भाजीत भाजी मेथीची

गोष्ट मेथीच्या भाजीतल्या काड्या काढण्याची
प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून कोणी करत असेल तर कसली भारी फिलिंग येते ना..पण जेंव्हा ती डोकेदुखी बनते तेंव्हा?
गोष्ट पुढे आहे..
"शीतल.. अग येतेस ना पाया पडायला..आज शेवटचा गुरुवार आहे. मगाशी चार आमंत्रण येऊन गेली पण तू बाजारात गेली होतीस. " रिया म्हणाली

"वहिनी.. अहो मला जेवणं बनवायचं आहे. एक काम करा तुम्ही साक्षीला घेऊन जावा. अस पण तीच आत्ताच लग्न झालं आहे तर चार बायका ओळखीच्या होतील." शीतल म्हणाली.

"साक्षी.. चल ग तू. साडी नेस नाहीतर ड्रेस घाल. पाया पडून येऊया लगेच."रिया म्हणाली

आम्हाला खरतर जरा जास्त ऐकू येत असल्याने काही ऐकूच
गेलं नाही म्हणून मग मीच ओरडले.. साक्षी... अग वहिनी सोबत जाऊन पाया पडून ये...नवीन आहेस ना..बायका विचारतील तुला..जा जाऊन ये.

"ओ वहिनी...मला कंटाळा आलाय तुम्हीच जावा ना.."साक्षी म्हणाली.

आणखी ओरडुन बोलयला लागू नये म्हणून मीच ड्रेस चढवला आणि वहिनी सोबत गेले. घरातून निघत होते की नवीन सुनेने आवाज दिला.

"वहिनी..मेथीची भाजी साफ करून ठेऊ का?"
पुन्हा मोठं असल्याचा भारी फील आला आणि मी पण मोठ्या तोऱ्यात हो करून ठेव म्हणत दोन तीन इंस्ट्रक्षन जास्तच दिल्या.

तीन घरात पाया पडून आले त्यात एका घरी छोट्या द्रोणात प्रसाद म्हणून रव्याचा शिरा दिला होता. थोडा मी खाल्ला आणि आमच्या पिल्लूने बाकी होता नव्हता तेवढा नको म्हणत संपवला. मी तीन घरात पाया पडून आले आणखी एक घर बाकी होत पण त्यांची तयारी सुरू होती म्हणून मी घरी येऊन जेवण करायला घेतल. बाहेरून पुन्हा आवाज आला.

"ओ वहिनी... शिरा एवढाच का आणला...आणखी आणायचा ना..."
मी कपाळावर जोरात हात मारून घेतला आणि तिला सांगितल.

"साक्षी..प्रसाद हा थोडाच दिला जातो..प्लेट भर नाही.."
आमच्या तोंडावर काहीच हावभाव नव्हते.. मी समजून गेले सगळ डोक्यावरून गेलं..

आता तिची एवढीच इच्छा होती म्हणून विचार केला बनवाव तिच्या आवडीच..पण लक्षात आल घरात रवा नाहीये मग जोरात आवाज देऊन किचन मधून विचारलं

"साक्षी.... अग शेवयाची खीर खाशील का?"
मी खीर बनवायला घेतली आणि पाचेक मिनिटांनी मला विचारण्यात आल..
"ओ वहिनी...तुम्ही मला आवाज दिला का?"

"नाही..खीर खाशील का ते विचारलं..रवा नाहीये ना म्हणून.."
पुन्हा डोक्यावरून विमान उडाल

आणि मग बोलण्यासोबत हातानी इशारा पण केला.

हातात शेवयांच रिकाम पॅकेट नाचवत मी पुन्हा विचारलं.
"अग रवा नाहीये..मग खीर बनवू का? तू खाशील का?" तेंव्हा कुठे आमच्या मॅडम हो म्हणाल्या...

जेवण बनवून खीर बनवायला घेतली आणि रिया वहिनींनी पुन्हा आवाज दिला.

