Login

भासती सत्य आभास जे भाग 2

एक थरार नक्की वाचा
भासती सत्य आभास जे भाग 2


मागील भागात आपण पाहिले विनय पाठक नावाचा तरुण पंधराव्या मजल्यावरून खाली पडतो . त्याबाबत तपास इन्स्पेक्टर शरद सुरू करतो आता पाहूया पुढे .


गेले आठ दिवस सर्व बाजूंनी तपास करूनही विनयने इतक्या वरून उडी का मारली याचे उत्तर सापडत नव्हते .

शरद इतर काही केसवर काम करत असताना अचानक समीरा किंचाळली , " सर ! इकडे या . "

शरद अक्षरशः पळत तिथे पोहोचला .

" समीरा , कुठेय पाल ? "

"इनफ हा सर , सारखी पालीला घाबरायला मी डॉक्टर प्रिया नाही . "
" मग किंचाळी कशाला फोडली . "

" हा इन्स्टाग्रामवर आलेला रिल बघा . "
तिने फोन समोर नाचवला .

" समीरा चेष्टा नको प्लीज . "

" सर सिरीयसली रिल बघा . ही सोशल मीडियावर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे . तिने लाइव्ह स्वतःचा गळा कापला आहे . "

" काय ? "
शरदने अक्षरशः फोन हिसकावून घेतला .


समोर एक बावीस तेवीस वर्षांची सुंदर मुलगी स्वतःच्या गाळ्यावर सुरी फिरवत होती . "

तितक्यात शरदचा फोन वाजला . पुढच्या मिनिटाला जीप ऑफिसच्या बाहेर पडली .


मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाट काढत गाडी डोंबिवलीकडे निघाली तशी समीरा , कदम आणि साळवे तिघांनी ओळखले आपल्याला कुठे जायचे आहे .


" सर , ही साक्षी पटेल नावाची पोरगी स्वतःच्या गळ्यावर सुरी फिरवते अशी काय संकटे असतील तिच्यावर ? "
कदम पटकन बोलून गेले .

" सर , विनय पाठक आणि ही केस जोडलेली असेल का ? म्हणजे दोघांनी मरताना व्हिडीओ केला आहे . "
समीरा म्हणाली .


" येस , समीरा हा मुद्दा लक्षात आलाच नव्हता . तिचे इंस्टाग्राम अकाऊंट चेक कर . आधीच्या पोस्ट मधून काही संदर्भ मिळतोय का ? "
शरद खुश होऊन म्हणाला .



अखेर तो प्रवास संपला आणि एका बिल्डिंगसमोर गाडी थांबली . स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी तोपर्यंत तपास सुरू केला होता . साक्षीचे आईवडील सुन्न होऊन भिंतीला टेकून बसले होते .


तिचा लहान भाऊ घाबरून एका कोपऱ्यात उभा होता . टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब घडलेल्या घटनेने घाबरून गेले होते .


" इन्स्पेक्टर , साक्षीचा फोन आणि लॅपटॉप आमच्या टीमला सोपवा . पुढील तपास क्राइम ब्रँच करेल . कदम कागदपत्रे दाखवा त्यांना . "
शरद सूचना देत घराचे निरीक्षण करत होता .



साक्षीचे आईवडील आणि भाऊ काहीच सांगण्याच्या अवस्थेत नव्हते .

" समीरा , तू इथे आसपास चौकशी कर . तिच्याबद्दल सगळी माहिती काढा . कदम शेजारी कोण आहेत त्यांच्याशी बोलून बघा . "
शरद भराभर सूचना देत होता .


उद्या पुन्हा साक्षीच्या कुटुंबाशी बोलायचे ठरवून शरद बाहेर पडला आणि त्याच्या मोबाईलवर मॅसेज आला . विनय गेले काही दिवस मानसिक उपचारासाठी औषधे ऑनलाइन मागवत होता .



आवश्यक धागा सापडला होता . विनय मानसिक आरोग्य समस्येवर उपचार घेत होता .

" कदम , त्या शोभाला बोलवा . "
शरद कदमला सूचना देऊन साक्षीने बनवलेला व्हिडिओ पुन्हा पहात होता .


इथेही साक्षी समोर कोणीतरी आहे असे समजून बोलत होती .


