Login

भासती सत्य आभास जे भाग 5

एक मानसिक खेळ
भासती सत्य आभास जे भाग 5


मागील भागात आपण पाहिले की इंदुमती प्रधानच्या पत्त्यावर गेल्यावर तो. शोध डॉक्टर वैजयंती पाटील यांच्या घरी येऊन थांबला . डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन समीरा , शरद आणि कदम बाहेर पडले . आता पाहूया पुढे .


" सर , चारही मृत व्यक्तींनी औषधे मागवत असताना डॉक्टर वैजयंती यांच्याच प्रिस्क्रिप्शनचा वापर केला आहे . पण रुग्णाची नावे वेगळी आहेत . "
समीरा आपल्याला मिळालेली माहिती सांगत होती .

इतक्यात क्राइम ब्रँच ऑफिसच्या बाहेर चॅनलच्या एबी व्हॅन घोंगावू लागल्या .

" सर टीव्ही लावा लवकर ."
कदम आत येत मोठ्याने ओरडले .

एक प्रसिद्ध उद्योगपती लाईव्ह होते . समोर ठेवलेल्या फोनवर रेकॉर्डिंग चालू होते .


" मिस्टर सारंग , जग मिथ्या आहे . विकृत आहे . आपल्याला ह्या जगात रहायचे नाही . "
स्वतःशीच बोलत ते दोन्हीकडच्या कृती करत होते .


" समीरा , इंदुमती असलेल्या हॉस्पिटलला पोहोचा . कदम गाडी काढा . आपल्याकडे बारा मिनिट आहेत फक्त ."

जवळपास धावत शरद बाहेर आला .


पोलीस व्हॅन वाऱ्याच्या वेगाने धावत होती .


" साळवे , ट्रॅफिक कंट्रोल युनिट लाईनवर घ्या . जितका शक्य होईल तेवढा मोकळा रस्ता हवाय ."
शरद एकीकडे लाइव्ह बघत सूचना देत होता .


" सारंग , आधी ह्या सुंदर शरीराचा मोह सोडला पाहिजे . त्यासाठी अंगावर असलेली कातडी नको ."

असे म्हणत त्याने छातीवर असलेली त्वचा सोलली . डोळ्यात रक्त उतरलेले आणि समोरून स्वतःच बोलत करत असलेले हाल .


" शरद फास्ट , एनी हाऊ स्टॉप हिम ."
कमिशनर फोनवर ओरडत होते .


सातव्या मिनिटाला गाडी बिल्डिंग जवळ आली . तोपर्यंत लोकल पोलिसांनी दरवाजा तोडण्याचे प्रयत्न सुरू केले होते .


" कदम हँड ग्रेनेड आणा . "
शरद ओरडला .

" कम ऑन सारंग पुरुषाला ज्यावर सर्वाधिक गर्व असतो तो नष्ट कर . "


सारंगने सुरी हातात धरली आणि धडाम करून ग्रेनेडने दरवाजा उडाला . दुसऱ्या क्षणी सारंगला पोलिसांनी ताब्यात घेतले .


" कदम मागे चालू असणारा मोबाईल घ्या . लाइव्ह बंद करा ."

शरद शांतपणे लपवलेला मोबाईल उचलून बोलू लागला .


" तू का खेळतोय यांच्याशी ? "

" तेच तुला शोधायचे आहे . एक मानसिक समाधना मिळते त्यांना मरताना बघून . हा सारंग कॉल गर्ल आणि बॉय बोलवायचा आणि त्यांना रक्तबंबाळ करून संबंध ठेवायचा . मेला असता आज . "

इतके बोलून फोन कट झाला .


तोपर्यंत लोकेशन ट्रेस झाले होते .


" साळवे लोकेशन कुठेय ? "

" सर बेस्ट बस डेपो लोकेशन आहे . तिथे जाण्यात अर्थ नाही . "




" सर , इंदुमती प्रधान गेले दोन वर्षे इथे नाही आहेत ."
समीरा फोनवर म्हणाली .

" ओके , आता नीट ऐक . वैजयंती पाटील यांच्या दवाखान्यात वीरेन नावाचा मुलगा आहे ."
समीराने तिथूनच गाडी वळवली .


" कदम , चला . डॉक्टर वैजयंती पाटील आपल्या ताब्यातून जायच्या आधी त्यांना बोलते करावे लागेल . "

शरद सरळ क्राइम ब्रँच ऑफिसवर आला .


" डॉक्टर , आता लपवाछपवी नको . तुमची आई गेली दोन वर्षे कुठे आहे ? का मारले तुम्ही आईला ? तुमच्या मनात तिच्याविषयी घृणा होती म्हणूनच ना ? "
शरद बोलत होता .


