Login

भासती सत्य आभास जे अंतिम भाग

एक थरारक खेळ नक्की वाचा
भासती सत्य आभास जे अंतिम भाग 6


मागील भागात आपण पाहिले की इंदुमती प्रधान गायब असल्याने एक अज्ञात व्यक्ती डॉक्टर वैजयंती पाटील यांच्या कडून त्याला हवे तसे औषधे लिहून घेतोय . त्यातच कदमांनी एक धागा शोधला . आता पाहूया पुढे .


कसेबसे डोळे उघडल्यावर वीरेन सावध झाला . आपले हातपाय बांधल्याचे त्याच्या लक्षात आले .

" आता आम्ही तुझ्या मालकाला फोन करू . जोपर्यंत मी म्हणत नाही फोन चालू राहायला हवा . "

" तू कोण हे सांगणारा ? नाही केले तर काय करशील ? "

" कदम , आधी कोणता हात कापायचा याचा ? "
कोठडीत उजेड करत शरद म्हणाला .
त्यासरशी वीरेन घाबरला .


" कदम , आता तुमचे काम सुरू . "
शरद तिथून बाहेर पडला .

" अनघा , तुला वेड ठरवत होती ती डॉक्टर . आता तू मला भेटली नाहीस तशीच तिची आई तिला भेटणार नाही कधीच ."
इतक्यात फोन वाजला .

" डॉक्टर सुटली का ? "
फोनवर बोलणे सुरू झाले .

अगदी भरवस्तीत असलेल्या इमारतीजवळ शरद आणि त्याची टीम थांबली . तिथून मागे एक स्वतंत्र बंगले असणारी कॉलनी होती .

" समीरा , चारही बाजूंनी वेढा घाला . ही शेवटची संधी आहे . "


" आज तुझे वीस लाख रुपये मिळतील त्यानंतर माझा आवाज तुला कधीच ऐकू येणार नाही . "
त्याने फोन ठेवला .


आता म्हातारीला संपवायचे होते . इतक्यात समोरचा दरवाजा तोडला गेला आणि काही कळायच्या आत शरदने त्याला जेरबंद केले .


पोलीस कोठडीत अत्यंत थंड चेहऱ्याने तो बसला होता . पंकज शिर्के .

आयआयटी मुंबई गोल्ड मेडलिस्ट , संगणक क्षेत्रातील हुशार आणि कर्तबगार तरुण . शरद त्याच्यासमोर बसला .

" हा इतका किरकोळ , चम्या दिसणारा मुलगा असे का करेल ? हाच विचार करताय ना इन्स्पेक्टर . मग ऐका . परमेश्वराने बुद्धी भरभरून देताना शरीरसंपदा आणि देखणेपण द्यायला विसरला .


संत कितीही म्हणाले की काय भुललासी वरलीया रंगा तरी तो महत्वाचा असतोच ना ?

आता तुमचंच बघा की , डॉक्टर प्रिया आणि तुम्ही एकत्र असताना लोक सहज म्हणत असणार ह्या चष्मिश मुलीला हा हिरो कसा मिळाला .

आम्ही एकत्र वाढलो . अनघा शिंदे आमच्या शेजारी रहायची . चाफेकळी नाक , गोरा रंग आणि सेम माधुरी सारखे हसणे . खूप प्रेम करायचो तिच्यावर .

पण.... तिलाही तेव्हा हा वरला रंग दिसला . पंजाबी जतिन सिंह त्याचे पुरुषी सौंदर्य . अनघा भरभरून बोलायची त्याच्याबद्दल माझ्याशी .


लवकरच त्याने अनघाला प्रपोज केले आणि घरच्यांना समजावून अनघा शिंदेंची सिंह झाली . मी लांबूनच तिला सुखी रहायचा आशीर्वाद दिला आणि कंपनीची ऑफर स्वीकारून निघून गेलो .


काळाबरोबर माणूस पुढे जातो ते शरीराने . मनाचे काय ? मला तिरस्कार वाटायचा माझ्या शरीराचा . असेच यंत्रवत दिवस चालले होते . वर्षभराने मी परत आलो .


घरी आईबरोबर गप्पा मारत असताना एक हडकुवळी , केस विस्कटलेली , डोळ्यांची खापडे बसलेली मुलगी वस्तू द्यायला आली . समोर वस्तू ठेवून ती निघूनही गेली .