" मला शांतता मिळेल ना ? तुम्ही सांगाल ते मी करणार . हो , तुमच्यावर विश्वास आहे माझा . "

बोलताना साक्षी समोर बघत होती .

गळ्यातून रक्त उडाल्यावर मात्र तिच्या चेहऱ्यावर ती घाबरल्याचे स्पष्ट दिसत होते . इतक्यात शोभा आल्याचा निरोप आला .


" मिस शोभा , विनय गेले काही दिवस आजारी होता का ? " सरळ मुद्द्यावर येत शरदने विचारले .


" सर , त्यादिवशी सगळे असल्याने मला जास्त बोलता आले नाही . विनयला उंचावर भीती वाटायची . कंपनीने दिलेला हा फ्लॅट म्हणूनच तो घ्यायला तयार नव्हता . "


" पण मग असा माणूस गॅलरीत जाऊन वर चढून खाली उडी कशी मारेल ? "
शरदने पुन्हा विचारले .


" तेच कळत नाही सर . आणखी एक विनय काही डेटिंग ऍप वापरायचा . "

" ते तर कॉमन आहे आजकाल . "

" हो पण त्यावरून देखील काही धागा मिळू शकेल का ? " शोभा सहज बोलून गेली .


" शोभा , त्याची कोणी खास मैत्रीण ? "

" त्याबद्दल फार नाही सांगता येणार ."

शोभा बाहेर पडल्यावर विनयच्या फ्लॅटवर परत एकदा जायचे ठरवून शरद बाहेर पडला .



" समीरा , विनयने मागवली तीच औषधे साक्षीने मागवली का ? ऑनलाइन काही प्रिस्क्रिप्शन अपलोड केले होते का ? याचा शोध घे . "

समीराला सूचना देऊन शरदने बुलेट काढली .


साध्या वेषात असल्याने त्याने मुद्दाम चौकीदाराला फक्त ओळखपत्र दाखवून प्रवेश केला . लिफ्टमध्ये शिरला आणि सोबत दोन वयस्कर बायका होत्या .


" दामले तो विन्या मेला वाईट झाले नाही . "

" अगं हलकट होता मेला . कितीतरी बायका आणायचा फ्लॅटवर . "
दुसऱ्या आजी पटकन बोलून गेल्या .


दोन्ही महिला लिफ्टबाहेर पडल्या . शरद विनयच्या फ्लॅटवर आला . सगळीकडे शोधूनही फक्त औषधांच्या बाटल्या तेवढ्या सापडल्या . आता याबाबत एकच व्यक्ती मदत करू शकत होती . शरदने फोन लावला .


" अहो भाग्य माझे चक्क मुंबईच्या शेरलॉक होम्सनी मला फोन केला . "
प्रियाचा कुत्सित स्वर कानावर पडला .


अखेरीस तिला कसेबसे समजावून शरद नेहमीच्या ठिकाणी पोहोचला .


प्रियाने औषधे पाहिली .

" शरद तणाव कमी करण्यासाठी अगदी सौम्य डोस दिला जातो . ते देखील ठराविक काळ . "

" समजा ही औषधे जास्त प्रमाणात घेतली तर ? "

" तर त्या व्यक्तीला भास होणे , झोप न लागणे अशा व्याधी होऊ शकतात . ही औषधे डॉक्टरांनी लिहून दिली तरच मिळणार . " प्रियाने माहिती पुरवली .


याचाच अर्थ कोणीतरी डॉक्टर नक्की आहे . शरदला आता खात्री पटली . प्रियाला भेटून शरद बाहेर पडला आणि त्याला पत्रकारांनी घेरले . साक्षी सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्याने बातमी जोरदार पसरत होती .


पत्रकारांना टाळून शरद घरी आला . तितक्यात त्याच्या फोनवर एक अनोळखी नंबर झळकला .

" हॅलो , शरद अंकल माझ्या पप्पांना वाचवा . "

पलीकडून एक लहान मुलगी रडत होती . शरदाने पत्ता लिहून घेतला आणि सरळ गाडी काढली .

नक्की कोणाचा हात असेल ह्यामागे ?
केवळ भास होण्याने लोक स्वतःचा जीव का घेत आहेत ?

वाचत रहा .
भासती सत्य आभास जे
©® प्रशांत कुंजीर

0

🎭 Series Post

View all