Login

भासती सत्य आभास जे भाग 1

एक गुंतागुंतीचा मानसिक खेळ आणि त्यातून रंगणारे नाट्य

भासती सत्य आभास जे भाग 1


मुंबई , रात्रभर जागे असलेले शहर . आपल्या लौकिकाला जागून नुकतेच झोपी गेलेले . जवळपास रात्रीचे दोन वाजत आले तरीही रस्त्यावर तुरळक वाहतूक . उशीरा काम संपवून घरी चाललेले चाकरमानी . फुटपाथवर अगदी शांत झोपलेले तिथलेच रहिवासी असलेले काही जण .


रस्त्यांवर दिव्यांचा झगमगाट रात्रीच्या अंधाराला काहीसे झाकोळत असलेला . इतकी रात्र असूनही काही इमारतीत अजूनही जाग असल्याचा खुणा .


अशाच एका रस्त्यावरून नेहमीचे कॉल सेंटरवरील काम संपवून पुढे चाललेले काही तरुण . हास्यविनोद करत आजुबाजूच्या जगाला विसरून चालत असताना अचानक धप्प असा आवाज झाला .

कचकन गाडीला ब्रेक लावावा तसे सगळेजण थांबले . समोर सगळीकडे रक्त आणि मधोमध एक मानवी देह . हे भयानक दृश्य पाहताच काही क्षण स्तब्ध असलेले तरुण भानावर आले .


" ये , पळ लवकर . उगीच नसत्या भानगडी नको . "
एकाने व्यवहारीक शहाणपण सुचवले .

" आपण पळालो तरी समोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणार . त्यापेक्षा पोलिसांना कळवू . "
दुसऱ्या एकाने फोन लावला .


पुढच्या दहाव्या मिनिटाला इन्स्पेक्टर शरद तिथे हजर झाला . तरुणांची जुजबी माहिती घेऊन त्यांना सोडून दिले . तोपर्यंत इमारत संपूर्ण जागी होऊन खाली सगळेच जमा झाले होते .


पंधराव्या मजल्यावरून विनय पाटील नावाची व्यक्ती खाली पडली होती .

" गर्दी बाजूला करा . कदम सीसीटीव्ही काम बघणारा कोण आहे ? फुटेज चेक करा . साळवे बॉडी पी. एम. साठी पाठवायची प्रक्रिया सुरू करा . "

भराभर सूचना देत शरद लिफ्टकडे निघाला .


" फ्लॅट नंबर ? "
त्याने सुरक्षारक्षक तरुणाला विचारले .

फ्लॅट नंबर घेऊन शरद लिफ्टमध्ये शिरला . सोबत सोसायटी सेक्रेटरी आणि अध्यक्ष होते .


" सर हा विनय एकटाच राहत होता . "

सेक्रेटरीने माहिती पुरवली .

" फ्लॅट कोणाच्या मालकीचा आहे ?"
शरदने विचारले .

" त्याच्या स्वतःच्या मालकीचा आहे . कोणात मिसळत नसल्याने त्याबद्दल फार माहिती नाही आम्हाला . "
माहिती टाळण्याचा प्रयत्न शरदने ओळखला .


दरवाजा आतून उघडलेला होता .

" स्ट्रेन्ज , एकटा राहणारा माणूस दरवाजा उघडा कशाला ठेवील ? "
शरद स्वतःच्या मनाशी बोलत आत शिरला .

प्रत्येक वस्तूमधून पैसा दिसत होता . टीपॉय वर दोन डिश आणि दोन ग्लास होते . दोन्ही रिकामे आणि शेजारी अर्धी झालेली रमची बाटली .


" तुम्ही म्हणालात विनय एकटाच राहायचा , मग इथे दोन माणसे असल्यासारखी व्यवस्था आहे ? त्याच्याकडे आज कोणी आले होते का ? "

सेक्रेटरीने गेटवर फोन करून खात्री केली .


आज दिवसभरात कोणीच विनयकडे आले नव्हते . शरदने संपूर्ण फ्लॅट फिरून पाहिला . विनयच्या मोबाईल आणि लॅपटॉप वर नजर जाताच शरदने त्या वस्तू ताब्यात घ्यायची सूचना दिली . कदम आणि साळवे खालची प्रक्रिया पूर्ण करून वर आले होते .


" सर दारूच्या नशेत तोल जाऊन पडला असेल खाली . " अध्यक्ष म्हणाले .

" ते बघूच आम्ही . तुम्ही आता गेला तरी चालेल . "
दोघांनाही जायला सांगून शरद पुन्हा निरीक्षण करू लागला .


