Login

भासती सत्य आभास जे भाग 3

एक मानसिक खेळाचा थरार
भासती सत्य आभास जे भाग 3


मागील भागात आपण पाहिले की दोन बळी गेले आणि दोघांचेही व्हिडिओ बघता काहीतरी धागा नक्कीच होता . विनय पाठक बद्दल जास्त माहिती मिळवत असतानाच शरदला एक अनोळखी फोन आला . आता पाहूया पुढे .


एक आयटी प्रोफेशनल , दुसरी एक यू ट्यूब स्टार आणि तिसरा कोण आहे ते कळणारच होते . ह्या सगळ्यांचा एकमेकांशी काहीच संबंध वरवर दिसत नसला तरी आतून कोणीतरी कोळ्यासारखे घट्ट जाळे विणून शिकार करत होता .


मानसिक शक्तीचा हा खेळ शरदसाठी नवीन नसला तरी ह्यावेळी गुन्हेगार नक्कीच जास्त तयारीचा होता . विचारांच्या तंद्रीत गाडी गिरगावमधील एका चाळीत थांबली .

" कदम इथे का थांबले ? "
शरद चिडला .

" सर फोन इथुनच आलेला . "
कदम गाडी पार्क करत म्हणाले .

शरद सरळ चाळीत शिरला . टोकाच्या एका खोलीबाहेर गर्दी जमली होती .

" फोन कोणी केलेला ? "
शरदच्या आवाजाने सगळे बाजूला झाले .

एक साधारण आठवी नववीच्या वयातली मुलगी पुढे आली .

" सर , मी फोन केला होता . बाबांनी ठेवलेले स्टेट्स बघून . "
" माझा नंबर कसा काय तुझ्याकडे ? "
" पोलीस स्टेशनमधून मिळवला सर . "
" कदम दरवाजा तोडा . "
शरद ओरडला .



दरवाजा तोडताच समोरचे दृश्य बघून क्षणभर शरद देखील स्तब्ध उभा राहिला . काही क्षणांत भानावर येताच त्याने त्या लहान मुलीला पहिले बाहेर काढले .


विनायक मोरे नावाचा इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . स्वतःच्या हाताने त्याने गळ्याची नस कापली होती . समोर ठेवलेला मोबाईल अजून व्हिडिओ रेकॉर्ड करतच होता .


" कदम मोबाईल ताब्यात घ्या . पुढील प्रोसिजर पूर्ण करून रिपोर्ट पाठवा . "
भराभर सूचना देत शरद बाहेर पडला .


त्याच्या डोक्यात आलेली शक्यता खरी असल्यास समान धागा सापडणार होता .

" समीरा , विनय पाठक आणि ज्योती दोघांचा व्हॉट्स ॲप डाटा रिकवर करा . त्यांच्या नावावर किती सिमकार्ड आहेत त्याची माहिती मिळवा . मी विनयच्या फ्लॅटवर जातोय आणि तिथूनच ज्योतीच्या घरी जाईल . "

शरद सूचना देतच गाडीत बसला . टीमला सूचना देऊन कदम धावतच गाडीजवळ आले .


शरद विनयच्या फ्लॅटवर पोहोचला त्याने थोडा शोध घेतला आणि कपाटात ठेवलेले सिमकार्ड सापडले . त्यानंतर ज्योतीच्या घरच्यांनी ती वापरत असलेले सिमकार्ड शोधून शरदकडे सोपवले . तिथून सरळ क्राइम ब्रँच ऑफिसवर पोचल्यावर शरदने समीराला बोलावले .


" सर , दोघांच्याही व्हॉट्स ॲप डाटामध्ये फार काही सापडले नाही . "
शरद हसला .


" आता ही सिम कार्ड आणि त्यांचा नंबर शोधून व्हॉट्स ॲप डाटा रिकवर कर . उद्या सकाळी भेटू . "


समीराने दोन्ही सिमकार्ड वर असलेला डाटा रिकवर करायला सुरुवात केली . त्यात फक्त एकाच नंबरवर चॅटिंग होत होते .


विनयच्या आणि ज्योतीच्या डेटिंग ऍप वरून तर समीराला वाटले होते की ही सिमकार्ड त्यासाठीच असतील . परंतु इथे तर एक सत्संग सांगणारी कुणी इंदुमती प्रधान नावाची बाई या दोघांशी बोलत होती .


समीराने सगळे चॅटिंग पुन्हा रिकव्हर केले . तसा शरदला मॅसेज करूनच ती घरी निघाली .


