Login

भातुकलीचा खेळ भाग 1

About Marriage

"अहो शिंदेबाई, तुम्हांला काही कळलं का?"

मोरेबाईंनी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शिंदेबाईंना उत्सुकतेने विचारले.

"कशाबद्दल विचारत आहेत तुम्ही?"

शिंदेबाईंनी प्रश्नार्थक नजरेने मोरेबाईंना विचारले.

"अहो, आपल्या काॅलनीतील सावंतबाईंच्या सूनेबद्दल विचारते आहे. ती इकडे सासरी घरी नाही आहे. असे ऐकण्यात आले माझ्या."

मोरेबाई चेहऱ्यावर साशंक भाव आणत शिंदेबाईंना म्हणाल्या.

"अहो, गेली असेल माहेरी किंवा फिरायला गेले असेल न्यू मॅरीड कपल."

शिंदेबाई हसत हसत म्हणाल्या.

"माहेरी एवढे दिवस राहू देत का कोणी? आणि सावंतबाईंचा रोहित तर इथेच आहे."

शिंदेबाईंची शंका दूर करत मोरेबाई म्हणाल्या.

"जाऊ द्या ना असेल काही काम किंवा असेल काही कारण ..आपल्याला काय करायचे आहे? कधी ना कधी कळेलच ..काय कारण आहे ते."

शिंदेबाई विषय संपवण्यासाठी म्हणाल्या.

"अहो, माझ्याकडे घरकाम करणार्‍या सोनालीला, सावंतबाईंकडे काम करणारी भारती सांगत होती की, ' सावंतांच्या घरात सध्या सर्वजण टेंशनमध्ये आहेत. रोहितच्या लग्नामुळे घरात जो आनंद झाला होता,तो आता दिसत नाही. नक्कीच काहीतरी झालेले आहे.'

भारतीला कारण वगैरे काही कळाले नाही, तिने सूनेबद्दल सावंतबाईंना विचारले तर.. ती माहेरी गेल्याचे त्यांनी तिला सांगितले; पण घरातील वातावरण पाहून तिला वेगळेच काही वाटत आहे आणि तिने हे सर्व सोनालीला सांगितले व सोनालीने मला हे सर्व सांगितले. मला वाटले तुम्हांला यातले काही अजून माहिती असेल. तुमचे आणि सावंतबाईंचे चांगले जमते ना !"

मोरेबाई अधिक माहिती देत शिंदेबाईंना म्हणाल्या.

" माझे व सावंतबाईंचे चांगले जमते. हे खरे आहे; पण मला अजून तरी त्या काही बोलल्या नाही याबद्दल. आता तुम्ही हे सर्व सांगत आहेत,तेव्हाच मला हे कळते आहे. तुम्ही सांगितलेले ऐकून वाटते की, नक्कीच काहीतरी झाले असेल. आपण याविषयावर सावंतबाईंना असे सरळपणे विचारले तर त्या काही सांगणार नाही आणि आपण असे कसे विचारू शकतो ना त्यांना? बघू कळेल काही दिवसांनी."

शिंदेबाई विचार करत म्हणाल्या.

"हो,ना ..अशा गोष्टी कितीही लपवल्या तरी लपत नाही.कधी ना कधी कळतातच इतरांना."

मोरेबाई म्हणाल्या.

"रोहितचे लग्न जमले तेव्हापासून सावंतबाई किती आनंदी होत्या. दिसायला सुंदर, उच्चशिक्षित, नोकरी करणारी सून मिळाली व तिच्या माहेरचे लोकही चांगले मिळाले.यामुळे सावंतांच्या घरात आनंदच आनंद होता. लग्न ही किती छान झाले! पण आज तुम्ही जे काही सांगितले ते ऐकून खूप वाईट वाटले. ज्यामुळे घरात टेंशन आहे,ते लवकर दूर व्हावे आणि पुन्हा त्या घरात आनंद यावा. असेच मला वाटते."

शिंदेबाई काळजीने म्हणाल्या.

"हो, देव करो व सर्व चांगलेच होवो."

मोरेबाई शिंदेबाईंच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाल्या.