"शीतल..अग चल आवरलं का तुझ..पटकन जाऊन येऊ"

"हो झालच..खीर ठेवली आहे गॅस वर साक्षीला सांगते लक्ष ठेवायला.अस म्हणत पटकन तोंडावर पाणी घेऊन पुन्हा तयार झाले. साक्षीला सगळ नीट सांगितल आणि घराबाहेर पडले पण निघतांना खिरीला अनुसरून तिचे प्रश्न ऐकले आणि वहिनींना सांगितल तुम्ही व्हा पुढे मी खीर बनवून येते.
फायनली ...सगळा स्वयंपाक आवरून मी पूजेसाठी निघाले..म्हणजे पाया पडायला.
दिवस दुसरा..
सकाळी लेकाचा टिफीन बनवला नवऱ्यासाठी भेंडीची भाजी बनवली आणि तेवढ्यात नवीन सूनबाई उठल्या. आज कामाचा पहिलाच दिवस असल्याने सगळी काम तिने भरभर आवरली म्हणजे फक्त आंघोळ हो.. तेही सव्वा तास.. आता म्हणाल घड्याळ लावून बसली होतीस का? तर नाही हो..लेक शाळेत जायला निघाला आणि त्या आंघोळीला गेल्या म्हणून वेळ लक्षात राहिली.
तर....
रात्री साफ करून ठेवलेली मेथीची भाजी...जी धुवायच्या आधीच रात्रीच कापून सुद्धा ठेवली होती ती भाजी साक्षीने बनवायला घेतली. आदल्या दिवशी गवारची पाणी टाकून शिजवलेल्या भाजीचा धसका घेतलेली मी.. यावेळी किचन मधे उभी राहिले. भाजी कशी बनवते ते बघायला. ओल्या कढईत तेल टाकलं तस तेल आणि पाणी दोन्हीचा मिलाप होऊन ते कढईत थयथयाट करू लागलं त्या सगळ्याला घाबरून एकदम वरून कांदा मिरची टाकत पलेत्याच्या टोकाने कांदा परतणाऱ्या आमच्या मॅडम ना बघून वाटल या दोन तासात काय भाजी होणार नाही म्हणून मग भाजी करायची जबाबदारी मी स्वतः घेतली. कांदा, मिरची, लसूण चांगला पोळून घेतला आणि त्यात आधीच कापून ठेवलेली मेथीची भाजी स्वच्छ धुवून टाकली. वरती फक्त पान असल्यामुळे मला काही समजल नाही पण जशी भाजी परतायला घेतली आणि सगळी जाडी देठ बघून डोक चक्रावल.. शेवटी भाजी शिजून घेता घेता त्यातल्या एकेक काड्या बाजूला काढून टाकत होते. आयुष्यात काड्या टाकणारी खूप पाहिलीत पण भाजीतून काड्या काढणारी मी पहिलीच असेन ना...असो..मीठ टाकून झाल्यावर भाजी थोडे वाफ येऊन द्यायला ठेवली आणि फोन घेऊन बेडरूम मधे गेले तेवढ्यात मागून आवाज आला.

"ओ वहिनी.. भाजीत अर्धा ग्लास पाणी बस झालं ना?"

माझं काळीज चोरल्यासारख वाटल आणि मी मोबाईल ठेवत पटकन किचन मधे गेले तर हातात पाण्याने भरलेला ग्लास बघून डोळ्यात पाणी आल आणि हातून पाण्याचा ग्लास घेत तिला म्हंटल कुठल्याच पालेभाजी किंवा फळभाजीत पाणी टाकायच नाही. भाजी परतून त्यात मीठ घालायचं आणि मग त्यावर झाकण ठेवून त्या झाकणावर पाणी ठेवायचं..अश्या भाज्या वाफेवर चांगल्या शिजतात.

हळू आवाजात प्रेमाने बोलले पण चेहरा बघून लक्षात आल विमान डोक्यावरून गेलं. शेवटी पाण्याचा ग्लास हातातून घेत त्यातल घोटभर पाणी मीच पियाले.. आणि शिजलेल्या मेथीच्या भाजीत ओल्या नारळाचा कीस टाकून सजवल. नकळतपणे भाजी सुद्धा माझे आभार मानते अस जाणवलं मला.
(भाजीतली जाडी देठ पुराव्यासहित सादर.)
समाप्त..
©® श्रावणी लोखंडे