कदमांनी विनायक मोरे बद्दल सगळी माहिती शरदला पाठवली होती . चाळीशीत असलेला मोरे बऱ्यापैकी पैसे बाळगून असलेला व्यावसायिक होता . बायको बँकेत नोकरी करत होती . मोठा मुलगा पुण्यात शिकत होता आणि मुलगी आठवीत . वरकरणी सुखी मध्यमवर्गीय कुटुंब . असा माणूस स्वतःला इतक्या भयंकर पद्धतीने का संपवेल ?




शरद सकाळी लवकर ऑफिसमध्ये पोहोचला . समीराने तिचे काम चोख बजावले होते . एखाद्या सत्संग सांगणाऱ्या बाईसाठी नवीन सिमकार्ड कोणी कशाला घेईल ? शिवाय ही इंदुमती कोणताही ग्रुप न करता पर्सनल बोलत आहे . नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे .


" कदम , ही सिमकार्ड खरेदी करताना सादर केलेली माहिती मिळवा . नक्कीच काहीतरी वेगळे घडत आहे . त्या विनायकच्या बायको आणि मुलीचा जबाब नोंदवून घ्या . "
कदमांनी सगळ्या सूचना ऐकल्या आणि ते बाहेर पडले .


क्राइम ब्रँच ऑफिसवर असलेला लँडलाइन वाजला . फोन खाली ठेवताच शरद ओरडला .

" साळवे गाडी काढा . फॉरेन्सिक टीम बोलावून घ्या . "

" साहेब जायचं कुठे आहे ? "
साळवे थोडे बिचकत म्हणाले .

" जुहू , मिल्की वे सोसायटी ."
एवढे बोलून शरद शांत बसला .


मिडियात प्रचंड खळबळ उडाली होती . प्रसिद्ध दिग्दर्शक जोगिंदर यांच्या मुलाने आत्महत्या केली . सगळीकडे एकच बातमी चालू होती .



" सर ही केस देखील अशीच आहे का ? "
कदमांनी विचारले .

" ते तिथे गेल्यावर लक्षात येईलच . त्याची संपूर्ण खोली शोधा कदम . "
मनात आखाडे बांधत शरद सूचना देत होता .


तितक्यात मोबाईल कंपनीतून फोन आला . ज्या माहितीवर सिमकार्ड होते ती इंदुमती प्रधान कोकणात रहात असल्याचे त्यावर नमूद केलेले होते . पत्ता पाठवतो असे तिथून सांगितले .


" सर दुर्दैवाने अशी सिमकार्ड घेणे खूप सोपे आहे . एकाचे कागदपत्र आणि दुसऱ्याचा पत्ता वापरून अशी सिम घेतली जातात ."
कदम माहिती पुरवत होते .


" कदम कागदपत्रांची माहिती मिळाली की प्रिंट काढा आणि त्या पत्त्यावर मी स्वतः जाणार आहे . "

चर्चा करत असताना जुहू येथील सोसायटी जवळ गाडी थांबली .


फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्ती असल्याने सगळा मिडिया बाहेर जमलेला होता . जोगिंदर सिंग मोठे प्रस्थ होते . त्यांनी एका मराठी अभिनेत्रीशी विवाह केला असल्याने त्यांचा मराठी सिनेमा आणि माध्यमांशी देखील चांगला घरोबा होता . मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे न देता शरद सरळ वर निघून गेला .



पंचविसाव्या मजल्यावर असलेले ते भव्य पेंट हाऊस बघूनच कदम भारावले .


" सर घर एकदम भारी आहे . "

" कदम कामावर लक्ष द्या . सांगितलेले लक्षात ठेवा . "

" पोलिसांना फोन कोणी केला ? "
साळवेनी एका नोकराला विचारले .


" सर , हा सखाराम ज्यूस घेऊन जायला दार वाजवत होता . दार उघडले नाही म्हणून त्याने मला बोलावले ."
मॅनेजर माहिती पुरवत होता .

" मृताचे आई वडील कुठे आहेत ? "

" ते दोघेही एका पार्टीला गेले होते . कोणत्याही क्षणी पोहोचतील . "
मॅनेजर अदबीने म्हणाला .


सायनाइड घेतल्याने शांत मरण आलेला तो. मुलगा बघून शरद संतापला होता . ती कोण इंदुमती प्रधान आहे तिला पकडले तरच सगळे. उलगडले जाईल . सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून घरी जायला रात्रीचे बारा वाजले .


" कदम , उद्या लवकर या . माझ्या गाडीने आपण इंदुमती प्रधानच्या पत्त्यावर जातोय ."

कोण असेल इंदुमती प्रधान ?
ही अशा नावाची बाई खून करत असेल ?

वाचत रहा .
भासती सत्य आभास जे
@प्रशांत कुंजीर
0

🎭 Series Post

View all