Login

भांड्यांवरील नावं - आठवणींचा दरवळ

भांड्यांवरील नावं मनाला आनंद देऊन जातात

भांड्यांवरील नावं - आठवणींचा दरवळ

ज्या काळी लग्न हे 'इव्हेंट' झालं नव्हतं आणि खऱ्या अर्थाने एखाद्या घरचं 'कार्य' होतं, त्या काळी बहुदा निमंत्रित लोक नवरा नवरीला जरुरी असलेल्या भांड्यांचा आहेर करायचे. घरात एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा कोणताही समारंभ असला तरी त्या व्यक्तीला एखादं भांड भेट म्हणून दिलं जायचं. कोणतंही भांड घेतलं, लहान असो अथवा मोठं, त्या दुकानात आपण रीतसर कागदावर भांड्यावर जसं नाव हवं आहे ते लिहून द्यायचं मग त्या दुकानातील एखादा विक्रेता त्यावर नाव कोरून द्यायचा. त्या भांड्यावरील नावावरून आपल्याला लगेचच कळायचं की हे कोणी दिले आहे.

मी भांडी घासताना त्या भांड्यावरील नाव आणि तारीख नेहमी बघतेच. लग्नात मिळालेल्या भांड्यांबरोबर एक आगळंच नातं जोडलेलं असतं. मन अफसुकच त्या दिवसां मध्ये रमून जातं. त्याकाळचं स्टील सुद्धा खूप उत्तम प्रतीच असायचं. कितीही जुनी भांडी अजून सुद्धा जशीच्या तशीच आहे. हल्ली स्टील नवीन विकत घेतलं तरी लगेचच त्याला चीर पडते. काही दुकानात ही नावं सुद्धा अतिशय सुवाच्य अक्षरात कोरली जायची. ती पाहून खूपच आनंद व्हायचा. हल्ली नावांचे पण स्टॅम्प निघाले आहेत. पटकन काम होतं. पण त्या कोरलेल्या अक्षरातली मजा त्यात असत नाही.

कधी कधी बाजारात आलेली नवीन पद्धतीची भांडी बरेच जण द्यायचे. म्हणूनच आपले जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आपल्याला विचारूनच कोणतं भांडं द्यायचं ते ठरवत. साधारण १९७५ च्या सुमारास मिल्क कुकर बाजारात नवीनच आले होते. माझ्या मोठ्या भावाच्या लग्नात जवळजवळ दहा-बारा मिल्क कुकर आले होते. कोणतीही भेट वस्तू उघडली की मिल्क कुकर! आम्ही एवढे हसलो होतो. कोणाच्या घरी दूध तापलं ते त्या मिल्क कूकरच्या शीटीच्या आवाजावरून लगेच कळायचं. ती शिटी वाजायची पण जरा मजेशीर. दूध उतू जायचं नाही हा त्याचा सर्वोत्तम फायदा.

एखाद्या मुलीच्या लग्नात आंदण मिळालेली भांडी तिच्यासाठी खूपच संस्मरणीय असतात. चि.सौ.कां आणि त्या पुढे मुलीचं नाव. त्या आठवणीने ती मुलगी खूपच हळवी होते. माझ्या लग्नात माझ्या एका मावशीने स्टीलची टाकी दिली होती आणि एका मावशीने 'वॉटर फिल्टर' दिला होता. त्यावेळी 'एक्वागार्ड'चं फॅड माजलं नव्हतं. लग्न झालं तेव्हा मी सुरुवातीची काही वर्ष परळला राहत होते तिकडे पहाटे पाचला एकदाच पाणी यायचं. पाणी आम्हाला साठवून ठेवावे लागत होतं. त्यामुळे माझ्या दोन्ही मावश्यांच्या भेटवस्तू मोरीच्या कट्ट्यावर स्थानापन्न होत्या. अशा रीतीने त्या मला स्वयंपाक घरात सोबत करायच्या.

सासुबाईंच्या वेळची भांडी सुद्धा नाव आणि तारखेनिशी स्वयंपाक घरात वावरत होती. तेव्हा वाटायचं बापरे ही किती जुनी भांडी आहेत पण जशीच्या तशी दिसायची. माझ्या लग्नानंतर कधी सासऱ्यांनी एखादं भांडं आणलं तर त्यावर आवर्जून ते माझं नाव घालायचे. मला खूप कौतुक वाटायचं. आपल्या बहिणींनी, मैत्रिणींनी आठवणीने दिलेली भांडी आणि तारखा बघायला खरंच खूप गंमत वाटते.

हल्ली आपण बऱ्याच लग्न पत्रिकांमध्ये 'कृपया आहेर आणू नये' असं लिहिलेलं पाहतो. अगदी क्वचित असंही पाहायला मिळतं की 'कृपया भांड्यांचा आहेर आणू नये'. म्हणजे त्यांना आहेर हवाय परंतु भांडी नको आहेत. अशावेळी निमंत्रितांपुढे प्रश्न उभा राहतो की आता यांना काय बरं द्यावं. पूर्वी पैशांची श्रीमंती नव्हती पण प्रेमाची श्रीमंती खूपच होती. घरच्या कार्यात चार-पाच दिवस नातेवाईकांचा, पाहुण्यांचा राबता असायचा. जागा लहान असली तरी मनं मोठी होती.