" स्टॉप इट इन्स्पेक्टर . रोज सकाळी रक्तबंबाळ झालेल्या माझ्या आईला मी सावरलं ते तिला मारण्यासाठी नाही . तिच्या मनावर उपचार करता यावेत म्हणून हे फील्ड निवडले . तुम्हाला वाटतं तितके मन आणि आयुष्य सोपे नाही ."

शांतता पसरलेली बघून शरदने हळूच पाण्याचा ग्लास पुढे केला .


पाणी पिल्यावर डॉक्टर शांत झाल्या .


" इन्स्पेक्टर , माझी आई प्रचंड सुंदर , सुशील आणि सोशिक होती . तिच्या ह्याच गुणांनी तिचा घात केला . विकृत सवयी असणारा माझा बाप तिला रोज एक धंदेवालीचे सोंग घ्यायला लावायचा आणि तसाच प्रणय करायचा .

त्याच कैफात तो तिला मारहाण करायचा . मी सगळे ऐकत असायची बेडरूम बाहेर असहाय्य . हळूहळू आईला भास व्हायला लागले .

रात्र झाल्यावर ती नटून घराच्या दारात उभी रहायची . पुरुषांना इशारे करायची . माझ्या बापाने तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवलं . माझी रवानगी मामाकडे झाली . त्याचवेळी आईला बरे करायला डॉक्टर व्हायचे ठरवले .


आईवर उपचार सुरु केले . ती जवळपास बरी होत आली आणि अचानक तुमची आई पळून गेली असा फोन आला .


माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता . मामाचे निधन झाल्यावर एकमेव आईच माझा आधार होती . मामा तिचे कधीच नाव घेऊ देत नसे . माझी बदनामी होऊ नये म्हणून त्याने मला त्याचे नाव दिले .


आता मी आईला परत आणणार होते तर ती गायब झालेली . त्याचदिवशी मला एका अनोळखी व्यक्तीने एक लिफाफा आणून दिला . माझ्या आईचे फोटो होते . खाली लिहिलेले आई जिवंत रहावी वाटत असल्यास फक्त मी सांगेल ते करावे लागेल . "
डॉक्टर थांबल्या .


" काय काम करायला सांगितले त्याने ? "
आता शरद हळुवार भाषेत म्हणाला .


" मानसिक भ्रम वाढवणारी औषधे तो वेगवेगळ्या रुग्णांच्या नावाने लिहून घ्यायचा . कौन्सिलिंग करून समोरच्याला कंट्रोल करायच्या नोट्स घ्यायचा . गेले दोन वर्षे सगळे सुरू आहे . खरतर विनय पाठक गेला तेव्हाच तुम्हाला संपर्क करावा वाटला पण माझ्यातल्या मुलीने डॉक्टरवर मात केली . मन सावरणे कठीण . "


" डॉक्टर , गेल्या दोन तीन वर्षात आलेला एखादा रुग्ण किंवा त्याबाबत कटू अनुभव ? "
शरदने विचारले .

" नाही , आजवर असा धक्कादायक अनुभव नाही . "

" ठीक आहे . तुम्ही जाऊ शकता . आमची माणसे बंगल्याच्या बाहेर असतील . "

शरदने चौकशी संपवली .


" इन्स्पेक्टर माझी आई..."

" ते आताच सांगत नाही . लवकरच तुमची आई तुम्हाला भेटेल ."


विरेन झपाझप चालत होता . आपला पाठलाग होत नाही याचा अंदाज घेत . अचानक मागून एक वस्तू डोक्यावर आदळली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला .


" सर , डॉक्टर वैजयंती पाटील सरकारी पॅनेलवर काम करतात . त्यांनी अनेकदा गुन्हेगारांच्या मानसिक स्थिती बाबत अहवाल दिले आहेत तसेच. महिलांच्या केसमध्ये देखील . ही एक केस बघा ही मुलगी अतिहिंसक वर्तन करत असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याने तिचा नवरा सुटला आणि त्या मुलीने नंतर आत्महत्या केली . "

" व्हेरी गुड . कदम ह्या मुलीची कुंडली काढा . गुन्हेगार मनाचे खेळ अजूनही खेळत आहे ." शरद शांतपणे घरी जायला निघाला .

कोण असले ह्या खेळाचा सूत्रधार ?
पाहूया अंतिम भागात.

वाचत रहा
भासती सत्य आभास जे
©® प्रशांत कुंजीर

0

🎭 Series Post

View all