" पंकज अरे अनघा आली होती ना ? "
आईने वस्तू पाहताच विचारले .

" काय ? "
मी मोठ्याने किंचाळलो . तडक तिचे घर गाठले .

खोदून विचारले तेव्हा एकच वाक्य म्हणाली , " पंकज परिकथेतील राजकुमार बिछान्यावर राक्षस असू शकतो हे कोणीच गोष्टीत लिहित नाही . "
त्यानंतर आठ दिवसांनी अनघा गेली .



मला वेड लागणे म्हणजे काय ? याचा शब्दशः अर्थ मला समजला . त्यानंतर मी अनघाच्या केसचा अभ्यास केला . मला समजले केवळ डॉक्टर वैजयंती यांनी दिलेला अहवाल जास्त महत्वाचा ठरला . त्यानंतर मी डॉक्टर वैजयंती यांच्या आयुष्यातील सगळी माहिती मिळवायला सुरुवात केली .


असेच एक दिवस शहरातील पब मध्ये गेलो होतो . तिथे विनय दिसला . अफाट देखणा आणि भोवती पोरींचा गोतावळा घेऊन फिरणारा . डोक्यात एक सणक गेली . मग माझे संगणक क्षेत्रातले नॉलेज वापरून मी स्वीट बनी नावाचे ऍप बनवले .


विनय जाळ्यात अडकला आणि मी माझा खेळ सुरू केला . इंदुमती प्रधान ताब्यात आल्यावर डॉक्टर वैजयंती पाटील यांच्या नॉलेजचा आणि ह्या लोकांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन खेळ सुरू झाला . सुरुवातीला छोटी काही कामे , कृती यांच्यातून हे नियंत्रण सुरू झाले . माझ्यासारखा एक नेभळट मुलगा विनय सारख्या हँडसम हिरोला कंट्रोल करतोय .


एक वेगळाच उन्माद मनात दाटून आला आणि त्याच भरात त्याला संपवला . एक अनामिक शांतता मिळाली . खऱ्या आयुष्यात अगदी सोज्वळ असणारी ही माणसे प्रत्यक्षात अनेक प्रकारे राक्षस होती .


एकेक करून त्यांना संपवणारा पंकज जगज्जेता होता त्याच्या जगात . "
पंकज थांबला .


त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भीतीचा लवलेश नव्हता . बाहेर उभ्या राहून हे ऐकणाऱ्या सगळ्यांना त्याची गोष्ट ऐकताना एकीकडे राग आणि दुसरीकडे दया अशा भावना निर्माण झाल्या .


देखणेपणा , रंग ह्यावरून एखाद्याला सहजपणे ये बुटक्या , ये काळे असे संबोधणे त्या व्यक्तीच्या मनावर खोल जखम करून जात असते . मानसिक विकारांची बीजे इथेच रोवली जात असावीत .


" इन्स्पेक्टर थँक यू . माझ्या आईला तुम्ही परत आणले . पण पंकज सापडला कसा ? "
वैजयंती म्हणाली .

" डॉक्टर , हा खेळ त्यांनी रचला असला तरी त्यात काही चुका होत्याच . "
इतके बोलून शरद थांबला .


" आई , चल आज खरा विजयाचा दिवस आहे . ज्याच्या पुरुषत्वाची विनय आणि ज्योती निशाणी होती ती आपण त्याला सांगून संपवली . फक्त ही दोन वर्षे तुला तिथे काढावी लागली . "


" वैजयंती मी पूर्ण बरी झाल्यावर देखील तो माणूस उजळ माथ्याने मला येऊन म्हणाला अशा दहा बायका ठेवून कितीतरी पोरे पैदा केली . तेव्हा तू इतकेच म्हणाली होतीस , तुमचे आभासी पुरुषत्व आणि त्या षंढ समाजाच्या चौकटीत मला थांबवून दाखवा . "


तितक्यात टीव्हीवर बातमी झळकली प्रसिद्ध लेखक सुधीर शारंगपाणी यांची आत्महत्या . वैजयंती आत कॉफी करायला वळली अगदी आईला आवडते तशी .


सदर कथा मनोरंजन हाच हेतू ठेवून वाचावी .