बैठकीच्या खोलीत पुस्तकाचे कपाट होते .

" हल्ली फॅशन म्हणून लोक पुस्तके घरात ठेवतात . "
कदम मोठ्याने हसले .

" कदम चला सीसीटीव्ही चेक करू . "
शरद वेगाने बाहेर पडला .


सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काहीही आढळून आले नाही . दिवसभरात कोणीच ह्या विनयला भेटायला आले नव्हते . सगळी प्रक्रिया आटोपून इन्स्पेक्टर शरद पहाटे घरी परत आला .


बिछान्यावर पडताच कधी डोळा लागला समजलेच नाही . ऊन बेडरूममध्ये आल्यावर त्या प्रकाशाने शरदला जाग आली . मस्त अंघोळ करून बाहेर आला आणि फोन वाजला .

" सर , पटकन व्हॉट्स ॲप ओपन करा . "
समीरा ओरडली .


तिला ओरडायचे मनात असूनही त्याने व्हॉट्स ॲप ओपन केले . विनयच्या मोबाईलवर त्याने खाली उडी घेताना एक व्हिडीओ रेकॉर्ड केलेला होता .


" नमस्कार , मी विनय प्रधान . तुम्ही सांगता तेच मी करणार आहे . हो , हा मी उठलोच . काय म्हणता बाहेर जाऊ . मस्त हवा येतेय . तुम्हीपण या . थोडे अजून पुढे जाऊ का ? "

अचानक पुढे विनयचा तोल गेला आणि तो खाली पडला .

समोर कोणीतरी असल्यासारखा विनय बोलत होता . नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे . भरभर आपले सगळे आवरून शरद क्राइम ब्रँच ऑफिसकडे निघाला .



विनयची मेडिकल हिस्ट्री तपासणे आवश्यक होते . ज्याप्रकारे त्याने व्हिडीओ बनवला तो सामान्य प्रकार वाटत नव्हता . विनयच्या मोबाईलमधून त्याच्या ऑफिसातील मित्रांचे नंबर मिळाले . त्यांच्यातील काही जणांना चौकशीसाठी इथे बोलवायचे शरदने ठरवले .


तितक्यात कदम पोस्टमोर्टम रिपोर्ट घेऊन आले . शरदने रिपोर्ट वाचला . कार्डियाक अटॅकने हृदय बंद पडून मृत्यू . याचा अर्थ खाली कोसळताना विनयला भीतीने हृदयविकाराचा झटका आला होता .

पंधराव्या मजल्यावरून खाली येताना काही क्षणात त्याचे हृदय बंद पडले होते . यावरून विनयने आत्महत्या केली नसल्याचे स्पष्ट दिसत होते .


इन्स्पेक्टर शरद भराभर मुद्दे नोंदवत होता . तितक्यात त्याने चौकशीला विनयचे मित्र हजर झाले .

" नमस्कार , मी इन्स्पेक्टर शरद . "
शरदने वातावरण हलके करत ओळख करून दिली .


" सर , विनय त्याच्या खाजगी आयुष्यात कोणाला डोकावू देत नव्हता . परंतु तो जीव नक्कीच देणार नाही . "
समोर बसलेला तरुण म्हणाला .

" बरं , त्याचे आईबाबा ,कोणी गर्लफ्रेंड ? इतर नातेवाईक ? "

" सर ते शोभा सांगू शकेल . तिच्याशीच जास्त बोलायचा विनय . "
त्याबरोबर शोभा पुढे आली .

" सर , त्याची आजी आहे कोकणात . बाकी नातेवाईक फार नाहीत . गर्लफ्रेंड वगैरे भानगडी न करता मजा करण्याचा त्याचा स्वभाव होता . "
हे सांगताना शोभाच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली .


" विनय कोणाकडे उपचार घेत होता का ? ऑफिसात त्याचे वागणे कसे होते ? "
शरदने पुढचा प्रश्न केला .

" प्रचंड प्रोफेशनल होता तो . मेडिकल हिस्ट्री मात्र आम्हाला ठाऊक नाही . "
त्यानंतर कदमांनी स्टेटमेंट लिहायला घेतले .


शरद कॉफी प्यायला बाहेर पडला . वरवर पाहता सामान्य वाटणारी ही घटना नक्कीच वेगळी असल्याची त्याची खात्री होती .
फक्त त्यासंदर्भात काहीच दिशा मिळत नव्हती .

कोण असेल खुनी ?
शरद हे रहस्य वाचू शकेल का ?