होते. फक्त मला कधी कधी या गोष्टींचं वाईट वाटतं की आईंना कोणतीही गोष्ट केली की त्यामध्ये काही ना काही तरी चुका दिसतच असतात. विभोर आता मोठा होत आहे, पण अजूनही त्या बोलतच असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. तरीसुद्धा कधी कधी वाईट वाटते"  ती म्हणाली.

त्यांचे जेवण झाले होते. विभोरने आपल्या आजी-आजोबांसाठी त्यांच्या आवडीचे आईस्क्रीम घेतले होते.

" आजी sss आजोबा sss " विभोरने जोरात हाक मारत  घरामध्ये प्रवेश केला.

" काय मग आज कोणतरी खूपच खुश दिसतंय ? " त्याचे आजोबा त्याला म्हणाले.

"त्या हॉटेलमध्ये आम्ही खूप गोष्टी खाल्ल्या." असं म्हणून त्याने ज्या ज्या गोष्टी खाल्ल्या त्या सगळ्यांची जणू यादीत सांगितली.

"विभोर, बाळा आधी आईस्क्रीम द्यायचं असते. ते बघ वितळायला सुरुवात झाली असेल." मागून विभोरचे बाबा आलेले होते ते म्हणाले.

" अरे बापरे !  मी तर विसरलो. आजी कुठे गेली? थांबा मी आजीला घेऊन येतो." असे म्हणून तो आजीच्या खोलीमध्ये निघून गेला.

" हे बघ, मला काही ते आईस्क्रीम नको. मला सर्दी होते. तुझ्या आजोबांना काय ते खायला सांग. अनुराधाताईंना मात्र आईस्क्रीम खायचे नव्हते." म्हणून त्यांच्या नातवाला म्हणाल्या.

"आजी, मी तुझ्यासाठी आणलं की नाही?  चल ना माझ्यासोबत." तो आपल्या आजीला समजावत होता.

नातवावर जीव खूप असल्यामुळे आता त्याच्या या निरागस बोलण्यावर त्याचे मन त्यांना तोडावेसे वाटले नाही, म्हणून हॉलमध्ये त्याच्या हाताला धरून आईस्क्रीम खाण्यासाठी आल्या.

क्रमशः

असे काय झाले होते की अनुराधाताईंना त्यांच्या मुलाने आणि सुनेने हॉटेलमध्ये बाहेर जेवायला नेले नव्हते ?

©विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all